जसराज जोशी – sangeet

परवा त्या आपल्या ‘योयो’चे एक गाणे ऐकत होतो.. ‘इसे केहेते है हिप हॉप हिप हॉप.. ’ तसा मी योयोचा चाहता वगरे अजिबात नाही; पण त्याची काही गाणी (जसे ‘अंग्रेजी बीट’, ‘मनाली ट्रॅन्स’) त्यांच्या प्रोग्रॅमिंगसाठी (संगीत संयोजन) आवडतात. त्याच्या लिरिक्समध्ये ब्रेक्स, यमक वापरण्याची पद्धत कधी कधी वेगळी असते खरी, पण तरीही त्यातल्या काव्याकडे माझे लक्ष जात नाही कधी (आणि जात नाही तेच बरे आहे!). परवा का कोण जाणे, लक्ष गेले, तर त्या ‘इसे केहेते है..’मध्ये पट्ठय़ा म्हणतो, ‘मं ग्रॅमी ले आउंगा!’. एकूणच साहेबांच्या महत्त्वाकांक्षेला सलाम!! देव यांना (ग्रॅमी देवो ना देवो, पण किमान) सुबुद्धी देवो. (मजा म्हणून हे गाणे लक्षपूर्वक ऐकाच!)
पण त्यानिमित्ताने हे ग्रॅमी आहे तरी काय? ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी- ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड हा संगीत आणि ध्वनिमुद्रण क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जाणारा जगातील सर्वोच्च मानला जाणारा असा पुरस्कार आहे. ग्रॅमीला संगीतातील ऑस्कर असेही म्हणतात. हे अ‍ॅवॉर्ड अमेरिकेच्या ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ रेकॉìडग आर्ट्स अँड सायन्स’ने १९५८ साली चालू केले. आजपर्यंत भारताच्या खिशात ८ ग्रॅमी पुरस्कार पडले आहेत. या वर्षी अजून दोन कलाकारांनी हे अ‍ॅवॉर्ड पटकावून भारतीयांची छाती गर्वाने फुगवली आहे. एक अ‍ॅवॉर्ड नीला वासवानी हिला ‘बालकांसाठीचा सर्वोत्तम अल्बम’ या कॅटॅगरीत मिळाले. तिच्या ‘आय अ‍ॅम मलाला’ या श्राव्य पुस्तकासाठी (audiobook) हा पुरस्कार मिळाला. तर दुसरे ग्रॅमी ‘बेस्ट न्यू एज म्युझिक’ या गटात रिकी केज याला मिळाले. त्याने साऊथ आफ्रिकन सहकलाकार वॉल्टर केलर्मनबरोबर काढलेल्या ‘विंड्स ऑफ संसारा’साठी हे ग्रॅमी मिळाले. ‘विंड्स ऑफ संसारा’मध्ये दोन गाणी आहेत- ‘लाँगिंग’ आणि ‘महात्मा’. दोन्हीमध्ये सांगीतिक दृष्टीने फार असे काही वेगळेपण नसले तरी त्यांचे ध्वनी-मिश्रण अत्यंत सुंदर आहे. मुळात शांती आणि सकारात्मकता या दोन भावना मनात जागृत करण्यासाठी या अल्बमची निर्मिती झाली आहे आणि या प्रयत्नात हे दोन कलाकार शंभर टक्के यशस्वी झाले आहेत.
भारताच्या खात्यात सर्वात पहिले ग्रॅमी आले, ते स्वर्गीय पंडित रविशंकर यांच्यामुळे. १९६७ मध्ये. अमेरिकन व्हायोलिनवादक येहुदी मेन्युईन यांसोबत त्यांनी ‘वेस्ट मीट्स ईस्ट’ हा जुगलबंदीचा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सादर केला होता. आत्तापर्यंत सर्वाधिक ग्रॅमी मिळवणारे भारतीयही पं. रविशंकरच आहेत! १९६७नंतर १९७२ मध्ये ‘कॉन्सर्ट फॉर बांगलादेश’साठी हे अ‍ॅवॉर्ड त्यांना पुन्हा मिळाले. बांगलादेशी निर्वासितांसाठी निधी उभारावा या हेतूने रविशंकरजी यांनी त्यांचे मित्र जॉर्ज हॅरिसन (‘बीटल्स’ या पराकोटीच्या प्रसिद्ध म्युझिक बँडचे गिटारवादक) यांच्याशी संपर्क साधला. या दोघांच्या कल्पनेतून न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डनवर कार्यक्रम झाला. त्याचा पुढे अल्बमही झाला. रविशंकरजी आणि उस्ताद अली अकबर खानसाहेब (सरोद) यांची जुगलबंदी, अल्लाहरखाँ साहेब (तबला) यांच्या साथीत खमाज रागात मस्त रंगली आहे. हा पूर्ण कार्यक्रमच मस्त आहे. रवीजींना तिसरे ग्रॅमी मिळाले त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी (सन २००१) कन्या अनुष्का शंकरसोबत केलेल्या कारनेगी हॉलइथल्या ‘फुल सर्कल’ या सादरीकरणाला.
जगभरात तबल्याचे नाव ताजमहालपेक्षाही जास्त प्रचलित करणाऱ्या उस्ताद झाकीर हुसेन यांनाही आजवर दोनदा ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड मिळाले आहेत. दोन्ही वेळेला उस्तादजी यांनी जगातल्या विविध तालवादकांबरोबर तबलावादन आणि पढन्त केली आहे. मिकी हार्ट या कलाकाराच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्लॅनेट ड्रम (१९९२) आणि ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट (२००९) या दोन अल्बम्ससाठी झाकीरभाईंना ग्रॅमी मिळाले आहे. १९९२ ला झाकीरभाईंबरोबर विक्कु विनायकम हे दिग्गज घटमवादकही होते. या दोन्ही अल्बम्समध्ये सर्व तालवादकांनी एकत्रित येऊन जो धुमाकूळ घातला आहे; तो ऐकण्या आणि पाहण्यासारखा आहे.
गिटार आणि विचित्र वीणा या दोन वाद्यांचा सुरेख मेळ साधून ‘मोहन-वीणा’ वाद्य तयार करणाऱ्या पंडित विश्वमोहन भट्ट यांनाही १९९४ मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला. ‘अ मीटिंग बाय द रिव्हर’ या अल्बमसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. यात मोहन वीणा आणि रे कूडर यांनी वाजवलेली वेगळ्या धाटणीची स्लाइड गिटार यांचा सुरेल मेळ आहे. अतिरिक्त कंप असलेले वादन, गिटारच्या लाकडाचाही केलेला वापर, कॉर्ड वादन.. सहीच! मोहन-वीणासुद्धा नेहमीप्रमाणेच गोड आणि सुरेल.
जगभरात भारताचे नाव करणाऱ्या कलाकारांच्या यादीत ए आर रेहमानचे नाव नाही आले तरच नवल! २०१० साली ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटाच्या ‘जय हो’ गाण्यासाठी आणि पाश्र्वसंगीतासाठी असे दोन ग्रॅमी मिळवून सरांनी दणक्यात हजेरी लावली. ‘स्लमडॉग..’विषयी आत्ता फार बोलत नाही; पुढे कधीतरी हा विषय निघेलच. जाता जाता एवढेच सांगेन, की ‘जय हो’ सोडून इतरही अनेक गोष्टी ‘स्लमडॉग..’ या आल्बममध्ये आहेत; आणि त्या फारच उच्च आहेत!

हे ऐकाच..
नोराह जोन्स या विदुषीचे नाव खास चौकटीत घेतले आहे. कारण ही तशी भारतीय मुळीच नाही. पण पंडित रविशंकर यांची मुलगी या नात्याने भारतीय वंशाची (अथवा अंशाची) नक्कीच आहे. नोराह जोन्सने ‘कम अवे विथ मी’ आणि ‘डोण्ट नो व्हाय’ (२००३), ‘हिअर वी गो अगेन’ आणि ‘सनराइज’ (२००५), ‘रिव्हर’ (२००८) या गाण्यांसाठी वेगवेगळ्या कॅटॅगरीत मिळून तब्बल ८ ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड्स जिंकले आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या या नोराह जोन्सचे जागतिक संगीतातील योगदान अभूतपूर्व आहे. पियानोवादन, गिटारवादन, गाणी लिहिणे, गायन अशा सर्वच आघाडय़ांवर नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या या कलाकाराचा मी फार मोठा फॅन आहे. हिच्या गाण्यांमधील मृदुता मला सर्वात जास्त भावते. हिची गाणी हेडफोन लावून ऐकली, तर असा भास होतो की जणू कोणी तरी आपल्या कानांना गोंजारतंय; कुरवाळतंय! आवाज, वादन, शब्दोच्चार, प्रत्येक गोष्टीत कमालीची मृदुता.. कमालीची धुंदी.. नोराह जोन्सला एकदा तरी ऐकाच; हिच्या प्रेमात पडला नाहीत तर सांगा!

===========================

मागच्या आठवडय़ात हिंदी चित्रपटांच्या पाश्र्वसंगीताची प्ले लिस्ट पाहिली. आता हॉलीवूड बॅकग्राउंड स्कोअरबद्दल. अर्थात आजची प्ले लिस्ट हॉलीवूड BGM ची. आपल्याकडे गाणी हा जसा चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे, तसा तो तिकडे हॉलीवूडमध्ये नाही. त्यामुळे तिकडे चित्रपटाचे संगीत म्हणजेच पाश्र्वसंगीतच असते. प्रत्येक चित्रपटासाठी वेगळे बॅकग्राउंड म्युझिक अर्थात BGM करायची पद्धतच तिकडे पूर्वापार चालत आलेली आहे. आपण यू टय़ूबवर नुसते Hollywood BGM असे टाकायचा अवकाश, प्रत्येक चित्रपटाच्या पूर्ण लांबीच्या म्हणजे दीड-दोन तासाच्या OST (ओरिजिनल साउंड ट्रॅक)पासून त्यामध्ये वापरण्यात आलेल्या छोटय़ा छोटय़ा थीम्सचा महासागरच आपल्यासमोर येऊन ठाकतो! आजची प्ले लिस्ट म्हणजे त्या समुद्रातील केवळ काही थेंब समजावेत. केवळ काही उदाहरणे.
जॉन विल्यम्स
जुरासिक पार्क, हॅरी पॉटर, शिंडलर्स लिस्ट, जॉज्, स्टार वॉर्स, सुपरमॅनसारख्या अनेक ‘क्लासिक्स’ला संगीत देणाऱ्या जॉन विल्यम्सची स्टाइलसुद्धा क्लासिकच आहे. पारंपरिक सिंफनी पद्धतीचा जास्तीत जास्त वापर जॉन विल्यम्स यांच्या संगीतात सुंदररीत्या केलेला दिसून येतो. ‘िशडलर्स लिस्ट’चे संगीत तर कमालच आहे.


जेम्स हॉरनर
हॉलीवूडमध्ये एकूणच खूप सिंफनी ऐकू येते. आपल्याकडे जसे शास्त्रीय संगीत हा पाया आहे, तसे तिकडे सिंफनी हा संगीताचा पाया आहे, त्यामुळे ती वगळून तिकडे अपवादानेच संगीत बनते. जेम्स हॉरनर यांचा भर हा लक्षात राहाणाऱ्या चालींच्या सिंफनीवर जास्त असतो. चाल पुढे घेऊन जाणारे एक मुख्य वाद्य – जसे बॅगपाइप, बासरी, ओबो, क्लेरिनेट असते किंवा गायक/ गायिकेचा आवाज, उत्तरोत्तर खुलत जाणाऱ्या चाली, स्वरांमधले विलक्षण सुंदर बदल आणि मागे चालू असलेल्या िस्ट्रग्स (व्हायोलिन्सचा ताफा), ब्रास (ट्रम्पिस्ट, सॅक्सफोन वगरे वाद्यांचा ताफा) या मिश्रणामुळे जेम्स हॉरनरचे संगीत नेहमीच परिणाम करते.
या संगीताचे वैशिष्टय म्हणजे हे चित्रपटाचा आनंद तर द्विगुणीत करतेच, पण त्याच्या थीम्स नुसत्या ऐकण्यासाठीही उत्तम ठरतात. उदाहरणार्थ ‘टायटॅनिक’ची थीम.. ज्याचे गाणेही आहे (माय हार्ट विल गो ऑन). जेम्स हॉरनरच्या आवडलेल्या ट्रॅक्सपकी काही म्हणजे- ‘ब्यूटिफुल माइंड’ चित्रपटातील ‘कॅलिडोस्कोप ऑफ मॅथेमॅटिक्स’ ही थीम, ‘ट्रॉय’ची मुख्य थीम, ‘अपोलो १३’ची ‘री-एंट्री अँड स्प्लॅशडाऊन’, ‘ग्लोरी’ चित्रपटाची शेवटची थीम आणि ‘ब्रेव्ह हार्ट’ची गाजलेली बॅगपाइपरची थीम.


