Old weapons names and pictures – Part 2

Old weapons names and pictures – Part 1 is here

 

अमेरिकी एम १ गरँड रायफल

चार वर्षे प्रचंड उत्पात घडवून १९१८ साली पहिले महायुद्ध थांबले.  मात्र त्याने युरोपमध्ये आणि जगात स्थायी स्वरूपाची शांतता प्रस्थापित होऊ शकली नव्हती. विविध देशांतील हेवेदावे पूर्णपणे मिटले नव्हते. युद्धाचा हा पूर्णविराम नसून केवळ स्वल्पविराम आहे असेच वाटत होते. त्यामुळे सर्वच प्रमुख देश आगामी संघर्षांसाठी शस्त्रसज्ज होत होते. अमेरिकेच्या स्प्रिंगफिल्ड आर्सेनलमधील  जॉन गरँड यांनी १९२० च्या दशकात .३० कॅलिबरची रायफल  डिझाइन केली होती.  ती १९३६ साली अमेरिकी सैन्याने अधिकृत रायफल म्हणून स्वीकारली. ती एम-१ गरँड रायफल म्हणून ओळखली गेली.

एम-१ गरँड ही मजबूत, सेमी-ऑटोमॅटिक, गॅस-ऑपरेटेड रायफल होती. तिच्या मॅगझिनमध्ये ८ गोळ्या मावत. त्यातून एका मिनिटाला १६ ते २४ गोळ्या झाडता येत. तिचा एकूण पल्ला ११०० मीटर असला तरी ती ४२० मीटपर्यंत प्रभावी आणि अचूक मारा करू शकत असे. अमेरिकी जनरल जॉर्ज पॅटन यांनी  एम-१ गरँड रायफलचे वर्णन आजवर डिझाइन करण्यात आलेले सर्वात चांगले आणि जगातील सर्वात घातक शस्त्र म्हणून केले होते. अमेरिकी लष्कराने ती स्वीकारल्यानंतर  १९५७ पर्यंत तिच्या साधारण ५४ लाख प्रती निर्माण केल्या गेल्या होत्या.  एम-१ गरँड रायफलने अमेरिकी सैनिकांची दुसरे महायुद्ध, कोरियन युद्ध आणि व्हिएतनाम युद्धापर्यंत साथ केली.

या बंदुकीत एक त्रुटी होती. तिच्या गोळ्या संपल्या की गोळ्या ज्यात बसवलेल्या असत ती धातूची क्लिप ‘पिंग’ असा आवाज करत बाहेर पडे. त्या आवाजाने शत्रूला बंदूक रिकामी झाल्याचे कळत असे आणि तो त्या सैनिकाला मारत असे. अशा पद्धतीने अमेरिकेचे अनेक सैनिक मारले गेले. पण त्यावर मात करण्यासाठी अमेरिकी सैनिकांनी लवकरच एक शक्कल शोधून काढली. ते रायफल पूर्ण भरून तयार ठेवत आणि एखादी मोकळी क्लिप कठीण जमिनीवर फेकत. त्याच्या आवाजाने शत्रूसैनिकाला अमेरिकी सैनिकाची रायफल रिकामी असल्याचा समज होऊन तो डोके वर काढत असे आणि मारला जात असे.

एम-१ रायफलचे निर्माते जॉन गरँड यांची कहाणीही तितकीच उद्बोधक आहे.  जॉन गरँड यांचा जन्म १ जानेवारी १८८८ रोजी कॅनडातील क्युबेक येथे झाला. वयाच्या ११ व्या वर्षी ते कनेक्टिकट येथील कापड कारखान्यात जमीन (फरशी) पुसण्याचे काम करत. पण यंत्रसामग्रीमध्ये त्यांना विलक्षण रस होता. फावल्या वेळात त्यांनी या कारखान्यातील सर्व यंत्रांचे काम जाणून घेतले होते. वयाच्या १८व्या वर्षी ते त्या कारखान्यात मशिनिस्ट म्हणून काम करू लागले होते.

नोव्हेंबर १९१९ मध्ये ते मॅसॅच्युसेट्स येथील स्प्रिंगफिल्ड आर्मरीमध्ये काम करू लागले आणि तेथेच चीफ सिव्हिलियन इंजिनियर बनले. तेथेच त्यांनी एम-१ रायफल बनवली आणि अन्य  शस्त्रांचा विकास केला. मात्र त्याबद्दल संपूर्ण सेवाकाळात त्यांना सरकारी पगाराशिवाय वेगळे काहीही मिळाले नाही. गरँड यांच्या योगदानाबद्दल त्यांना काही आर्थिक लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी होऊ लागली. पण त्यांना १ लाख डॉलरची मदत करण्याचा प्रस्ताव अमेकिी काँग्रेसमध्ये चर्चेला आला तेव्हा तो संमत झाला नाही. गरँड यांना १९४१ साली मेडल फॉर मेरिटोरियस सव्‍‌र्हिस आणि १९४४ साली गव्हर्नमेंट मेडल फॉर मेरिट ही सन्मानपदके मिळाली. गरँड १९५३ साली सेवनिवृत्त झाले आणि १६ फेब्रुवारी १९७४ साली त्यांचे निधन झाले.

 

हिटलर आणि जेम्स बॉण्डने वापरलेले वॉल्थर पीपीके

जगातील सर्वात प्रसिद्ध पिस्तुलांमध्ये जर्मन वॉल्थर पिस्तुलांचे स्थान नक्कीच अव्वल आहे. कार्ल वॉल्थर यांनी १८८६ साली स्थापन केलेल्या या कंपनीची पिस्तुले आजही जगभरात वापरात आहेत. त्यांच्या विविध सुधारित आवृत्तींचे आता अमेरिका, फ्रान्ससह अन्य देशांमध्येही उत्पादन होते. अ‍ॅडॉल्फ हिटलरने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेर ३० एप्रिल १९४५ रोजी आत्महत्येसाठी वॉल्थर पीपीके हे पिस्तूल वापरले होते. इयान फ्लेमिंग यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध जेम्स बॉण्ड या काल्पनिक पात्राच्या हाती सुरुवातीला .२५ बरेटा ४१८ पिस्तूल दिले होते. पुढे शस्त्रास्त्रतज्ज्ञ जॉफ्रे बूथरॉइड यांच्या सूचनेनंतर फ्लेमिंग यांनी डॉ. नो या कादंबरीपासून बॉण्डच्या हाती वॉल्थर पीपीके हे पिस्तूल दिले. तेव्हापासून जेम्स बॉण्डचे पिस्तूल म्हणून वॉल्थर पीपीके प्रसिद्ध आहे.

वॉल्थर पीपी हे पिस्तूल १९२९ साली प्रथम बाजारात आले. वॉल्थर पोलीस पिस्टल असे त्याचे पूर्ण नाव होते. ते प्रामुख्याने जर्मन पोलीस अधिकाऱ्यांसाठी तयार केले होते. अत्यंत सुबक आणि सुटसुटीत डिझाइनचे हे पिस्तूल तितकेच भक्कम बांधणीचे आणि वापरास खूपच प्रभावी होते. त्याची लांबी साधारण साडेसहा इंच तर वजन अवघे ०.६८२ किलोग्रॅम होते. त्यात ८ गोळ्यांचे बॉक्स मॅगझिन बसत असे आणि हे सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल ब्लो-बॅक अ‍ॅक्शन तंत्रावर चालत असे. त्याच्या विविध आवृत्तींमध्ये ९ मिमी शॉर्ट, ७.६५ मिमी, ६.३६ मिमी आणि ०.२२ इंच अशा कॅलिबरच्या गोळ्या वापरल्या जात. पण वॉल्थर पीपीमध्ये प्रामुख्याने ०.३२ इंच एसीपी (७.६५ मिमी व्यास आणि १७ मिमी लांबीचे) काडतूस वापरले जायचे. सुरुवातीला पोलिसांसाठी तयार केलेल्या या पिस्तुलाचे गुण लवकरच जर्मन सेनादलांनीही हेरले आणि लष्करासह जर्मन हवाईदलात म्हणजे लुफ्तवाफमध्ये वॉल्थर पीपी प्रसिद्ध झाले.

१९३० साली त्याची वॉल्थर पीपीके (पोलीस पिस्टल कुर्झ) ही आवृत्ती वापरात आली. जर्मन भाषेत कुर्झ म्हणजे लहान किंवा आखूड. मूळ पीपी पिस्तुलापेक्षा पीपीके लांबीला थोडे लहान होते. त्याच्याही विविध कॅलिबरच्या आवृत्ती असल्या तरी त्यात प्रामुख्याने ०.३२ इंच एसीपी हे काडतूस वापरले जायचे. वॉल्थर पीपीकेचे वजन केवळ ०.५६८ किलोग्रॅम होते. त्यात ७ गोळ्यांचे मॅगझिन बसवले जायचे. त्याची सेफ्टी कॅच म्हणजे सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी होती.

याशिवाय १९३८ साली वॉल्थर पी-३८ नावाचे पिस्तूलही वापरात आले. ते प्रामुख्याने आधीच्या जर्मन लुगर पिस्तुलांना पर्याय म्हणून विकसित झाले होते. डबल अ‍ॅक्शन ट्रिगर, इंडिकेटर पिन असलेली हॅमर सेफ्टी आदी वॉल्थर पिस्तुलांची खासियत होती. डबल अ‍ॅक्शन प्रकारात ट्रिगर दाबल्यावर बंदूक कॉक आणि फायर दोन्ही होते. म्हणजे ट्रिगर आणि हॅमरचे काम एकाच वेळी होते. तर हॅमर सेफ्टी इंडिकेटर पिनमुळे पिस्तूल भरलेले आहे की रिकामे आहे हे कळत असे.

वॉल्थर पिस्तुलांनी दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचे प्रमुख पिस्तूल म्हणून काम केले. नाझी सेनादलांचे आणि राजवटीचे ते एक दृश्यचिन्ह म्हणून आकारास आले. त्याची परिणामकारता इतकी चांगली होती की आजही अमेरिकेत स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीतर्फे आणि फ्रान्समध्ये मॅनुऱ्हिन कंपनीतर्फे त्यांचे उत्पादन होते.

 

गांधीहत्येसाठी वापरलेले एम १९३४

a gun to kill gandhi

इटलीतील बरेटा ही जगातील सर्वात जुनी आणि अद्याप सुरू असलेली शस्त्रास्त्र कंपनी मानली जाते. १५२६ साली स्थापना झाल्यापासून आजतागायत गेली ५०० वर्षे ही कंपनी इटालियन सैन्याला अव्याहतपणे शस्त्रे पुरवत आली आहे.  सुरुवातीला ही कंपनी बंदुकांच्या केवळ बॅरल बनवत असे. आज ती मुख्यत्वे दर्जेदार पिस्तुलांसाठी प्रसिद्ध आहे.

बरेटाचे पहिले पिस्तूल १९१५ साली तयार झाले. प्रत्यक्षात पहिल्या महायुद्धात तातडीच्या गरजेतून या पिस्तुलाची निर्मिती झाली होती. पण त्याने बरेटासाठी एक नवे दालन उघडले आणि नंतर तिच बरेटाची ओळख बनली. बरेटा मॉडेल १९१५ पिस्तुलाची पहिली आवृत्ती ७.६५ मिमीची होती. त्यात रिकामे काडतूस बाहेर फेकण्यासाठी फायरिंग पिनचा वापर केला होता. या पिस्तुलाच्या पुढील आवृत्तीत कॅलिबर ९ मिमी करण्यात आले. तसेच रिकामे काडतूस बाहेर टाकण्यासाठी इजेक्टर स्टॉप पद्धत वापरण्यात आली. त्यामुळे सुधारित आवृत्ती अधिक खात्रीशीर बनली होती.

त्यानंतरचे पिस्तूल १९३४ साली बाजारात आले. दुसऱ्या महायुद्धात या पिस्तुलाचे व्यापक प्रमाणावर उत्पादन झाले आणि बरेटा जगातील सर्वात मोठय़ा पिस्तूलनिर्मात्या कंपन्यांपैकी एक बनली. १९३० च्या दशकात इटलीचे सैन्य जर्मनीच्या वॉल्थेर पीपी नावाच्या पिस्तुलाने चांगलेच प्रभावित झाले होते. त्यामुळे इटलीच्या सैन्याला पिस्तूल पुरवण्यासाठी जर्मनीच्या कंपनीकडून स्पर्धा निर्माण होण्याची भीती बरेटाला वाटत होती. त्यातून बरेटाने मॉडेल १९३४ हे सेमी -ऑटोमॅटिक पिस्तूल बनवले. ते इटलीच्या सैन्याने १९३७ साली अधिकृत पिस्तूल म्हणून स्वीकारले. त्याच्या पुढची मॉडेल १९३५ ही आवृत्तीही नंतर तयार झाली. ते पिस्तूलही एम १९३४ सारखेच होते. पण त्यातून .३२ एसीपी (७.६५ ब्राऊनिंग) काडतुसे डागली जात.

बरेटा पिस्तुलांची ओळखीची खूण म्हणजे त्यांच्या स्लाइडवरील भागातील मोकळी खाच. पिस्तूल कॉक करण्यासाठी स्लाइड खेचले जाते. गोळी झाडल्यानंतर स्लाइड मागेपुढे होते आणि त्याच्या वरील मोकळ्या खाचेतून झाडलेल्या काडतुसाचे रिकामे आवरण बाहेर पडते. बरेटाच्या एम १९३४ च्या निर्मितीत कमीत कमी सुटे भाग वापरलेले असल्याने ते वापरास आणि देखभालीस अत्यंत सोपे पिस्तूल होते. त्यात एक गोळी झाडल्यानंतर दुसरी गोळी चेंबरमध्ये आणण्यासाठी ब्लो-बॅक पद्धती वापरली होती. त्याच्या मॅगझिनमध्ये ७ गोळ्या मावत. या पिस्तुलाची एक त्रुटी म्हणजे त्याचा हॅमर उघडा होता. सेफ्टी कॅच लॉक केल्यावर केवळ ट्रिगर लॉक होत असे आणि हॅमर खुला राहत असे. अशा वेळी हॅमर नुसता ओढून सोडला तरी पिस्तुलातून चुकीने गोळी झाडली जात असे.

भारतीयांना बरेटा मॉडेल १९३४ पिस्तूल माहीत आहे, ते ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी वापरले म्हणून. त्याचा सीरियल नंबर ६०६८२४ असा होता आणि त्यात .३८० एसीबी प्रकारच्या गोळ्या वापरल्या जात. १९३४ साली इटलीत तयार झालेले हे पिस्तूल एका अधिकाऱ्याने इटलीच्या अ‍ॅबिसिनीयावरील आक्रमणात वापरले. त्यानंतर ते एका ब्रिटिश अधिकाऱ्याकडे गेले. त्यानंतर त्याची मालकी अनेकदा बदलली. पण ते भारतात कसे आले आणि गोडसेच्या हाती कसे पडले याचा नेमका सुगावा लागत नाही.

 

मॅग्झिम आणि व्हिकर्स मशिनगन

गॅटलिंग गन प्रामुख्याने हाताने फिरवावी लागत असल्याने तिच्या वापरावर मर्यादा होत्या. १८८० च्या दशकात स्मोकलेस पावडरचा शोध लागल्यानंतर ही अडचण दूर झाली. नेहमीच्या गनपावडरच्या ज्वलनातून निर्माण होणारा धूर आणि वायू अनियमित असे. स्मोकलेस पावडरचे ज्वलन अधिक नियमित प्रकारे होते. त्यातून निर्माण होणाऱ्या बंदुकीच्या धक्क्य़ाचा किंवा रिकॉइलचा वापर करून बंदुकीतून झाडलेल्या गोळीचे रिकामे आवरण बाहेर फेकणे आणि नवी गोळी फायरिंग चेंबरमध्ये आणणे ही कामे करता येऊ लागली. हे तंत्र वापरून अमेरिकेतील हिरम स्टीव्हन्स मॅग्झिम यांनी १८८४ साली ऑटोमॅटिक मशिनगन बनवली. ती मॅग्झिम मशिनगन म्हणून गाजली. त्यांच्या पाठोपाठ ते तंत्र वापरून हॉचकिस, लेविस, ब्राऊनिंग, मॅडसन, माऊझर आदींनीही मशिनगन बनवल्या. आता खऱ्या अर्थाने मशिनगन युग अवतरले होते आणि रणांगणावर मृत्यू थैमान घालू लागला होता.

कोणत्याही मशिनगनला उष्णता ही मुख्य अडचण भेडसावत होती. बंदुकीच्या दारूचा चेंबरमध्ये होणारा स्फोट, त्यातून निर्माण होणारे गरम वायू आणि तापलेली गोळी बंदुकीच्या बॅरलच्या आतील पृष्ठभागावर घासून वेगाने बाहेर पडताना बरीच उष्णता निर्माण होते. त्याने मशिनगनचे बॅरल खूप तापते. परिणामी  मशिनगन एक तर जॅम होऊ शकते किंवा ट्रिगर न दाबदाच सलग गोळ्या झाडल्या जाऊ शकतात. त्यामुळे मशिनगन थंड ठेवणे हे तिच्या रचनाकारांसाठी एक आव्हान असते. मॅग्झिम यांनी ही अडचण सोडवण्यासाठी बॅरलच्या भोवतीने धातूचे दंडगोलाकार आवरण बसवून त्यात पाणी खेळते ठेवले होते. त्यामुळे मशिनगन थंड राहत असे. याला वॉटर-कुल्ड सिस्टम म्हटले जाते.

मॅग्झिम मशिनगनचे वजन साधारण २७ किलो होते. त्यात कॅनव्हासवर बसवलेल्या २५० गोळ्यांचा पट्टा भरला जायचा. त्यात .३०३ कॅलिबरच्या गोळ्या वापरल्या जात. मॅग्झिम मशिनगन मिनिटाला ५५० ते ६०० गोळ्या झाडू शकत असे. ती चालवण्यासाठी ४ सैनिक लागत. मशिनगनच्या वजनामुळे ती एकटय़ाला उचलणे अवघड होते. त्यामुळे ती युद्धभूमीवर एका ठिकाणाहून दुसरीकडे लगेच नेता येत नसे. एकाच ठिकाणाहून तिला फायर करावे लागे.

पुढे १८९६ साली मॅग्झिम यांची कंपनी ब्रिटनच्या व्हिकर्स लिमिटेड या कंपनीने विकत घेतली. त्यांनी मॅग्झिम मशिनगनमध्ये सुधारणा करून व्हिकर्स मशिनगनची निर्मिती केली. मूळच्या मॅग्झिम मशिनगनच्या कार्यपद्धतीत काही बदल केले. तिचे वजन कमी केले. काही सुटय़ा भागांसाठी मिश्रधातू वापरले गेले. त्याने मशिनगनची ताकद वाढली. तसेच बॅरलच्या पुढील टोकाला मझल बूस्टर बसवण्यात आला. त्याने रिकॉइलची ऊर्जा अधिक कार्यक्षमतेने वापरता येते आणि बंदूक आणखी खात्रीलायक बनते. ब्रिटिश लष्कराने नोव्हेंबर १९१२ मध्ये व्हिकर्स मशिनगन त्यांची स्टँडर्ड मशिनगन म्हणून स्वीकारली. त्याच्या जोडीने मॅग्झिम मशिनगनही वापरात होती.

आतापर्यंत विमानांचा उगम होऊन ती युद्धात वापरली जाऊ लागली होती. विमानावर मशिगनग बसवण्यासाठी वैमानिकाच्या पुढील जागा सर्वात योग्य होती. पण तेथे मशिनगनच्या गोळ्यांच्या वाटेत प्रोपेलरची पाती येत असत. यावर मात करण्यासाठी ‘गन सिन्क्रोनायझरचा’ शोध लागला. त्यात प्रोपेलरची पाती आणि मशिनगनचा मेळ साधून फिरत्या पात्यांच्या मधून गोळ्या झाडल्या जातात. व्हिकर्स बायप्लेन या विमानात १९१३ साली ही प्रणाली बसवली गेली.

 

मशीनगनचा उगम आणि गॅटलिंग गन

मशीनगनच्या शोधाने युद्धतंत्रात क्रांती केली. त्यापूर्वीच्या बंदुकांनी एकेक किंवा फार तर एका मिनिटात १५-२० गोळ्या झाडू शकणाऱ्या सैनिकाच्या हाती भयंकर मारक शक्ती आली. आता एकटा सैनिक शत्रूच्या संपूर्ण तुकडीला थोपवू किंवा संपवू शकत होता. मशीनगनच्या आगमनाने पारंपरिक पायदळाची युद्धभूमीवरील व्यूहरचना बदलली. पहिले महायुद्ध हे बहुतांशी मशीनगनचे युद्ध म्हणूनच ओळखले जाते. त्यातील व्हर्दून आणि सोम येथील लढायांमध्ये मशीनगन्सनी लाखो सैनिकांचे प्राण घेतले. जॉन ब्राऊनिंग यांची मशीनगन या युद्धात प्रभावी ठरली असली तरी मशीनगनचे जनक ते नव्हते. त्यांच्या आधीही अनेक जणांनी या कल्पनेवर काम केले होते.

सुरुवातीच्या फ्लिंटलॉक आणि पर्कशन लॉक बंदुकांच्या निर्मितीनंतर एकापेक्षा अधिक गोळ्या झाडू शकणाऱ्या शस्त्रांची मागणी वाढू लागली. त्यातून रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, रीपिटिंग रायफल आदींचा जन्म झाला. त्यातून फार तर ५, १०, २० गोळ्या झाडता येत असत. पुढे ही शस्त्रेही युद्धात कमी पडू लागली.

सुरुवातीला एका वेळी अनेक गोळ्या झाडण्यासाठी बंदुकीच्या नळ्यांची संख्या वाढवून प्रयत्न केले गेले; पण नळ्यांची संख्या वाढवण्यावर मर्यादा होती. सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये  फिलाडेल्फियाचे जोसेफ बेल्टन, ब्रिटनमधील हेन्री क्लार्क, हेन्री बेसेमर, अमेरिकेतील जॉन रेनॉल्ड्स, सी. ई. बार्नेस, विल्सन अ‍ॅगर यांची अ‍ॅगर किंवा कॉफी मिल गन यांचा समावेश होता. पण ही सर्व मॉडेल्स प्रत्यक्ष वापरास कुचकामी ठरली.

लंडन येथील जेम्स पकल यांनी १७१८ साली पहिली मशीननग प्रत्यक्षात तयार केली. तत्पूर्वी हे शस्त्र केवळ कल्पनेतच किंवा ड्रॉइंग बोर्डवरच अस्तित्वात होते. पकल गनमध्ये गोलाकार फिरणारा सिलेंडर होता आणि त्याद्वारे चेंबरमध्ये गोळ्या भरल्या जात. त्यामध्ये वर्तुळाकार रचनेत अनेक बॅरल्स बसवलेली असत आणि ती एका हँडलद्वारे हाताने गोलाकार फिरवली जात. त्याला हँड क्रँक सिस्टम म्हटले जायचे. त्याने त्यातून गोळ्या झाडल्या जात. हे तंत्र वापरून अमेरिकेत अनेक मशीनगन्स तयार झाल्या आणि अमेरिकी गृहयुद्धात वापरल्याही गेल्या.

मात्र पकल यांच्या मशीनगनमध्ये गोळ्या झाडण्यासाठी पर्कशन लॉक व्यवस्था होती. त्यामुळे तिच्यावर मर्यादा येत होती. सेल्फ कंटेन्ड मेटॅलिक काटिर्र्जचा विकास झाल्यानंतर एका वेळी अनेक गोळ्या झाडू शकणाऱ्या शस्त्रांच्या विकासालाही चालना मिळाली.

त्यात सर्वात प्रभावी मशीनगन होती ती गॅटलिंग गन. अमेरिकी गृहयुद्धादरम्यान १९६२ साली रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांनी तयार केलेल्या मशीनगनला गॅटलिंग गन म्हणतात. त्यात १० बॅरल्स होती. ती हाताने फिरवली जात. प्रत्येक बॅरलचा वर्तुळाकार फेरा पूर्ण होताना त्यात गोळी भरली जाऊन ती झाडली जायची. त्यानंतर बॅरलचा अर्धा फेरा पूर्ण होताना त्यातील रिकामे काडतूस बाहेर काढले जायचे. सुरुवातीला गॅटलिंग यांनीही पर्कशन लॉक पद्धत वापरली होती; पण पुढील आवृत्तीत त्यांनी सेल्फ कंटेन्ड काटिर्र्ज वापरले आणि मशीनगन अधिक प्रभावी बनवली. अशा पद्धतीने गॅटलिंग गनमधून एका मिनिटात ३००० गोळ्या झाडल्या जात. कालानुरूप मशीनगनची क्षमता वाढवण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यात विजेवर चालणारी मोटर वापरून मशीनगन चालवली गेली. त्याच तंत्रात आता अनेक सुधारणा झाल्या असून आजही गॅटलिंग गनच्या सुधारित आणि शक्तिशाली आवृत्ती वापरात आहेत.

ब्राऊनिंग ऑटोमॅटिक रायफल, मशिनगन आणि शॉटगन

colt model 1895
colt model 1895

जॉन ब्राऊनिंग १८९० च्या दशकात ऑगडेन येथे एकदा नेमबाजी करत होते. अन्य एका नेमबाजाच्या बंदुकीचे निरीक्षण करताना त्यांना एक गोष्ट जाणवली. बंदुकीतून गोळी झाडताना बाहेर पडणाऱ्या वायूंच्या झोतामुळे पुढील गवत आणि छोटी झुडपे हलत होती. जेम्स वॅटला जशी किटलीचे झाकण उडालेले पाहून वाफेच्या शक्तीची जाणीव झाली तसाच हा प्रसंग होता. बंदुकीतून बाहेर पडणाऱ्या या वायूंची शक्ती वाया जात असून तिचा वापर करून घेता येईल असे ब्राऊनिंग यांच्या लक्षात आले आणि खेळ थांबवून ते तडक कारखान्यात आले. त्यानंतर त्यांनी बंदुकीतून बाहेर पडणारे हे वायू पुढील गोळी चेंबरमध्ये आणण्यासाठी वापरले. त्यातूनच गॅस-ऑपरेटिंग मशिनगनचा शोध लागला.

ब्राऊनिंग हे डिझाइन घेऊन कोल्ट कंपनीकडे गेले. तेथे त्यांनी सलग २०० गोळ्या झाडून दाखवल्या. लष्कराला या मशिनगनची आणखी कठोर परीक्षा घ्यायची होती. तेथे ब्राऊनिंग यांनी सलग १८०० गोळ्या झाडून दाखवल्या. कोल्ट कंपनीतर्फे त्याचे उत्पादन सुरू झाले आणि ही मशिनगन कोल्ट मॉडेल १८९५ म्हणून गाजली. त्याच्या पुढच्या भागात गॅसचा वापर करण्यासाठी धातूचा एक पट्टीसारखा भाग असायचा. तो सतत हलत असे. त्यामुळे ही बंदूक जमिनीपासून काही उंचीवर ट्रायपॉड वापरून ठेवावी लागायची. त्यामुळे तिला पोटॅटो डिगर म्हणत. ही मशिनगन चीनमधील बॉक्सर रेव्होल्युशनमध्ये काही प्रमाणात वापरली गेली. त्यानंतर पहिल्या महायुद्धापर्यंत मशिनगनचा फारसा वापर झला नाही. पण तिच्यात सुधारणा होत राहिल्या.

ब्राऊनिंग यांनी १९१७ साली सुधारित मशिनगनचे डिझाइन विकसित केले. त्यात सततच्या गोळीबारामुळे तापणारे बॅरल थंड करण्यासाठी बाजूने पाण्याच्या आवरणाचा वापर केला होता. त्यामुळे ही मशिनगन मॉडेल १९१७ वॉटर-कूल्ड मशिनगन म्हणून ओळखली गेली. ब्राऊनिंग यांनी एका चाचणीत त्यातून सलग ४८ मिनिटे १२ सेकंदांत ४० हजार गोळ्या झाडून दाखवल्या. दुसऱ्या महायुद्धात ब्राऊनिंग सुधारित मशिनगन वापरून ब्रिटिशांनी जर्मनीची अनेक विमाने पाडली. नाझी जर्मनीच्या हवाईदलाचे तत्कालीन प्रमुख हर्मन गेअरिंग त्या संदर्भात  म्हणाले होते की, जर जर्मनीकडे ब्राऊनिंग मशिनगन असती तर ‘बॅटल ऑफ ब्रिटन’चा निकाल वेगळा लागला असता.

गॅस-ऑपरेटेड ब्राऊनिंग ऑटोमॅटिक रायफलनेही (बीएआर) युद्धभूमीवर क्रांती घडवली. या बंदुकीत २० गोळ्या मावत आणि त्या अडीच सेकंदात झाडल्या जात. बीएआरच्या स्वरूपात सैनिकांच्या हाती चालताचालता वापरता येणारी मशिनगनच आली होती. ही बंदूक दुसरे महायुद्ध, कोरियन आणि व्हिएतनाम युद्धांमध्येही वापरली गेली. या बंदुकीच्या रॉयल्टीतून ब्राऊनिंग खूप पैस कमावू शकले असते. मात्र त्यांनी साडेसात लाखांचे एकरकमी मानधन घेऊन ती अमेरिकी लष्कराला देऊन केली. आपल्याकडून देशाला भेट आहे, असे ते म्हणत. या बंदुकीनेच पुढील असॉल्ट रायफल्सचा मार्ग प्रशस्त केला. २६ नोव्हेंबर १९२६ रोजी कामात व्यस्त असतानाच ब्राऊनिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतरही त्यांची सुपरपोस्ट डबलडेकर शॉटगन खूप गाजली. आजवर सर्वाधिक ऑलिम्पिक पदके मिळवून देणारी बंदूक म्हणून ती प्रसिद्ध आहे.

पहिले महायुद्ध सुरू करणारे : ब्राऊनिंग १९१० पिस्तूल

जॉन ब्राऊनिंग आणि विंचेस्टर रिपिटिंग आम्र्स कंपनीची भागीदारी १८९०च्या दशकापर्यंत चांगलीच बहरली होती. विंचेस्टर कंपनीने १७ वर्षांत ब्राऊनिंग यांची ४४ डिझाइन विकत घेतली होती. सन १९०० पर्यंत ७५ टक्के स्पोर्टिग गन्स ब्राऊनिंग यांनी डिझाइन केलेल्या होत्या. मात्र ब्राऊनिंग यांच्या बंदुकांची डिझाइन विकत घेण्यात विंचेस्टर कंपनीची एक गुप्त खेळीही असायची. ब्राऊनिंग यांची डिझाइन्स प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या हाती पडू नयेत म्हणून विंचेस्टर ती सरसकट विकत घेऊन ठेवत असे. त्यातील सर्वच डिझाइन्सची उत्पादने बाजारात येत नसत. सन १९०० मध्ये ब्राऊनिंग यांनी ऑटोमॅटिक शॉटगन डिझाइन केली. ही बंदूक बाजारात उत्तम चालणार याची ब्राऊनिंग यांना खात्री होती. त्याचे डिझाइन विंचेस्टरने विकत घेऊन ते फडताळात पडून राहावे अशी त्यांची इच्छा नव्हती. ब्राऊनिंग या बंदुकीचे डिझाइन विंचेस्टरला देण्यास उत्सुक नव्हते. पण ती वेळ आल्यावर ब्राऊनिंग यांनी विंचेस्टरकडे एकरकमी मानधनाऐवजी कायमची रॉयल्टी देण्याची मागणी केली. विंचेस्टरने त्याला नकार दिला. तेव्हापासून ब्राऊनिंग आणि विंचेस्टर यांचे संबंध कायमचे तुटले.

मग जॉन ब्राऊनिंग ते डिझाइन घेऊन रेमिंग्टन कंपनीकडे गेले. मात्र ब्राऊनिंग भेटीसाठी थांबले असतानाच रेमिंग्टनच्या अध्यक्षांचे (मोर्सेलिस हार्डी) निधन झाले. त्यानंतर ब्राऊनिंग त्यांचे डिझाइन घेऊन थेट युरोपमधील बेल्जियमच्या फॅब्रिक नॅशनल या कंपनीकडे गेले. त्यातून ब्राऊनिंग ऑटोमॅटिक-५ शॉटगनचा जन्म झाला. ती ऑटो-५ किंवा ए-५ नावाने अधिक परिचित आहे. एका वेळी पाच काडतुसे मावणारी ती पहिलीच शॉटगन होती. त्यातून पुढे ऑटोमॅटिक पिस्तुलांच्या निर्मितीचा मार्ग सुकर झाला.

ब्राऊनिंग यांच्या मॉडेल १९०० पिस्तुलाच्या पाच लाख प्रती खपल्या. ब्राऊनिंग मॉडेल १९०० पिस्तुलाच्या ‘वेस्ट पॉकेट’ आणि ‘बेबी ब्राऊनिंग’ नावाच्या आवृत्तीही उपलब्ध होत्या. त्यानंतर ब्राऊनिंग मॉडेल १९१० हे पिस्तूल विकसित झाले. पहिल्या महायुद्धाची सुरुवात करून ८५ लाख जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले पिस्तूल म्हणून ते इतिहासात कुप्रसिद्ध आहे. ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्चडय़ूक फ्रांझ फर्डिनंड आणि त्याची पत्नी सोफी यांची गॅव्रिलो प्रिन्सिप याने २८ जून १९१४ रोजी बोस्नियाची राजधानी सॅरायेव्हो येथे एफएन मॉडेल १९१० .३८० कॅलिबर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. आणि पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. यापूर्वी या घटनेत एफएन मॉडेल १९०० .३२ कॅलिबर पिस्तूल वापरले गेल्याचे मानले जात होते.

त्यानंतर बाजारात आलेले ब्राऊनिंग मॉडेल १९११ किंवा एम१९११ हे पिस्तूलही तितकेच गाजले. पहिल्या महायुद्धापासून १९८५-८६ पर्यंत ते अमेरिकी सैन्याचे स्टँडर्ड इश्यू पिस्तूल होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ड्वाइट आयसेनहॉवर आणि जनरल जॉर्ज पॅटन यांचे ते आवडते पिस्तूल होते.

 

बंदूकविश्वाचा लिओनार्दो द विन्ची

जॉन मोझेस ब्राऊनिंग यांना बंदुकांच्या जगातील लिओनार्दो द विंची म्हणून ओळखले जाते. ७१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी विविध प्रकारच्या १०० बंदुकांची डिझाइन बनवली आणि त्यांच्या नावावर १२८ पेटंट जमा आहेत. त्यातील काही बंदुका मूळ डिझाइनच्या सुधारित आवृत्ती असल्या तरी अनेक बंदुका पूर्णपणे नव्या संकल्पनांवर आधारित होत्या. त्यांच्या बंदुकांनी जगाच्या इतिहासावर मोठी छाप पाडली असली तरी अनेक जणांना त्या बंदुकांच्या रचनाकाराचे नाव माहीत नाही, कारण त्यापैकी बहुतांश बंदुकांचे आराखडे त्यांनी अन्य कंपन्यांना निर्मितीसाठी विकले होते.

जॉन मोझेस ब्राऊनिंग यांचा जन्म १८५५ सालचा. त्यांचे कुटुंब अमेरिकेतील युटाह प्रांतातील ऑगडेन या ठिकाणचे. वडील जोनाथन हेदेखील बंदूक निर्माते. त्यांनी तयार केलेली रिपिटर रायफल प्रसिद्ध होती. वयाच्या २३ वर्षी जॉन ब्राऊनिंग यांच्या पाहण्यात अन्य एका व्यक्तीने तयार केलेली बंदूक आली. ती पाहून त्यांना जोरात हसू आले आणि ते उद्गारले की, यापेक्षा चांगली बंदूक तर मी तयार करू शकतो. आणि त्यांनी खरोखरच स्वत: बंदूक तयार केली. ती मॉडेल १८८५ सिंगल शॉट रायफल नावाने प्रसिद्ध झाली. त्या बंदुकीने विंचेस्टर रिपिटिंग आम्र्स कंपनीचे अधिकारी टी. जी. बेनेट इतके प्रभावित झाले की, ते कनेक्टिकटहून ऑगडेन येथे जॉन ब्राऊनिंग यांना भेटायला आले. तेथे जॉन यांचे बंधू मॅक, एड, सॅम आणि जॉर्ज यांनी त्यांचा कारखाना आणि दुकान थाटले होते. विंचेस्टर कंपनीने ब्राऊनिंग यांच्या मॉडेल १८८५ रायफलचे हक्क ८००० डॉलरला विकत घेतले आणि तिचे विंचेस्टर कंपनीच्या कनेक्टिकट येथील कारखान्यात उत्पादन सुरू झाले. हीच ती प्रसिद्ध विंचेस्टर मॉडेल १८८५ सिंगल शॉट रायफल. येथूनच जॉन ब्राऊनिंग आणि विंचेस्टर यांच्या सहकार्याची कहाणी सुरू झाली.

दुसऱ्याच वर्षी ब्राऊनिंग यांनी डिझाइन केलेल्या विंचेस्टर मॉडेल १८८६ लिव्हर अ‍ॅक्शन रिपिटिंग रायफलचे उत्पादन सुरू झाले. या बंदुकीसाठी ब्राऊनिंग यांनी ५० हजार डॉलर मिळाले होते. ती विंचेस्टरच्या सर्वोत्तम मॉडेल्सपैकी एक मानली जाते. १८८७ साली जॉन ब्राऊनिंग दोन वर्षांसाठी ख्रिस्ती मिशनरी बनून सफरीवर गेले. परत आल्यावर त्यांनी राहिलेले काम भरून काढत तीन वर्षांत २२ पेटंट्सची नोंद केली.

विंचेस्टर कंपनीने ब्राऊनिंग यांना एकदा आव्हान दिले होते. त्यांना तातडीने बंदुकीच्या नव्या डिझाइनची गरज होती. ब्राऊनिंग यांनी जर तीन महिन्यांत नवी बंदूक डिझाइन केली तर विंचेस्टरने त्यांना १० हजार डॉलर देण्याचे आमिष दाखवले. हे काम दोन महिन्यांत केले तर १५ हजार डॉलर मिळणार होते. ब्राऊनिंग यांनी एका महिन्यात नवी बंदूक तयार करून दिली आणि २० हजार डॉलर वसूल केले. ही नवी बंदूक विंचेस्टर मॉडेल १८९२ म्हणून गाजली.

पुढील दोन वर्षांत विंचेस्टरने ब्राऊनिंग यांची ११ मॉडेल्स विकत घेतली. त्यात मॉडेल १८९४, मॉडेल १८९५ आणि मॉडेल १८९७ पंप अ‍ॅक्शन रिपिटिंग शॉटगनचा समावेश होता. विंचेस्टर मॉडेल १८९५ अमेरिकेचे माजी अध्यक्ष थिओडोर (टेडी) रुझवेल्ट यांची आवडती बंदूक होती. ते तिला ‘बिग मेडिसिन’ म्हणत.

 

मोझिन-नगांट एम १८९१ रायफल

Mozin nangat m 1991 rifle
Mozin nangat m 1991 rifle

अमेरिकी सैन्यावर १८९८ च्या स्पेनबरोबरील युद्धात जी परिस्थिती ओढवली होती तशीच दुर्दशा रशियन सैन्यावर १८७७-७८ साली ऑटोमन तुर्की साम्राज्याबरोबर प्लेवेन येथे झालेल्या युद्धात आली होती. रशियन सैनिकांकडे बर्दन सिंगल-शॉट रायफल होत्या. तर तुर्क सैनिकांकडे एकावेळी अनेक गोळ्या झाडू शकणाऱ्या विन्चेस्टर रिपिटिंग रायफल होत्या. साहजिकच तुर्कानी रशियनांचा धुव्वा उडवला. मग रशियाने बंदुका बदलण्याचा निर्णय घेतला.

अनेक बंदुका चाचणीसाठी आणण्यात आल्या. त्यात रशियाच्या कॅप्टन सर्गेई मोझिन यांची ३-लाइन (७.६२ मिमी) आणि बेल्जियन डिझायनर लिआँ नगांट यांची ३.५ लाइन (९ मिमी) रायफल स्पर्धेत होत्या. रशियन गणन पद्धतीनुसार १ लाइन म्हणजे इंचाचा दहावा भाग. त्यानुसार ३-लाइन म्हणजे ७.६२ मिलीमीटर व्यास असलेली बंदुकीची नळी. निवड समितीची मते दुभंगली होती. दोन्ही रायफलमध्ये काही गुण-दोष होते. त्यांच्या संकरातून जी रायफल तयार झाली तिला मोझिन-नगांट मॉडेल १८९१ म्हणून ओळखले जाते.

रशियन सैन्याची ही अत्यंत खात्रीलायक बंदूक होती. जगातील सर्वाधिक उत्पादन झालेल्या रायफल्सपैकी ती एक आहे. तिच्या १८९१ पासून आजवर ३७ दशलक्ष प्रती तयार झाल्या आहेत. दोन्ही महायुद्धे आणि त्यापुढेही या रायफल वापरात होत्या. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी फौजा मॉस्कोच्या वेशीपर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र स्टालिनग्राडच्या ज्या ऐतिहासिक लढाईत जर्मनांना रेड आर्मीने धूळ चारली त्या विजयात मोझिन-नगांट रायफलचा वाटा मोठा होता. रशियन सैनिकांना मोझिन-नगांटने खरी साथसोबत केली. या रायफलची स्नायपर आवृत्ती वापरून रशियाच्या पुरुषांसह महिला स्नायपरनीही शेकडो जर्मन सैनिकांचा बळी घेतला आहे.

या रायफलचे मूळ नाव थ्री-लाइन रायफल मॉडेल १८९१ असे होते. ३-लाइन म्हणजे ७.६२ मिमी. तेव्हापासून एके-४७ रायफलपर्यंत रशियन बंदुकांचे ७.६२ मिमी कॅलिबर कायम राहिले आहे. ही बोल्ट-अ‍ॅक्शन रायफल होती आणि तिच्या मॅगझिनमध्ये एका वेळी ५ गोळ्या मावत असत. बोल्ट-अ‍ॅक्शन पद्धतीत गोळी झाडताना बंदुकीचे कमीत कमी भाग हलतात. त्यामुळे त्यांची अचूकता चांगली असते. त्यामुळेच पुढे स्नायपर रायफल म्हणूनही मोझिन-नगांट चांगलीच लोकप्रिय झाली. मोझिन-नगांटच्या ड्रगून, कार्बाइन अशा आवृत्त्याही चलनात आल्या. मूळ मोझिन-नगांटची सुधारित मॉडेल ९१/३० ही आवृत्तीही तितकीच प्रभावी होती. झारचा रशिया, साम्यवादी क्रांतीनंतरचा सोव्हिएत रशिया, सोव्हिएत प्रभावाखालील पूर्व युरोपातील अनेक देश, चीन आणि बऱ्याच देशांत मोझिन-नगांट वापरात होत्या. बोल्शेव्हिक क्रांतीतही त्या वापरल्या गेल्या.

मोझिन-नगांट रायफलची नेमबाजी स्पर्धासाठीचीही आवृत्ती होती. ती वोस्तोक नावाने ओळखली जायची. १९६० आणि १९७० च्या दशकात त्या युरोपीय देशांना निर्यातही केल्या गेल्या. एकंदर मोझिन-नगांट रायफलने रशियाच्या समाजजीवनावर अमीट ठसा उमटवला आहे.

 

ली-एनफिल्ड ०.३०३ रायफल

पहिल्या महायुद्धातील एक प्रसंग. दमदार जर्मन आक्रमणापुढे बेल्जियमने नांगी टाकलेली. दरम्यान, ४ ऑगस्ट १९१४ रोजी ब्रिटनने युद्धाचा पुकारा केला. आता आगेकूच करणाऱ्या जर्मन फौजांच्या आणि बेल्जियन सैन्याच्या मध्ये बेल्जियममधील मोन्स (Mons) या गावात ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्सचे (बीईएफ) ७५,००० सैनिक छातीचा कोट करून उभे ठाकलेले होते. जर्मन सैन्य ब्रिटिशांपेक्षा संख्येने खूप जास्त होते. पण ती कमी ब्रिटिश सैनिकांनी त्यांच्या बंदुका आणि त्या चालवण्याच्या असाधारण कौशल्याने भरून काढली.

मोन्सजवळील मालप्लाकेट येथे २३ ऑगस्ट १९१४ रोजी लढाईला तोंड फुटले. ब्रिटिशांनी जर्मन सेनेला नुसते रोखलेच नाही तर त्यांना मोठय़ा प्रमाणावर मनुष्यहानी स्वीकारायला भाग पाडले. दोन दिवसांनी ल कॅटो (Le Cateau) येथे त्याचीच पुनरावृत्ती झाली. या विभागातील एकंदर युद्धात ब्रिटिशांना माघार घ्यायला लागली. तरीही त्यांनी जर्मनांना बराच काळ थोपवून धरले. ब्रिटिश सैनिकांचा (टॉमी) मारा इतका प्रखर होता की जर्मनांना वाटले ब्रिटिशांकडे मशीनगन आहेत. वास्तविक मोन्स येथे ब्रिटिशांच्या हाती होत्या शॉर्ट, मॅगझिन-लोडेड ली-एनफिल्ड (SMLE) रायफल्स. याच बंदुकांना आपण  ०.३०३ (पॉइंट थ्री नॉट थ्री) रायफल म्हणून ओळखतो. ज्या आजही आपल्या पोलीस दलात वापरात आहेत. ब्रिटिशांनी त्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धासह पुढे कोरियन युद्धातही वापरल्या.

जेम्स पॅरिस ली आणि विल्यम मेटफर्ड यांनी तयार केलेली ली-मेटफर्ड रायफल ब्रिटिश सेनेने १८८८ साली स्वीकारली. पुढे ती बदलण्यासाठी शॉर्ट, मॅगझिन-लोडेड ली-एनफिल्ड (SMLE) रायफल बनवण्यात आली. जेम्स ली यांचे डिझाइन वापरून लंडनजवळील एनफिल्ड येथील रॉयल स्मॉल आम्र्स फॅक्टरी येथे ती बनवली. म्हणून तिला ली-एनफिल्ड रायफल म्हणतात. तिच्या नळीचा आतील व्यास ०.३०३ इंच आहे म्हणून तिला पॉइंट थ्री नॉट थ्री म्हणतात. तिचे सुरुवातीचे मॉडेल एमएलई (MLE) म्हणून ओळखले जायचे. पण सैनिक तिला एमिली (Emily) म्हणत. पुढील मॉडेल एसएमएलई (SMLE) होते. तिला (Smelly) म्हटले जायचे. तिचे १० गोळ्या मावणारे मॅगझिन आणि सफाईदार बोल्ट-अ‍ॅक्शन या जमेच्या बाजू होत्या. मैलभरापर्यंत ती अचूक मारा करू शकत असे.

साधारण सैनिक त्यातून मिनिटाला १५ ते २० गोळ्या तर काही निष्णात सैनिक मिनिटाला ३० गोळ्या झाडू शकत. ब्रिटिश सैनिकांचे हेच कौशल्य मोन्सच्या लढाईत कामी आले होते. एसएमएलई रायफल नंबर १ मार्क ३ ही बंदूक १९०७ मध्ये तर पुढील रायफल नंबर ४ मार्क १ ही बंदूक १९३९ साली वापरात आली. पुढे १९५० च्या दशकात ब्रिटिश सैन्यात एल १ ए १ सेल्फ लोडिंग रायफल (एसएलआर) वापरात येईपर्यंत .३०३ वापरात होती.

आजवर या रायफलच्या विविध देशांत मिळून १७ दशलक्षच्या वर प्रती तयार झाल्या आहेत. भारतीय लष्करात तर या रायफल होत्याच पण पोलीस दलातही त्या अद्याप आहेत. मुंबईतील २००८ सालच्या दहशतवादी हल्ल्यावेळीही पोलिसांनी .३०३ रायफलनिशीच दहशतवाद्यांचा मुकाबला केला होता.

 

एम १९०३ स्प्रिंगफिल्ड रायफल

m 1903 springfield rifle
m 1903 springfield rifle

अमेरिका आणि स्पेन यांच्यात १८९८ साली झालेल्या युद्धात अमेरिकेने एका लढाईत स्पेनकडून सपाटून मार खाल्ला. बॅटल ऑफ सॅन हुआन हिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लढाईत स्पेनच्या ७५० सैनिकांनी अमेरिकेच्या १५ हजार सैनिकांना रोखूनच धरले नाही तर त्यातील १४०० सैनिकांना काही मिनिटांत ठार मारले.

त्याने अमेरिका हादरली. लष्कराने चौकशी समिती नेमली. त्यांच्या तपासात असे लक्षात आले की, स्पॅनिश सैनिकांच्या जर्मन बनावटीच्या एम १८९३ माऊझर रायफल अमेरिकी सैनिकांकडील स्प्रिंगफिल्ड मॉडेल १८९२-९९ क्रॅग-यॉर्गनसन रायफलपेक्षा बऱ्याच सरस होत्या. नॉर्वेजियन डिझाइनच्या क्रॅग-यॉर्गनसन रायफलमध्ये दोन प्रमुख त्रुटी दिसून आल्या. तिचे मॅगझिन लोड करण्यास खूप वेळ लागत असे आणि तिच्या चेंबरमध्ये उच्च वेगाच्या काडतुसाला लागणारी पुरेशी शक्ती पुरवणारा स्फोट सहन करण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे अमेरिकेने क्रॅग-यॉर्गनसन रायफल बदलण्याचा निर्णय घेतला.

माऊझर रायफलने अमेरिकी सैन्याला इतके प्रभावित केले होते की, त्यांनी आपल्या सैन्यासाठी नवी रायफल बनवताना माऊझरचाच आधार घेतला. वास्तविक माऊझर रायफलचे डिझाइन वापरल्याबद्दल त्या कंपनीला अमेरिकेने रॉयल्टी देणे गरजेचे होते, पण अमेरिकेने माऊझर कंपनीला रॉयल्टी देण्याचे टाळले. त्यातून वादही निर्माण झाला, पण पहिले महायुद्ध सुरू झाले आणि त्यात जर्मनीचा पराभव झाला म्हणून जर्मनीला रॉयल्टी मिळालीच नाही.

अमेरिकेने माऊझरच्याच धर्तीवर स्प्रिंगफिल्ड शस्त्रास्त्र कारखान्यात स्वत:ची रायफल बनवली. ती मॉडेल १९०३ स्प्रिंगफिल्ड रायफल नावाने ओळखली गेली. ती .३० कॅलिबरची, ५ गोळ्यांचे मॅगझिन बसणारी, बोल्ट अ‍ॅक्शन रायफल होती. सुरुवातीला तिला पुढे स्लायडिंग-रॉड टाइप बायोनेट (संगीन) होते. पण ते फारच तकलादू असल्याने तत्कालीन अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी त्याच्या जागी नेहमीचे धातूच्या लांब पात्याचे संगीन बसवण्याची आज्ञा दिली. आता ही बंदूक चांगली तयार झाली होती. अमेरिकी सैन्याने ती १९०३ साली अधिकृत बंदूक म्हणून स्वीकारली आणि १९३९ सालापर्यंत तिचे स्थान कायम होते. त्यानंतर सुधारित एम-१ गरँड रायफलने तिची जागा घेतली. पण तरीही एम १९०३ स्प्रिंगफिल्ड रायफल पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, कोरियन युद्ध आणि व्हिएतनाम युद्धापर्यंत वापरात होती. १९३९ नंतर तिचा प्रामुख्याने स्नायपर गन (दूरवरील नेमबाजीची रायफल) म्हणून वापर झाला.

अमेरिकेच्या इतिहासात या बंदुकीने मानाचे स्थान पटकावले आहे. पहिले महायुद्ध सुरू होईपर्यंत अमेरिकेतील स्प्रिंगफिल्ड आर्मरी आणि रॉक आयलॅण्ड आर्सेनल या कारखान्यांत ८ लाखांहून अधिक एम १९०३ स्प्रिंगफिल्ड रायफल तयार झाल्या होत्या. या रायफलनिशी अमेरिका पहिल्या महायुद्धात उतरली. आजही या रायफलसाठी हौशी संग्राहक हजारो डॉलर मोजायला तयार असतात.

 

माऊझर सी ९६ ‘ब्रूमहँडल’ पिस्तूल

पॉल माऊझर यांच्या माऊझर सी ९६ ब्रूमहँडल (Mauser Construktion 96 Broom-handle) या सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुलाने इतिहासात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रिव्हॉल्व्हरचा बराच प्रसार झाला होता. त्यामुळे एका वेळी अनेक गोळ्या झाडण्याची क्षमता असलेल्या शस्त्रांची मागणी वाढू लागली होती. युद्धात ही बाब निर्णायक ठरत होती. त्यामुळे रायफलमध्येही सिंगल-शॉटऐवजी मल्टि-शॉट तंत्राला महत्त्व आले होते. रिव्हॉल्व्हरमध्ये पाच ते सहाच्या वर गोळ्या मावत नसत. त्यामुळे अधिक क्षमतेच्या पिस्तुलांच्या विकासाला चालना मिळाली. जर्मनीतील ह्य़ुगो बोरशार्ट (Hugo Borchardt) यांनी १८९३ साली ऑटोमॅटिक पिस्तुलाची प्राथमिक आवृत्ती बनवली होती. त्याचे पिस्तूल बोरशार्ट सी-९३ नावाने ओळखले जात होते. जर्मनीतीलच जॉर्ज लुगर यांनी बोरशार्ट यांच्या पिस्तुलात सुधारणा करून १९९८ साली लुगर पिस्तूल बाजारात आणले होते. त्याला चांगली मागणी होती.

माऊझर यांनी १८७८ साली झिगझ्ॉग नावाचे रिव्हॉल्व्हर बाजारात आणले होते. त्याच्या रिव्हॉल्व्हिंग चेंबरवर इंग्रजी झेड अक्षराच्या आकारात खाचा होत्या. त्यावरून त्याला झिगझ्ॉग नाव पडले. पण ते बाजारात फारसे खपले नाही. त्यानंतर माऊझर यांनी फिडेल, फ्रेडरिक आणि जोसेफ फिडरले (Fidel, Friedrich, Josef Feederle) या बंधूंच्या मदतीने १८९६ साली सी-९६ पिस्तुल बनवले. त्यात एका वेळी १० गोळ्या मावत असत. ते सेमी-ऑटोमॅटिक प्रकारचे पिस्तूल होते. माऊझर यांनी पॉट्सडॅम येथे कैसर विल्हेम दुसरे यांना सी-९६ पिस्तुलाचे प्रात्यक्षिक दाखवले होते. त्यांनाही ते आवडले. मात्र जर्मन सेनादलांसाठी त्याची निर्मिती केली गेली नाही. माऊझर सी ९६ पिस्तूल त्यावेळी काळाच्या पुढे असल्याचे मानले जाते.

पुढे लुगर आणि ब्राऊनिंग पिस्तुलांमुळे ऑटोमॅटिक पिस्तुले स्वीकारण्याची मानसिकता बनली आणि माऊझर यांच्या सी ९६ पिस्तुलाला मागणी आली. त्याचे हँडल जमीन लोटण्यासाठी वापरायच्या झाडूसारखे होते. म्हणून हे पिस्तूल ब्रूम-हँडल नावाने अधिक गाजले. १८९६ ते १९३९ दरम्यान सी-९६च्या दहा लाख प्रती तयार झाल्या होत्या.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी तरुणपणी सैन्यात सेकंड लेफ्टनंट असताना आफ्रिकेतील सुदान येथील युद्धात माऊझर सी-९६ ब्रूमहँडल पिस्तूल वापरले होते. त्याने त्यांचे प्राण वाचवल्याची आठवण ते सांगत. लॉरेन्स ऑफ अरेबियाने ते वापरले होते. रशियाच्या बोल्शेव्हिक क्रांतिकारकांमध्ये ते प्रसिद्ध होते. तसेच भारतीय स्वातंत्र्यलढय़ात ऑगस्ट १९२५ मध्ये रामप्रसाद बिस्मिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी कटामध्ये रेल्वेतील खजिना लूटताना त्यांचा वापर केला होता. चिनी साम्यवादी जनरल झु डे यांनी नानचांग उठावात हेच पिस्तूल वापरले होते.

पहिल्या महायुद्धादरम्यान माऊझर यांनी लुगर कंपनीचा ताबा घेतला. त्यानंतरही माऊझर कंपनीने ऑटोमॅटिक रायफल, रणगाडाविरोधी बंदूक, शिकारीच्या आणि खेळातील नेमबाजीच्या बंदुकांचे उत्पादन केले. माऊझर बंधूंपैकी विल्हेम यांचे १८८२ साली तर पॉल यांचे १९३० मध्ये निधन झाले. पण त्यांनी घालून दिलेली दर्जेदार उत्पादनांची परंपरा आजही कायम आहे.

 

हिटलरची आवडती माऊझर गेवेर ९८ रायफल

जर्मन अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आणि बोल्ट-अ‍ॅक्शन तंत्राचा परमोच्च बिंदू म्हणून माऊझर गेवेर १८९८ (Mauser Gewehr 98) या रायफलची ख्याती आहे. जर्मनीसह विविध देशांत तिच्या १०० दशलक्षहून अधिक प्रतींची निर्मिती झाली आहे. या सगळ्या बंदुका सलग मांडल्या तर पृथ्वीला अडीच वेळा प्रदक्षिणा घातली जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन सैनिकांची ही खरी सोबतीण होती. पहिल्या महायुद्धात प्रत्यक्ष लढणाऱ्या आणि आयर्न क्रॉस हा जर्मनीचा सर्वोच्च लष्करी सन्मान मिळवणाऱ्या अ‍ॅडॉल्फ हिटलरची ही आवडती रायफल होती.

एकोणिसाव्या शतकात नेपोलियन बोनापार्टने युरोपच्या बऱ्याचशा भूभागावर नियंत्रण स्थापित केले होते. जर्मनीतील वुर्टेमबर्ग या प्रांतातील राजा फ्रेडरिक हादेखिल त्याचा मांडलिक बनला होता. फ्रेडरिकने १८११ साली त्याच्या प्रांतातील निकार नदीच्या काठावरील ऑबर्नडॉर्फ या गावातील ऑगस्टाइन मोनास्टरीचे रूपांतर करून तेथे रॉयल वुर्टेमबर्ग रायफल फॅक्टरी सुरू केली. माऊझर गेवेहर ९८ रायफलचे रचनाकार पॉल आणि विल्हेम माऊझर यांचे वडील तेथे बंदूक निर्मितीसाठी कामाला होते. त्यांच्या हाताखाली या दोन बंधूंनी बंदुकीच्या तंत्रज्ञानाचे प्राथमिक धडे गिरवले. त्या काळी प्रशियात ड्रेझी यांची निडल गन प्रसिद्ध होती. पॉल माऊझर यांच्या ती  १८५८ साली प्रथम पाहण्यात आली. त्याहून चांगली रायफल आपण बनवू शकतो असा आत्मविश्वास पॉल यांना वाटला.

त्यातून त्यांनी १८६८ साली बोल्ट-अ‍ॅक्शन रायफल बनवली. त्याचे पेटंट त्यांनी युरोपऐवजी अमेरिकेत नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पॉल यांना ते सॅम्युएल नोरीस यांच्याबरोबर विभागून मिळाले. त्या भागीदारीतून माऊझर-नोरीस रायफल तयार झाली. पुढे नोरीस यांना या भागीदारीत रस उरला नाही आणि त्यांनी त्यातून अंग काढून घेतले. मात्र जाता-जाता मॉडेल १८७१ इन्फंट्री रायफलचे प्रात्यक्षिक जर्मन सम्राट कैसर विल्हेम पहिले यांना दाखवण्याची सोय केली. कैसरना बंदूक आवडली. मात्र तिच्या उत्पादनाचे हक्क माऊझर यांना न देता त्यांनी राष्ट्रीय गुपित म्हणून सरकारी कारखान्यात या बंदुकीचे उत्पादन केले. माऊझर यांना बंदुकीच्या रिअर साइट्सच्या उत्पादनावर समाधान मानावे लागले. त्यातही ८५ टक्के रॉयल्टी मध्यस्थ म्हणून नोरीस यांना गेली.

पुढे १८७३ मध्ये माऊझर यांनी रॉयल वुर्टेमबर्ग रायफल फॅक्टरी विकत घेतली. १८७७ साली झालेल्या युद्धात तुर्कस्तानच्या सैनिकांनी १५ गोळ्या मावणाऱ्या विन्चेस्टर रायफल वापरून रशियाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. त्यामुळे अनेक गोळ्या मावणाऱ्या स्वयंचलित बंदुकांना मागणी आली. १८७१ ते १८८४ या काळात माऊझरनी टय़ूब मॅगझिनमध्ये ८ गोळ्या बसणाऱ्या रायफलची निर्मिती केली. त्यापुढे १८८९ च्या बेल्जियन मॉडेलमध्ये मॅगझिन वापरले आणि १८९३ च्या स्पॅनिश मॉडेलमध्ये काडतुसात स्मोकलेस पावडर वापरली. याशिवाय बोल्ट अ‍ॅक्शनच्या तंत्रात सुधारणा केली. गेवेर १८९८ मध्ये पाच गोळ्या मावत आणि त्या एका वेळी भरण्यासाठी स्ट्रिपर क्लिप तंत्रज्ञान वापरात आले होते. यातून गेवेर ९८ त्या काळातील जगातील सर्वात खात्रिशीर बोल्ट अ‍ॅक्शन रायफल बनली होती.

 

जे. एफ. केनेडी यांची ‘हत्या’री मानलिकर-कारकॅनो

manlicker rifle
manlicker rifle

युरोपमध्ये १९व्या शतकाच्या अखेरीस फ्रान्समधील अँटोनी अल्फॉन्स शॅसपो (Antoine Alphonse Chassepot) आणि ऑस्ट्रियातील फर्डिनंड रिटर फॉन मानलिकर (किंवा मानलिशर – Ferdinand Ritter von Mannlicher) यांच्या बंदुकांना विशेष मागणी होती. त्यांचे लाखोंच्या संख्येने उत्पादन झाले.

शॅसपो यांनी ब्रिच-लोडिंग, सेंटर-फायर नीडल गनचा शोध लावला. ती बंदूक फ्रेंच लष्कराने १८६६ साली स्वीकारली. त्याबद्दल शॅसपो यांना सन्मानपदकही मिळाले. शॅसपो यांची फ्युझिल मॉडेल १८६६ रायफल प्रसिद्ध आहे. ही बोल्ट-अ‍ॅक्शन, ब्रिच-लोडिंग रायफल फ्रेंच सैन्याचा बराच काळ आधार होती. १८७०-७१ सालच्या फ्रँको-प्रशियन युद्धात फ्रान्सला त्याचा खूप उपयोग झाला. याच्या पुढील अनेक आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या. फ्युझिल लेबेल एमएलई १८८६ (Fusil Lebel mle 1886) ही त्यांची रायफल विशेष गाजली. खात्रीशीर बोल्ट-अ‍ॅक्शन आणि स्मोकलेस प्रोपेलंट वापरलेले शक्तिशाली काडतूस ही त्याची वैशिष्टय़े होती. मात्र त्याच्या टय़ूब मॅगझिनमध्ये बसणाऱ्या ८ गोळ्या भरण्यास काहीसा वेळ लागत असे. त्यामुळे त्यानंतरच्या मॉडेल वापरात आल्यानंतर या रायफल बदलण्यात आल्या. या रायफलच्या अन्य देशांतील आवृत्तीही प्रसिद्ध होत्या. त्यात बेल्जियममधील फ्युझिल एफएन माऊझर एमएलई १८८९ आणि इटलीतील फ्युझिल मॉडेलो ९१ या बंदुकांचा समावेश आहे.

मानलिकर यांनी एन-ब्लॉक क्लिप चार्जर-लोडिंग मॅगझिनचा शोध लावला. त्यात सुधारणा करून त्यांनी ऑटो शोनॉर (Otto Schönauer) यांच्या मदतीने रोटरी फीड मॅगझिन बनवले. मानलिकर यांचे बंदूक जगताला सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांच्या बंदुकीतील स्ट्रेट-पूल बोल्ट. म्हणजे बंदूक कॉक करण्यासाठी वापरला जाणारा, सरळ मागे-पुढे होणारा खटका. मानलिकर मॉडेल १८९५ ही बंदूक ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सैन्यात १८९५ पासून पुढे तीन दशके वापरात होती. इटलीच्या सैन्याने ती मानलिकर-कारकॅनो नावाने स्वीकारली. मानलिकर-कारकॅनो रायफलमध्ये माऊझर मॉडेल १८८९ मधील बोल्ट-अ‍ॅक्शन आणि कारकॅनो (Carcano) यांच्या बोल्ट-स्लीव्ह प्रणालीचा संयोग होता. पहिल्या महायुद्धात इटलीच्या सैन्याने मानलिकर-कारकॅनोच्या साथीने ऑस्ट्रो-हंगेरियन सैन्याचा सामना केला. याशिवाय बल्गेरिया, युगोस्लाव्हिया आणि ग्रीसच्या सैन्यानेही या बंदुका वापरल्या. या बंदुका पहिल्याच नव्हे तर दुसऱ्या महायुद्धातही वापरल्या गेल्या. जर्मन सैन्यानेही १९४३ साली इटलीत काही प्रमाणात या रायफल वापरल्या.

ली हार्वे ओसवाल्ड याने २२ नोव्हेंबर १९६३ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या करण्यासाठी इटालियन मानलिकर-कारकॅनो मॉडेल ९१ रायफल वापरली होती. तिचा सीरियल नंबर ‘सी २७६६’ असा होता. शॅसपो आणि मानलिकर या दोन्ही रायफलनी युरोपच्या आणि जगाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.

विन्चेस्टर रिपिटिंग रायफल

विन्चेस्टर रिपिटिंग रायफल हे नाव अमेरिकेतील विन्चेस्टर रिपिटिंग आम्र्स कंपनीने १८६०च्या दशकात आणि नंतर बनवलेल्या अनेक रिपिटिंग रायफल्सच्या समूहासाठी वापरले जाते. अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रांतांमधील अनागोंदी संपवण्यात या बंदुकांचाही मोठा वाटा होता. यातील मॉडेल १८७३ ही विशेष गाजलेली बंदूक.

विन्चेस्टर रायफल ही एक प्रकारे स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीतूनच निर्माण झालेली कंपनी होती. न्यूयॉर्कमधील वॉल्टर हंट यांनी १८४८ साली व्हॉलिशन रिपिटिंग रायफलचे पेटंट घेतले होते. या हंट रायफलमध्ये रॉकेट बॉल म्हणून ओळखले जाणारे काडतूस वापरले जायचे. मात्र हंट रायफल फारशी शक्तिशाली नव्हती. लेविस जेनिंग्ज यांनी १८४९ मध्ये हंट यांच्याकडून त्यांच्या बंदुकीचे बौद्धिक संपदा हक्क विकत घेतले आणि विंडसर येथील रॉबिन्स अ‍ॅण्ड लॉरेन्स कंपनीतर्फे १८५२ मध्ये त्याचे उत्पादन केले. होरेस स्मिथ आणि डॅनिएल वेसन यांनी रॉबिन्स अ‍ॅण्ड लॉरेन्स तसेच बेंजामिन टायलर हेन्री यांच्याकडून जेनिंग्जचे पेटंट हस्तगत केले. स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने हंट-जेनिंग्ज रायफलमध्ये अनेक सुधारणा केल्या आणि काही गुंतवणूकदारांच्या मदतीने १८५५ साली व्लोल्कॅनिक रिपिटिंग आम्र्स कंपनी स्थापन केली. त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार ऑल्विहर विन्चेस्टर होते. हस्ते-परहस्ते या कंपनीची मालकी अमेरिकी गृहयुद्धानंतर ऑलिव्हर विन्चेस्टर यांच्याकडे आली आणि त्यांनी तिचे नाव विन्चेस्टर रिपिटिंग आम्र्स कंपनी असे ठेवले.

या कंपनीने मूळच्या हेन्री रायफलमध्ये सुधारणा करून पहिली विन्चेस्टर रायफल बनवली. ती विन्चेस्टर मॉडेल १८६६ या नावाने ओळखली गेली. त्यात जुनेच .४४ कॅलिबरचे हेन्री काडतूस वापरले जायचे. या बंदुकीची चौकट ब्रॉन्झची बनवली होती. विन्चेस्टर यांनी त्याऐवजी नवी स्टीलची चौकट वापरून अधिक शक्तिशाली काडतूस वापरू शकणारी बंदूक बनवली. ती विन्चेस्टर मॉडेल १८७३ म्हणून गाजली. तिचेच पुढे १८७६ मॉडेलही बाजारात आले. ते सेन्टेनियल मॉडेल म्हणून ओळखले जाते. त्यानंतरही विन्चेस्टरची अनेक सुधारित मॉडेल्स येत राहिली. मात्र १८७३ चे मॉडेलच सर्वाधिक वापरात राहिले. ते केवळ २० डॉलर इतक्या किमतीत उपलब्ध होते. अमेरिकी सैनिक आणि सामान्य नागरिकांनीही त्याला मोठय़ा प्रमाणात पसंती दर्शवली.

या रायफलचे वैशिष्टय़ म्हणजे ती एकदा लोड केल्यानंतर अनेक गोळ्या झाडू शकत असे. त्याच्या टय़ूब मॅगझिनमध्ये १५ गोळ्या मावत असत. त्यामुळे तिला रिपिटिंग रायफल म्हणत. आता रायफलमध्ये एकेक गोळी भरण्याची कसरत करण्याची गरज नव्हती.

विन्चेस्टर रिपिटिंग रायफलने अमेरिकी स्थानिक इंडियन आदिवासींबरोबरचा संघर्ष, फ्रान्सचे मेक्सिकोतील आक्रमण, स्पेन आणि अमेरिकेचे युद्ध, मेक्सिकोची क्रांती, रशिया आणि तुर्कस्तानचे युद्ध, पहिले आणि दुसरे महायुद्ध अशा अनेक युद्धांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली.

रायफल : केंटकी, बेकर, शार्प्स, स्पेन्सर ते मार्टिनी-हेन्री

एकीकडे हँडगन प्रकारात रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुलांचा विकास होत असताना रायफलमध्येही अनेक स्थित्यंतरे होत होती. गरज आणि तंत्रज्ञानातील प्रगती या दोन घटकांचा त्यावर मुख्य प्रभाव पडत होता. त्याच्या प्रत्येक टप्प्याची आणि प्रत्येक बंदुकीची तपशीलवार चर्चा करणे शक्य नसले तरी या ऐतिहासिक बंदुकांचा धावता आढावा घेणे क्रमप्राप्त आहे.

सन १७०० च्या आसपास अमेरिकेत केंटकी रायफल वापरात होती. जेम्स कूपर यांच्या ‘द लास्ट ऑफ द मोहिकन्स’ या पुस्तकातील ‘हॉकआय’ नथॅनिएल पोए यांनी केंटकी रायफल वापरल्यामुळे ती प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ‘ब्लंडरबस’ नावाची मोठय़ा व्यासाची आखूड बॅरल असलेली पिस्तूल वापरात होती. तिचा आवाज मोठा व्हायचा पण अचूकचा आणि प्रभाव फारसा नसायचा. त्यावरून मोठा गाजावाजा करून फारसा प्रभाव पाडू न शकणाऱ्या गोष्टीसाठी इंग्रजीत ब्लंडरबस हा शब्द वापरला जातो. त्यानंतरच्या काळात ब्राऊन बेस आणि लाँग लँड पॅटर्न मस्केट वापरात होत्या. त्यांनी ब्रिटिश साम्राज्य विस्तारास हातभार लावला.

अमेरिकेने १७७६ साली ब्रिटनपासून स्वातंत्र्यासाठी युद्ध पुकारल्यानंतर शस्त्रांची कमतरता जाणवू लागली. त्यावेळी अमेरिकी काँग्रेसने फ्रान्सकडे गुप्त दूत पाठवून शस्त्रे आणि आर्थिक मदतीची मागणी केली. फ्रान्सने अमेरिकेला पॅटर्न १७६६ मस्केट पुरवल्या. त्यांचे पुढे अमेरिकेत स्प्रिंगफील्ड आर्मरीमध्ये उत्पादन होऊ लागले. त्या अमेरिकी पॅटर्न १७९५ मस्केट म्हणून ओळखल्या गेल्या.

त्यानंतरच्या काळात इझेकिल बेकर यांनी तयार केलेल्या बेकर रायफल वापरात आल्या. त्यांच्या बॅरलमध्ये आत सात वक्राकार खाचा (ग्रूव्ज) पाडल्या होत्या. या रायफलिंगमुळे बेकर रायफल बरीच अचूक होती. त्याच काळात प्रशियन सैन्याची येगर रायफल प्रचारात होती. अमेरिकेतील १८४१ साली वापरात आलेल्या मिसिसिपी रायफलने मेक्सिकोबरोबरील युद्धात चांगली कामगिरी केली होती. स्वित्र्झलडमधील जीन सॅम्युएल पॉली यांनी १८१२ ते १८१६ या काळात ब्रिच-लोडिंग रायफल विकसित केली. तर प्रशियातील जोनाथन निकोलाऊस फॉन ड्रेझी यांनी तयार केलेल्या ‘निडल गन’मुळे फायरिंग पिनच्या वापराचा मार्ग सुकर झाला. याशिवाय यूएस मॉडेल १८४२ रायफल्ड मस्केट, ब्रिटिश व्हिटवर्थ. ४५१ शॉर्ट रायफल यांचाही उल्लेख गरजेचा आहे.

ख्रिस्तियन शार्प्स यांनी १८४८ साली तयार केलेली शार्प्स रायफल आणि ख्रिस्तोफर स्पेन्सर यांची मॉडेल १८६५ स्पेन्सर रायफल यांनी अमेरिकी गृहयुद्धात महत्त्वाची कामगिरी केली. स्पेन्सर रायफलच्या टय़ूब मॅगझिनमध्ये सात काडतुसे बसत. त्यामुळे ती बंदूक रविवारी लोड करून खुशाल आठवडाभर फायर करत राहावी, अशी तिची ख्याती होती. ती सुरुवातीची कार्बाइन होती. अमेरिकेतील १८६७ मॉडेल स्नायडर रायफल ब्रिटिशांनी त्यांच्या पॅटर्न १८५३ रायफल (१८५७ च्या उठावात वापरलेल्या) बदलण्यासाठी वापरल्या. पुढे त्यांच्या जागी स्वित्र्झलडचे फ्रेडरिक फॉन मार्टिनी आणि अमेरिकेचे हेन्री पीबडी यांनी बनवलेली मॉडेल १८७१ मार्टिनी-हेन्री रायफल वापरात आली.

 

रेमिंग्टन : मॉडेल १८६३ रिव्हॉल्व्हर

remington 1863 revolver
remington 1863 revolver

रेमिंग्टनच्या रोलिंग ब्लॉक रायफल या सर्वात प्रसिद्ध बंदुका असल्या तरी या कंपनीने २०० वर्षांच्या इतिहासात वेळोवेळी तयार केलेल्या शस्त्रांनी त्या त्या काळात आपली छाप पाडली आहे. अमेरिकेत १८४० आणि १८५० च्या दशकात सॅम्युएल कोल्ट यांच्या रिव्हॉल्व्हर्सनी बाजारात मक्तेदारी स्थापित केली होती. पण १८५९ साली कोल्ट यांच्या पेटंटची मुदत संपली आणि अनेक कंपन्या रिव्हॉल्व्हर उत्पादनात उतरल्या.

फोर्डाइस बील्स (Fordyce Beals) यांनी १८५८ साली डिझाइन केलेल्या रिव्हॉल्व्हरचे रेमिंग्टन कंपनीतर्फे १८५९ मध्ये उत्पादन होऊ लागले. हे रिव्हॉल्व्हर रेमिंग्टन मॉडेल १८५८ म्हणून गाजले. हे मुळात .३१ कॅलिबरचे पॉकेट रिव्हॉल्व्हर होते. नंतर त्याच्या .४४ कॅलिबर आर्मी, .३६ कॅलिबर नेव्ही अशा आवृत्तीही उपलब्ध झाल्या. रेमिंग्टनने १८५९ साली जोसेफ रायडर यांच्याशी डबल अ‍ॅक्शन रिव्हॉल्व्हर उत्पादनाचा करार केला. रेमिंग्टन मॉडेल १८६३ आर्मी हे रिव्हॉल्व्हर विशेष गाजले. या रिव्हॉल्व्हरची खासियत म्हणजे ते टॉप स्ट्रॅप प्रकारचे होते. म्हणजे त्याच्या चेंबरच्या वरच्या बाजूची चौकट मजबूत धातूची होती. त्यामुळे त्याला अधिक बळकटी मिळाली होती. हे रिव्हॉल्व्हर अमेरिकी गृहयुद्धात इतके गाजले की उत्तरेकडील राज्यांच्या सैनिंकांना ते सरकारी कोटय़ातून मिळाले तर प्रतिस्पर्धी दक्षिणेकडील बंडखोर राज्यांच्या सैनिकांनी ते जमेल तेथून मिळवले. युद्धाच्या अखेरीस अमेरिकी लष्कराच्या चीफ ऑफ ऑर्डनन्सनी रेमिंग्टनला शक्य होईल तितक्या मॉडेल १८६३ रिव्हॉल्व्हर पुरवण्याची ऑर्डर दिली.

दरम्यान, अमेरिकी गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच (१८६१ मध्ये) रेमिंग्टनचे संस्थापक एलिफालेट रेमिंग्टन यांचे निधन झाले. त्यांच्या नंतर त्यांची तीन मुले फायलो, एलिफालेट तिसरे आणि सॅम्युएल यांनी व्यवसाय पुढे नेला. गृहयुद्धाच्या काळात रेमिंग्टनने अमेरिकेच्या प्रसिद्ध स्प्रिंगफील्ड रायफल्सचे उत्पादन केले आणि ४० हजार स्प्रिंगफील्ड रायफल्स सैन्याला पुरवल्या. मात्र युद्ध संपल्यानंतर सर्वच शस्त्रास्त्र निर्मात्यांना मंदीच्या झळा जाणवू लागल्या. त्या काळात रेमिंग्टन बंधूंनी डेरिंजर पिस्तुलांवर भर दिला. १८६० ते १९३४ या काळात रेमिंग्टनने विविध देशांत अडीच लाख डेरिंजर पिस्तुले विकली. तसेच शांततेच्या काळात नेमबाजीच्या स्पर्धासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुका बनवल्या. या वेळी तिघा बंधूंपैकी सॅम्युएल हे युरोपभर फिरून सेल्समनचे काम करत. १८६७ ते १९३४ या काळात रेमिंग्टनने दहा लाखांच्या आसपास रोलिंग ब्लॉक रायफल्स निर्यात केल्या. त्याने रेमिंग्टनला तारले. हा रेमिंग्टनचा सुवर्णकाळ मानला जातो.

त्यानंतर मात्र रेमिंग्टनचा पडता काळ सुरू झाला. १८७० च्या दशकाच्या अखेरीस अमेरिकी लष्कराने त्यांच्या पायदळाकडील रायफल्स बदलण्याचा निर्णय घेतला. रेमिंग्टनला त्यांच्या रोलिंग ब्लॉक रायफल निवडल्या जाण्याची खात्री होती. पण सैन्याने स्प्रिंगफील्ड कारखान्यात तयार होणाऱ्या ट्रॅप डोअर सिस्टिमच्या रायफल्सची निवड केली. कारण एकच की त्याचे पेटंट स्प्रिंगफील्ड कारखान्याचा सुपरिंटेंडंट अ‍ॅलन याच्याकडे होते आणि तो सरकारी कर्मचारी असल्याने त्याला रॉयल्टी द्यावी लागणार नव्हती. रेमिंग्टनचे १८७५ साली बाजारात आलेले रिव्हॉल्व्हर कोल्टच्या पीसमेकरच्या स्पर्धेत फारसे टिकले नाही.

 

 

अमेरिकी ‘डीएनए’शी समरस : रेमिंग्टन

रेमिंग्टन ही अमेरिकेतील सर्वात जुनी आणि मोठी बंदूक कंपनी म्हणूनच परिचित आहे. १८१६ साली स्थापना झाल्यापासून आजतागायत ती अव्याहतपणे अमेरिकेच्या प्रत्येक संघर्षांत दर्जेदार, अचूक आणि खात्रीशीर शस्त्रे पुरवत आली आहे. अमेरिकी राष्ट्रीय आणि समाजजीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर रेमिंग्टनने आपली छाप पाडली आहे. त्यामुळेच अमेरिकी ‘डीएनए’शी समरस झालेली बंदूक कंपनी म्हणून रेमिंग्टनची ख्याती आहे.

एलिफालेट रेमिंग्टन यांचे वडील अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यात लोहारकाम करत. पुढे रेमिंग्टन कुटुंब न्यूयॉर्क राज्यातील इलियन गावात वास्तव्यास गेले. आजही रेमिंग्टन बंदुकांचे उत्पादन तेथूनच होते. वयाच्या २३ व्या वर्षी, म्हणजे १८१६ साली एलिफालेट यांना बंदूक हवी होती. मात्र बाजारातून तयार बंदूक विकत घेण्यापेक्षा आपणच स्वत:ची बंदूक तयार करावी असे त्यांना वाटले. मग त्यांनी स्वत: घरच्या भात्यात गन बॅरल घडवून त्याच्या आधाराने संपूर्ण बंदूक तयार केली. ती इतकी चांगली तयार झाली की आसपासच्या अनेक जणांनी त्यांच्याकडे बंदूक तयार करून देण्याची मागणी नोंदवली. सुरुवातीला केवळ गन बॅरल बनवण्यातच रेमिंग्टन यांचा हातखंडा होता. अमेरिकेतील प्रसिद्ध केंटकी रायफल्सच्या बॅरल रेमिंग्टनने तयार केलेल्या असत. पण तेवढय़ावर समाधान न मानता त्यांनी लवकरच संपूर्ण बंदूक तयार करण्यास सुरुवात केली. त्यातूनच रेमिंग्टन यांच्या कंपनीचा जन्म झाला.

रेमिंग्टन यांनी १८४० च्या आसपास सिनसिनाटी येथील जॉन ग्रिफिथ्स यांच्याकडून मिसिसिपी रायफलच्या उत्पादनाचे हक्क आणि कंपनीची यंत्रसामग्री विकत घेतली. मिसिसिपी रायफल्सनी रेमिंग्टनची ख्याती आणखी वाढवली. दरम्यान, रेमिंग्टनच्या म्युलियर रायफल्स काही फार चालल्या नाहीत.

सुरुवातीपासून रेमिंग्टनने केवळ स्वत:च्या बंदुका विकसित करण्यापेक्षा विविध ठिकाणच्या कुशल कारागीर, तंत्रज्ञांना आपल्या छताखाली आणून त्यांच्या कलागुणांना वाव दिला. अन्य तंत्रज्ञांनी विकसित केलेली मॉडेलही आपल्या कंपनीत उत्पादित करू दिली. हा खुलेपणा रेमिंग्टनच्या वाढीस पूरक ठरला आणि तो अमेरिकेच्या राष्ट्रीय विचारधारेशी जुळणारा आहे.

रेमिंग्टनमधील अशाच एका तंत्रज्ञाने विकसित केलेली चालताना वापरावयाच्या काठीतील बंदूक (वॉकिंग केन गन) १८५० ते १८७० च्या दशकात बरीच लोकप्रिय होती. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील बंदूक निर्माते हेन्री डेरिंजर यांनी १८३०च्या दशकात लहान, सुटसुटीत आणि एक किंवा दोन गोळ्या झाडू शकणारी पिस्तुले बनवली. तशा पिस्तुलांचे उत्पादन अनेक कंपन्यांनी सुरू केले. या सगळ्या पिस्तुलांना समूहवाचक म्हणून डेरिंजर हे नाव मिळाले. रेमिंग्टननेही अशी डेरिंजर पिस्तुले बनवली आणि ती लोकप्रियही झाली.

रेमिंग्टनने १८६७ साली रोलिंग ब्लॉक रायफल बाजारात आणली. ही ब्रिच-लोडिंग गन होती आणि त्यात गोळी भरल्यानंतर ब्रिच बंद करण्यासाठी धातूचा रोलिंग ब्लॉक म्हणजे फिरता वक्राकार भाग असे. त्यामागे हॅमर असे. ही यंत्रणा प्रभावी ठरली होती. त्यामुळे रोलिंग ब्लॉक बंदुका शिकारी तसेच अन्य वर्तुळांमध्येही लोकप्रिय झाल्या.

 

 

अब्राहम लिंकन, वॅन गॉ यांचे ‘हत्या’रे!

44 calibar deringer
44 calibar deringer

अमेरिकेतील सुरुवातीच्या बंदूक निर्मात्यांनी १८५० च्या आसपास आणि त्यानंतर त्या देशाचा विस्तार होण्यास आणि यादवी युद्धात विजय होण्यात महत्त्वाची भूमिका वठवली. पण अमेरिकेला यादवी युद्धात विजय मिळवून देणाऱ्या अब्राहम लिंकन या माजी अध्यक्षांना त्यापैकीच एका शस्त्राला बळी पडावे लागले.

अमेरिकेचे सोळावे अध्यक्ष अब्राहम लिंकन १४ एप्रिल १८६५ रोजी वॉशिंग्टन डीसी येथील फोर्ड्स थिएटरमध्ये ‘अवर अमेरिकन कझिन’ नावाचे नाटक पाहण्यास गेले होते. तेव्हा त्यांच्या गॅलरीत मागील बाजूने जॉन विल्क्स बूथ नावाच्या अभिनेत्याने प्रवेश केला. बूथच्या खिशात डेरिंजर नावाचे लहानसे पिस्तूल होते. त्याच्या लहान आकारामुळे ते कोठेही लपवण्यास अगदी सोपे होते म्हणूनच बूथने ते शस्त्र निवडले होते. नाटकात एक विनोदी संवाद येईपर्यंत बूथ दबा धरून थांबला. हेतू हा, की संवादानंतरच्या हास्यकल्लोळात गोळीचा आवाज दडपला जावा. त्यानंतर बूथने अचानक लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. लिंकन तत्काळ कोमात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले. अचानक झालेल्या कल्लोळात बूथने लिंकन यांच्या सहकाऱ्यावर चाकूने वार केला आणि गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. त्यात त्याच्या घोटय़ाचे हाड मोडले. तरी तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पुढे बारा दिवसांत पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ठार मारले.

अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील बंदूक निर्माते हेन्री डेरिंजर (Henry Deringer) यांनी १८३० च्या दशकात आकाराने लहान, वापरास सुटसुटीत आणि एकच गोळी झाडू शकणारी पिस्तुले बनवली. नंतर तशा प्रकारची विविध कंपन्यांनी बनवलेली अनेक पिस्तुले बाजारात आली. त्यात एक किंवा दोन बॅरलमधून एक अथवा दोनच गोळ्या झाडता येत. लहान आकारामुळे ती बरीच लोकप्रिय झाली. बूथने वापरलेले डेरिंजर .४४ कॅलिबरचे होते. सध्या ते जेथे लिंकन यांची हत्या झाली त्याच्या खालील मजल्यावरील फोर्ड््स थिएटर म्युझियममध्ये मांडलेले आहे.

त्याचप्रमाणे फ्रान्समधील कॅसिमिर लिफॉशो (Casimir Lefaucheux) यांनी १८२० च्या दशकात पिनफायर काटिर्र्ज तयार केले. ते वापरण्यासाठी अनेक बंदुका तयार झाल्या. त्यापैकी एक म्हणजे लिफॉशो पिनफायर रिव्हॉल्व्हर. बंदुकांच्या इतिहासात हे काही विशेष प्रभाव पाडणारे शस्त्र नव्हते. मात्र ते कायमचे लक्षात राहिले आहे ते प्रसिद्ध डच चित्रकार विन्सेंट वॅन गॉ (किंवा गॉख – Vincent van Gogh) यांनी आत्महत्येसाठी वापरले म्हणून. गॉ यांनी २९ जुलै १८९० रोजी पॅरिसच्या जवळ मोकळ्या मैदानात स्वत:च्या छातीत ७ मिमी लिफॉशो पिनफायर पॉकेट रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेतली. मात्र त्या काळात या रिव्हॉल्व्हरला कोणी फारसे गांभीर्याने घेत नव्हते. त्याच्या गोळ्यांनी माणूस मरण्याची शाश्वती नसे. त्यामुळे दुकानदार वगैरे मंडळी चोराचिलटांना हुसकावून लावण्यासाठी ते वापरत. त्यामुळे गोळी झाडून घेतल्यावर गॉ हॉटेलवर परतले आणि अनेक तासांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या चित्रांप्रमाणेच लिफॉशो रिव्हॉल्व्हरलाही अजरामर करून गेले.

 

बर्मिंगहॅमचा गन क्वार्टर आणि वेब्ली अ‍ॅण्ड स्कॉट

webli and scott
webli and scott

अमेरिकेतील गृहयुद्धाचा फायदा केवळ स्थानिक शस्त्रास्त्र निर्मात्यांनाच होत होता असे नाही. तर अटलांटिक महासागरापार युरोपमधील ब्रिटनसारख्या देशांनीही त्याचा चांगलाच लाभ उठवला होता. ब्रिटनच्या बर्मिगहॅम या शहरातील ‘गन क्वार्टर’ नावाने ओळखला जाणारा भाग बंदूक निर्मात्यांसाठी प्रसिद्ध होता.

बर्मिगहॅम शहराच्या उत्तरेकडील स्टीलहाऊस लेन, शॅडवेल स्ट्रीट आणि लव्हडे स्ट्रीट यांच्यामध्ये वसलेल्या भागाला गन क्वार्टर म्हणत. सतराव्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत तेथे बंदूक निर्मितीचा व्यवसाय बहरला आणि अनेक बंदूक कंपन्या नावारूपास आल्या. त्यात जोसेफ बेंटली, वेब्ली अ‍ॅण्ड स्कॉट, विल्यम त्रांतर, ए. ए. ब्राऊन अ‍ॅण्ड सन्स आदी कंपन्या विशेष गाजल्या. ब्रिटनच्या सुप्रसिद्ध ली-एनफिल्ड रायफल्सची निर्माती वेस्टली रिचर्ड्स आणि आफ्रिकेत बंदुका पुरवणारी फार्मर अ‍ॅण्ड गॅल्टन, डब्ल्यू. डब्ल्यू. ग्रीनर आदी कंपन्याही इथल्याच. बर्मिगहॅमच्या गन क्वार्टरमध्ये सर्वप्रथम १६३० साली बंदुकीची निर्मिती झाल्याच्या नोंदी आहेत. तेव्हापासून अगदी १९६० च्या दशकात बर्मिगहॅम इनर रिंग रोडच्या बांधणीसाठी गन क्वार्टरचा बराचसा भाग पाडून टाकेपर्यंत तेथे बंदुकांचा व्यवसाय सुरू होता. बर्मिगहॅमच्या गन क्वार्टरमधील कंपन्यांनी तयार केलेल्या बंदुका सतराव्या शतकात इंग्लिश गृहयुद्धापासून नेपोलियनची युद्धे, क्रिमियन युद्ध, अमेरिकी गृहयुद्ध, पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि त्यानंतरही वापरल्या गेल्या. येथील काही कंपन्यांनी अमेरिकी गृहयुद्धात दक्षिणेकडील बंडखोर राज्यांना (कन्फेडरेट स्टेट्स) शस्त्रे पुरवून भरपूर नफा कमावला.

लंडनस्थित रॉबर्ट अ‍ॅडम्स यांच्या कंपनीने १८५० च्या दशकात अमेरिकेतील सॅम्युएल कोल्ट यांच्या कंपनीला युरोपमध्ये मोठी स्पर्धा निर्माण केली होती. १८५४ साली बाजारात आलेल्या अ‍ॅडम्स सेल्फ-कॉकिंग रिव्हॉल्व्हरने ब्रिटन आणि अमेरिकेतील अनेक सेनाधिकाऱ्यांची मने जिंकली. त्यामध्ये एक गोळी झाडल्यानंतर चेंबर फिरवण्यासाठी हॅमर वापरावा लागत नसे. थेट ट्रिगर दाबल्यावर चेंबर फिरणे आणि गोळी झाडणे ही दोन्ही कार्ये होत असत. म्हणजेच आजच्या डबल अ‍ॅक्शन रिव्हॉल्व्हरची ती सुरुवात होती. तसेच जोसेफ बेंटली यांच्या १८५३ साली वापरात आलेल्या बेंटली डबल अ‍ॅक्शन रिव्हॉल्व्हरनेही मोठी बाजारपेठ काबीज केली.

बर्मिगहॅममध्ये १७९० साली विल्यम डेव्हिस यांनी ‘बुलेट मोल्ड’ तयार करण्यास सुरुवात केली. त्यांचे जावई फिलिप वेब्ली यांनी १८४५ मध्ये त्याची सूत्रे स्वीकारली आणि वेब्ली कंपनीचा जन्म झाला. त्याचे १८५७ मध्ये डब्ल्यू. अ‍ॅण्ड सी. स्कॉट अ‍ॅण्ड सन्स या कंपनीबरोबर विलिनीकरण झाले आणि ‘वेब्ली अ‍ॅण्ड स्कॉट’ या कंपनीची निर्मिती झाली. मूळच्या वेब्लीचे ‘लाँगस्पर’ रिव्हॉल्व्हर बरेच गाजले. नंतरच्या वेब्ली अ‍ॅण्ड स्कॉटची ‘मार्क वन’ आणि ‘मार्क सिक्स’ ही रिव्हॉल्व्हर मॉडेल्स ब्रिटिश सैन्याने अधिकृत शस्त्र म्हणून स्वीकारली. ब्रिटिश सैन्याचा ती बराच काळ आधार होती. ती दुसऱ्या महायुद्धानंतरही अनेक देशांत वापरात होती.

 

स्मिथ अ‍ॅण्ड वेसन : मॉडेल १, २, ३ रिव्हॉल्व्हर्स

Smith & Wesson revolvers model 1 2 3
Smith & Wesson revolvers model 1 2 3

स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीचे व्होल्कॅनिक रिव्हॉल्व्हर बरेच लोकप्रिय झाले तरी त्यात एक त्रुटी होती. त्याच्या काडतुसांमध्ये मक्र्युरी फल्मिनेट हे स्फोटक होते. काही वेळा एक गोळी झाडल्यानंतर सर्व काडतुसांचा स्फोट होऊन सर्व गोळ्या एकदम झाडल्या जात.

या त्रुटी दूर करून स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने १८५७ साली ‘मॉडेल वन’ नावाचे रिव्हॉल्व्हर बाजारात आणले. त्याने त्यापूर्वीच्या पर्कशन कॅप रिव्हॉल्व्हरचा काळ संपवला आणि खऱ्या अर्थाने आधुनिक रिव्हॉल्व्हरचे युग सुरू झाले. त्याचे .२२ कॅलिबरचे रिम फायर काडतूसही स्मिथ अ‍ॅण्ड वेसननेच विकसित केले होते. तेव्हापासून स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने आपल्या बंदुकांसाठी काडतूस विकसित करण्याची परंपरा आजतागायत कायम राखली आहे. मॉडेल वन जरी वापरास सुटसुटीत असले तरी त्याच्या .२२ कॅलिबरच्या गोळ्या जंगली श्वापदे मारण्यास किंवा युद्धात शत्रूसैनिकांना रोखण्यास पुरेशा शक्तिशाली नव्हत्या.

त्यामुळे स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने गोळीचा आकार आणि ताकद वाढवून .३२ कॅलिबरच्या गोळ्या डागणारे ‘मॉडेल टू’ नावाचे रिव्हॉल्व्हर तयार केले. ते मॉडेल वनपेक्षा बरेच शक्तिशाली होते. त्याला सैन्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्या वेळी अमेरिकी गृहयुद्ध (१८६१ ते १८६५) सुरू झाले होते. त्या वेळी कोल्ट कंपनीच्या रिव्हॉल्व्हर्ससह स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीच्या रिव्हॉल्व्हर्सनाही मोठी मागणी आली. गृहयुद्धाच्या काळात स्मिथ अ‍ॅण्ड वेसन अमेरिकेतील एक मोठी बंदूकनिर्माती कंपनी म्हणून नावारूपास आली.

मात्र अमेरिकी गृहयुद्ध संपल्यानंतर तेथील सर्वच शस्त्रास्त्रनिर्मात्या कंपन्यांची बाजारपेठ ओसरली. कंपन्या तग धरून राहण्यासाठी धडपडू लागल्या. युद्धानंतर १८६७ साली स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीची महिन्याकाठी केवळ १५ रिव्हॉल्व्हर विकली जात होती. या मंदीतून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेबाहेरील बाजारपेठेचा मागोवा घेणे क्रमप्राप्त होते. त्याच दरम्यान पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र प्रदर्शन भरणार होते. स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने परिश्रमपूर्वक त्यांच्या शस्त्रांमध्ये सुधारणा करून ती पॅरिसमध्ये मांडली. ती पाहून रशियन सैन्याचे प्रतिनिधी आणि झारचा पुत्र युवराज अलेक्सिस बरेच प्रभावित झाले. रशियाने त्यांच्या सैन्यासाठी स्मिथ अ‍ॅण्ड वेसनच्या २० हजार रिव्हॉल्व्हर्सची ऑर्डर दिली. त्यात मॉडेल थ्री या रिव्हॉल्व्हरचा प्रामुख्याने समावेश होता. मॉडेल थ्री .४४ कॅलिबरची सेंटर फायर प्रकारची काडतुसे डागत असे. १८६८ ते १८७० या काळात उत्पादनास सुरुवात झालेले हे अमेरिकेतील पहिले मोठय़ा कॅलिबरचे रिव्हॉल्व्हर होते.

अमेरिकी लष्करातील मेजर जॉर्ज स्कोफिल्ड (Major George W. Schofield) यांनी मॉडेल थ्रीमध्ये काही बदल केले. त्यांचा समावेश करून स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने १८७५ साली स्कोफिल्ड यांच्या नावानेच नवे रिव्हॉल्व्हर बाजारात आणले. त्यासाठी .४५ स्कोफिल्ड नावाचे खास काडतूसही विकसित केले. त्याला अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांच्या सैन्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच्या दशकात स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने या दोन्ही सैन्यांना लाखो रिव्हॉल्व्हर्स पुरवल्या आणि कंपनीला चांगलीच ऊर्जितावस्था प्राप्त झाली.

 

 

 

 

स्मिथ अँड वेसन : व्होल्कॅनिक रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे

Volcanic revolvers and cartridges Smith & Wesson
Volcanic revolvers and cartridges Smith & Wesson

केवळ एक लक्षवेधी कल्पना असलेल्या रिव्हॉल्व्हरला मूर्त व्यावसायिक रूप देण्याचे काम जरी सॅम्युएल कोल्ट यांचे असले तरी त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन एकत्रित काडतूस (सेल्फ कण्टेण्ड कार्ट्रिज) विकसित करून त्यावर आधारित रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुले बनवण्याची किमया साधली ती ‘स्मिथ अ‍ॅण्ड वेसन’ (Smith & Wesson) या कंपनीने. कोल्ट आणि स्मिथ अ‍ॅण्ड वेसन यांची कहाणी सुरुवातीला सहकार्याची आणि नंतर तीव्र व्यावसायिक स्पर्धेची असल्याने तितकीच रोमांचक आहे.

स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीच्या नावातील भागीदार डॅनिएल वेसन यांचे थोरले बंधू एडविन वेसन हे अमेरिकेतील १८४०च्या दशकातील प्रसिद्ध नेमबाज आणि बंदूक निर्माते होते. एडविन यांच्या हाताखाली घरच्याच बंदुकीच्या कारखान्यात डॅनिएल यांनी उमेदवारी केली. त्या काळात सॅम्युएल कोल्ट यांच्या रिव्हॉल्व्हर बाजारात दाखल झाल्या होत्या. अमेरिका-मेक्सिको युद्धादरम्यान कोल्ट यांच्या वॉकर रिव्हॉल्व्हरच्या काही सुटय़ा भागांचे उत्पादन करण्याचे काम (सब-कॉन्ट्रॅक्ट) वेसन बंधूंना मिळाले होते. एडविन आणि डॅनिएल वेसन यांनीही त्यांच्या स्वत:च्या रिव्हॉल्व्हरचे डिझाइन तयार केले होते आणि ते बाजारात आणण्यास दोघे बंधू उत्सुक होते.

मात्र जानेवारी १८४९ मध्ये एडविन वेसन यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि वेसन यांची कंपनी कर्जबाजारी बनली. एडविन यांच्या स्वप्नातील रिव्हॉल्व्हर बनवण्याचा डॅनिएल यांचा प्रयत्न होता. पण त्याकाळी रिव्हॉल्व्हरचे पेटंट सॅम्युएल कोल्ट यांच्याकडे असल्याने त्यात अडथळा आला. कोल्ट आणि वेसन यांच्यात चाललेला रिव्हॉल्व्हरवरील बौद्धिक स्वामित्व हक्काचा खटला कोल्ट यांनी जिंकला आणि त्यांच्या पेटंटला मुदतवाढ मिळाली. या प्रसंगानंतर सॅम्युएल कोल्ट आणि डॅनिएल वेसन हे कायमचे प्रतिस्पर्धी बनले.

डॅनिएल वेसन यांनी १८५२ साली होरेस स्मिथ या त्या वेळी अमेरिकी बंदूक उद्योगात स्थिरावलेल्या ज्येष्ठ व्यावसायिकाशी भागीदारी केली. त्यातूनच स्मिथ अ‍ॅण्ड वेसन या कंपनीची निर्मिती झाली. पुढे तेही बंदूक उद्योगातील मोठे नाव बनले. स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीने बाजारात आणलेले पहिले रिव्हॉल्व्हर ‘व्होल्कॅनिक’ नावाने ओळखले गेले. यातून एका मागोमाग एक डागल्या जाणाऱ्या गोळ्या एखाद्या ज्वालामुखीच्या उद्रेकासारख्या भासत. त्यावरून त्याला व्होल्कॅनिक नाव पडले. त्यासाठी तयार केलेल्या व्होल्कॅनिक काटिर्र्जचे स्मिथ आणि वेसनने १८५४ मध्ये पेटंट घेतले. सॅम्युएल कोल्ट यांच्या रिव्हॉल्व्हरच्या पेटंटची मुदत १८५६ साली संपत होती.

तोपर्यंत स्मिथ अ‍ॅण्ड वेसनच्या व्होल्कॅनिकमध्येही अनेक सुधारणा केल्या गेल्या. नवीन रिव्हॉल्व्हरचा आराखडा मूर्त स्वरूप घेत होता. त्यांनी जुन्या .२२ कॅलिबर काडतुसामध्ये सुधारणा केल्या होत्या. या वेळपर्यंत कोल्ट यांच्या पेटंटचा अडसरही दूर झाला होता. आता स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनी कोल्टला टक्कर देण्यास सज्ज होती.

 

 

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *