Articles

आरत्या शुद्ध म्हटल्या पाहिजेत

‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची’ याचा अर्थ अगदी सोपा आहे. सुख देणारा व दु:ख हरण करणारा असा हा गणपती विघ्नाची वार्ता शिल्लक ठेवीत नाही व ज्याची कृपा प्रेमाचा पुरवठा करते, पण ही आरती म्हणताना पुष्कळ जण नुरवी (ऊरू देत नाही) या शब्दाएवेजी नुर्वी हा अर्थहीन शब्द वापरतात.

गणपतीचं आगमन व्हायची वेळ आली की आरत्यांच्या पुस्तकांची शोधाशोध सुरू होते आणि प्रत्यक्ष गणपती, मग तो चाळीतला असो, घरातला असो किंवा सार्वजनिक असो, आल्यानंतर तर कोणाकडची आरती जास्त मोठी याच्यात चुरस लागते. आरत्यांची संख्या आणि ती म्हणणाऱ्यांचे आवाज एकापेक्षा एक चढत जातात. पण या आरत्या शुद्ध म्हटल्या पाहिजेत. त्यातला अर्थ समजून म्हटल्या पाहिजेत. देवे म्हणजे ओरडणे नव्हे हे कितीजण लक्षात घेतात? आपण आज इतकी वर्षे ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही गणपतीची आरती म्हणतो. लहान मुलांना तर ही पहिली आरती म्हणताना जोर चढतो, पण ही आरती कुणी रचलीय हे शोधण्याबद्दल ही मुलं किंवा त्यांचे पालकही कितपत प्रयत्नशील असतात? या कर्त्यांचं नाव त्या आरतीमध्येच दडलंय असं मी मुलांना एकदा म्हटलं. मुलांनी चार-पाच वेळा ती आरती पूर्ण म्हटली, पण तरीही त्यांच्या लक्षात आलं नाही म्हणून सांगण्याचा हा प्रपंच! ही आरती नीट वाचली तर लक्षात येईल की त्यात आहे ‘दास रामाचा वाट पाहे सजना’ हा रामाचा दास कोण? अर्थात रामदास! तेव्हा ही आरती रामदासांनी रचलीय! या आरतीमध्ये रामदास ज्या गणपतीची स्तुती करतात तो गणपती आपल्या घरोघरी येणाऱ्या गणपतीसारखा उजव्या किंवा डाव्या सोंडेचा, त्रिनयना, ज्याची सोंड सरळ आहे असा आणि तो वक्रतुंड आहे. ‘वक्रतुंड’ या शब्दाचा अर्थ अनेकजण वाकडय़ा तोंडाचा असा करतात. पण त्याचा खरा अर्थ आहे ‘वक्रान तुंडय़ति असौ वक्रतुंड’ म्हणजेच जे वक्र म्हणजे दुष्ट असतात, त्यांचा संहार करणारा, त्रिनयना म्हणजे तीन डोळे असणारा, शंकराप्रमाणे या शंकर पुत्रालाही तीन डोळे आहेत. मात्र शंकराने तिसरा डोळा उघडला म्हणजे प्रलय, पण गणपतीचा तिसरा डोळा मात्र ज्ञानाचा समजला जातो. आपल्याकडे टिटवाळ्याच्या आणि मोरगावच्या गणपतीला तीन डोळे आहेत, तसेच या आरतीत त्याला लंबोदरही म्हटलंय. ‘लंबोदर’ त्याचे नुसते मोदक खाऊन झालेले नाही हे लक्षात ठेवावे. ‘अपराध माझे कोटय़ान्कोटी मोरेश्वर बा तू घाल पोटी’ हे अनेकांचे अपराध पोटात घातल्यामुळे हा ‘लंबोदर’ झाला आहे. याने पीतांबर नेसलेला आहे आणि तो फणीवर बंधना आहे. म्हणजेच त्याच्या कमरेला साप बांधलेला आहे. गणपती हा भाद्रपदात येत असल्यामुळे म्हणजेच पावसाळ्यात नासाडी करतो, म्हणून गणपतीनं सापाला कमरेला व उंदराला पायाजवळ ठेवले आहे. अशा या गणपतीच्या आरतीची सुरुवात आहे.
‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची’ याचा अर्थ अगदी सोपा आहे. सुख देणारा व दु:ख हरण करणारा असा हा गणपती विघ्नाची वार्ता शिल्लक ठेवीत नाही व ज्याची कृपा प्रेमाचा पुरवठा करते, पण ही आरती म्हणताना पुष्कळ जण नुरवी (ऊरू देत नाही) या शब्दाएवेजी नुर्वी हा अर्थहीन शब्द वापरतात. तसेच पुरवी (पुरवतो) याबद्दल ‘पुर्वी’ हा अर्थहीन शब्द वापरतात. तसेच ‘दुर्गे दुर्घट भारी’ या देवीच्या आरतीत
चारी श्रमले परंतु न बोलवे कांही!
साही विवाद करिता पडले प्रवाही!
या आरतीत ‘चारी’ म्हणजे चार वेद (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद) व ‘साही’ म्हणजे सहा शास्त्रे असा अर्थ आहे. पण मूळ अर्थ न कळल्यामुळे मग ‘श्रमले’ ऐवजी ‘श्रमलो’ व ‘पडले’ ऐवजी ‘पडलो’ असा चुकीचा प्रथम पुरुष वापरला जातो. गणपतीच्या या उत्सवात अथर्वशीर्षांची आवर्तनं म्हणतात पण जणू एखादं कुत्रं मागं लागलं अशी! त्याचा अर्थ जाणून न घेता ‘उरकून टाकायचंय’ या भावनेनं ते म्हटले जाते. याच अथर्वशीर्षांची पहिली सुरुवात आहे ॐ नमस्ते गणपतये! त्वमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि! त्वमेव केवलं कर्तासि! त्वमेव केवलं धर्तासि! त्वमेव केवलं हर्तासि यातील नमस्ते नम: म्हणजे हे गणपती तुला नमस्कार असो. कारण हा गणपती कसा आहे तर तो कर्ता, धर्ता आणि संहारकर्ता आहे. अशी ही सुरुवात करून गणपती अथर्वशीर्षांच्या पहिल्या दहा भागांत गणपतीच्या आध्यात्मिक आणि तांत्रिक स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे, तर शेवटच्या तीन विभागांत त्याची फलश्रुती आहे. या अथर्वशीर्षांची एक हजार आवर्तनं केली म्हणजे मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. यातील ग हा विजयमंत्र आहे. तोच ॐकारस्वरूप आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत पहिल्या अध्यायात म्हटलंय, ‘अकार चरण युगल उकार उदर विशाल. मकार महामंडळ! मस्तका कारे’ ॐ हे शब्द ब्रम्ह आहे. यात अ- ऽ – म (अव्यक्त) यांचा संयोग आहे. ‘अ’ हा कंठातून येतो तर ‘म’ ओठ मिटल्याशिवाय म्हणताच येत नाही. हीच जणू काही शब्दाची उत्पती, स्थिती आणि लय आहे. वाङ्मयचा आणि विश्वाचाही विस्तार झाला असे समजले जाते. नामजपही ॐकार जपातून निर्माण झाला आहे. तसेच अ- ॐ- विश्वाचे मूळ परब्रह्म समजतात. अर्धमात्रा ही मूळ मायेची निदर्शक समजतात. पण एकंदरीत अथर्वशीर्ष म्हणताना काय किंवा गणपतीच्या आरतीच्या वेळी आपण करतो काय तर फक्त या गोष्टी जलद किंवा जोराजोरानं म्हणतो. अगदी त्याचा अर्थ लक्षात न घेता कित्येकदा या आरत्या जोरानं म्हटल्या जातात की आजूबाजूला कोणी आजारी असेल ही साधी माणुसकीची जाणही त्यावेळी आपल्याला नसते. खरं तर आरती म्हणजे दैवाची केलेली आळवणी. ती इतक्या वरच्या पट्टीत कशाला? आणि आरत्यांची संख्या तरी इतकी का वाढवतो आपण? ३/४ आरत्या झाल्या की ‘घालीन लोटांगण’ म्हणायला सुरुवात करावी. या ‘घालीन लोटांगण’चे शुद्ध स्वरूप पुढीलप्रमाणे-
घालीन लोटांगण वंदिन चरण! डोळ्यांनी पाहिन रूप तुझे
प्रेमे आलिंग आनंदे पुजिन! भावे ओवाळीन म्हणे नामा!
यात नामदेव महाराज म्हणतात (हे देवा मी) लोटांगण घालीन, तुझे पाय वंदन करीन, तुझे रूप डोळ्यांनी पाहीन, प्रेमाने (तुला) आलिंगन देईन, आनंदाने (तुझी) पूजा करीन, भक्तिभावाने तुला ओवाळीन, यात ‘घालीन, वंदीन, पाहीन, आलिंगन, पूजिन, ओवाळीन’ ही क्रियापदे आहेत व नामा म्हणजे नामदेव, पण लोक आलिंगन, पूजिन ही नामेच वापरतात आणि चक्क ‘नामा म्हणे’ ऐवजी ‘म्हणेन मा’ असं म्हणतात.

‘देवे’ म्हणजे मंत्राच्या शेवटी ‘देवा’ हा शब्द आलेला आहे असे ऋग्वेदातील प्रत्येक मंडळातून अनुक्रमाने घेतलेले मंत्र होत. पूर्वी दोन बाजूंना अर्धे भटजी राहून एक एक बाजूने शुद्ध व सुरांत ‘देवे’ म्हणत असत, ते फार ऐकावेसे वाटत. ‘देवे’ पुष्कळ आहेत पण सर्वांना प्रचलित असलेले. ‘मंत्र पुष्पांजलि’ म्हणून म्हटले जाणारे देवे थोडे आहेत.

घालीन लोटांगणनंतर जी ‘देवे’ म्हटली जातात त्याचा अर्थ काय, किंबहुना ‘देवे’ म्हणजे काय हेही ठाऊक असणारे विरळाच. कारण मुळात ते संस्कृतात आहे. सोप्पे मराठी शुद्ध म्हणता येत नाही. अर्थाकडे लक्ष दिले जात नाही तर संस्कृत देव्याची काय कथा! अर्थ समजणे तर दूर राहो, पण निदान जाणत्या माणसांकडून संथा घेऊन देवे शुद्ध व सुरांत म्हणावे.
‘देवे’ म्हणजे ज्या मंत्राच्या शेवटी ‘देवा’ हा शब्द आलेला आहे असे ऋग्वेदातील प्रत्येक मंडळातून अनुक्रमाने घेतलेले मंत्र होत. पूर्वी दोन बाजूंना अर्धे भटजी राहून एक एक बाजूने शुद्ध व सुरांत ‘देवे’ म्हणत असत, ते फार ऐकावेसे वाटत. ‘देवे’ पुष्कळ आहेत पण सर्वांना प्रचलित असलेले. ‘मंत्र पुष्पांजलि’ म्हणून म्हटले जाणारे देवे थोडे आहेत. यातसुद्धा प्रामुख्याने होणारी चूक म्हणजे पुष्कळ लोक यात ‘करोमि यद्यम्’ ऐवजी ‘करोमि यज्ञ’ असे म्हणतात. यद्यम म्हणजे यद्- वद् म्हणजेच ‘जे जे मी जे जे करतो ते नारायणाला समर्पण करतो’ असा याचा खरा अर्थ आहे. येथे कुठेही ‘यज्ञा’चा संबंध नाही. रात्रीच्या गणपतीच्या आरत्यांची संख्या व त्या म्हणतानाही आवाजाची पट्टी वरची का असते याचा शोध घेतला असता लक्षात आलं की, बहुधा सकाळच्या आरत्यांच्या वेळी घरोघरी ऑफिसला जाण्याची धावपळ असते. म्हणून मग ती सकाळची आरती कशीतरी अक्षरश: उरकली जाते आणि रात्रीच्या आरतीला त्याचा वचपा भरून काढला जातो. तुम्हीच मनाशी विचार करा, आपण हे जे वागतो. ते बरोबर आहे का? मोजक्याच ३/४ आरत्या त्याचा अर्थ नीट समजून घेऊन, फार आवाज न वाढवता म्हणता नाही का येणार? आधीच आपल्याकडे साऱ्या गोष्टीचं प्रदूषण झालंय त्यानं आवाजाच्या (ध्वनी) प्रदूषणाला आपण का निमित्त व्हायचं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *