Aarati

श्री विंध्यवासिनी माता आरती

श्री विंध्यवासिनी माता आरती

जय जय जगदंबे, श्री अंबे, विंध्यवासिनी देवी जय जय जगदंबे ||धृ||
अनुपम स्वरुपाची, तुझी घाटी, अन्य नसे या सृष्टी, तुजसम रुप दुसरे
परमेष्टी, करिता झाला कष्टी, शशीरस रसरसला, वदनपुटी,
दिव्यसुलोचन दृष्टी सुवर्णरत्नांच्या, शिरी मुकुटी, लोपती रवि शशीकोटी,
गजमुख तुज स्तविले, हे रंभे मंगल सकलरंभे,
जय जय जगदंबे, श्री अंबे, विंध्यवासिनी देवी जय जय जगदंबे ||१||

कुंकुम गिरी शोभे, मळवटी, कस्तुरी तिलक ललाटी,
नासिक अति सरळ, हनुवटी, रुचिरामृत रस ओढी,
कमान जणू लावल्या धनुकोटी, आकर्ण लोचन भृकुटी
शिरी नीट भांगवली, उफराशी, कर्नाटकची घाटी,
भुजंग निलरंगा परिशोभे वेणी पाठीवरती लोंबे|
जय जय जगदंबे, श्री अंबे, विंध्यवासिनी देवी जय जय जगदंबे ||२||

कंकण कनकाचि मनगटी, दिव्यमुथा दशकोटी, बाजुबंद नवे
बाहुटी, चर्चुनी केशर उटी, सुगंध पुष्पांचे, हारकंठी,
बहुमोत्याची दाटी, अंगी नवी चोळी जरीकाठी,
पीत पितांबर, तगटी, पैंजण पदकमळी, अती शोभे भ्रमर धावती लोभे|
जय जय जगदंबे, श्री अंबे, विंध्यवासिनी देवी जय जय जगदंबे ||३||

साक्षण तू क्षितीच्या तळवटी, तुची स्वये जगजेठी,
ओवाळीन आरती दिपताटी, घेउनी करसंपुष्टी,
करुणामृत हृदये, संकष्टी, धावसी भक्तासाठी,
विष्णुदास सदा बहुकष्टी, देशिल जरी निजभेटी
तरी मग काम उणे, या लाभे, धावपाव अविलंबे |
जय जय जगदंबे, श्री अंबे, विंध्यवासिनी देवी जय जय जगदंबे ||४||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *