ॐकार साधना

‘खुले आकाश, प्रकृती झकास’ या घोषवाक्याच्या आधारे मोकळ्या हवेत व मोकळ्या वातावरणात ओंकार साधनेसह व्यायाम केला तर प्रकृती ठणठणीत राहते, हे कृतीतून दाखवून देणारे व या पद्धतीचा अंगीकार केलेल्यालाही तशीच अनुभूती देणारे नगरचे डॉ. जयंत करंदीकर म्हणजे हरहुन्नरी व्यक्तिमत्व. दलित मुलींच्या शिक्षणासाठी बालिकाश्रम वसतिगृहाच्या कामाचा कौटुंबिक सामाजिक वारसा जपताना संगीत, गायन व उतार वयात ओंकार साधनेच्या प्रचार-प्रसारातून स्वतःचा स्वतंत्र लौकिक निर्माण करण्यात डॉक्टर यशस्वी झाले. त्यांचे निधन त्यांनी रुजवलेल्या ओंकार साधना वृक्षाचा पाया थोडा हलवून जाईल, पण हा वृक्षच त्यांनी इतका बळकट केला आहे की, भविष्यात त्याची सावली अवघ्या समाजमनाचे आरोग्य नक्कीच सुधारून जाईल.

डॉ. करंदीकर यांच्या आजी म्हणजे आईची आई- जानकीबाई आपटे यांनी १९४३ मध्ये दलित मुलींच्या शिक्षणासाठी नगरला बालिकाश्रम वसतिगृह सुरू केले. पुढे त्यांच्या कन्या म्हणजे डॉक्टरांच्या आई- स्वातंत्र्यसैनिक माणिकताई करंदीकर यांनी या वसतिगृहाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर तब्बल ३०-३२ वर्षे डॉक्टर स्वतः या संस्थेचे विश्वस्त होते. आयुर्वेदाचे शिक्षण घेतलेले त्यांचे वडील म्हणजे- करंदीकर गुरुजींनी आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी वाहून घेतले होते. तेही स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या स्मृति जपण्यासाठी डॉक्टरांनी १९७९ मध्ये कुष्ठरोग्यांच्या निरोगी मुलांसाठी बालसदन उभारले. तेही मागील ३८ वर्षे येथे सुरू आहे.

संगीत विशारद व पुणे आकाशवाणीचा ‘अ’ श्रेणीचा गायक असा लौकिक मिळवलेल्या डॉ. करंदीकरांचे विश्व वयाच्या पन्नाशीपर्यंत हॉस्पिटल व गायन यातच व्यग्र होते. ज्ञानेश्वरीतील ओव्यांना संगीत देण्याच्या इच्छेतून ‘ज्ञानेश्वरी अमृतगंगा’ कार्यक्रमाची रचना त्यांनी केली. ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या निरूपणासह ते सादर करीत. पुढे ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याचे वर्णन असणाऱ्या संत नामदेवांच्या १४४ अभंगांतील १६ अभंगांवर आधारित ‘संजीवन समाधी ज्ञानेशाची’ हा नवा कार्यक्रम निरूपणासह त्यांनी सुरू केला. त्याला रसिकांकडून दाद मिळाल्यावर व कॅसेट करण्याचा आग्रह झाल्य़ावर त्यांनी रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ गाठला. पण दुर्दैवाने त्यांना गळा साथ देईना. गायकाच्यादृष्टीने आभाळ कोसळण्याचीच ही घटना. स्वतः डॉक्टर असून घसा खराब होण्याचा अंतर्मुख होऊन विचार करतानाच त्यांना ज्ञानेश्वरीतील ‘कष्टले संसार शीणे। जे देवो येती गाऱ्हाणे तया ओ नावे देणे। तो संकेतु…’ हा श्लोक आठवला. त्याचा अर्थ म्हणजे- ‘या विश्वात जे दु:खी, कष्टी, पीडित आहेत, त्यांच्या हाकेला जो ओ देतो तो ओंकार…’ असे लक्षात आल्यावर त्यांनी ओंकाराचा शोध सुरू केला. ओंकाराचे योग्य उच्चारण केले तरच त्याचा फायदा होऊ शकतो, हे लक्षात आल्यावर साधू-संतांच्या भेटीतून ओंकाराच्या शास्त्रशुद्ध उच्चाराची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण ओंकाराचे महत्त्व त्यांच्याकडून स्पष्ट झाले तरी ओंकार उच्चाराचे पुरेसे समाधानकारक स्पष्टीकरण होत नसल्याने गीता, उपनिषद, संतसाहित्याचा धांडोळा घेतला. आधुनिक आवाज व वाणीशास्त्राचा अभ्यास केला. तब्बल तीन वर्षांच्या या संशोधनातून त्यांना उत्तर मिळाले- ‘ओंकार उच्चारताना ओ नंतर बिंदूमात्रा यायला हवी व नंतर ती मकाराच्या गुंजनात मिसळली पाहिजे.’ ओंकार साधनेचे हे गुढ रहस्य जाणल्यावर त्यांनी बिंदूमात्रा जाणवेल अशा प्रकारे साडेतीन मात्रांच्या ओंकाराचा उच्चार बसवला आणि त्याला नाव दिलं ‘तरंग ओंकार’. अवघ्या सात सेकंदांच्या या ओंकार उच्चारणात ‘ओ’ चार सेकंद, ‘ओं’ एक सेकंद व ‘म’ २ सेकंद अशी विभागणी केली. स्वतः याचे प्रयोग सुरू केल्यावर त्यांना अविश्वसनीय परिणाम मिळाला. स्वत:चा गळा अवघ्या तीन महिन्यांत पूर्वीपेक्षा अधिक सुरेल झाला.

ओंकार साधनेचे महत्व लक्षात आल्यावर त्यावर डॉ. करंदीकरांनी अखंड संशोधन सुरू ठेवले. पुढे ‘ॐ शक्ती व्हाइस एनर्जी थेरपी’ ही होलिस्टिक अल्टरनेटिव्ह उपचार पद्धती विकसित केली. यात ओंकार उच्चारण्याच्या ६४ पद्धती दाखवल्या. याशिवाय श्वासावर आधारित श्वसनाचे २० प्रकार, ध्यानाच्या विविध क्रियाही आहेत. या पद्धतीच्या आधारे आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांवर वैद्यकीय उपचारांबरोबरच ओंकार थेरपीचे उपचार त्यांनी सुरू केले. त्याचा रुग्णांनाही फायदा होऊ लागला. ओंकाराची महती पटल्याने पंडित फिरोज दस्तूर, यशवंत देव, सोनाली राठोड, सुनिधी चौहान, रवींद्र साठे, मिलिंद इंगळे, अनुराधा मराठे असे नामवंत गायक कलावंत डॉक्टरांकडे उपचार व मार्गदर्शनासाठी येऊन गेले.

ओंकाराच्या सुयोग्य उच्चारणाने वाणीदोष पूर्ण नाहीसे होतात, असे करंदीकरांचे म्हणणे होते. ‘ओंकार उच्चारण साधनेची सुरुवात कधीही भरपूर श्वास घेऊन करायची नाही. श्वास नेहमी बोलल्यासारखा सहज आला पाहिजे. त्याचबरोबर दोन ओंकार उच्चारणामधील श्वास सप्तांगाने (तोंडाने, कंठाने, पोटाने, सहज, लयबद्ध, फुप्फुसांच्या मागच्या भागातून व खालच्या दिशेने) घेतला पाहिजे. ओंकार उच्चार सहज, लयबद्ध, नादमय, तेजोमय, तेलाच्या धारेसारखा वा मंदिराच्या गाभाऱ्यातून येणाऱ्या घंटानादासारखा यायला हवा. त्याने साधकाचे मन प्रसन्न व्हायला हवे. दमछाक होता कामा नये आणि ओंकार पुन:पुन्हा उच्चारायची ओढ लागायला हवी’, असे ते आवर्जून सांगायचे. ओंकाराच्या साडेतीन मात्रा मनुष्याच्या शरीरातील षट्चक्रांवर स्थित असल्यामुळे ओंकार साधनेने सूक्ष्म नादचैतन्याची मोहळे असलेल्या षट्चक्रांची शुद्धी होते व त्यांच्या कार्यात समतोल राहतो, असा त्यांचा दावा होता.

नगरपासून १५ किलोमीटर अंतरावर औरंगाबाद रस्त्यावरील डोंगरगण येथील सात एकर जागेत डॉ. करंदीकरांचे ‘ओम् शक्ती व्हाइस एनर्जी थेरपी सेंटर’ आहे. आरोग्य, अध्यात्म व संगीत या तीन पातळ्यांवर येथे काम चालते. सर्वसाधारण व्यक्तींना निरोगी राहण्यासाठी ओंकाराचा मंत्र ते विनामूल्य शिकवायचे. ‘ॐ जीवेश्वर तराणा’ ही शास्त्रीय संगीतातील नवी तराणा पद्धती त्यांनी विकसित केली होती व त्याचे प्रयोग केले. हृदयाची कार्यक्षमता समजण्यासाठी ‘ईसीजी’ काढला जातो. त्याचप्रमाणे रुग्णाच्या प्राणशक्तीचे व जीवशक्तीचे बल मोजण्यासाठी डॉक्टर करंदीकर ‘इलेक्ट्रो व्हॉइस एनर्जी ग्राफ’ (ई.व्ही.ई.जी.) काढायचे. यासाठी त्यांनी स्वतःच स्वतंत्र उपकरणही विकसित केले होते. या उपकरणाद्वारे त्या व्यक्तीच्य़ा प्राणशक्तीचे बल कळले, की ओंकार उच्चारण उपचार सुरू करायचे. अशा प्रकारे व्याधीमुक्त झालेले त्यांचे अनेक रुग्ण आहेत. ओंकार साधनेची ही परंपरा जपण्याचे काम आता त्यांच्या शिष्यांना व रुग्णांनाच करावे लागणार आहे.

================================

 • ॐकार उच्चारताना तोंड अल्प उघडावे. तोंड अल्प उघडणे म्हणजे तोंड उघडून दोन्ही दातांच्या मधे आपले पहिले बोट ठेवावे, नंतर बोट तेथून काढून टाकावे. जी तोंडाची उघडलेली स्थिती राहील ती स्थिती म्हणजे अल्प तोंड उघडल्याची स्थिती होय. ही स्थिती कंठ खुला राहण्याची स्थिती आहे. या अल्प उघडलेल्या स्थितीतच ॐकार उच्चार करावा. अल्प तोंड उघडण्याची दुसरी पद्धती म्हणजे अल् या शब्दाचा उच्चार करून तोंड उघडावे. टाळूच्या मूध्रेकडील भागाला चिकटलेली जीभ अलगद खाली आणावी. अशा रीतीने तोंडाची उघडलेली स्थिती व आकार राहील ती म्हणजे तोंडाची अल्प उघडलेली स्थिती होय.
 • ॐकार साधनेत जिभेचा कोठेही संबंध येत नाही आणि तसा येऊ देऊ नये. साधनेत जिभेचे स्थान स्वस्थ अवस्थेतील जिभेच्या स्थानाप्रमाणे असावे. स्वस्थ अवस्थेत जिभेचे टोक खालील दातांच्या हिरडीच्या थोडेसे पाठीमागे असते व जीभ स्थिर असते. हे स्थान निश्चित जाणून घेण्यासाठी तोंड मिटून आपण स्वस्थ बसावे व आपल्या या स्वस्थ अवस्थेतील जिभेच्या स्थानाकडे लक्ष द्यावे म्हणजे ॐकार साधनेच्या वेळेस जीभ कशी स्थिर राहिली पाहिजे हे साधकाच्या निश्चित लक्षात येईल.
 • ॐकाराचा उच्चार घशाच्या पाठीमागील बाजूकडून म्हणजेच कंठातूनच झाला पाहिजे. पाठीमागील बाजू म्हणजे आपण कंठातून पाणी जेथून गिळतो किंवा आवंढा जेथून गिळतो ती जागा होय. हाच तो कंठ म्हणजे सामान्य भाषेत घसा. ॐकारच्या वाचिक जपाचे स्थान हेच आहे. हे स्थान समजण्यासाठी तोंडात थोडे पाणी घेऊन लक्षपूर्वक गिळून पाहावे किंवा आवंढा लक्षपूर्वक गिळून पाहावा. हनुवटी व गळा जेथे मिळतो ते हे कंठाचे स्थान आहे. मानवी कंठ तीन भागांत विभागला आहे- १. ब्रह्मकंठ, २. विष्णुकंठ व ३. शिवकंठ. ॐकारातील अकारमात्रेचा उच्चार ब्रह्मकंठातून, उकार मात्रेचा उच्चार विष्णुकंठातून व म्कार मात्रेचा उच्चार शिवकंठातून झाला पहिजे, तरच ॐकाराची अपेक्षित सुयोग्य स्पंदने मिळतील.

===========================

कुठल्याही निरोगी व्यक्तीचे गाढ निद्रेतील श्वसन जर आपण तपासले, तर असे लक्षात येईल की, ती व्यक्ती स्त्री असो, पुरुष असो, कोणत्याही वयाची असो, त्याची श्वासोच्छ्वास क्रिया संथगतीने, लयबद्ध, सहजपणे चालू असते आणि या क्रियेच्या वेळी पोटाची वरखाली होणारी हालचाल दिसते. ही स्वस्थ व्यक्तीच्या गाढनिद्र्रेेतील श्वासोच्छ्वास क्रिया नेणिवेतील आहे ज्याला वैद्यकीय परिभाषेत इनवोलंटरी (Involuntary) असे संबोधतात. त्या गाढनिद्रेत व्यक्तीचे मनही कार्य करत नाही आणि शरीरही कार्य करत नाही. या क्रियेत श्वासपटल हा श्वासाचा प्रमुख स्नायू सहज आकुंचन पावल्याने श्वास फुप्फुसाच्या खालच्या रुंद भागात जातो. त्यामुळे गाढनिद्रेतील स्वस्थ व्यक्तीचे पोट वर उचलले जाते व श्वास सोडताना पोट पुन्हा पूर्वस्थितीत येते. भारतीय तत्त्वज्ञानातील आध्यात्मिक शास्त्रात याच क्रियेला सोऽहम् अजपाजप अशी संज्ञा दिली आहे.
कोणीही व्यक्ती दिवसभरात २१,४०० ते २१, ६०० वेळा श्वासोच्छवासाची क्रिया करते. ती इतकी सहज व लयबद्ध चाललेली असते की, दिवसातून एकदाही आपले या श्वासोच्छ्वास क्रियेकडे आपले लक्ष जात नाही. श्वासोच्छ्वास क्रियेत काही अडथळा आला, दम लागला तरच तो डॉक्टरांकडे धाव घेतो. गाढ निद्रेतील स्वस्थ माणसाचे सोऽहम् श्वासोच्छ्वास क्रिया ही श्वासपटलाधारित श्वसनाचीच क्रिया आहे. सोऽहम् या शब्दातील स आणि ह ही अक्षरे काढली तर शिल्लक उरतो तो ॐ.
शास्त्रशुद्ध ॐकार साधनेतून श्वासाचा प्रमुख स्नायू श्वासपटल बलवान होतो, सशक्त होतो आणि त्याची २४ तास सोऽहम् स्वरूपच श्वासोच्छ्वास क्रिया चालू राहते. ॐकार साधना ही श्वासपटलाधारित श्वसनाच्या पायावरच उभी राहिली तरच ते नादचतन्य साधक व्यक्तीला निरामय आरोग्याकडे घेऊन जाईल अन्यथा नाही. या आधीच्या लेखातून विशद केलेले ॐकाराचे अष्टगुण व त्यातून निर्माण होणारे सुपरिणाम श्वासपटलाधारित श्वसनानेच ॐकार उच्चारण झाले तरच साधक व्यक्तीच्या प्रत्ययास येतील.
प्रत्येक व्यक्तीने खाली दिलेला प्रयोग घरी करून बघावा.
सतरंजीवर अथवा गादीवर उताणे सरळ झोपावे, उजवा हात नाभीवर पालथा ठेवावा, डावा हात छातीच्या अगदी वरच्या भागावर मध्यस्थानी ठेवावा, सर्व अंग शिथिल करून डोळे मिटावे व त्रयस्थ म्हणून आपणच आपल्या श्वासोच्छ्वास क्रियेचे अवलोकन करावे. श्वास खेचू नये, ओढू नये, कृत्रिम रीतीने मुद्दामहून घेऊ नये. आपण गाढनिद्रेत आहोत असा मनात भाव ठेवावा. या स्थितीत श्वासोच्छ्वास क्रियेच्या वेळी होणारी हालचाल पोटावर व छातीवर ठेवलेल्या पालथ्या पंजाने तपासावी.
ती तपासताना जर पोट वरखाली होत असेल तर श्वासोच्छ्वास क्रिया बरोबर चालू आहे असे समजावे. परंतु छातीच्या वरच्या भागावर ठेवलेला डावा हात वर-खाली होत असेल तर मात्र आपली श्वासोच्छ्वास क्रिया चुकीची होत आहे असे समजावे.

=========================

ॐ कार उच्चारणात कोणकोणती काळजी घ्यावी, याविषयीची काही महत्त्वाची तत्त्वे-

 • ॐकार उच्चारणात तो कंठाने उच्चारला पाहिजे, कानाने ऐकला पाहिजे, डोळ्याने ‘पाहिला’ पाहिजे आणि मनाने चिंतला पाहिजे. थोडक्यात, काया-वाचा-मनाने त्यांचे उच्चारण झाले पाहिजे. यालाच ॐकाराचा अनुक्रमे कायिक, वाचिक व मानस जप म्हणतात.
 • ॐकार साधना करताना पाठीचा कणा सरळ रेषेत ताठ ठेवला पाहिजे, त्याला कोठेही बाक नको. पद्मासन, सुखासन किंवा वज्रासन घालून ॐकार साधना केली तर उत्तमच. पण ज्यांना ते जमणार नाही त्यांनी अगदी खुर्चीवर बसून वर नमूद केल्याप्रमाणे फक्त पाठीचा कणा सरळ रेषेत ताठ ठेवून ॐकार साधना केली तरी चालेल. कारण ॐकार उच्चारणातील तेच मूलतत्त्व आहे.
 • साधना करताना साधकाची मान सरळ रेषेत हवी. हनुवटी वर उचलली जाऊ नये अथवा खालीही जाऊ नये. त्याने स्वरतंतूंवर ताण येतो. म्हणूनच मान डोळ्यांच्या सरळ रेषेत असावी.
 • ॐकाराचा उच्चार व त्याचा स्वरलगाव पाठीमागून पुढे म्हणजे कंठाकडून ओठाकडे गोलाकार घडय़ाळ्याच्या काटय़ाप्रमाणे असावा.
 • ॐकार साधना करताना कपडे सलसर असावेत; जेणेकरून ॐकार साधनेत अभिप्रेत असलेली दोन ॐकार उच्चारणामधील उदरश्वसनाची म्हणजे पोटाच्या श्वसनाची व हालचालीची क्रिया सहज होईल. त्यासाठी पुरुषांनी शक्यतो झब्बा, पायजमा व स्त्रियांनी पंजाबी ड्रेस घालावा. पुरुषांनी पँट घालावयाची असल्यास ती सल असावी, पट्टा घातलेला नसावा.
 • ॐकार साधनेत साधनेचे स्थळ, साधनेसाठीचे आसन, परिसर, देह, मन आणि उच्चार शुद्ध, स्वच्छ व शुचिर्भूत हवेत. त्यामध्येही मनाची शुद्धता व उच्चाराची शुद्धता महत्त्वाची आहे.
 • ॐकार उच्चारणात शरीर व मन जितके स्थिर राहील, तितके जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  उच्चाराबरोबर डोलू नये.
 • ॐकार साधनेसाठी ब्रह्ममुहूर्त, पहाटेची वेळ सर्वात चांगली आहे. पण इतर वेळेस साधना केली तरी चालते. फक्त साधनेच्या आधी एक तास पोटात अन्न नको, ते रिकामे हवे.

=====================================

आपण ॐकार उच्चारणाच्या अष्टगुणांपकी विस्सष्ठ व मंजू या दोन गुणांचा ऊहापोह केला आहे. या लेखात आणखी दोन गुणांच्या उच्चारणाविषयी माहिती घेऊ.
विञ्ञेंय
विञ्ञेंय याचा अर्थ स्पष्टपणे कळणारा म्हणजेच ज्यातील शब्द स्पष्टपणे कळतात असा. नादचतन्य ओम्मधील ‘ओ’चा उच्चार करताना तो ‘ओ’च ऐकू आला पाहिजे. तो वोम्-आम्-अम्-एॅम् किंवा ऑम् या पद्धतीने होता कामा नये. ‘ओ’ उच्चारताना दोन्ही गाल थोडेसे आत घेतले तर ‘ओ’चा उच्चार ‘ओ’प्रमाणे निश्चित होतो. प्रत्येकाने आपल्या कंठातून उमटणारा ‘ओ’चा उच्चार स्वत:च्याच कानांनी ऐकावा, तो जर वोम् होत असेल तर चा याचा अर्थ जीभ हलून ती वरच्या दाताच्या आतल्या बाजूला लागत आहे असे समजावे. तशी ती लागता कामा नये. ॐकार उच्चारणात जीभ हलता कामा नये. ती स्थिर राहिली पाहिजे, हे मी पुन:पुन्हा सांगत आहे. जिभेचे टोक ॐ उच्चारणभर खालच्या दंतपंक्तीच्या पाठीमागे स्थिर हवे. एकदा का ॐ या वर्णाचे उच्चारण उत्तम झाले तर मुखातून बाहेर पडणारे सर्व स्वर व व्यंजने सुस्पष्ट होत जातात.
सबनीय –
सबनीय म्हणजे श्रवणीय. ॐ हा परमशुद्ध नादोच्चार शास्त्रशुद्ध पद्धतीने उच्चारल्यास तो श्रवणीयच असतो. मग तो कोणीही म्हटलेला असो. श्रवणीय म्हणजे सतत ऐकावासा वाटणारा. आपल्या कंठातून उमटलेला आपणच केलेला ॐचा उच्चार आपल्याला स्वत:ला पुन:पुन्हा म्हणावासा वाटला पाहिजे. कितीही वेळपर्यंत उच्चार केला तरी थकवा आला नाही तर तो उच्चार श्रवणीय होतो आहे, असे साधकाने समजण्यास हरकत नाही. ॐ उच्चार श्रवणीय झाला तर तो सांसर्गिकही होतो म्हणजे तो उच्चार ऐकणाऱ्या व्यक्तीलाही म्हणण्यास प्रवृत्त करतो म्हणजेच ॐ म्हणण्यास प्रवृत्त करतो.
उपमा द्यायचीच झाल्यास एक सडका आंबा, आंब्याची सर्व आढी नासवतो परंतु पाण्यात जर तुरटी फिरवली तर ती तुरटी सर्व पाणी शुद्ध करते. त्याप्रमाणेच ॐचे कार्य हे तुरटीप्रमाणेच आहे.
म्हणजेच ॐकार साधक साधनेने स्वत: शुद्ध व सात्वीक होऊ लागतोच व आपल्या भोवतालच्या परिसरालाही शुद्ध व सात्त्विक करू लागतो. अर्थात तो उच्चार शास्त्रशुद्ध व सुयोग्य पद्धतीने केलेला असेल तरच अन्यथा नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *