Articles

एकवीस पत्री 21 Patri of Ganesha

दुर्वा आणि जास्वंदीच्या फुलाबरोबरच गणपतीच्या पूजेतील आणखी एक अविभाज्य घटक म्हणजे एकवीस पत्री. केवळ गणेशाला वाहिल्या जाणाऱ्या म्हणूनच नव्हे तर या एकवीस पत्री म्हणजे एकवीस वनौषधी आहेत, त्यांचे वेगवेगळे औषधी उपयोग आहेत.

१) मधुमालती –
या वनस्पतीला मालतीपत्र असेही म्हणतात. वनस्पती शास्त्रात हिला ‘हिपटेज बेंघालेन्सीसकुर्झ’ म्हणतात. फुफुसाचे विकार, त्वचारोग, जाडी कमी करण्यासाठी ही गुणकारी आहे. स्त्रीरोगातील श्वेतपदर, गर्भाशयाचे विकारांत तसेच नेत्ररोगातही या वनस्पतीचा खात्रीशीर उपयोग होतो.
२) माका – हिचे शास्त्रीय नाव ‘इक्लिप्टा प्रोस्ट्रेटा’ म्हणतात. मूत्रपिंडाचे आजार, केसांचे विकार यासाठी माक्याच्या पानाचा रस वापरतात. कावीळ, त्वचारोग, मूळव्याध, विंचुदंश, आमवात यासाठी माका गुणकारी आहे. माका रसायन आहे. रसायन म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देणारे औषध. माक्याचा रस सर्वागास चोळून जिरवल्याने शरीरातील मेदाच्या गाठी विरघळतात.
३) बेलपत्र – हिचे वनस्पती शास्त्रातील नाव ‘ऐजल मार्मेलस’ असे आहे. पोटातील जंत, पोटाचे विकार यावर बेलपत्राचा उपयोग होतो. आमांशाच्या विकारात बेलफळ गुणकारी आहे. बेलाच्या पानांचा रस ४ चमचे व मध २ चमचे घेतल्याने सात दिवसांत कावीळ बरी होते. बेलाच्या पानांचा २ चमचे रस, १ कप दुधातून घेतल्याने स्वप्नदोष कमी होतो.
४) दूर्वा – वनस्पती शास्त्रात हिला सायनोडॉन डॅक्टीलॉन म्हणतात. ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. हिच्या दोन जाती आहेत, पांढरी व निळी पैकी गणेशाला पांढऱ्या दूर्वा प्रिय आहेत. या जातीला हिल हराळी असेही म्हणतात. दूर्वाना प्रजोत्पादक व आयुष्यवर्धक मानले जाते. म्हणून गर्भदानविधीत स्त्रीच्या नाकपुडीत दूर्वाचा रस पिळतात. अंगातील उष्णता, दाह कमी करण्यासाठी, त्वचारोगनाशक म्हणून, वंध्यत्व नाहीसे करण्यासाठी दूर्वाच्या रसाचा खूप उपयोग होतो. मूत्रविकारासाठी दूर्वा परमौषधी आहेत. पांढऱ्या दूर्वा भीमाशंकर या प्रसिद्ध ठिकाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.
५) धोतरा – याचे शास्त्रीय नाव ‘टोब्रानॅपल स्ट्रॅमोनियम’ आहे. ही क्षुद्रवर्गीय वनस्पती आहे. तिच्या काळा, पांढरा व राजधोत्रा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून ‘अॅफ्रोपिन’ नावाचे औषध बनवतात. वेदनाशामक म्हणून याचा उपयोग होतो. दमा व श्वास विकारांवर कनकासव हे धोत्र्यापासून तयार होणारे औषध प्रसिद्ध आहे. हत्तीपायरोगात धोत्र्याच्या पानांचा रस इतर औषधांसोबत लेप म्हणून वापरतात. ही वनस्पती नऊ उपविषात गणली जाते. त्यामुळे हिचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
६) तुळस – तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसीमम सॅन्टम आहे. तुळस गणपतीला निषिद्ध असली तरी फक्त गणेश चतुर्थीस तुळस वापरतात. मात्र वाहून झाल्यावर त्वरीत बाजूला काढावी. विष्णू, कर्पूर, हिरवी व कृष्ण(रान) अशा तीन जाती आहेत. हवा शुद्ध करणे हा तुळशीचा मुख्य गुणधर्म आहे. दमा, खोकला, सर्दी या विकारात ही श्रेष्ठ ठरते. कॅन्सरसारख्या विकारात तुळशीची पाने मंजिऱ्या याचा रस रोज ४ चमचे असा एक महिना घेतल्यास परिणामकारक ठरू शकतो.
७) शमी – शास्त्रीय नाव ‘प्रोस्पोपिस सिनेरिऐंजल’ आहे. शमीत सुप्त अग्निदेवता असते असे म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची राख ठेवतात. त्वचारोग, दमा, मूत्रविकार, सूज या विकारांत शमी गुणकारी ठरते.
८)आघाडा – आघाडय़ाचे शास्त्रीय नाव ‘अक्र्याराधस अस्पेरा’ आहे. हिचा उपयोग बायका, ऋषीपंचमीचे दिवशी स्नानाचे वेळी तोंड धुण्यासाठी करतात. कारण मुखरोग, दंतरोगात हे श्रेष्ठ औषध आहे. कफविकार, सूज, भगंदर-मूळव्याध, मूतखडा, शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी मेदविकार, मलेरिया अशा अनेक आजारात आघाडा उपयोगी ठरतो.
९) डोरली – शास्त्रीय नाव ‘सोलॅनम इंडिकम’ आहे. डोरलीची मुळे गुणकारी असतात. त्वचारोग, पोटाचे विकार, वातनाशक, मूत्ररोगातसुद्धा वापरतात.
१०) कण्हेर – शास्त्रीय नाव ‘नेरीयम इंडिकम’ आहे. तिला करवीर, हयारी, कणगिले असेही म्हणतात. कण्हेरीची पाने व मुळाची साल औषधी आहे. महाविषगर्भ या वेदनाशामक तेलात त्याची साल वापरलेली असते. मूळव्याधीच्या कोंबास कण्हेरीचे मूळ पाण्यात उगाळून लावल्यास कोंब गळून पडू शकतात. कण्हेरीच्यामुळाची हृदयावर ‘डिजिटॅलीस’ सारखी क्रिया होते. नऊ उपविषात हिचा समावेश होतो. घोडय़ांना मारणारी म्हणून हिचे नाव हयारी असे आहे. डोक्यातील खवडे, त्वचारोग यात वापरतात.
११) मंदार – शास्त्रीय नाव ‘कॅलोट्रॅपीस गायगँटी’ आहे. मराठीत रुई या नावाने प्रसिद्घ आहे. मारुतीच्या गळ्यात हिच्या पानाची माळ घालतात. हनुमानपत्नी म्हणूनही हिला ओळखतात. तिच्या चंड, गंध व श्वेत अशा तीन जाती आहेत. हिची पाने, फुले, मुळे औषधी आहेत. तसेच चीकसुद्धा औषधी आहे पण अंगावर उततो त्यामुळे सावधपणे वापरावा. रुईच्या चिकामुळे शौचासही साफ होते. शरीरावरील गाठीत या चिकाचा इतर औषधांसोबत लेप देतात. पोटाचे विकार, वातरोग, अर्धशिशी, त्वचारोग, दमा, चामखीळ, कुरूप, कावीळ, अंडवृद्धी, कॅन्सरच्या गाठी, मूळव्याध अशा विकारांत मंदार हे चांगले औषध आहे.
१२) अर्जुन – शास्त्रीय नाव ‘टर्मेनॅलिया अर्जुना’. हाडे जोडण्यासाठी श्रेष्ठ वनस्पती. हृदयरोगात खूप उपयोगी आहे. यावनस्पतीत कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे मूतखडय़ासारख्या विकारात जपून वापरावी. नाकातोंडातून रक्त पडणे, शौचातून रक्त पडणे, त्याचप्रमाणे रक्त व लघवीतील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयोगी येते. भाजलेल्या जखमांवरही वापरतात.
१३) विष्णुकांत – शास्त्रीय नाव ‘इवॉलवुलस अल्सिनॉयडस’ आहे. शंखपुष्पीच्या नावाने या वनस्पतीला ओळखतात. बुद्घिवर्धक आणि ब्रेनटॉनिक म्हणून उत्तम. लठ्ठपणा, मानसिक विकारांत वापरली जाऊ शकते.
१४) डाळिंब – शास्त्रीय नाव ‘पुनिका ग्रॅनॅटम’ आहे. आरक्ता, गणेश अशा जाती आहेत. पित्तात खूप गुणकारी आहेत. गालावरील वांग जाण्यास डाळिंबाची साल वापरतात. अतिसार, पचन, कावीळ, स्वरदोष, पोटातील जंत, अशक्तपणा, तोंड येणे अशा रोगोपचारात श्रेष्ठ आहे.
१५) देवदार – शास्त्रीय नाव ‘स्रिडस देवदार’. हिमालय तसेच प. घाटावर आढळणारा वृक्ष. संधिवात, जुनाट सर्दी, ताप, अपचन, उचकी अशा रोगात उपयोगी. गर्भाची वाढ खुंटल्यास देवदाव्र्यादी काढा हे अप्रतिम औषध या वनस्पतीपासून करतात.
१६) मरवा – शास्त्रीय नाव ‘ओरिगोनॉन हॉर्टेनिस’ आहे. ही अत्यंत सुवासिक वनस्पती आहे. जखमांमुळे, भाजल्याने किंवा कोणत्याही कारणांमुळे त्वचेवर पडलेल्या डागांवर श्रेष्ठ.
१७) पिंपळ – शास्त्रीय नाव ‘फिकस रेलीजिओसा’. पिंपळपानांना अश्वत्थपत्र असेही म्हणतात. हवा शुद्धीकरणासाठी श्रेष्ठ आहे. पिंपळपानातून पदार्थ खायला दिल्याने मुलांची वाणी स्वच्छ होते असे मानतात. िपपळाची लाख खडीसाखरेबरोबर दिल्यास खूप छान झोप लागते. त्याशिवाय तिचा उपयोग लहान मुलांना आकडी येण्यावरही प्रतिबंधात्मक म्हणून होतो.
१८) जाई – शास्त्रीय नाव ‘जास्मिनम ग्रँडीफ्लोरम’. तोंड आल्यावर जाईचा पाला उपयोगी पडतो. जुनाट जखमांवरही पाल्याचा उपयोग होतो. केशवृद्घिसाठीही जाईचे तेल वापरतात.
१९) केवडा – शास्त्रीय नाव ‘पँडय़ानस ओडोरॅडिसमिया’. स्त्रीरोग, गर्भपाताच्या विकारात वापरतात. ‘चंद्रकला’ या आयुर्वेदिक औषधात केवडय़ाचा समावेश असतो. दीर्घकाळ असलेला ताप, चक्कर, रक्तदाब, मानेचे वेदनारोग, मधुमेह, घटसर्प या रोगांमध्ये उपयोगी आहे.
२०) हादगा – शास्त्रीय नाव ‘सेसबॅनिया ग्रँडीफ्लोरा’. या पानांना अगस्तिपत्र म्हणतात. फुलांची भाजी करतात. फुलांत अनेक जीवनसत्त्वे असतात. मल्टीव्हिटॅमिनच्या खुराकापेक्षा ही फुले केव्हाही श्रेष्ठ.
२१) बोर – शास्त्रीय नाव ‘झिझिपस मौरीटीआना’. तापामुळे होणारा दाह कमी करण्यासाठी बोराचा काढा देतात. मुरमांवर बोराच्या बियांचे चूर्ण वापरल्याने चेहऱ्यांवरील पुटकुळ्या, काळे डाग जाऊन चेहरा तजेलदार दिसतो. घसा बसल्यावर बोरपत्रे भाजून गोळ्या करून चघळल्यास उपयुक्त.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *