आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी आपण देवाची नेहेमीच प्रार्थना करतो,अशीच ही एक प्रार्थना.
तुझ्याच अंशे बाल निर्मिला अत्रिनंदना परमेशा
सर्व संकटे दूर करोनी रक्षी रे जगदीशा (१)
प्रातःकाळी सायंकाळी दिवसा रात्री केंव्हाही
शिशुवरी तव कृपा असुदे चिंता त्याची तू वाही (२)
दुष्ट नजर त्या कधी न लागो ग्रहादि पीडा तू तोडी
गोरजपीडा भूतप्रपीडा तोडी ,फोडी ,तू मोडी (३)
त्रिशूलधारी हे परमेशा सर्व अरिष्टा छेदोनी
तुझ्या रक्षणे अलंकारिले बालक तूही पाहोनी (४)
अश्विनीवेषा हे जगदीशा कुमार माझा तू रक्षी
झोपी जावो उभा असो वा असो कुठेही ,तू साक्षी (५)
दीर्घायू हे बालक होवो ओजबलाने युक्त असो
मुमुक्षत्व तू मला देऊनी बालकचिंता तुला असो (६)