हॅन्स झिमर
हा जर्मन संगीतकार (जर्मन उच्चार – हान्स त्सिमर) BGM मधला गब्बर! vd05अतिशय कमी सूर वापरून, चालीपेक्षा ध्वनीवर आणि ध्वनीमुळे होणाऱ्या परिणामावर जास्त भर देणाऱ्या प्रयोगशील हॅन्स झिमरचे जगभरात कोटय़वधी फॅन्स आहेत. विविध आवाजांच्या, कंपनांचा विचार करून भरीव ऑर्केस्ट्राच्या साहाय्याने प्रेक्षकांच्या उत्कंठेशी खेळणे म्हणजे या सरांच्या डाव्या हातचा मळ! हॅन्स झिमरचे पाश्र्वसंगीत हे चित्रपटापासून वेगळे करताच येत नाही. एखाद्या मध्यवर्ती भूमिके एवढेच महत्त्व या संगीतालाही असते.
चित्रपटाच्या यशात या संगीताचा फार मोठा वाटा असतो. काही उदाहरणे- पायरेट्स ऑफ कॅरेबियन- ‘वन डे’ ही थीम, ‘मिशन इम्पॉसिबल- २’ मधली ‘इंजेक्शन’, ‘इन्सेप्शन’मधली ‘ड्रीम इज कोलॅप्सिंग’ आणि शिखर म्हणजे ‘ग्लॅडिएटर’, ‘डार्क नाइट’, ‘इंटरस्टेलर’चे अख्खे साउंडट्रॅक. याशिवाय ‘गॉडफादर’ची गाजलेली टय़ून (निनो रोटा.. ज्याच्यावरून ‘अकेले हम अकेले तुम’ चित्रपटातले ‘राजा को रानी से प्यार हो गया’ गाणे बेतले आहे) आणि ‘शटर आयलँड’ (संकलन- रॉबी रॉबर्टसन)चे पाश्र्वसंगीतही परिणामकारकतेत कुठेच मागे पडत नाही.

==========================

नुकताच म्हणजे ६ जानेवारीला वाढदिवस झाला ए. एस. दिलीप कुमार ऊर्फ अल्लाह रखाँ रेहमान ऊर्फ सरांचा, अर्थात आपल्या लाडक्या ए. आर. रेहमान यांचा. त्यानिमित्ताने पेश आहे अफफ प्ले लिस्ट. खरंतर रेहमान हे प्रकरण एका प्ले लिस्टमध्ये सामावणारं नाही. म्हणून या आठवडय़ात विचार करतोय रेहमान सरांच्या सुरुवातीच्या काही चित्रपटांचा. अर्थात रेहमान फेज वन.
अशी फेज किंवा असा काळ, जेव्हा सरांचं नवीन आलेलं प्रत्येक गाणं ऐकताक्षणीच ब्रह्मानंदी टाळी लागायची. असा काळ, ज्यात बाकी संगीतकरांमध्ये चढाओढ असायची ती रेहमानचं गाणं पहिल्यांदा कोण चोरी करेल याची. ऑडिओ कॅसेटचा काळ होता तो. फार पूर्वीचा नसला तरी आता आठवावा लागेल असा. तुम्हाला आठवत असेल ती ‘रोजा’ची सुप्रसिद्ध कॅसेट, ज्यात एका बाजूला तमिळ आणि एका बाजूला िहदी गाणी होती. या कॅसेटची आम्ही चक्क पारायणं केली आहेत. क्लासिक रेहमानचा काळ. साधारण १९९२ ते ९५ ची ती रेहमान फेज वन!
सुरुवात अर्थातच ‘रोजा’च्या गाण्यांनी. ‘रोजा’तली सर्वच गाणी अफलातून. त्यातली माझी सर्वात आवडती म्हणजे ‘दिल है छोटासा’ आणि ‘ये हसीन वादियाँ’. एक किस्सा प्रसिद्ध आहे या चित्रपटाबाबतचा.. दिग्दर्शक मणिरत्नम जेव्हा रेहमान सरांना पहिल्याप्रथम भेटले तेव्हा त्यांनी सरांना ‘रोजा’मधला तो गावातला सीन वर्णन करून सांगितला आणि म्हणाले, याच्यावर काहीतरी म्युझिक तयार कर. त्यावर रेहमानने तिथल्या तिथे एक आलापसदृश म्युझिक पीस तयार केला. तो ऐकूनच रेहमानला रोजा ही फिल्म बहाल झाली आणि ‘रेहमान’ नावाचा प्रवास सुसाट चालू झाला. हाच पीस आपल्याला ‘दिल है छोटासा’च्या दुसऱ्या कडव्याआधी (M2) ऐकू येतो. ‘ये हसीन वादियाँ’.. या गाण्याविषयी काय बोलू? केवळ म्युझिकच्या आधारे शब्दाचा वापर न करता बर्फाचे वातावरण, बर्फाळ प्रदेशाचा फील कसा काय निर्माण करता येऊ शकतो एखाद्याला?.. केवळ अशक्य!
नंतर १९९३ मधली ‘जंटलमन’ आणि ‘थिरुडा थिरुडा’ (हिंदी- ‘चोर चोर’) मधली गाणी. ‘जंटलमन’मधलं ‘चिककू बुक्कू रैइले’ (ज्याच्यावरून ‘पाकचिक राजाबाबू’ हे गाणं चोरलेलं आहे) ऐकून मी वेडाच झालो होतो. यात रेल्वेच्या आवाजाचा ऱ्हिदममध्ये जो वापर झालाय तसा आजपर्यंत कुठल्याही गाण्यात झाला नाहीए.
‘थिरुडा थिरुडा’मधलं ‘थी थी’ (हिंदी- ‘दिल दिल’) हे गाणं फार लोकांनी ऐकले नसेल, कारण ही फिल्म हिंदीमध्ये चालली नाही. हे एक प्रणयगीत आहे आणि यात सरगम आणि तालाच्या पढंतीचा (बोलांचा) जो वापर झालाय तो आजही नवा नवा वाटतो. मग १९९४ मध्ये आला ‘काधलन’ म्हणजेच हिंदी- ‘हमसे है मुकाबला’. यातलं ‘मुक्काला मुकाबला’ या गाण्याची चाल उचलून तर जवळ जवळ ५ ते ७ गाणी निघाली नंतर. ‘हमसे है मुकाबला’मधलं माझं सर्वात आवडतं म्हणजे ‘सुन री सखी’ हे हरिहरनजींच्या मखमली गायकीतलं ठुमरीवजा गाणं. याच चित्रपटातलं ‘गोपाला गोपाला’ हे गाणंही अफलातून. खटय़ाळ स्वभावाच्या या गाण्यात मध्ये बासरीवरची एक इमोशनल टय़ून येऊन जाते आणि गाण्याची मजा द्विगुणित करते. असं कॉम्बिनेशन फक्त सरांच्याच डोक्यातून येऊ शकतं.
मग ९५ मध्ये आला ‘बॉम्बे’! माझा सर्वात आवडता अल्बम. ‘हम्मा हम्मा’, ‘तू ही रे’, ‘कुच्चि कुच्चि रक्कमा’, ‘बॉम्बे थीम’ आणि नुसत्या आठवणीने अंगावर काटा आणणारं ‘कहेना ही क्या’! चाल, कोरस, मधूनच हार्मोनियमबरोबर येणारी सरांची सरगम, सगळं काही अद्भुत! या गाण्यावर प्ले लिस्ट संपवण्यावाचून पर्याय नाही! (याच वर्षी ‘रंगीला’सुद्धा आला, पण ‘रंगीला’ मी फेज-२ मध्ये टाकू इच्छितो. ती पुढे कधीतरी येईलच..)

हे ऐकाच..
‘थिरुडा थिरुडा’ या तमिळ चित्रपटातलं ‘थी थी’ हे रेहमान सरांचं ऐकावंच असं एक गाणं. हिंदीत फिल्म आली. ते गाणंही ‘दिल दिल’ नावानं उतरलं. पण मुळात हिंदी चित्रपट कधी आला कधी गेला कळलंच नाही. अर्थातच हे गाणं फार लोकांपर्यंत पोहोचलं नाही. पण यातली सरगम आणि बोलांचा वापर ऐकावाच असा. हरिहरननी गायलेलं ‘सुन री सखी’ हे ‘हम से है मुकाबला’मधलं गाणंही ऐकावंच असं या सदरात मोडणारं. जरूर ऐका. रेहमान सरांची फेज १ जागवण्यासाठी ही दोन गाणी पुन्हा एकदा ऐकलीच पाहिजेत.

======

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *