UDDHAV THAKARE PACHASA INSTEAD OF CHALISA
UDDHAV THAKARE PACHASA INSTEAD OF CHALISA
‘हनुमान चालिसा’च्या धर्तीवर ‘उद्धव पचासा’ हा ग्रंथ रचण्यात आला असून, सैनिकांनी त्याचे नित्य पठण केल्यास त्यांना धनप्राप्ती, बलप्राप्ती यांचा लाभ होईल, असे ह.भ.प. आबासाहेब पुरंदरे यांनी म्हटले आहे. हा ग्रंथ पूर्णरूपात लवकरच शाखा-शाखांना विक्रीसाठी (ऊर्फ पावती फाडण्यासाठी) उपलब्ध करून दिला जाईल. या ग्रंथाची ही एक झलक !
‘उद्धव पचासा’
जयाच्या मनाची। न लागे दाद। म्हणती त्यास दादू। सर्व लोक
आतल्या गाठीचा। कुणी म्हणे त्यास। कुणी म्हणे त्यास। नाही गती
सर्वेसर्वा तोच। तोच अन्नदाता। पक्षाचा कैवारी। तोच आता
नाम त्याचे घेऊ। रूप त्याचे पाहू। तेव्हाचि जीवाला। चैन पडे
पाच दशकांची। सुरस कहाणी। काया वाचा मनी। साठवावी
करोनिया स्नान। बैठक मारून। प्रसन्न चित्ताने। आठवावी
रोज करी याचे। मनन चिंतन। त्याच्या गाठी पडे। पुण्य राशी
सावध होऊनि। ऐका आता तुम्ही। कथा उद्धवाच्या। पन्नाशीची
जन्म म्हाराष्ट्राचा। झाला त्याच साली। माई जेव्हा होत्या। गरोदर
जुलै सत्तावीस। जीव कासाविस। वाट पाही जन। घरोघर
आणि अचानक। चैतन्य फाकले। बाळराजे आले। या जगात
आनंदून गेले। थोरले महाराज। गादीचा वारस। जन्मा आला
काय सांगू मग। चमत्कार झाला। आकाशात झाली। ढगदाटी
वीज कडाडली। मोठय़ा आवेगाने। भीतीचे सावट। पसरले
काय हो इशारा। असे निसर्गाचा। विजेची शलाका। काय सांगे?
पाहुनि पत्रिका। हासला ज्योतिषी। धीर धरा म्हणे। सर्वालागि
सृष्टीने काढिला। बाळाचा हो फोटो। वीज म्हणजे त्याचा। फ्लॅश होता
पाहुनिया फ्लॅश। बाळ आनंदला। भविष्य सूचन। होते त्यात
मोठा होवोनिया। धरील कॅमेरा। त्यात होई याचा। हातखंडा
सृष्टीचे काढुनि। हजारोंनी फोटो। फेडील हा ऋण। आभाळाचे
कलाकारा पोटी। कलाकार आला। झाला जै जै कार। चोहीकडे
वाटली साखर। तोंड झाले गोड। म्हणुनि हो खाती। पाव वडे
भविष्याची बीजे। भूतकाळामध्ये। प्रत्येकाला नसे। जाण त्याची
कॅमेऱ्याचा हात। कॅमेऱ्याची साथ। कॅमेऱ्याची बात। पुढे पाहू
दिस मास गेले। गेली वर्षे सहा। काळ कसा अहा। पुढे गेला
जिथे तिथे होते। मराठीची गोची। म्हणोनि कुंचला। पेटविला
मोठे महाराज। झाले ढाण्या वाघ। धावे अंगावर। एकेकाच्या
शिवाजीच्या नावे। सेना आली जन्मा। बाळ उद्धवही। आनंदला
* * *
सोडोनिया लुंगी। वाजविली पुंगी। असे बहुढंगी। खेळ झाले
शारदेची झाली। मग पिछेहाट। लक्षुमीची मात्र। चैन झाली
आपला नायक। जात्याच हुशार। शाळेतही त्याचा। भाव मोठा
काकांच्या घरात। पुत्ररत्न आले। उद्धव हो झाला। भाऊ मोठा
आता पुढे ऐका। खास इतिहास। बंधुभाव मोठा। येथे नांदे
बालपणी सारे। सुखा-सुखी नांदे। मोठेपणी मात्र। होती वांदे
धरोनिया हात। एकत्र खेळिले। एक काढी चित्रे। एक फोटो
सेना फोफावली। सेना झाली मोठी। यशाची लागली। सुपर लोट्टो
चित्रकाराजागी। चित्रकार बैसे। धाकटय़ाचे ऐसे। तत्त्वज्ञान
राजकारणाची। तुला नसे जाण। म्हणे तुझी जागा। कॅमेऱ्यात
उद्धवाच्या डोकी। चमकला फ्लॅश। चाल केली खास। ऐसी त्याने
माझिया बापाने। लावियेले झाड। फळे त्याची कोणा। कैची मिळे?
विठ्ठलाचे हात। कटेवरी होते। बडवे लागले। भांडण्यासी
एक होते त्याचे। झाले मग दोन। एकमेका लागे। काढण्यासी
आपला नायक असा हो हुशार। जमविले त्याने। सैनिकांसी
सिंहासनी त्याने। अभिषेक केला। सूत्रे सारी दिली। मिलिंदाशी
लोक म्हणे कोणा। म्हणू आता सेना। दोहोंचेही रूप। एक असे
एकीकडे ‘पाय’। एकीकडे ‘डोके’। सैनिकांची मने। बिथरली
लचका मराठीचा। कोणी तोडायाचा। लागले बछडे। झुंजायासी
एका पाठी गर्दी। बाप एका पाठी । एकमेकां साप। म्हणो लागे
भैया झाला भाऊ। भाऊ झाला भैया। मराठीची झाली। सुकी भेळ
गडकिल्ले झाले। सारे कासावीस। उद्धाराचा त्यांच्या। सुरू खेळ
शिव वडा खाऊ। शिव वडा पाहू। शिव वडा नेऊ। घरोघरी
उद्धवचि मन। उद्धवचि तन। उद्धवचि ध्यान। धरी आता
ऐसा पन्नाशीचा। रम्य तो सोहळा। उभ्या मेणबत्त्या। केकवरी
गोऱ्ह्यांची नीलम। आणि रश्मीताई। नेसुनि भरजरी। हौस भारी
मध्य रात्री गेला। काटय़ावरी काटा। आणि फिरली सुरी। केक वरी
ऐसा मराठीचा। अभिमान भारी। दारी निरांजन। केविलवाणी
आपुला घेऊनि। आपण हो वाटा। त्याचा त्यास द्यावा। नको हाव
मनसेच्या नावे। करील जो शंख। भक्त खरा तोच। ओळखावा
उद्याचे दैवत। आदित्य राइझिंग। याची मनी जाण। असो द्यावी
।। इति प्रथमोध्याय द्वाड हा।।