Marathi people in Pakistan Karachi

marathi.jpg

Marathi people in Pakistan Karachi

भोसले, जगताप, जाधव, सांडेकर, दुपटे… या आडनावांच्या माणसांची भेट कराचीत होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण तसे घडले खरे. कराची प्रेस क्लबच्या निमंत्रणावरून पाकिस्तानभेटीवर गेलेल्या मुंबई प्रेस क्लबच्या पत्रकारांना या मराठी मंडळींना भेटण्याची संधी मिळाली. स्थानिक पत्रकारांकडून मिळवलेल्या फोन नंबरवर मराठीतून बोलल्यावर पलीकडून आनंदातिशयाने प्रतिसाद आला आणि ही मराठी मंडळी थेट भेटायलाच आली. त्यांच्याबरोबर संवाद साधताना ‘आम्ही इथे अगदी मजेत आणि सुरक्षित आहोत. नोकरी व्यवसाय उत्तम चाललेत’, अशीच भावना त्यांनी व्यक्त केली.

सध्या पाकिस्तानात तब्बल दोन हजार मराठी माणसे राहतात. त्यातील बहुसंख्य कराचीत आहेत. ‘श्री महाराष्ट्र पंचायत कराची’ या संस्थेशी ही सगळी मंडळी जोडलेली आहेत. परमेश जाधव या संस्थेचे अध्यक्ष. कराचीतल्या ‘गझीबा बॉम्बे चाट अँड मसाला डोसा’ या भारतीय पदार्थ मिळणाऱ्या मोठ्या रेस्तराँमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. फाळणीच्या आधीपासून अनेक वर्षे ही मंडळी तिथे आहेत. व्यापाऱ्यांसोबत मदतनीस, ड्रायव्हर, हमाल अशा कामांसाठी ही मराठी माणसे मुंबईहून कराचीला पोहचली असावीत. गेल्या शंभरेक वर्षांत त्यांनी महाराष्ट्राशी असलेले नाते कायम ठेवले आहे.

‘ आम्ही पाकिस्तानात सुखी आहोत. नोकरी व्यवसायातही भरभराट आहे. पण , आपल्या माणसांना मात्र भेटावेसे वाटते. कधी जेजुरी-तुळजापूरला जाऊन कुलदैवतेचे दर्शन घ्यायचे असते. हे जाणे-येणे सोपे व्हावे. दोन्ही देशांनी व्हिसा प्रक्रिया सोपी केली , तर हे शक्य होईल. तुम्ही आपल्या मराठी माणसांपर्यंत हा निरोप नक्की पोहचवा ‘, अशी कळकळीची विनंती पाकिस्तानातल्या मराठी माणसांनी मुंबई प्रेस क्लबच्या पत्रकारांना केली.

कराचीतील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या दिलीप भोसले यांची सासुरवाडी मुंबईतल्या मुलुंडची. त्यांची पत्नी आणि मुली सध्या मुंबईत आल्या आहेत. रवी जगताप यांचे मूळ गाव पुण्याजवळचे खडकी. तर देवानंद सांडेकरांचे वडील मुंबईहून कराचीत आले होते. सांडेकरांना एकदा तरी मुंबईला यायचे आहे. एकदा येण्याचा प्रयत्न केला पण व्हिसा मिळाला नाही , त्यानंतर ते राहूनच गेले. विशाल राजपूतची आई मधुमती खरात मराठी आहे. तर गणेश गायकवाडांचे वडील पापडाचा व्यापार करायला कराचीत आले होते. त्यांची पत्नी पाकिस्तानातच जन्मली वाढली , पण सासू मात्र मुंबईकर आहे. कराचीभर प्रसिद्ध असलेली टेलरिंग फर्म तुळशीराम दुपटे या मराठी माणसाची आहे!

या मुस्लिमबहुल देशात तुम्हाला त्रास नाही का होत , या प्रश्नावर सगळ्यांचे ठाम उत्तर ‘ नाही ‘ असे होते. अपवाद म्हणून बाबरी मशिद पाडली तेव्हा दंगली झाल्या. पण , त्यावेळीही या मंडळींना वाचवले ते त्यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांनी , असे त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक बंध

नारळी पौर्णिमा , चैत्र पाडवा , दिवाळी , होळी हे सण ही मंडळी अगदी धुमधडाक्यात साजरे करतात. सार्वजनिक गणपती बसवतात. त्याचे विसर्जनही दणक्यात होते. पुरणपोळी आणि मोदकांसह आज महाराष्ट्रातही विस्मरणात गेलेले पुरणाचे कानवले आणि कडकणी हे पदार्थही त्यांच्या घरात होतात.

कोकण कनेक्शन

डॉन या पाकिस्तानातील आघाडीच्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या सिद्रा रोघे हिचेही कोकणाशी थेट नाते आहे. तिचे आजी-आजोबा मुरुडजवळच्या रेवदंड्याचे. फाळणीच्या वेळी चांगल्या नोकरीच्या शोधात ते कराचीला आले. पुन्हा कोकणात जाऊन लग्न केले. पाठोपाठ भाऊही कराचीत आला. पुढे भारत दाखवायला रोघे मुलांना घेऊन गेले होते , तेव्हा मात्र खूप संशयाने पाहिले गेले. त्यानंतर मात्र येणे झाले नाही. सिद्राला मात्र संधी मिळाली की , तिचे रूट्स शोधायला रेवदंड्याला यायचे आहे.
Marathi people in Pakistan Karachi

shree maharashtra panchayat karachi

Similar Posts

One Comment

Leave a Reply to Rajendra Ramchandra Chitre Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *