नारेश्वर येथील स्वामी रंगावधुत यांच्या ‘रंगवाकसुधा’ या पुस्तकातील अर्थ देत आहे.
हा वैदिक पंचशील मंत्र आहे.
“सह नाववतु’- (सह नी अवतु) तो परमपिता परमेश्वर आपले दोघांचे (गुरु-शिष्याचे) रक्षण करो! एक संरक्षित आणि दुसरा उपेक्षित राहिला तर कालान्तराने दोघांचा नाश होतो.
“सह नौ भुनक्तु”- आपण दोघे ऐश्वर्य आणि विविध सुखोपभोग भोगु! एक सुख-सोयींमधे लोळेल, चांदीच्या ताटात रोज मिष्टान्न खाईल आणि दुसरा दु:खात तळमळेल, जेमतेम कोद्री (तृणधान्य) सुद्धा न मिळवेल, तर एक अपचन आणि दुसरा उपासमारीचे भक्ष्य होऊन दोघेही विनाशाच्या पंथास जातील.
‘सह वीर्य करवावहै’- आपण दोघे शक्तिमान बनु या, दोघेही बलाची उपासना करुया, सात्विक सामर्थ्य मिळवु या! एक सबळ आणि दुसरा निर्बळ असेल, तर समाजात नेहमी शीत किंवा उष्ण युद्धाचे वातावरण राहील आणि त्याच्या गुप्त प्रकट ज्वाळेत समस्त विश्व भाजुन निघेल.
‘तेजस्विनावधीतमस्तु’- (तेजस्विनी अधीतमस्तु)
आपले उभयतांचे अध्ययन तेजस्वी असो! यातुन एकमेकांविषयी परस्पर देवत्वाची भावना प्रकटेल, एकमेकांविषयी आदर आणि सहानुभूतीची ज्योत जागेल आणि तरच मनुष्यात खरी मानवता जागेल. मनुष्य एकमेकांसाठी जीव देइल आणि व्यक्तिगत स्वार्थ बाजुला ठेवुन परमार्थात पावले टाकील. स्व विसरुन सर्वांमधे सामावुन जाईल आणि विश्वात शांती व समृद्धीचे साम्राज्य पसरले जाईल.
‘मा विद्विषावहै’ – आपण कधी ही एकमेकांचा द्वेष करु नये! ‘मी’ मधे ‘तू’ आणि ‘तू’ मधे ‘मी’ बघुन सर्वत्र मी-तू, माझे-तुझे पलीकडे, एक, अविनाशी, अखंड परमतत्वाचे दर्शन करुन सर्वत्र एक, अभंग, आध्यात्मिक एकता अनुभवून जगातुन रागद्वेष, दु:ख-दारिद्र्य, युद्ध-संघर्ष यास हद्दपार करुन सुख, शांति, व आनंदाने आनंदाकडे प्र्स्थान करुया!
उलट वाणीने ‘हंस’ उच्चाराने
गुरु-शिष्याचा भेद तो जाळतो ( सोSहं- हंसः )