Articles

गणपतीची माहिती गणेश चतुर्थी माहिती

संपूर्ण गणपती माहिती आपल्यासाठी, All about lord Ganpati Bappa, All information abount Ganapati

गणेश चतुर्थी Ganesh Chaturthi माहिती, Information on Ganesh Chaturthi

भाद्रपद व माघ महिन्याची शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणतात. हिंदूश्रद्धेनुसार हा गणपतीचा जन्म दिन होय. गणेश चतुर्थीची प्रचलित कथा येणेप्रमाणे आहे – एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता. वाटेत साप पाहिल्याने उंदिर भयाने कापू लागला. यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुनः पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. म्हणून तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही असा शाप दिला.
पुराणांमध्ये गणपती शिवहर, पार्वतीपुत्र नावाने शंकरपार्वतींचा मुलगा नावाने उल्लेखित आहे. गणपतीची इतर काही नावे आहेत –
गणपती हेरंब महागणपती महोदर एकदंत लक्ष्मीविनायक विकट उच्छिष्टगणपती
विरिगणपती शक्तिगणपती विद्यागणपती गजानन विनायक हरिद्रागणपती विघ्नराज वक्रतुंड

माघ शुक्ल चतुर्थी व भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा दोनदा जन्म झाल्याने द्वैमातुर नावानेही ही देवता ओळखली जाते. या देवतेस अग्रपूजेचा मान असतो. हिंदू धर्मग्रंथात या देवतेची वर्णने स्थलपरत्वे बदलत असली तरी हत्तीचे मुख आणि मनुष्याचे शरीर असलेली देवता हे वर्णन समान आहे. या देवतेचे वाहन काही ठिकाणी उंदीर तर काही ठिकाणी सिंह सांगितले आहे….
पुराण व साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. गणपती हा महाभारताचा लेखनिक होता. भारतात सर्वत्रच गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. गणेशाचा उपासक संप्रदाय गाणपत्य नावाने ओळखला जातो. गणेश गायत्री मंत्र असा आहे –
” महत्काया विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ”

व्युत्पत्ती

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. महाराष्ट्रात हे नाव विशेष लोकप्रिय आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक- शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो. याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचारित आहे. हेरंब नाव देशीय प्राकृत शब्द हेरिम्बो पासून आले आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय. वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत.

वक्रतुण्ड म्हणजे ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो. गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो.वक्रतुंड या नावाची आणखी एक व्युत्पत्ति आहे..
“वक्रान तुंडयति इति वक्रतुंड..” म्हणजे जो वाकड्या मार्गाने चालणार्या लोकांना शिक्षा करून सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुंडगणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला. दुसर्‍या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक दाताचे उत्पाटन केले. आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात. विघ्नराज वा विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपती असा आहे. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपती व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले.

गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. दोन ऋक मंत्र (गणानाम गणपतीम् हवामहे.व विषु सीदा गणपते…) वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप उद्भवल्याचे अनेक संशोधक मान्य करतात.

ऋग्वैदिक गणपतीची दुसरी नावे होती -बृहस्पती, वाचस्पती. ही देवता ज्योतिर्मय मानली जाई. तिचा वर्ण लालसर सोनेरी होता. अंकुश, कुर्‍हाड ही या देवतेची अस्रे होती. या देवतेच्या आशिर्वादाविना कोणतीही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई. ही देवता कायम ‘गण’ नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई.[५]

दुसर्‍या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे. इसवीसनपूर्व आठव्या शतकापासून सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत लिहिल्या गेलेल्या बौधायण धर्मसूत्रात गणेशाचा उल्लेख नाही. इसवीसनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही. गुप्त काळाच्या अस्तकाळापासून या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असावी.

काळाच्या अस्तकाळापासून या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असावी.
मानवगृह्यसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल, कटंकट, उष्मित, कुष्माण्ड राजपुत्र व देवयजन इत्यादीचा विनायक म्हणून उल्लेख आहे. महाभारतातील विनायक हाच आहे. याचे काम विघ्न उत्पादन करणे असे. पुढे हाच विघ्नकर्ता गणपती विघ्नहर्ता मानला जाऊ लागला. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक हा अम्बिकेचा पुत्र होय. गणेशाचा पार्वतीपुत्र उल्लेख येथेच प्रथम होतो. अनेक पुराणे स्वयम्भू मानतात.कार्तिकेयाचे अनेक गण वा पार्षदही पशुपक्ष्यांचे मुखधारित असतात. इसवीसनाच्या सहाव्या शतकातील ‘भूमारा’त याप्रकारच्या अनेक गणांचा उल्लेख सापडतो. गणेश म्हणजेच गण-ईशाचे ह्त्तीमुख असण्याचे हेही कारण असू शकते. काही ठिकाणी गणेश व यक्ष/नागदेवता यांची वर्णने मिसळल्याचे दिसते. गणपतीच्या ह्त्तीमुखाचे हेही कारण असावे. पुराणांमध्ये ह्त्तीमुखधारी यक्ष आहेत. यक्ष हे गणपती प्रमाणे लंबोदर असतात.

‘याज्ञवल्क्य संहिता’ या ग्रंथात विनायक व गणपतीच्या पूजेचे विवरण सापडते.इसवीसनाच्या सातव्या शतकात रचलेल्या ललित माधव-ग्रंथात गणपतीचा उल्लेख आहे.

पौराणिक संदर्भ
गणेश पौराणिक हिंदू धर्मातील प्रथम पूज्य व त्या कारणाने एक मुख्य देवता आहे. म्हणून ही देवता नाना आख्यान-उपाख्यानात, वेगवेगळ्या पुराण व महाकाव्यात उल्लेखित आहे. गणेशाविषयीची सर्वाधिक महत्वाची कहाणी म्हणजे गणपतीचे गजानन होणे होय. प्रत्येक पुराणाच्या वर्ण्यविषयानुसार या प्रसंगावर विविध भाष्य पाहायला मिळतात. इतका की यामुळे पुराणांमध्ये काही ठिकाणी परस्पर-विरोधही दिसतो. याशिवाय गणपतीच्या मातृपितृभक्ती व विवाहाविषयीच्या अनेक कथा वाचायल्या मिळतात.

पुराणांतील जन्मकथा
शिवपुराण – शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार, पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार मुलास दारी नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले. कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी तिज शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्तिली. शंकरांनी होकार भरला. परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला.
स्कंदपुराण – स्कंदपुराणात गणपतीच्या जन्माविषयी एकाधिक उपाख्यान वर्णिली आहेत. या पुराणातील गणेश खण्डाप्रमाणे सिन्दूर नामक एक दैत्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले. पण या अर्भकाचा मृत्यु न होता ते मुण्डहीन अवस्थेत जन्माला आले. नारदाने बालकास याचे कारण विचारले असता गजाननाने वरील घटना सांगितली. तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते स्वतःच्या शरिरावर चढवले.
स्कंपुराणाच्या ब्रह्मखण्डातील कथेनुसार, पार्वतीने स्वतःच्या मळापासून एक सुन्दर व पूर्णांग पुतळा निर्मिला व त्यात प्राण फुंकले व त्यास आपला द्वारपाल नेमून ती स्नानास गेली. नंतर तेथे येऊन स्नानागारात जाणा-या शंकरास बालकाने अडवले. शंकरासोबतच्या युद्ध झाले व त्यात शंकरांनी बालकाचे मस्तक छिन्न केले. या नंतर गजासुराचा वध करून शंकरांनी त्याचे मस्तक बालकाच्या धडावर बसवले.
स्कंदपुराणाच्या- अर्बुद खण्डात म्हटले आहे की, पार्वतीने अंगमळापासून एक मस्तकहीन पुतळा बनवला. कार्तिकेयाने ह्या पुतळ्यास स्वतःचा भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली व त्याने एक गजमुण्ड आणले. पार्वतीचा आक्षेप असतानाही दैवयोगाने हे मस्तक धडाशी जोडले गेले. यानंतर शक्तिरूपिणी पार्वतीने पुतळ्यास जीवनदान दिले. गजमुण्डयुक्त पुतळ्यावर नायकत्वाचा एक विशेष भाव उमटला त्यामुळे तो महाविनायक नावाने परिचित झाला. शंकरांनी या पुत्रास गणाधिपती होशिल व तुझ्या पूजेविना कार्यसिद्धी होणार नाही असा आशिर्वाद दिला. कार्तिकेयाने त्यास कुर्‍हाड दिली. पार्वतीने मोदकपात्र दिले व मोदकाच्या वासाने उंदीर गणपतीचे वाहन बनला.

बृहद्धर्मपुराण – बृहद्धर्मपुराणाप्रमाणे पार्वती पुत्रलाभासाठी इच्छुक असताना शंकरांनी अनिच्छा प्रकट केली. पुत्राकांक्षी पार्वतीस शंकरानी एक वस्त्र फाडून दिले व पुत्रभावाने चुंबन करण्यास सांगितले. पार्वतीने त्याच वस्त्रास आकार दिला व त्यास जिवंत केले. तेव्हा हा पुत्र अल्पायू आहे असे उद्गार शंकरांनी काढले. मुलाचे मस्तक तत्क्षणी छिन्न झाले. यामुळे पार्वती शोकाकुल झाली. या वेळी उत्तरदिशेस असलेल्या कोणाचेही मस्तक जोडले असता हा पुत्र वाचेल अशी एक आकाशवाणी झाली. तद्नुसार पार्वतीने नंदीस उत्तरेत पाठवले. नंदीने देवतांचा विरोध झुगारून इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावताचे मस्तक कापून आणले. शंकरांनी हे मुंडके जोडून पुत्रास जिवंत केले. शंकरांच्या वराने इंद्राने ऐरावतास समुद्रात टाकले असता त्यासही पुनः मस्तक प्राप्त झाले.

सवाहन गणेश, कर्नाटकातील तळकाडुच्या वैद्येश्वर मंदिरातील शिल्प
सवाहन गणेश, कर्नाटकातील तळकाडुच्या वैद्येश्वर मंदिरातील शिल्प

 

220px-13th_century_ganesha_statue
इंडोनेशिया देशातील प्राम येथे मिळालेली गणेशमूर्ती

 
ब्रह्मवैवर्त पुराण – ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, शंख-चक्र-गदा-पद्मधारी कृष्णास पाहून मुग्ध पार्वतीने तशाच एका पुत्राची कामना केली. कृष्णाने तसे वरदानही दिले. एकदिवस जेव्हा शिव-पार्वती स्वगृही क्रीडारत असताना कृष्ण वृद्ध ब्राह्मणरूपात भिक्षा मागण्यास आला. पार्वती त्यास भिक्षा देण्यास गेली असता शंकराचे वीर्यपतन झाले व तेथे कृष्ण स्वतः शिशुरूपात अवतीर्ण झाला. वृद्ध ब्राह्मण अंतर्धान पावला. पार्वती ह्या शतचन्द्रसमप्रभम् बालकास पाहून आनंदित झाली नंतर देवता व ऋषिगण बालकास पाहण्यास कैलासी आले. त्यात शनीदेवही होता. शनीने आपल्या कुदृष्टीची गोष्ट पार्वतीस सांगितली पण पार्वतीच्या आग्रहाने शनी बालकास बघण्यास तयार झाले. पण शनीने भीतीने केवळ डाव्या डोळ्यानेच बालकाकडे बघितले. पण तेवढ्यानेही बालकाचे मस्तक छिन्न होऊन वैकुण्ठात कृष्णाच्या देहात जाऊन विलिन झाले. पार्वती शोकाने बेशुद्ध झाली. तेव्हा गरुडावरून जाणा-या विष्णूने पुष्पभद्रा नदीच्या तीरावर उत्तरदिशेस डोके ठेवून झोपलेल्या एका हत्तीस पाहिले. त्याचे मस्तक ऊडवल्याने हत्तीणी व तिचे बाळ रडू लागले. तेव्हा विष्णूने एका मुंडक्यापासून दोन मुंडकी तयार केली व एक हत्तीच्या व दुसरे गणपतीच्या धडावर स्थापिले व दोघंना जीवित केले. शंकरांच्या आशिर्वादाने गणपतीस अग्रपूजेचा मान मिळाला. पार्वतीच्या आशिर्वादाने तो गणांचा पती,विघ्नेश्वर व सर्वसिद्धिदाता झाला. यानंतर एकेकाळी कार्तिकेयास देवांचा सेनापती नेमताना इन्द्राचा हात आखडला. शंकरास याचे कारण विचारले असता, गणेशाची अग्रपूजा न झाल्याने असे घडले असे सांगितले.
ब्रह्मवैवर्त पुराणातील आणखी एका कथेनुसार, माली आणि सुमाली नामक दोन शिवभक्तांनी सूर्यावर त्रिशूळाने आघात केला. म्हणून सूर्य अचेतन होऊन जग अंधारात बुडाले. सूर्यपिता कश्यपाने शंकरास शाप दिला की तुझ्या मुलाचे मस्तक असेच ढासळेल. यामुळे गणपती मस्तकहीन झाला व म्हणून नंतर इंद्राने ऐरावताचे मस्तक जोडले.

 
सध्या स्मिथ्सोनियन इन्स्टिट्यूटमध्ये असलेले व मूळचे इ.स. १३ व्या शतकातील म्हैसूर भागातील गणपतीचे पाषाणशिल्प

 

१८१० सालातील गणेश चित्र, सध्या चंदीगढ संग्रहालयात
पद्मपुराण – पद्मपुराणानुसार, शंकर पार्वती ऐरावतवर बसून वनविहारास गेले असता त्यांच्या मिलनाने गजमुंड गणेशाचा जन्म झाला.
वराहपुराण – वराहपुराणानुसार , देव व ऋषिगण शंकरापाशी येऊन विघ्ननिवारणासाठी नव्या देवतेची मागणी केली असता शंकराजवळ एक बालक प्रकट झाला. देवगण, पार्वती बालकास पाहून मुग्ध झाले. पण शंकर क्रोधित झाले. त्यांच्या शापाने बालकास गजमुख, लांबडे पोट व पोटाशी नाग प्राप्त झाला. क्रोधित शंकरांच्या घामातून अनेक गणांनी जन्म घेतला. गणपती त्यांचा अधिपती झाला. या ठिकाणी गणपतीचा गणेश, विघ्नकर व गजास्य म्हणून उल्लेख आहे.

देवीपुराण – देवीपुराणानुसार, शंकरांच्या राजसिक भावामुळे हातातून घाम स्त्रवला व त्यातून गणपतीचा जन्म झाला.

मत्स्यपुराण – मत्स्यपुराणानुसार, पार्वती चूर्ण (भुकटी) स्वतःच्या शरिराचे मर्दन करत होती. याच भुकटीपासून तिने गणपतीची मूर्ती बनवली व गंगेत टाकली. पुतळा मोठा होत होत पृथ्वीइतका झाला. नंतर या मुलास गंगा व पार्वतीने पुत्ररूप मानले व ब्रह्माच्या आशिर्वादाने हा मुलगा गणाधिपती झाला.

वामनपुराण – वामनपुराणानुसार, पार्वतीने स्नानाच्या वेळी अंगमळापासून चतुर्भूज गजानन मूर्ती निर्मिली व महादेव त्यास पुत्र मानून म्हणाले मया नायकेन विना जातः पुत्रकः (मला सोडूनही पुत्र जन्म झाला) त्यामुळे हे बालक विनायक म्हणून प्रसिद्ध होईल व विघ्ननाशकारी होईल.
इतर आख्याने

ब्रह्मवैवर्त पुराण – ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, परशुराम एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून कैलासी आले असता, द्बाररक्षक गणेशाने त्यांस अडवले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. यात परशुरामांच्या परशुमुळे गणेशाचा एक दात उपटला गेला.

शिवपुराण – शिवपुराणानुसार, गणेश व कार्तिकेय विवाहासाठी स्पर्धा करत होते. तेव्हा दोघांमध्ये जो प्रथम पृथ्वीपरिक्रमा करेल त्याचा विवाह आधी होईल असा निर्णय झाला. कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीपरिक्रमेस गेला. गणपतीने शंकर पार्वतीस सातवेळा प्रदक्षिणा घातली व शास्त्रमतानुसार शतवार पृथ्वीपरिक्रमा केल्याचे पुण्य मिळवल्याचा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद मान्य होऊन विश्वरूपाच्या दोन मुलींसोबत – रिद्धी(बुद्धी) व सिद्धीसोबत गणेशाचा विवाह झाला. लक्ष्य हा सिद्धीचा तर लाभ हा बुद्धीचा पुत्र होय.विवाहाची वार्ता नारदाकडून ऐकून दु:खी कार्तिकेय क्रौञ्च पर्वतावर राहण्यास गेला. आणखी एका कथेनुसार तुलसी नामक एक नारी गणेशासोबत विवाह करू इच्छित होती. गणपती ब्रह्मचर्यव्रती असल्याने त्याने नकार दिला व तुलसीस दानवपत्नी होशिल असा शाप दिला. तुलसीनेही तुझा विवाह होईल असा शाप दिला.

तन्त्र – तंत्रमतानुसार लक्ष्मी व सरस्वती या गणपतीच्या पत्नी होत. याखेरीज तीव्रा, ज्वालिनी, नन्दा, सुभोगदा, कामरूपिनी, उग्रा, तेजोवती, सत्या आणि विघ्ननाशिनी नावाच्या गणेशाच्या इतर नऊ पत्नी होत.

महाभारत – महाभारतामध्ये, कौरव व पाण्डव यांच्या मृत्युनंतर व्यास ध्यानास बसले. महाभारताच्या सा-या घटना त्यांना आठवू लागल्या. तेव्हा एका विशाल ग्रंथाच्या रचनेचा त्यांनी निश्चय केला. यासाठी त्यांना पात्र लेखनिकाची गरज होती. ब्रह्माच्या सल्ल्यानुसार ते गणपतीकडे आले. गणपती लेखनिक होण्यास तयार झाला. पण त्याची एक अट होती – लिहिताना लेखणी थांबू नये. व्यासांनी उलट अट सांगितली – अर्थ न समजता गणपतीने तो श्लोक लिहू नये. यासाठी व्यासांनी महाभारतात ८८०० कूटश्लोक समाविष्ट केले. या श्लोकांचा अर्थ समजण्यास गणपतीस थोडा वेळ लागल्याने त्यांना आणखी श्लोकरचना करण्यासाठी अवसर मिळाला.

 

अवनीन्द्रनाथ टागोर यांचे ‘गणेश-जननी’ चित्र अवतार
उपपुराण मानल्या जाणा-या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण- ह्या दोन ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.

गणेश पुराण – गणेश पुराणात- उल्लिखित गणपतीचे चार अवतार सत्य, त्रेता, द्बापर व कलीयुगात अवतीर्ण झाले. हे होते –
महोत्कट विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप व अदिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झालाया अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असूर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.
मयूरेश्वर – हा षडभूज व श्वेतवर्णी अवतार आहे. वाहन मोर. त्रेता युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याच्या वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळेस मोर भाऊ कार्तिकेय यास दान केला. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे.
गजानन – हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार. वाहन उंदिर. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला.अवतारसमाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली.
धूम्रकेतु – द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा. हा अवतार कलीयुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते. विष्णूच्या कल्की अवतारावरून कल्पित.

कर्नाटकच्या म्हैसूर शहरातील संग्रहालयातील भागवत पोथीवरील गणपती
मुद्गल पुराण – मुद्गल पुराणात- गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते. दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे. हे अवतार खालील प्रमाणे –
वक्रतुण्ड – प्रथम अवतार.वाहन सिंह. मात्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध केला.
एकदन्त – आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक. मूषकवाहन.अवताराचा उद्देश्य मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध।
महोदर – वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप. बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक। मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.
गजवक्त्र वा गजानन – महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला.
लम्बोदर – ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक.वाहन मूषक. क्रोधासुराचा वध केला.
विकट – सूर्याचे प्रतीक. कामासुराचा वध केला. वाहन मयूर.
विघ्नराज – विष्णूचे प्रतीक.ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचे उद्देश्य.
धूम्रवर्ण – शिवाचे प्रतीक. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक. वाहन घोडा.अभिमानासुराचा नाश केला.
रूप व रूपभेद
भारतीय शिल्प व चित्रकलेत गणेश एक अत्यंत महत्वपूर्ण व लोकप्रिय मूर्तीविषय आहे.गणपतीच्या नाना रूपांचे वर्णन जे पुराण व इतिहासात मिळते, ते भारतीय उपखंडात व भारताबाहेरही विविध रूपात आविष्कृत झाले आहे. गणेशाच्या विविधरूपातील मूर्ती आहेत. कोठे उभा, कोठे नृत्यरत, कोठे असुरवधकारी वीर युवक म्हणून, कोठे शिशु तर कोठे पूजक रूपातील गणपती दिसतो. गणपतीची उपलब्ध प्राचीनतम मूर्ती इसवीसनाच्या दुसर्‍या शतकात श्रीलंकेत निर्मिली गेली. इसवीसनाच्या सहाव्या शतकापासूनच्या गणेशमूर्ती भारताच्या विविध भागात मिळाल्या आहेत. इसवीसनाच्या सातव्या शतकात गणपती लोकप्रिय दैवत म्हणून स्थापित झाले असे दिसते.
शक्तिसह महागणपती, १९वे शतक – कर्नाटकी शैली रूप

भारतीय शिल्पकलेत प्रथमपासूनच गणेश गजानन, एकदंत व लंबोदर रूपात आहे. गणेशाच्या ध्यान, प्रार्थना व मंत्रही असेच रूपवर्णन करतात-

सर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं प्रस्यन्दन्मद्गन्धलुब्धमधुपब्यालोलगण्डस्थलम्।
दन्ताघातविदारितारिरुधिरैः सिन्दूरशोभाकरं वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम्।। (गणेशध्यानम्)
एकदंन्तं महाकायं लम्बोदरं गजाननं।
विघ्ननाशकरं देवम् हेरम्बं प्रणमाम्यहम्।। (गणेशप्रणामः)

देवेन्द्रमौलिमन्दारमकरन्दकणारुणाः।
विघ्नं हरन्तु हेरम्वचरणाम्बुजरेणबः।। (गणेशप्रार्थना)
सुरवातीच्या काळापासूनच गणपती एकदंत रूपात शिल्पबद्ध आहे. गुप्तकाळातील गणेशमूर्तीही लंबोदर आहेत. ब्रह्मांड पुराणात या उदरात सारे जग सामावू शकेल असे म्हटले आहे.[१७] गणपतीच्या हातांच्या व अस्त्रांच्या संख्येत मतांचि विविधता दिसते. गणपती चतुर्भूज, द्बिभूज, षड्भूज अशा अनेक रूपात दिसतो. हातात साधारणपणे पाश-अंकुश, वरदहस्त व मोदक असे रूप असते.

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या पुरातन नारायणेश्वर मंदिरावरील गणेशपट्टी. घराच्या वा देवळाच्या द्वारावरील गणेशपट्टी वा गणेशप्रतिमा हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे

भारतात व बाहेर गणपतीच्या रूपात अनेक फरक दिसतो. रूपभेदानुसार ध्यान व पूजाविधी बदलतो. गुप्तयुगातील गणेशमूर्ती अष्ट ते दशभूज आहेत. तंत्रमार्गी ग्रन्थ तन्त्रसारात, काश्मीरात, नेपाळमध्ये व अफगाणिस्तानमध्ये आढळणार्‍या मूर्तींमध्ये गणपतीचे वाहन सिंह दाखवले आहे. येथील गणपती नेहमीप्रमाणेच प्रसन्न रूपात आहे. पण प्राणतोषिनी तन्त्र- या तांत्रिक ग्रंथात उल्लेखित चौरगणेश साधनाचे फळ चोरतो असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे विघ्नगणेश विघ्न घडवितो व लक्ष्मीगणेश लक्ष्मीस आलिंगन देउन असतो असा उल्लेख आहे.

महागणपती – महागणपती हे गणपतीचे एक तंत्रमार्गी रूप आहे. यात गणपतीसोबत शक्ती विराजमान असते व एकमेकांस उपस्थ स्पर्श केलेला असतो.

हेरम्ब-गणपती – हेरम्ब-गणपती तन्त्रसार- ग्रंथात उल्लेखित आहे.हे रूप पंचानन (पाचतोंडी) असते. त्यातील मधले एक मुख ऊर्ध्वदिशी (आकाशाकडे तोंड केलेल्) असते. अभयवर, मोदक, निजदन्त, मुण्डमाला, अंकुश व त्रिशूल असतो. हेरम्ब म्हणजे दीन पालक होय. वाहन सिंह. नेपाळमध्ये हेरम्ब-गणपतीचे वाहन उंदिरही असते.

नृत्यगणेश – नृत्यगणेश आठहाताचा व नृत्यरत असतो. हाती शस्त्र नसते. मुद्रा नाचाची असते.

विनायक गणेश – विनायक गणेशाचा उल्लेख अग्निपुराण ग्रंथात आहे. याची पाच भिन्न रूपे आहेत – चिंतामणी विनायक, कपर्दी विनायक, आशा विनायक, गजविनायक व सिद्धिविनायक. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक एकच असून तो अम्बिकापुत्र आहे.

बौद्ध गणेश – बौद्ध गणेशाचा उल्लेख बौद्ध साधनमाला-ग्रंथात मिळतो.तो द्बादशभूज (बारहाती) आहे.त्याचे कपाळ रक्तपूर्ण असून हाती मांस असते.

कर्नाटकच्या म्हैसूर शहरातील संग्रहालयातील भागवत पोथीवरील गणपती

इसवीसनाच्या पहिल्या शतकात बनलेली व श्रीलंकेतील मिहिनटाल येथे मिळालेली मूर्ती आतापर्यंतची प्राचीनतम गणेशमूर्ती आहे. उत्तर प्रदेशच्या फरूखाबाद जिल्ह्यात चौथ्या शतकात निर्मिलेली द्बिभूज दगडी गणेशमूर्ती पाहायला मिळते. इसवीसनाच्या पाचव्या शतकात निर्मिलेली मध्यप्रदेशातील उदयगिरी येथे मोदक खाणा-या गणपतीची मूर्ती मिळालेली आहे. सर्वसाधारणपणे तीन प्रकारच्या गणेशमूर्ती पाहायला मिळतात – आसनस्थ, नृत्यरत व उभ्या. यात बसलेल्या मूर्तींची संख्या सर्वाधिक आहे. जबलपूर येथे हतीमुख असलेल्या देवीची मूर्ती मिळाली आहे. तंत्रमार्गात अल्लेखित गणेशपत्नी – गणेशाणी हीच असावी असा अंदाज आहे.

आरत्या व स्तोत्रे
|| सुखकर्ता दु:खहर्ता ||

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरव प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ताफळांची ||१||
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती | दर्शनमात्रे मनःकामना पुरती ||ध्रु.||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा | चंदनाची उटी कुंकमकेशरा ||
हिरेजडित मुकुट शोभतो बरा | रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ||२||
लंबोदर पीतांबर फणिवरवंदना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना | संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ||३||

भारताबाहेरील गणेश
भारताबाहेर अनेक देशांमध्ये गणेशमूर्ती सापडल्या आहेत. प्राप्त गणेशमूर्ती द्बिभूज व मोदकभक्षणरत आहेत. हातात मोदकभांडे, कुर्‍हाड, अंकुश, पाश, दंड, शूळ, सर्प, धनुष्यबाण दिसतात. जावा बेटाच्या वाडा नामक जागी इसवीसनाच्या अकराव्या शतकातील बसलेल्या स्थितीतील मूर्ती मिळालेली आहे. या मूर्तीवर तंत्रमताचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. इंडोनेशियामध्ये इतरत्रही गणपतीच्या आसनस्थ मूर्ती मिळालेल्या आहेत. यात खिचिड येथे मिळालेली मूर्ती सर्वाधिक सुंदर आहे. ही मूर्ती चतुर्भूज असून , अभंगदेह , सुंदर डोळे, नागजानवेधारी, वाहन उंदीर अशी आहे. चारपैकी तीन हातात अक्षसूत्र, विषाण, मोदकभांडे आहे, चौथा हात अस्पष्ट आहे.

महाराष्ट्रातील गणेशोत्सव
महाराष्ट्रातील गणेशोत्सव गणपतीसंबंधित सर्वात मोठा उत्सव आहे. प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी वा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस भारतीय पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थी पासून सुरू होतो.हा उत्सव दहा दिवस चालतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मूर्ती विसर्जित केल्या जातात. पेशव्यांच्या काळात हा घरगुती उत्सव्याच्या स्वरूपात असण्याचे उल्लेख आहेत. पूर्वी केवळ घरगुती व्रत/उत्सव अशा स्वरूपात असलेल्या गणेश उत्सवास इ.स.१८९३ साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक स्वरूप दिले. या स्वरूपामुळे सुरूवातीस सुधारकी व सनातनी अशा दोन्ही मतांच्या लोकांनी टिळकांवर टीका केली होती. पारंपारिक स्वरूपामुळे पुण्याचे व भव्यतेमुळे मुंबईचे गणपती प्रेक्षणिय असतात.
इतर राज्यांतील गणेशपूजा

कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यात महाराष्ट्राप्रमाणे भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून गणपतीचा उत्सव साजरा करतात. येथे हा उत्सव बहुतांशी घरगुती स्वरूपाचा धार्मिक विधी या स्वरूपात असतो.
राजस्थान मध्ये गणगौर नावाचा सण साजरा होतो.
बंगालमध्ये दुर्गापूजेच्या काळात दुर्गेसोबत गणपतीचीही पूजा होते.

हिंदू पुराणांतील गणपती
आदी शंकराचार्यांनी गणपतीस पाच मुख्य देवतेत स्थान दिल्यावर गणपतीची दैवत म्हणून लोकप्रियता वाढू लागली. गणपतीच्या उपासकांचा गाणपत्य संप्रदाय निर्माण झाला. पुण्याजवळच्या चिंचवडचे मोरया गोसावी हे गाणपत्य संप्रदायातील थोर पुरूष मानले जातात. या संप्रदायात गणपतीवर दोन उपपुराणे रचिली गेली – गणेश पुराण आणि मुद्गल पुराण.

गणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथाच्या रचनाकाळात मतभेद आहेत.यांची रचना साधारणपणे इस ११०० ते इस १४०० मध्ये झाल्याचे मानले जाते. सामान्यपणे गणेश पुराण हा आधीचा व मुद्गल पुराण नंतरचा ग्रंथ मानतात. गणपती अथर्वशीर्षाची रचना इसवीसनाच्या सोळा ते सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या काळात झाली.

गणेश पुराण – गणेश पुराण गणेशाच्या कथा व पूजापद्धती यासाठी हे पुराण महत्वाचे आहे. याचे दोन खंड आहेत – उपासनाखंड आणि क्रीडाखंड किंवा उत्तरखण्ड. । उपासनाखण्डाची अध्यायसंख्या ९२ असून क्रीडाखंडाची अध्यायसंख्या १५५ आहे. उपासनाखंडाच्या ३६ अध्यायांच्या आधारे प्रसिद्ध गणेश सहस्रनाम स्तोत्राची रचना झाली आहे. याचा अनेक ठिकाणी पाठ होतो. क्रीडाखंडाचे अध्याय १३८-४८ गणेश गीता नावाने प्रसिद्ध आहेत. गणपतीने आपल्या गजानन अवतारात ही गीता राजा वरेण्य यास सांगितली. याचे स्वरूप भगवद्गीता ग्रंथाप्रमाणे आहे. कृष्णाऐवजी येथे गणपतीस भगवद्-तत्त्व मानले आहे. क्रीडाखंडात गणपतीच्या चार अवतारांचे वर्णन आहे.

मुद्गल पुराण – यात गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.

गणपती अथर्वशीर्ष – गणेश अथर्वशीर्ष किंवा गणेश अथर्वशीर्षोपनिषद हा गणपतीविषयीचे अप्रधान उपनिषद आहे. महाराष्ट्र राज्यात याचा विशेष प्रभाव आहे. रांजणगाव येथिल मंदिरात प्रवेशतोरणावर हा ग्रंथ कोरला आहे. या ग्रंथात गणपतीस सर्व देवीदेवतांच्या रूपात पाहण्यात आले असून सर्व देवतांपेक्षा वरचा मानन्यात आले आहे. या ग्रंथावर तंत्रमताचाही प्रभाव आहे. ‘गं’ हा गणपतीचा बीजमंत्र आहे असा उल्लेख या ग्रंथात येतो

प्रसिद्ध मंदिरे
हिंदू मंदिरात गणपती दोन रूपात दिसतो – पहिला परिवार-देवता वा पार्श्वदेवता रूपात; अथवा मंदिरातील मुख्य देवता रूपात. पुराणांमध्ये पार्वतीने गणेशास द्बाररक्षक म्हणून नेमले होते त्याअनुषंगाने दरवाजावर गणपतीची मूर्ती कोरली जाते. याशिवाय स्वतंत्र गणेशमंदिरेही आहेत. यात सर्वाधिक उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरसमूह. पुणे शहराच्या १०० किमी परिघातील ही आठ मंदिरे गणेशाचे मंडल(वर्तुळ) बनवतात. याशिवाय महाराष्ट्रातील मुंबईच्या सिद्धिविनायक व टिटवाळ्याच्या गणपतीचा समावेश होतो. कोकणातील गणपतीपुळ्याचे मंदिर विख्यात आहे. पुण्यात सारसबाग येथिल उजव्या सोंडेचा गणपती प्रसिद्ध आहे. पुण्याचे ग्रामदैवतही गणपतीच आहे. कसब्यातील ह्या गणपतीची पूजा जिजाबाई करत असत. जळगाव येथे उजव्या व डाव्या सोंडेच्या गणपतीचे एकत्रित मंदिर आहे. अशा स्वरूपाचे एकत्र मंदिर दुर्मिळ आहे. वाईच्या ढोल्या गणपतीची विशालकाय मूर्ती प्रेक्षणीय आहे.

महाराष्ट्राबाहेर उत्तर भारतातील मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन; राजस्थान राज्यातील जोधपुर, रायपूर; बिहार राज्यातील वैद्यनाथ; गुजरात राज्यातील बडोदा, धोळका व वलसाड; उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी शहरातील धुंडिराज मंदिर आदी उल्लेखयोग्य मंदिरे आहेत. दक्षिण भारतातील गणेश मंदिरांमध्ये तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्लीचे जम्बुकेश्वर मंदिर, रामेश्वरम व सुचिन्द्रम येथिल मंदिर; कर्नाटक राज्यातील हंपी, इडागुंजी; आंध्रप्रदेश राज्यातील भद्राचलमचे मंदिर आणि केरळमधील कासारगोड उल्लेखयोग्य आहेत. भारताबाहेर नेपाळ मध्येही अनेक मंदिरे आहेत.

म‍राठी संस्कृतीतील गणेश
मराठी संस्कृतीत गणपतीचा उल्लेख अनेक ठिकाणी दिसतो.

महाराष्ट्रातील घरे व मंदिरांच्या मुख्य दारावर गणेशपट्टी वा गणेशप्रतिमा असते. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणा-या संकंटांचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते.

मराठी साहित्याच्या प्रारंभ काळापासून गणेशाचे उल्लेख आहेत. मराठी भाषेमधील आद्य वाङमयकार असलेल्या महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथात गणपतीचा असा उल्लेख येतो –
” तेया गणरायाचे उदार रूपडे थोरपण जिंकले होडे ।

कवीस शब्दब्रह्मीची राणिव कोडे, जेणे पाहिले तो सिंदुरे आंडंबरे ।।
गोर मेरू जसा, तयाचे ठायी सिद्धीचे सर्ग, नानाविध वसती भोग ।
तेण आधारे अग्नेय सुखावले।।

ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील खालील नमनाची ओवी सुप्रसिद्ध आहे –

ओम नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जयजय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||
देवा तुचि गणेशु| सकलमतिप्रकाशु| म्हणे निवृत्तीदासु | अवधारिजोजी ||

नामदेवांनीही गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. त्यात ते म्हणतात –
लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड करितसे खंड दुश्चिन्हांचा ||
चतुर्थ आयुधे शोभतासी हाती भक्ताला रक्षिती निरंतर ||

तुकोबा गणपतीला नाचत येण्याची विनंती करतात –
गणराया लौकरी येई । भेटी सकलांसी देई ।।
अंगी सिंदूराची उटी । केशरकस्तुरी लल्लाटी ।।
पायी घाग-या वाजती । नाचत आला गणपती ।।
तुका म्हणे पाही । विठ्ठल गणपती दुजा नाही ।।

गणपती संतवाङमय व शास्त्रपुराणांबाहेर पडून लोकसंस्कृतीतही अनेक ठिकाणी आला आहे. तमाशातला प्रारंभीचा गण गणेशस्तवनाचा असतो. यात गणपती ऋद्धीसिद्धींसह नाचत येतो.

पठ्ठे बापूराव आपल्या कवनात म्हणतात – तुम्ही गौरीच्या नंदना । विघ्न कंदना । या नाचत रमणी । जी जी जी ||
कोकणातील गणपतीच्या नाचाची गाणी प्रसिद्ध आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बाल्यांचा गणपतीचा नाच दमदार व लक्षवेधी असतो. बाल्यांचे गणपतीचे एक गाणे असे – यावे नाचत गौरीबाळा । हाती घेऊनी पुष्पांच्या माळा । सर्वे ठायी वंदितो तुला | यावे नाचत गौरीबाळा।
लोकगीतामध्येही गणपतीचे वर्णन येते. कार्तिकेय गणपती भावांचा झगडा, शंकरपार्वतीचे बालकौतुक असे अनेक विषय यात आहेत. एका लोकगीतातले वर्णन असे –
” हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।
आमी जातो आमी जातो, सोनारू साळा ।।

सोनारीन बाई ग सोनारू दादा ।।
बाळाचं पैजण झालंका न्हाई ?
फिरून येजा फिरून येजा गवराबाई गवराबाई ।।
हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।
गवराबाईने म्हणजे गणपतीच्या आईने (गौरीने) गणेशबाळासाठी सोनाराकडे पैजण करायला टाकले आहेत आणि सोनाराने ते अजून दिले नाहीत असे वर्णन या गाण्यात आहे.

असे मराठी संस्कृतीत ठायीठायी असणा-या गणपतीचा उत्सव सार्वजनिक करून लोकमान्य टिळकांनी गणेशाचे महाराष्ट्राच्या लोकजीवनातील महत्व अधोरेखित केले.
अष्टविनायक
अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देऊळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात स्थित असलेल्या ह्या देऊळांना स्वतंत्र इतिहास आहे.

श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक! अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.

श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर नक्षीकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे –

मोरगांव

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.

जवळच कर्‍हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.

थेऊर

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. या गणेशाला डाव्या बाजुला सोंड आहे.

पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.

थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)

सिद्धटेक

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून ९९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून १४२ कि. मी. अंतरावर आहे.

रांजणगाव

अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की – त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.

अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो.

हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

ओझर

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.

लेण्याद्री

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्‍या आहेत.

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

महड

महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.

या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.

रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.

पाली

पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.

हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली – पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल – गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.

अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणार्‍या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.

अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची क्षेत्रे आहेत ती पुढीलप्रमाणे – ( येथील श्रीगणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हटले जाते.)
१. टेकडीचा गणपती(नागपूर) – जि. नागपूर

२. शमी विघ्नेश(अदासा) – जि. नागपूर

३. अष्टदशभूज(रामटेक) – जि. नागपूर

४. भृशुंड(मेंढा) – जि. भंडारा

५. सर्वतोभद्र(पवनी) – जि. भंडारा

६. सिद्धीविनायक(केळझर) – जि. वर्धा

७. चिंतामणी(कळंब) – जि. यवतमाळ

८. वरदविनायक(भद्रावती) – जि. चंद्रपूर

भारतीय परंपरेमध्ये सर्वात आधी पुजा केली जाते ती गणपतीची. गणपतीला अथर्ववेदकाळापासून मान्यता मिळाली आहे. पूर्वी गणपतीची पुजा ग्रामदैवतांबरोबर केली जायची. त्यांची स्थापनाही गावाच्या वेशीवर केली जात असे. गावाचे साथीचे रोग, परकीय आक्रमण यापासून रक्षण करणे ही यामागची भावना. असेच काही गणपती महाराष्ट्रात अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध आहेत.या गणपतीच्या ठिकाणांचा उल्लेख मुद्दगल पुराणात गणपती क्षेत्र म्हणून केला आहे. या अष्टविनायक स्थानांचा उल्लेख स्थानिक लोककथांमधून आढळतो.

यामुळे अष्टविनायकांचे दर्शन घेण्याची इच्छा प्रत्येकाला होते. आणि म्हणून अष्टविनायकांच्या या यात्रेला खूप महत्त्व आहे. अष्टविनायकांची यात्रा करताना या गणपतीचे दर्शन घ्यायचा क्रमदेखील ठरलो आहे. या शास्त्राप्रमाणे सर्वप्रथम दर्शन घ्यायचे ते मोरगाव्या मोरेश्वराचे. त्यानंतर सिद्धटेक, पाली, येऊर, महड, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेऊन पुन्हा मोरगावला जायचे की अष्टविनायकाची यात्रा पूर्ण होते.

पुण्यापासून २० कि.मी. ते ११० कि.मी. अंतरावर ही सगळी गणपती स्थाने आहेत. पुणे हे यात्रेसाठीचे मध्यवर्ती ठिकाण आहे.

गणपतीची विविध स्तोत्रे, आरती आणि गणेश स्तुती असलेल्या साहित्यामध्ये संस्कृतमधील ‘श्री गणपती अथर्वशीर्ष’या स्तोत्राला विशेष महत्त्व आहे. ‘अथर्वशीर्ष’ हे उपनिषद आहे. गणेशोत्सवाच्या काळात दररोज व संकष्टी-विनायकी-अंगारकी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण ‘अथर्वशीर्षा’ची आवर्तने करतात. तर काही जण दररोज गणेशाची आराधना म्हणून किमान एकदा तरी ‘श्री गणपती अथर्वशीर्षा’चे पठण करतात. ‘गणपती अथर्वशीर्षा’ची वैयक्तिक किंवा सामूहिक आवर्तने केली जातात. पुण्यामध्ये दगडुशेट हलवाई गणपतीसमोर हजारो महिला दरवर्षी ‘गणपती अथर्वशीर्षा’ची आवर्तने विशिष्ट दिवशी करीत आहेत.
भारतीय संस्कृतीतील विविध पुराणे आणि अन्य प्रश्नचीन ग्रंथांमधूनही विविध ऋचा, ओव्या, श्लोक यांच्या माध्यमातून गणेशाची स्तुती केलेली आहे. गणेशभक्तांमध्ये प्रसिद्ध असलेले आणि नेहमी म्हटले जाणारे ‘गणपती अथर्वशीर्ष’ हे गणकऋषींनी सांगितले असून ते मूळचे अथर्ववेदातील आहे. ‘अथर्वशीर्ष’ याची फोड ‘अ’ अधिक थर्व अधिक शीर्ष अशी केली जाते. ‘अ’ म्हणजे अभाव, ‘थर्व’ म्हणजे चंचल आणि ‘शीर्ष’ म्हणजे डोके. चंचलपणाचा अभाव असणारे डोके, किंवा शांत डोके असा या शब्दाचा साधा अर्थ. डोके शांत ठेवण्याची विद्या यात सांगण्यात आली आहे. म्हणूनच असे म्हणतात की चंचल वृत्ती असलेल्यांसाठी ‘गणपती अथर्वशीर्ष’ हे एक वरदान आहे. विद्यार्थ्यांसाठी डोके शांत ठेवण्याकरिता याचे पठण नक्कीच लाभदायक ठरते.
अथर्वशीर्ष’ हे एकूण दहा भागांमध्ये असून पहिल्या सहा भागांमध्ये गणपतीच्या निर्गुण रुपाचे वर्णन सांगण्यात आले आहे. सातव्या भागामध्ये गणेश विद्या तर आठव्या भागात गणपतीची गायत्री सांगण्यात आली आहे. नवव्या भागात गणेशाच्या ध्यानासाठी सगुण स्वरुपाचे वर्णन असून दहाव्या भागात गणपतीला वंदन केले आहे. तर त्यापुढे ‘अथर्वशीर्ष’ पठणाची फलश्रुती देण्यात आली आहे. ‘गणपती अथर्वशीर्षा’चे पठण करताना ‘ओम नमस्ते गणपतये’ येथून सुरुवात करून ‘नमो व्रातपतये नमो गणपतये नम: प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नम:’ इथपर्यंत म्हणण्याची पद्धत आहे. हे एकदा म्हटले की ‘अथर्वशीर्षा’चे एक आवर्तन पूर्ण होते. आपल्याला जेवढय़ा संख्येत आवर्तने करायची आहेत ती करून झाल्यानंतर शेवटी फक्त एकदाच ‘एतदर्वशीर्षम’पासून पुढील फलश्रुती म्हणायची असते. भारतीय संस्कृतीत देव-देवतांना विविध स्तोत्रे, मंत्र म्हणून अभिषेक करण्याची पद्धत आहे. ‘गणपती अथर्वशीर्ष’ म्हणून गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करण्याची पद्धत असून अभिषेकासाठी गणेशभक्तांमध्ये ‘अथर्वशीर्ष’ अधिक आवडीचे आहे.

गणपती अथर्वशीर्ष
हरिः ॐ नमस्ते गणपतये॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमासि॥ त्वमेव केवलं कर्तासि॥
त्वमेव केवलं धर्तासि॥ त्वमेव केवलं हर्तासि॥ त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि॥
त्वं साक्षादात्मासि नित्यं ॥ १॥
ऋतं वच्मि॥ सत्यं वच्मि॥ २॥
अव त्वं माम्॥ अव वक्तारम्॥ अव श्रोतारम्॥ अव दातारम्॥ अव धातारम्॥ अवानूचानमव शिष्यम्॥ अव पश्चात्तात्॥ अव पुरस्तात्॥ अवोत्तरात्तात्॥ अव दक्षिणात्तात्॥ अव चोर्ध्वात्तात्॥ अवाधरात्तात्॥ सर्वतो मां पाहि पाहि समंतात्॥ ३॥
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः॥ त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः॥ त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि॥ त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि॥ त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥ ४॥
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते॥ सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति॥ सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति॥ सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति॥ त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः॥ त्वं चत्वारि वाक्पदानि।।५॥
त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः॥ त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारास्थितोऽसि नित्यम्॥ त्वं शक्तित्रयात्मकः॥ त्वां योगिनोध्यायंति नित्यम्॥
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वंमिंद्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवःस्वरोम्॥ ६॥
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम्॥ अनुस्वारः परतरः॥ अर्धेन्दुलसितं॥ तारेण ऋद्धं॥ एतत्तव मनुस्वरूपम्॥ गकारः पूर्वरूपम्॥ अकारो मध्यमरूपम्॥ अनुस्वारश्चांत्यरूपम्॥ बिन्दुरुत्तररूपम्॥ नादः संधानम्॥
संहिता संधिः॥ सैषा गणेशविद्या॥ गणक ऋषिः॥ निचृद्गागायत्रीच्छंदः॥
गणपतिर्देवता॥ ॐ गं गणपतये नमः॥ ७॥
एकदंताय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि॥ तन्नो दंतिः प्रचोदयात्॥ ८॥
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणाम॥ रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्॥
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्॥ रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्॥ भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्॥आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम्॥
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः॥ ९॥
नमोत्रातपतये। नमो गणपतये। नमः प्रमथपतये। नमस्ते अस्तु लंबोदरायैकदंताय विघ्नानाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः॥१०॥

फलश्रुति …
एतदथर्वशीर्षं योऽधीते॥ स ब्रह्मभूयाय कल्पते॥ स सर्वविघ्नैर्नबाध्यते॥ स सर्वत: सुखमेधते । स पंचमहापापात्प्रमुच्यते॥ सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति॥ प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति॥ सायं प्रातः प्रयुंजानो अपापो या भवति॥
सर्वत्राधीनोऽपविघ्नो भवति॥ धर्मार्थकाममोक्षं च विंदति॥ इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं ॥ यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति। सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्॥ ।
अनेन गणपतिमभिषिंचति स वाग्मी भवति॥ चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति। इत्यथर्वणवाक्यम्॥ ब्रह्मद्यावरणं विद्यात् । न बिभेति कदाचनेति॥
यो दूर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति॥ यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति॥ यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति॥
यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते॥
अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति॥ सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति॥ महाविघ्नात्प्रमुच्यते॥ महादोषात्प्रमुच्यते॥ महापापात् प्रमुच्यते॥ स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति॥ य एवं वेद इत्युपनिषत्॥ १४॥
ॐ सहनाववतु॥ सहनौभुनक्तु॥ सह वीर्यं करवावहै॥
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै॥
ॐ शांति॒: । शांति॒:॥ शांति॑:॥
॥ इति श्रीगणपत्यथर्वशीर्षं समाप्तम्॥

अर्थ

भगवान श्रीगणेशांना नमस्कार असो.

ॐ हे देवांनो, आम्ही कानांनी शुभ ऎकावे. यजन करणार्‍या आम्हांस डोळ्यांनी कल्याणच दिसावे. सुदृढ अवयवांनी व शरीरांनी युक्त असलेल्या आम्ही स्तवन करीत करीत देवांनी दिलेलें जे आयुष्य असेल तें घालवावे. ॥१॥

ॐ ज्याची किर्ती वृद्धांपासून (परंपरेने) ऎकिवांत आहे तो इंद्र आमचें कल्याण करो. सर्वद्न्य व सर्वसंपन्न असा पूषा (सूर्य) आमचे कल्याण करो. ज्याची गती अकुंठित आहे असा तार्क्ष्य (गरूड) आमचे कल्याण करो. बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत करो. ॥२॥

ॐ तें (श्रीगजाननरूपी तेज) माझें रक्षण करो. पठण करणाराचे रक्षण करो. (पुनश्च सांगतों) तें माझें रक्षण करो व पठण करणाराचे रक्षण करो. ॥३॥

ॐ त्रिवार शांति असो.

श्रीगणेश अथर्वशीर्षाचा अर्थ:

ॐ गणांचा नायक असलेल्या तुला नमस्कार असो. तूंच प्रत्यक्ष आदितत्व आहेस. तूंच केवळ (सर्व जगाचा) निर्माता आहेस. तूंच केवळ (विश्वाचे) धारण करणारा आहेस. तूंच केवळ संहार करणारा आहेस. तूंच खरोखर हें सर्व ब्रम्ह आहेस. तूं प्रत्यक्ष शाश्वत आत्मतत्व आहेस. ॥१॥

मी ऋत आणि सत्य (या परमत्म्याच्या दोन्ही अंगांना अनुलक्षून वरील सर्व) म्हणत आहें. ॥२॥

तूं माझें रक्षण कर. वक्त्याचे (तुझें गुणवर्णन करणार्यारचें) रक्षण कर. श्रोत्याचें रक्षण कर. (शिष्यास उपासना) देणार्यासचे (गुरूचें) रक्षण कर. (ती उपासना) धारण करणार्यायचे (शिष्याचे) रक्षण कर. ज्ञानदात्या (गुरूंचें) रक्षण कर. शिष्याचें रक्षण कर. मागच्या बाजूनें रक्षण कर. समोरून रक्षण कर. डावीकडून रक्षण कर. उजवीकडून रक्षण कर. आणि ऊर्ध्व दिशेकडून रक्षण कर. अधर दिशेकडून रक्षण कर. सर्व बाजूंनी सर्व ठिकाणी माझें रक्षण कर. रक्षण कर. ॥३॥

तूं ब्रम्ह आहेस. तूं चैतन्यमय आहेस. तूं आनन्दरूप आहेस. ज्याहून दुसरें कांहींच तत्व नाहीं असें सत्, चित् व आनंद (या रूपांनी प्रतीत होणारें एकच) तत्व तूं आहेंस. तूं प्रत्यक्ष ब्रम्ह आहेस. तूं (नाना प्रकारें नटलेल्या विश्वाचें ज्ञान आहेस. तू (सर्वसाक्षीभूत एकत्वाचें) विशिष्ट असें ज्ञान आहेस. ॥४॥ हें सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होतें. हें सर्व जग तुझ्यामुळें स्थिर राहतें. हें सर्व जग तुझ्या ठिकाणींच परत येऊन मिळतें. तूं पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश आहेस. तूं (परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी ही) वाणीची चार रूपें आहेस. ॥५॥

तूं (सत्व, रजस् व तमस्) या त्रिगुणांच्या पलीकडे आहेस. तूं (स्थूलदेह, सूक्ष्मदेह व कारणदेह) या देहत्रयांच्या पलीकडचा (महाकारण) आहेस. तूं (जाग्रद्वस्था, स्वप्नावस्था व सुषुप्तावस्था) या तीन अवस्थांच्या पलीकडचा (तुर्यावस्थारूप) आहेस. तूं (भूत, वर्तमान व भविष्यत्) या तिन्ही कालांच्या पलीकडचा आहेस. (मनुष्यशरीरांतील) मूलाधारचक्रांत तूं नेहमी स्थित आहेस. तूं (इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति व क्रियाशक्ति या) तिन्ही शक्तींचा आत्मा आहेस. योगी तुझें नित्य ध्यान करितात. तूं ब्रम्हदेव, तूंच विष्णु, तूंच रूद्र, तूंच इंद्र, तूंच अग्नि, तूंच वायु, तूंच सुर्य, तूंच चंद्र, तूंच ब्रह्म, तूंच भू:, तूंच भुव:, तूंच स्व: व तूंच ॐकार आहेस. ॥६॥

‘गण’ शब्दाचा आदिवर्ण ‘ग्’ याचा प्रथम उच्चार करून वर्णांतील प्रथमवर्ण ‘अ’ याचा उच्चार केला. त्याचे समोर अनुस्वार अर्ध्चंद्राकार शोभणार्याा ॐकारानें युक्त (असा उच्चार केला कीं) हें तुझ्या बीजमन्त्राचे (ग्ँ) रूप होय. गकार हें पुर्वरूप, अकार मध्यरूप, अनुस्वार अन्त्यरूप व (प्रणवरूप) बिंदु (हें पुर्वीच्या तिन्हींना व्यापणारें) उत्तररूप होय. या (सर्वां) चे एकीकरण करणारा नाद होय. सर्वांचें एकत्रोच्चारण म्हणजेच सन्धि. (अशा रीतीनें बीजमन्त्र सिद्ध होणें) हीच ती गणेशविद्या. (या मंत्राचा) गणक ऋषी आहे. (या मंत्राचा) निच्ऋद्गायत्री हा छन्द (म्हणण्याचा प्रकार) आहे. गणपति देवता आहे. ‘ॐ गं गणपतये नम:।’ (हा तो अष्टाक्षरी मन्त्र होय.) ॥७॥

आम्ही एकदन्ताला जाणतों. आम्ही वक्रतुंडाचे ध्यान करतों. त्यासाठी एकदन्त आम्हांस प्रेरणा करो. ॥8॥ (या भागास गणेशगायत्री असे म्हणतात.) ॥८॥

एक दांत असलेला, चार हात असलेला, (उजव्या बाजूच्या वरच्या हातापासून प्रदक्षिणाक्रमानें त्याच बाजूच्या खालच्या हातापर्यंत) अनुक्रमें पाश, अंकुश, दांत व वरदमुद्रा धारण करणारा, ध्वजावर मूषकाचें चिन्ह असणारा, तांबड्या रंगाचा, लांबट उदर असलेला, सुपासारखे कान असलेला, रक्तवस्त्र धारण करणारा, तांबड्या (रक्तचंदनाच्या) गन्धानें ज्याचे अंग विलेपित आहे असा, तांबड्या पुष्पांनी ज्याचें उत्तम पूजन केले आहे असा, भक्तांवर दया करणारा, सर्व जगाचें कारण असणारा, अविनाशी, सृष्टीच्या आधींच प्रगट झालेला, प्रकृतिपुरूषापलीकडचा देव, असें जो नित्य ध्यान करतो तो योगी, (किंबहुना) योग्यांत श्रेष्ठ होय. ॥९॥

व्रतांचा समूह म्हणजेच तपश्चर्या. तिच्या अधिपतीस नमस्कार असो. गणांच्या नायकार नमस्कार असो. सर्व अधिपतींतील प्रथम अधिपतीस नमस्कार असो. लंबोदर, एकदन्त, विघ्ननाशी, शिवसुत अशा श्रीवरदमुर्तीला नमस्कार असो. ॥१०॥

या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रम्हरूप होतो. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाहीं. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. (हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग) या पांचही महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा (अज़ाणपणे) केलेल्या पापाचा नाश करतो. सकाळीं पठण करणारा रात्रीं (नकळत) केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळीं व सकाळीं पठण करणारा पाप (प्रवृत्ती) रहित होतो. सर्व ठिकाणी (याचे) अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हें अथर्वशीर्ष (अनधिकारी) शिष्य-भाव नसलेल्या माणसाला सांगूं नये. जर कोणी अशा अनधिकार्याीस मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्त्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगें सिद्ध होईल. ॥११॥

जो गणपतीला अभिषेक करतो, तो उत्त्म वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांहीं न खातां जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असें अथर्वण ऋषींचें वाक्य आहे. (याचा जप करणार्याीला) ब्रह्म व आद्या (म्हणजे माया) यांचा विलास कळेल. तो कधींच भीत नाहीं. ॥१२॥ जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान् होतो. जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्ट्फल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनीं हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होतें. ॥१३॥

योग्य प्रकारें (याचा) उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीतीरीं किंवा गणपति प्रतिमेसंनिध जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. (असा मंत्र सिद्ध करणारा) महाविघ्नापासून मुक्त होतो. महादोषापासून मुक्त होतो. महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो, जो हें असें जाणतो. असें हें उपनिषद् आहे. ॥१४॥

हे लक्षात ठेवा सर्वांनीच….
श्रावण संपत आला की गणपतीचे वेध लागायला लागतात. गणपती, गौरी (महालक्ष्मी) हा कोकणातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात दिवाळी इतकाच किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचा सण मानला गेला आहे. टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं लोण दिवसेंदिवस पसरतच चाललंय, राजकारण्याने तर ह्या उत्सवाचं भांडवल केलंय.

आजतर गणपतीला ‘ग्लोबल’ महत्त्व आलं आहे, कोणत्याही कामाचा, गोष्टीचा, लेखाचा ‘श्रीगणेशा’च करावा लागतो. कोणत्याही पूजेतही गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. गणेश ही बुद्धीची देवता तर आहेच पण वाद्यांची जाणकार आहे. संगीत नृत्य ह्या सारख्या 14 विद्या अन चौसष्ठ कलातही तो आद्य आहे.सर्वांत विविधता कोणत्या देवात असेल तर ती गणपतीत आहे. त्याचे आकारही किती विविध प्रकारे चित्रित करता येतात. त्याची स्वयंभू रूपेही निसर्गातच बघायला मिळतात. तो कोणत्याही आकारात, प्रकारात दिसतो म्हणूनच तो आपला वाटतो, जवळचा वाटतो.सर्वांचा तो लाडका आहे. लहान मुलांनाही गणपतीबाप्पा फार फार आवडतो.

पण या उत्सवाला आता पर्यावरणाचं अधिष्ठान देण्याची गरज आहे. पर्यावरणाचा विचार करता धातूची मूर्ती प्रतिष्ठित करणं योग्य. मातीची मूर्ती असल्यास ती विसर्जन न करता योग्य काळजी घेऊन पुनर्स्थापित करता येते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मोठमोठ्या व अवाढव्य असतात. त्या वजनाला हलक्या असल्या तरी त्या पूर्णपणे विरघळल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांच्या मोठमोठ्या उंच व विसर्जनामुळे होणारे प्रदूषण याचाच मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे.

शाडूची नैसर्गिक रंगाने रंगवलेली लहान मूर्ती चालेल. त्याच्या मखर सजावटीतही थर्माकोल, प्लॅस्टिक इत्यादीचा वापर करण्याऐवजी फुले, पाने, फळे यासारख्या नैसर्गिक गोष्टी वापरण्यावर भर द्यावा. गणपतीलाही दूर्वा, जास्वंद या सारख्या नैसर्गिक गोष्टीच आवडतात. त्यामुळे निसर्गाच्या या देवाची पूजा जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टीनेच करा.

विघ्नहर्त्याचे प्रकटीकरण, त्यांच्या लीला, स्तुती व भक्तीचे वर्णन जवळपास सर्व पुराणांमध्ये आढळते. उपलब्ध वर्णनांचे सार काढून एका लेखात सामावणे अशक्य कोटीतील काम आहे. वाचकांसाठी पुराणांच्या नावांसहित संक्षिप्त वर्णन खाली देत आहे..

पद्य पुराण : यामध्ये पार्वतीच्या मळापासून भगवान गणेशाचे गजमुखाच्या रूपातील प्रकटीकरणाचे वर्णन आहे. पवित्र गंगा मातेने त्यांना पुत्र मानल्याचा उल्लेख आहे. अर्थात म्हणूनच गणेशास गांगेय नावानेही संबोधण्यात येते. सोबतच त्याच्या लीलेचेही वर्णन आहे.

शिवपुराण : विघ्नहर्त्याची श्र्वेत कल्पात उत्पत्तीची कथा, गणेशाचे भगवान शंकराच्या गणांसोबतच्या अद्भूत युद्धाचे वर्णन आढळते. ‍शंकराच्या त्रिशुलाने लंबोदराचे डोके उडवल्यानंतरचा वृत्तांत, यानंतर व्यथित झालेली पार्वती, शंकराने गजमुखास पुन्हा जिवंत करेपर्यंतचा वृत्तांत यात आहे. याशिवाय गणेशाच्या बाललीला, गणपती विवाह, नाराज झालेला कार्तिकेय या प्रसंगाचे वर्णन आढळते.
महाभारत : महाभारताची कल्पना संपूर्णपणे डोक्यात स्पष्ट झाल्यानंतर व्यासमुनी विचारात पडले. कारण एवढ्या विस्तृत ग्रंथाची रचना झाली पण त्याचे लेखन करणार कोण? असा प्रश्न त्यांना पडला. भगवान गणेशाने प्रसन्न होऊन त्यांचा लेखनिक होण्याचे मान्य केले. मात्र, ‘सांगताना एकही क्षण थांबू नये या ह्या अटीवरच. व्यासांचे ग्रंथ लेखनाचे आमंत्रण विघ्नहर्त्याने स्वीकारण्यापर्यंतचा वृत्तांत यात आहे. यानंतर गणेशाचे संपूर्ण ग्रंथ लिहून पूर्ण करण्यापर्यंतचा वृतांत त्यात आहे.

बृह्यवैवर्त्त पुराण : या पुराणात भगवान गणेशाच्या प्रकटी करणाअगोदरचा रोमहर्षक वृत्तांत आढळतो. पुत्रप्राप्तीसाठीच्या पुण्यक व्रताचे त्यात विस्ताराने वर्णन आहे. भगवान शंकराने पार्वतीस पुत्रप्राप्तीसाठी हा मंत्र सांगितला होता. पार्वतीने पुत्र प्राप्तीच्या इच्छेसाठी केलेले पुण्यक व्रत, पूर्णाहूती अगोदर ब्राह्मणाचा दक्षिणेसाठी आग्रह, पार्वतीची अशक्य कोटीतील दक्षिणा देण्याची तयारी, असे प्रसंग यात आहेत. पूर्णाहूती नंतर ब्राम्हणाने दक्षिणेच्या रूपात साक्षात भगवान शंकराची घातलेली मागणी, पार्वतीने अशक्य कोटीतील दक्षिणा देणे, आणि व्रताच्या प्रभावामुळे विघ्नहर्त्याची निर्मिती हे प्रसंग रोमहर्षक आहेत.

याप्रमाणेच लिंग पुराण, भविष्य पुराण यासारख्या अनेक पुराणात वर्णन सापडते. साक्षात विघ्नहर्त्याच्या नावानेच श्री गणेश पुराणही उपलब्ध आहे.
भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष कानी पडतो. मोरया म्हणजे नमस्कार. अर्थात गणपती बाप्पा मोरयाचा अर्थ गणपतीस दंडवत असा होतो. गणेशाचा मोरेश्वर नावाचा भक्त होऊन गेला. त्यावरून हा मोरया शब्द रूढ झाला असावा.
‘ मद्‍ भक्तांनाच ये भक्ता: ते प्रियतमा मता:।।
अर्थात माझ्या भक्तांचे भक्त मला अधिक प्रिय आहे. परमेश्वरानेच स्वत: असे म्हटले आहे. त्यामुळेच मोरया हे नाव गणपती सोबत जोडण्यात आले असावे. गणेश चतुर्थी, गणरायाची चतुर्थ अवस्था तुर्यावस्थेपर्यंतची सिद्धीच सूचित करते. चंद्र मनाचा परमेश्वर आहे. ‘चंद्रमा मनैसो जात.। चंद्र कलेकलेने वाढतो व घटतो. मनाचेही तसेच आहे. तुर्यावस्थेपर्यंत पोहचण्याची इच्छा ठेवणार्‍या मनुष्याचे मन चंचलतेचे दास होता कामा नये. मनाच्या आधीन झाल्यास तो अध:पतनाचा मार्ग समजावा.

कोणत्याही आईस आपल्या मुलाचे नको असेच गणपतीचे रूप आहे. मात्र तरीही आपल्या ऋषीच्या दृष्टीने गणपतीचे महत्व अगाध आहे. कोणत्याही शुभकामास त्याच्या पूजनानेच सुरूवात होते. प्रसंग कोणताही असो, लग्नकार्य, लक्ष्मीपूजन, भूमीपूजन. मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा या सर्वांत गणपतीचे पूजन आवश्यक आहे. गणपतीची मूर्ती असायलाच पाहिजे असे नाही, सुपारीचा गणपती केला तरी चालेल. मात्र, प्रथम पूजन होणार ते गणपतीचेच. पुराणकथेनुसार गणपतीचे डोके उडवल्यानंतर पार्वतीस प्रसन्न करण्यासाठी भगवान शिवसंकराने आपल्या एका गणास चांगले शिर शोधण्यास पाठवले. तो हत्तीचे डोके घेऊन आला. गणपतीच्या धडावर ते ठेवल्यावर तो जिवंत झाला. अशाप्रकारे गणपतीचा गजानन झाला.

पुराणातील भाषा भावगर्भित व लक्षणात्मक रूपकांनी समृद्ध आहे. बुद्धिमान लोक भावार्थ समजून घेतात. तर इतर कथेच्या रूपात आनंद घेतात. भगवान शिवाने हत्तीचे डोके धडावर बसवले मग गणेशाचेच का नाही बसवले? गणपति ज्ञानाची देवता असून समाजाचे नेतृत्व त्यांच्या हाती असल्याचे पुराण सांगते. कारण संकुचित वृत्तीचा मानव महान तत्वज्ञानी किवा लोकप्रिय पुढारी नाही होऊ शकत. गण-पती म्हणजेच समूहाचा नेता. त्याचप्रमाणे तो गुणपतीही आहेच. पुढारी व तत्ववेत्यात कोणते गुण असायला पाहिजे, याचे गणपति मूर्तीमंत प्रतीक आहे. त्याच्याजवळ बाह्य सौदर्य नसले तरी आंतरिक सौदर्याचे भांडार आहे.

पुढारी व ज्ञानी पुरूषाच्या अंगी दूरदृष्टी असणे आवश्यक आहे. भविष्यातील बदल टिपणारी दृष्टी त्यांच्याकडे हवी. गणपतीस दोन दात आहेत. एक पूर्ण व दुसरा अर्धा. पहिला श्रद्धेचा तर दुसरा मेधाचा आहे. जीवनविकासाकरिता आत्मश्रद्धा व ईश्वरश्रद्धा असणे आवश्यक आहे. मेधा कमी असल्यास चालेल मात्र गुरू व परमेश्वराप्रती श्रद्धेस तडा जाता कामा नये. त्यास चार हात आहेत. अंकुश, पाश, मोदक व आशीर्वाद त्यामध्ये असतो. विषयवासनेवर ताबा मिळवणे आवश्यक असल्याचे अंकुश सुचवतो. आवश्यकता भासल्यास इंद्रियांना दंड करण्याचे सामर्थ्य ज्ञानी व नेतृत्व करणार्‍या पुरूषाने अंगी बाणवणे आवश्यक असल्याचे त्यातून प्रतीत होते. मोदक म्हणजे आनंद देणारा पदार्थ. बौद्धीक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील धुरीणांचा आहार सात्विक असायला पाहिजे. व्यापक अर्थाने बघितल्यास प्रत्येक इंद्रियांचा आहार सात्विक असायला पाहिजे. मोदक तत्वज्ञानाचे प्रतीक आहे. बाहेरून त्याची चव कळत नसली तरी आतून तो गोडच असतो. आपल्या कर्माचे मोदक प्रभूच्या हातात देणार्‍यास परमेश्वर आशीर्वाद देतो. चौथ्या हातातून हेच सूचित होते.
गणपतीचे रूपभेद
भारतात व बाहेर गणपतीच्या रूपात अनेक फरक दिसतो. रूपभेदानुसार ध्यान व पूजाविधी बदलतो. गुप्तयुगातील गणेशमूर्ती अष्ट ते दशभूज आहेत. तंत्रमार्गी ग्रंथ तंत्रसारात, काश्मीरात, नेपाळमध्ये व अफगाणिस्तानमध्ये आढळणार्‍या मूर्तींमध्ये गणपतीचे वाहन सिंह दाखवले आहे. येथील गणपती नेहमीप्रमाणेच प्रसन्न रूपात आहे. पण प्राणतोषिनी तंत्र – या तांत्रिक ग्रंथात उल्लेखित चौरगणेश साधनाचे फळ चोरतो असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे विघ्नगणेश विघ्न घडवितो व लक्ष्मीगणेश लक्ष्मीस आलिंगन देउन असतो असा उल्लेख आहे.
* महागणपती – महागणपती हे गणपतीचे एक तंत्रमार्गी रूप आहे. यात गणपतीसोबत शक्ती विराजमान असते व एकमेकांस उपस्थ स्पर्श केलेला असतो.

* हेरंब-गणपती – हेरंब-गणपती तंत्रसार ग्रंथात उल्लेखित आहे. हे रूप पंचानन (पाच तोंडी) असते. त्यातील मधले एक मुख ऊर्ध्वदिशी (आकाशाकडे तोंड केलेले) असते. अभयवर, मोदक, निजदन्त, मुण्डमाला, अंकुश व त्रिशूल असतो. हेरम्ब म्हणजे दीन पालक होय. वाहन सिंह. नेपाळमध्ये हेरम्ब-गणपतीचे वाहन उंदिरही असते.

* नृत्यगणेश – नृत्यगणेश आठहाताचा व नृत्यरत असतो. हाती शस्त्र नसते. मुद्रा नाचाची असते.

* विनायक गणेश – विनायक गणेशाचा उल्लेख अग्निपुराण ग्रंथात आहे. याची पाच भिन्न रूपे आहेत – चिंतामणी विनायक, कपर्दी विनायक, आशा विनायक, गजविनायक व सिद्धिविनायक. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक एकच असून तो अम्बिकापुत्र आहे.

* बौद्ध गणेश – बौद्ध गणेशाचा उल्लेख बौद्ध साधनमाला-ग्रंथात मिळतो. तो द्बादशभूज (बारहाती) आहे. त्याचे कपाळ रक्तपूर्ण असून हाती मांस असते.

इसवीसनाच्या पहिल्या शतकात बनलेली व श्रीलंकेतील मिहिनटाल येथे मिळालेली मूर्ती आतापर्यंतची प्राचीनतम गणेशमूर्ती आहे. उत्तर प्रदेशच्या फरूखाबाद जिल्ह्यात चौथ्या शतकात निर्मिलेली द्बिभूज दगडी गणेशमूर्ती पाहायला मिळते. इसवीसनाच्या पाचव्या शतकात निर्मिलेली मध्यप्रदेशातील उदयगिरी येथे मोदक खाणा-या गणपतीची मूर्ती मिळालेली आहे. सर्वसाधारणपणे तीन प्रकारच्या गणेशमूर्ती पाहायला मिळतात – आसनस्थ, नृत्यरत व उभ्या. यात बसलेल्या मूर्तींची संख्या सर्वाधिक आहे. जबलपूर येथे हतीमुख असलेल्या देवीची मूर्ती मिळाली आहे. तंत्रमार्गात उल्लेखित गणेशपत्नी – गणेशाणी हीच असावी असा अंदाज आहे.

गणपतीचे अवतार
उपपुराण मानल्या जाणा-या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण- ह्या दोन ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.

गणेश पुराण – गणेश पुराणात- उल्लेखित गणपतीचे चार अवतार सत्य, त्रेता, द्बापर व कलीयुगात अवतीर्ण झाले. हे होते –

महोत्कट विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप व अदिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला. या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असूर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.
मयूरेश्वर – हा षडभूज व श्वेतवर्णी अवतार आहे. वाहन मोर. त्रेता युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याच्या वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळेस मोर भाऊ कार्तिकेय यास दान केला. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे.

वक्रतुण्ड – प्रथम अवतार. वाहन सिंह. मात्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध केला.
एकदन्त – आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक. मूषकवाहन. अवताराचा उद्देश्य मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध।
महोदर – वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप. बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक। मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.
गजवक्त्र वा गजानन – महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला.
लम्बोदर – ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक. वाहन मूषक. क्रोधासुराचा वध केला.
विकट – सूर्याचे प्रतीक. कामासुराचा वध केला. वाहन मयूर.
विघ्नराज – विष्णूचे प्रतीक. ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचा उद्देश्य.
धूम्रवर्ण – शिवाचे प्रतीक. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक. वाहन घोडा. अभिमानासुराचा नाश केला.

अध्यात्मातिल “विज्ञान…”
गणेश प्रिय आरोग्यदायी एकवीस वनस्पती…..”
दुर्वा आणि जास्वंदीच्या फुलाबरोबरच गणपतीच्या पूजेतील आणखी एक अविभाज्य घटक म्हणजे एकवीस पत्री. केवळ गणेशाला वाहिल्या जाणाऱ्या म्हणूनच नव्हे तर या एकवीस पत्री म्हणजे एकवीस वनौषधी आहेत, त्यांचे वेगवेगळे औषधी उपयोग आहेत.

१) मधुमालती – या वनस्पतीला मालतीपत्र असेही म्हणतात. वनस्पती शास्त्रात हिला ‘हिपटेज बेंघालेन्सीसकुर्झ’ म्हणतात. फुफुसाचे विकार, त्वचारोग, जाडी कमी करण्यासाठी ही गुणकारी आहे. स्त्रीरोगातील श्वेतपदर, गर्भाशयाचे विकारांत तसेच नेत्ररोगातही या वनस्पतीचा खात्रीशीर उपयोग होतो.
२) माका – हिचे शास्त्रीय नाव ‘इक्लिप्टा प्रोस्ट्रेटा’ म्हणतात. मूत्रपिंडाचे आजार, केसांचे विकार यासाठी माक्याच्या पानाचा रस वापरतात. कावीळ, त्वचारोग, मूळव्याध, विंचुदंश, आमवात यासाठी माका गुणकारी आहे. माका रसायन आहे. रसायन म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देणारे औषध. माक्याचा रस सर्वागास चोळून जिरवल्याने शरीरातील मेदाच्या गाठी विरघळतात.
३) बेलपत्र – हिचे वनस्पती शास्त्रातील नाव ‘ऐजल मार्मेलस’ असे आहे. पोटातील जंत, पोटाचे विकार यावर बेलपत्राचा उपयोग होतो. आमांशाच्या विकारात बेलफळ गुणकारी आहे. बेलाच्या पानांचा रस ४ चमचे व मध २ चमचे घेतल्याने सात दिवसांत कावीळ बरी होते. बेलाच्या पानांचा २ चमचे रस, १ कप दुधातून घेतल्याने स्वप्नदोष कमी होतो.
४) दूर्वा – वनस्पती शास्त्रात हिला सायनोडॉन डॅक्टीलॉन म्हणतात. ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. हिच्या दोन जाती आहेत, पांढरी व निळी पैकी गणेशाला पांढऱ्या दूर्वा प्रिय आहेत. या जातीला हिल हराळी असेही म्हणतात. दूर्वाना प्रजोत्पादक व आयुष्यवर्धक मानले जाते. म्हणून गर्भदानविधीत स्त्रीच्या नाकपुडीत दूर्वाचा रस पिळतात. अंगातील उष्णता, दाह कमी करण्यासाठी, त्वचारोगनाशक म्हणून, वंध्यत्व नाहीसे करण्यासाठी दूर्वाच्या रसाचा खूप उपयोग होतो. मूत्रविकारासाठी दूर्वा परमौषधी आहेत. पांढऱ्या दूर्वा भीमाशंकर या प्रसिद्ध ठिकाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.

५) धोतरा – याचे शास्त्रीय नाव ‘टोब्रानॅपल स्ट्रॅमोनियम’ आहे. ही क्षुद्रवर्गीय वनस्पती आहे. तिच्या काळा, पांढरा व राजधोत्रा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून ‘अॅफ्रोपिन’ नावाचे औषध बनवतात. वेदनाशामक म्हणून याचा उपयोग होतो. दमा व श्वास विकारांवर कनकासव हे धोत्र्यापासून तयार होणारे औषध प्रसिद्ध आहे. हत्तीपायरोगात धोत्र्याच्या पानांचा रस इतर औषधांसोबत लेप म्हणून वापरतात. ही वनस्पती नऊ उपविषात गणली जाते. त्यामुळे हिचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
६) तुळस – तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसीमम सॅन्टम आहे. तुळस गणपतीला निषिद्ध असली तरी फक्त गणेश चतुर्थीस तुळस वापरतात. मात्र वाहून झाल्यावर त्वरीत बाजूला काढावी. विष्णू, कर्पूर, हिरवी व कृष्ण(रान) अशा तीन जाती आहेत. हवा शुद्ध करणे हा तुळशीचा मुख्य गुणधर्म आहे. दमा, खोकला, सर्दी या विकारात ही श्रेष्ठ ठरते. कॅन्सरसारख्या विकारात तुळशीची पाने मंजिऱ्या याचा रस रोज ४ चमचे असा एक महिना घेतल्यास परिणामकारक ठरू शकतो.
७) शमी – शास्त्रीय नाव ‘प्रोस्पोपिस सिनेरिऐंजल’ आहे. शमीत सुप्त अग्निदेवता असते असे म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची राख ठेवतात. त्वचारोग, दमा, मूत्रविकार, सूज या विकारांत शमी गुणकारी ठरते.
८)आघाडा – आघाडय़ाचे शास्त्रीय नाव ‘अक्र्याराधस अस्पेरा’ आहे. हिचा उपयोग बायका, ऋषीपंचमीचे दिवशी स्नानाचे वेळी तोंड धुण्यासाठी करतात. कारण मुखरोग, दंतरोगात हे श्रेष्ठ औषध आहे. कफविकार, सूज, भगंदर-मूळव्याध, मूतखडा, शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी मेदविकार, मलेरिया अशा अनेक आजारात आघाडा उपयोगी ठरतो

९) डोरली – शास्त्रीय नाव ‘सोलॅनम इंडिकम’ आहे. डोरलीची मुळे गुणकारी असतात. त्वचारोग, पोटाचे विकार, वातनाशक, मूत्ररोगातसुद्धा वापरतात.
१०) कण्हेर – शास्त्रीय नाव ‘नेरीयम इंडिकम’ आहे. तिला करवीर, हयारी, कणगिले असेही म्हणतात. कण्हेरीची पाने व मुळाची साल औषधी आहे. महाविषगर्भ या वेदनाशामक तेलात त्याची साल वापरलेली असते. मूळव्याधीच्या कोंबास कण्हेरीचे मूळ पाण्यात उगाळून लावल्यास कोंब गळून पडू शकतात. कण्हेरीच्या मुळाची हृदयावर ‘डिजिटॅलीस’ सारखी क्रिया होते. नऊ उपविषात हिचा समावेश होतो. घोडय़ांना मारणारी म्हणून हिचे नाव हयारी असे आहे. डोक्यातील खवडे, त्वचारोग यात वापरतात.
११) मंदार – शास्त्रीय नाव ‘कॅलोट्रॅपीस गायगँटी’ आहे. मराठीत रुई या नावाने प्रसिद्घ आहे. मारुतीच्या गळ्यात हिच्या पानाची माळ घालतात. हनुमानपत्नी म्हणूनही हिला ओळखतात. तिच्या चंड, गंध व श्वेत अशा तीन जाती आहेत. हिची पाने, फुले, मुळे औषधी आहेत. तसेच चीकसुद्धा औषधी आहे पण अंगावर उततो त्यामुळे सावधपणे वापरावा. रुईच्या चिकामुळे शौचासही साफ होते. शरीरावरील गाठीत या चिकाचा इतर औषधांसोबत लेप देतात. पोटाचे विकार, वातरोग, अर्धशिशी, त्वचारोग, दमा, चामखीळ, कुरूप, कावीळ, अंडवृद्धी, कॅन्सरच्या गाठी, मूळव्याध अशा विकारांत मंदार हे चांगले औषध आहे.
१२) अर्जुन – शास्त्रीय नाव ‘टर्मेनॅलिया अर्जुना’. हाडे जोडण्यासाठी श्रेष्ठ वनस्पती. हृदयरोगात खूप उपयोगी आहे. या वनस्पतीत कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे मूतखडय़ासारख्या विकारात जपून वापरावी. नाकातोंडातून रक्त पडणे, शौचातून रक्त पडणे, त्याचप्रमाणे रक्त व लघवीतील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयोगी येते. भाजलेल्या जखमांवरही वापरतात.
१३) विष्णुकांत – शास्त्रीय नाव ‘इवॉलवुलस अल्सिनॉयडस’ आहे. शंखपुष्पीच्या नावाने या वनस्पतीला ओळखतात. बुद्घिवर्धक आणि ब्रेनटॉनिक म्हणून उत्तम. लठ्ठपणा, मानसिक विकारांत वापरली जाऊ शकते.

१४) डाळिंब – शास्त्रीय नाव ‘पुनिका ग्रॅनॅटम’ आहे. आरक्ता, गणेश अशा जाती आहेत. पित्तात खूप गुणकारी आहेत. गालावरील वांग जाण्यास डाळिंबाची साल वापरतात. अतिसार, पचन, कावीळ, स्वरदोष, पोटातील जंत, अशक्तपणा, तोंड येणे अशा रोगोपचारात श्रेष्ठ आहे.
१५) देवदार – शास्त्रीय नाव ‘स्रिडस देवदार’. हिमालय तसेच प. घाटावर आढळणारा वृक्ष. संधिवात, जुनाट सर्दी, ताप, अपचन, उचकी अशा रोगात उपयोगी. गर्भाची वाढ खुंटल्यास देवदाव्र्यादी काढा हे अप्रतिम औषध या वनस्पतीपासून करतात.
१६) मरवा – शास्त्रीय नाव ‘ओरिगोनॉन हॉर्टेनिस’ आहे. ही अत्यंत सुवासिक वनस्पती आहे. जखमांमुळे, भाजल्याने किंवा कोणत्याही कारणांमुळे त्वचेवर पडलेल्या डागांवर श्रेष्ठ.
१७) पिंपळ – शास्त्रीय नाव ‘फिकस रेलीजिओसा’. पिंपळपानांना अश्वत्थपत्र असेही म्हणतात. हवा शुद्धीकरणासाठी श्रेष्ठ आहे. पिंपळपानातून पदार्थ खायला दिल्याने मुलांची वाणी स्वच्छ होते असे मानतात. िपपळाची लाख खडीसाखरेबरोबर दिल्यास खूप छान झोप लागते. त्याशिवाय तिचा उपयोग लहान मुलांना आकडी येण्यावरही प्रतिबंधात्मक म्हणून होतो.
१८) जाई – शास्त्रीय नाव ‘जास्मिनम ग्रँडीफ्लोरम’. तोंड आल्यावर जाईचा पाला उपयोगी पडतो. जुनाट जखमांवरही पाल्याचा उपयोग होतो. केशवृद्घिसाठीही जाईचे तेल वापरतात.

१९) केवडा – शास्त्रीय नाव ‘पँडय़ानस ओडोरॅडिसमिया’. स्त्रीरोग, गर्भपाताच्या विकारात वापरतात. ‘चंद्रकला’ या आयुर्वेदिक औषधात केवडय़ाचा समावेश असतो. दीर्घकाळ असलेला ताप, चक्कर, रक्तदाब, मानेचे वेदनारोग, मधुमेह, घटसर्प या रोगांमध्ये उपयोगी आहे.
२०) हादगा – शास्त्रीय नाव ‘सेसबॅनिया ग्रँडीफ्लोरा’. या पानांना अगस्तिपत्र म्हणतात. फुलांची भाजी करतात. फुलांत अनेक जीवनसत्त्वे असतात. मल्टीव्हिटॅमिनच्या खुराकापेक्षा ही फुले केव्हाही श्रेष्ठ.
२१) बोर – शास्त्रीय नाव ‘झिझिपस मौरीटीआना’. तापामुळे होणारा दाह कमी करण्यासाठी बोराचा काढा देतात. मुरमांवर बोराच्या बियांचे चूर्ण वापरल्याने चेहऱ्यांवरील पुटकुळ्या, काळे डाग जाऊन चेहरा तजेलदार दिसतो. घसा बसल्यावर बोरपत्रे भाजून गोळ्या करून चघळल्यास उपयुक्त.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पूजल्या जाणाऱ्या आणि ‘कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे’ अशी ज्याचे स्तवन केले जात, त्या गणेशाची रूपे काळानुरूप बदलत गेली. पुराणांमध्ये पाहिले तर असे दिसून येते की विलक्षण भीतीप्रद विनायकाचा पुढे सुलक्षण गणपती झाला. गणेशाच्या याच रूपांचे गणेशपुराणाचा संदर्भ घेऊन केलेले रंजक विवरण.

गणेशोत्सवात गणेशाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती पाहायला मिळतात. खरं तर गणेशमूर्ती हा विषयच गहन व विस्तीर्ण आहे. आज आपल्यासमोर जी प्रचलित परंपरागत गणेशमूर्ती आहे ती चतुर्भुज, लंबोदर, गजमुख अशी. हे ध्यान गणपती अथर्वशीर्षांतील वर्णनाशीच अधिक जुळणारे आहे. गणपती अथर्वशीर्षांतील ते वर्णन असे आहे.
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङकुशधारिणम।
अभयं वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्।
म्हणजे एक दात, चार हात, पाश व अंकुश धारण करणारा, अभय व वरद हस्तमुद्रांचा आणि उंदराचे चित्र असलेला ध्वज धारण करणारा. अथर्वशीर्षांत ‘मूषकध्वजम’ म्हणजे ज्याच्या ध्वजावर मूषकचिन्ह आहे असा. आपल्या परंपरागत प्रचलित मूर्तीत उंदीर प्रत्यक्ष गजाननाचे वाहन म्हणूनच दाखवलेला आहे. प्रतिवर्षी गणेशाची मातीची मूर्ती घरोघरी आणून तिचे पूजन करण्यासंबंधी मूळ संदर्भ गणेशपुराणात येतो. (क्रीडाखंड अ. ७० श्लो. ३५-३६) विनायक जेव्हा काशीनगरीतील आपले कार्य आटोपून कश्यपाश्रमी म्हणजे आपल्या घरी परत जावयास निघाला तेव्हा नगरीतील लोक शोकाकुल झाले. त्यांचे समाधान करीत असताना विनायकाने त्यांना सांगितले की, ”आता तुम्ही सारखा माझाच ध्यास घेऊन बसलात तर तुमच्या मनाला स्वास्थ्य लाभणार नाही. तेव्हा तुम्ही माझी मातीची मूर्ती करून घरोघर बसवा आणि तिची पूजा करीत चला. मात्र या ठिकाणी ती मूर्ती कशी असावी याचे वर्णन आलेले नाही.

शास्त्रात गणेशाचे स्वरूप कसे असावे यासंबंधी पुढीलप्रमाणे नियम सांगितला आहे.
श्रीगणेश पुराणाच्या क्रीडाखंडात अध्याय ७८ मध्ये स्वत: श्रीगणेशाने आपल्या अवतारांविषयी कथन केले आहे. विलक्षण भीतीप्रद विनायकाचाच पुढे सुलक्षण गणपती झाला असे दिसून येते. गणपतीच्या रूपामध्ये अनेक प्रकारे विविधता दिसून येते. कधी रिद्घिसिद्घीसोबतचा गणेश तर कधी लाभ व लक्ष्य या दोन मुलांसमवेतचा कुटुंबगणेश, कधी शंकराच्या परिवारात शोभणारा बालगणेश. स्वयंभू शिलारूपी मूर्ती हा एक वेगळा प्रकार आहेच. याशिवाय पर्वतातून किंवा वृक्षातून आलेले त्याचे प्रकटीकरण हाही एक वेगळा प्रकार आहे. हिमालयातील गौरीकुंडाजवळ ‘मुंडकटा गणेश’ (ज्याचे शिर म्हणजे डोके कापलेले आहे), गजमुखी नसलेली गणेशमूर्तीही दक्षिणेत एके ठिकाणी आढळते.
लंगडय़ा बाळकृष्णाप्रमाणेच लंगडय़ा गणपतीची बालमूर्तीही वेलोर किल्यातील जलगंधेश्वर मंदिराच्या कल्याण मंडपातील खांबावर आढळते. अशीच दुसरी मूर्ती लंडनच्या ‘इंडिया म्युझियम’मध्ये आहे. तिच्या उजव्या हातात मोदक असून, मूर्ती पंचरसी धातूची आहे. श्रीकृष्णाप्रमाणे मुरली आडवी धरून वाजविणारा मुरलीधर गणेश श्रीशैल्य मल्लिकाजुर्नाच्या मंदिरात आणि हैद्राबादच्या सालारजंग म्युझियममध्ये आहे. या मूर्ती धातूच्या पत्र्यावर कोरलेल्या आहेत. नर्मदेतील लालसर रंगाचे दगड गणपती म्हणून पुजले जातात. त्यांना नर्मदे म्हणतात. ‘बाण, तांदळे, नर्मदे’ असा दासबोधात उल्लेख आहे. तांदळा म्हणजे गणपतीची मूर्ती म्हणून पूजिला जाणारा गणेशपाषाण. श्रीमोरया गोसाव्यांना कऱ्हेत लाभलेली गणेशमूर्ती ही असाच तांदळा आहे. काही ठिकाणी गणेशलिंग म्हणून गणेशपाषाणाचा उल्लेख केला जातो. टिहरी गढवालच्या गणेश प्रयागक्षेत्रात असे गणेशलिंग आहे. तंजावर जिल्ह्यातील तिसन्नालोर येथे गणपती म्हणून शाळिग्रामचीच पूजा होते. काश्मिरमध्ये ओरिसातील जाजपूर टेकडय़ांत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशगुळे किंवा अगरगुळे येथ प्रचंड नैसर्गिक शिळाच गणपती म्हणून पुजल्या जातात.
आकारातील प्रचंडतेविषयी वाईचा ढोल्या गणपती, (१० फूट उंच, ८ फूट उंच), सातारचा ढोल्या गणपती, आधासा (अदोषक्षेत्र) येथील गणपती(१८ फूट उंच व ७ फूट रुंद) उज्जयनि व इंदूर येथील गणेश(१२ फूट उंच), नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील गणेशमूर्ती(२२ फूट उंच) आपल्या प्रचंड आकारासाठी प्रसिद्ध आहेत. नगर जिल्ह्यातील नेऊरगावच्या नेऊरगावकर घराण्यात पुजली जाणारी गणेशमूर्ती अंगठय़ाएवढी आहे. एक संगमरवरी उजव्या सोंडेची मूर्ती दक्षिणेत स्वामिमलाईजवळील तिरुलनपुरीच्या देवळात आढळते. पोवळ्यावर कोरलेल्या गणेशमूर्ती किंवा प्रत्यक्ष पोवळ्याच्याच तयार केलेल्या गणेशमूर्ती खाजगी पूजेत आढळतात. तांदुळाच्या एका दाण्यावर कोरलेल्या गणेशमूर्तींचाही उल्लेख करता येईल.
स्त्री आकार : पुरुष आकाराप्रमाणे स्त्रीआकारातील गणेशमूर्तीही आढळतात. शुचिंद्रम (मद्रास) अग्मासान्निधीच्या अगदी समोर असलेल्या खांबावर गणेशानीविनायकाची प्रतिमा कोरलेली आहे. स्त्रीआकारातील गणेशाची दुसरी मूर्ती मध्यप्रदेशातील जबलपूरजवळ भेंडाघाटावर एका मंदिरात आहे. मदुराईच्या मीनाक्षीमंदिरातील व्याघ्रपाद गणेशानीची मूर्ती वैशिष्टय़पूर्ण आहे.
वाहन भेद : गणेशाचे वाहन उंदीर हे सर्वश्रुत आहे. परंतु वाहनासहित असलेल्या ज्या विविध गणेशमूर्ती उपलब्ध आहेत त्याचे वाहन सिंह, मोर, वाघ ही वाहनेसुद्धा काही गणेशमूर्तीची आढळतात. नेपाळमधील हेरंबचा एक पाय सिंहावर व दुसरा उंदरावर आहे.
नृत्यमूर्ती : नृत्यगणेशाच्या मूर्ती शिल्पांतील तशाच सुटय़ा घडीवपण आहेत. पाषाणमूर्तीप्रमाणेच अशा धातूमूर्तीही अनेक उपलब्ध आहेत.
दोन ते अठरा हातांच्या गणेशमूर्ती : दोन, चार, सहा, आठ, दहा, बारा, चौदा आणि अठरा हातांच्या गणेशमूर्ती आहेत.
द्विहस्त : दोन हातांच्या गणेशमूर्ती प्राचीन समजल्या जातात. यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे गोकर्णाची व त्यानंतर इडगुंजीची. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात चांदवडजवळ रेणुका देवीच्या डोंगराच्या पायथ्याशी व्दिभुज गणपती दिसून येतो. गणेशपुराणातील वर्णनेप्रमाणे कलियुगातील गणेशावतार द्विभुज असल्याचं म्हटले आहे. परंतु सध्यातरी चतुर्भुज गणेशाचीच उपासना आपण करतो.
चतुर्भुज : चार हातांची गणेशमूर्ती भारतात व भारताबाहेरही आढळणारी सार्वत्रिक मूर्ती आहे.

चतुर्भुज : चार हातांची गणेशमूर्ती भारतात व भारताबाहेरही आढळणारी सार्वत्रिक मूर्ती आहे.
षडभुज : एकेकाळी षडभुज मूर्ती हा एक वादग्रस्त मुद्दा होता. परंतु अशा सहा हातांच्या गणेशमूर्ती अनेक ठिकाणी आढळल्या आहेत. नेपाळमधील सहा हातांच्या मूर्तीचे एक चित्र एलिस गेटी यांच्या ग्रंथात आहे. तर ज्ञानेश्वरांच्या गणेशवर्णनात सहा हातांच्या गणेशमूर्तीचा उल्लेख येतो. हा गणपती कल्पित असून त्यांना त्याच मूर्तीचे दर्शन घडले असावे. याशिवाय शंकरगड, जुन्या संस्थानातील सोहागपूर, नर्मदाकाठावरील नेमावर तसेच राजशाहीच्या वरेंद्र संशोधन मंडळाच्या वस्तुसंग्रहालयात षडभुज गणेशमूर्ती उपलब्ध आहेत.
अष्टभुज : अष्टभुज मूर्ती ही तंत्रमार्गातली असावी. भिंगार येथील उत्खननात मिळालेल्या अष्टभुज तांडवमूर्तीचा जारण-मारण विद्येशी संबंध असल्याचा उल्लेख सापडतो.
दशभुज : गणपतीच्या दहा हातांच्या मूर्ती पुष्कळच आढळतात. यातील चार हात गणपतीचे बाकीचे सहा शिव, विष्णू व शक्ती यांचे असेही म्हणतात. दशभुज गणपती व महागणपती ध्यानात सापडतो. पुण्याला सापडलेला चिंतामणी दशभुज आहे. नेपाळ मधील हेरंबही दहा हातांचा आहे.
द्वादशभुज : द्वादशभुज म्हणजे बाराहाती गणपती मूर्ती क्वचितच आढळतात. औरंगाबाद येथे थोरल्या बाजीरावाने दिलेली मूर्ती बारा हातांची उजव्या सोंडेची आहे.
चौदा हाती : ही एकमेव गणेशमूर्ती बिहारमधील मेरजवळ सापडली.
अठरा हाती : रत्नागिरी येथे विनायक कृष्ण जोशी यांनी आपल्या राहत्या घराच्या परिसरातच अठरा हातांची गणेशमूर्ती स्थापन केली आहे. याला वीर विघ्नेश म्हणतात.

 

300px-ganesha_kangra_miniature_18th_century_dubost_p51
300px-ganesh_janani
300px-ganapati1 250px-ganesha_nurpur_miniature_circa_1810_dubost_p64 maha_ganapati 300px-tibetianganpati 300px-ganesha_ink

स्रोत :विनायक शिंदे

 

अख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणपती. ह्या ज्ञानाच्या देवाचे म्हणजेच गणरायाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस आगमन होते. या चतुर्थीस ‘गणेश चतुर्थी’ म्हणतात. प्रत्येक चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी, कृष्णपक्षातील चतुर्थीस संकष्टी व मंगळवारी आली तर अंगारकी चतुर्थी म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यातील चतुर्थीना विशेष महत्व आहे.

यादिवसाबद्दल पुराणांमध्ये बऱ्याच कथा आहेत. काही कथांनुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला. काहीनुसार या दिवशी म्हणजेच भादपद चतुर्थीला त्याने गजासुराचा नाश केला. ते काहीही असो पण या दिवसापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीस विघ्नहर्ता गणेशाची, त्याला घरी आणण्याची प्रथा रुढ झाली.

या दिवशी गणेशमूर्ती घरी आणतात. ती पूर्व-पश्चिम किंवा उत्तरेकडे तोंड करू ठेवतात. पुजेला चंदन, दूर्वा, केतकी, तुळस, शेंदूर वगैरे एकवीस प्रकारची पत्री महाभिषेक करून भक्तीभावाने आवाहन, आसन, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुण्य, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व मंत्रपुष्प अशा सोळा उपचारांनी जाणकार व्यक्ती पूजा करते. फक्त याच दिवशी गणपतीला तुळस वाहतात. नंतर सुखहर्ता दुखहर्ता आरती म्हणतात. आरतीनंतर शमी, केतकी, दूर्वा, शेंदूर वाहून मोदकांचा नैवद्य वाहतात. घरोघरी आपापल्या परंपरेनुसार दीड, पाच, सात अथवा दहा दिवस गणपती बसवतात व विसर्जनावेळी समुद्र, नदी किंवा तळयात दोन वेळा बुडवून वरखाली करतात व विसर्जन करतात.

गणपती ही विज्ञान देवता आणि सामाजिक देवतासुद्धा आहे. कोणत्याही कार्याची सुरवात गणेशपुजेने होते. श्रीगणेश हे एक तत्व आहे. ब्रह्म आहे. आत्मा आहे. गणपती हे ज्ञानाचे, विज्ञानाचे रुपक आहे. स्वरूप आहे.

गणपती शेतीचे रक्षण करतो. त्याचे शूपकर्ण म्हणजे धान्य पाखडण्याचे सूप आहे तर त्यांचा एकदंत म्हणजे शेतीसाठी आवश्यक असा नांगराचा फाळ आहे. गणपतीला आवडणाऱ्या दुर्वा ह्या ओषधी आहेत. त्या अतिशय थंड असतात. टॉयफाईड वा उष्णतेच्या विकारांमध्ये दुर्वेचा रस अतिशय लाभदायी ठरतो.

लोकमान्य टिळकांनी घरोघरी पूजल्या जाणाऱ्या या सार्वजनिक गणनायकाची १८९२ साली नगरच्या चौकात प्रतिष्ठापना करून सामाजिक गणेशोत्सवाची सुरवात केली. लोकमान्यांनी सामाजिक, अध्यात्मिक व वैचारिक असा त्रिवेणी संगम साधून लोकजागृती केली. समाजामध्ये एकता व संघटन निर्माण केले. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात गणेशोत्सवाचे योगदान अतिशय मोलाचे ठरले आहे. म्हणूनच गणपती ही एका अर्थाने सामाजिक देवतासुद्धा आहे.

तरी या पवित्र दिवशी आपण ज्ञानी, संयमी, सदगुणी होण्याचा निश्चय करुया. आपले वैयक्तिक व सामाजिक कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याचा निर्धार करूया हाच खरा गणेशचतुर्थीचा संदेश आहे.

गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करू नये?
एकदा चंद्राने गणपतीच्या रुपाची थट्टा केली, ‘काय तुझे ते मोठे पोट, ते सुपासारखे कान, ती सोंड, ते बारीक डोळे !’ तेव्हा गणपतीने त्याला शाप दिला, ‘यापुढे कुणीही तुझे तोंड पाहणार नाही. जो पाहील त्याच्यावर चोरीचा आळ येईल.’ त्याप्रमाणे चंद्राला कोणीही आपल्यासमोर येऊ देत नव्हते. त्याला कोठेही जाता येईना. एकाकी जीवन जगणे अशक्य असते. तेव्हा चंद्राने तपश्चर्या करून गणपतीस प्रसन्न करून घेतले व उःशाप मागितला. ‘उःशाप देताना मूळ शाप नष्ट होता कामा नये. काही प्रमाणात शाप राहिला पाहिजे व उःशापही झाला पाहिजे. आपणच दिलेला शाप आपण पूर्णपणे नष्ट करणे युक्त नाही’, असा विचार करून ‘गणेश चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाहीत; पण संकष्ट चतुर्थीला तुझे दर्शन घेतल्याशिवाय कोणीही भोजन करणार नाही’, असा उःशाप गणपतीने चंद्राला दिला.

गणपती अथर्वशीर्ष
गणपतीची विविध स्तोत्रे, आरती आणि गणेश स्तुती असलेल्या साहित्यामध्ये संस्कृतमधील ‘श्री गणपती अथर्वशीर्ष’या स्तोत्राला विशेष महत्त्व आहे. ‘अथर्वशीर्ष’ हे उपनिषद आहे. गणेशोत्सवाच्या काळात दररोज व संकष्टी-विनायकी-अंगारकी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण ‘अथर्वशीर्षा’ची आवर्तने करतात. तर काही जण दररोज गणेशाची आराधना म्हणून किमान एकदा तरी ‘श्री गणपती अथर्वशीर्षा’चे पठण करतात. ‘गणपती अथर्वशीर्षा’ची वैयक्तिक किंवा सामूहिक आवर्तने केली जातात. पुण्यामध्ये दगडुशेट हलवाई गणपतीसमोर हजारो महिला दरवर्षी ‘गणपती अथर्वशीर्षा’ची आवर्तने विशिष्ट दिवशी करीत आहेत.
भारतीय संस्कृतीतील विविध पुराणे आणि अन्य प्रश्नचीन ग्रंथांमधूनही विविध ऋचा, ओव्या, श्लोक यांच्या माध्यमातून गणेशाची स्तुती केलेली आहे. गणेशभक्तांमध्ये प्रसिद्ध असलेले आणि नेहमी म्हटले जाणारे ‘गणपती अथर्वशीर्ष’ हे गणकऋषींनी सांगितले असून ते मूळचे अथर्ववेदातील आहे. ‘अथर्वशीर्ष’ याची फोड ‘अ’ अधिक थर्व अधिक शीर्ष अशी केली जाते. ‘अ’ म्हणजे अभाव, ‘थर्व’ म्हणजे चंचल आणि ‘शीर्ष’ म्हणजे डोके. चंचलपणाचा अभाव असणारे डोके, किंवा शांत डोके असा या शब्दाचा साधा अर्थ. डोके शांत ठेवण्याची विद्या यात सांगण्यात आली आहे. म्हणूनच असे म्हणतात की चंचल वृत्ती असलेल्यांसाठी ‘गणपती अथर्वशीर्ष’ हे एक वरदान आहे. विद्यार्थ्यांसाठी डोके शांत ठेवण्याकरिता याचे पठण नक्कीच लाभदायक ठरते.

‘अथर्वशीर्ष’ हे एकूण दहा भागांमध्ये असून पहिल्या सहा भागांमध्ये गणपतीच्या निर्गुण रुपाचे वर्णन सांगण्यात आले आहे. सातव्या भागामध्ये गणेश विद्या तर आठव्या भागात गणपतीची गायत्री सांगण्यात आली आहे. नवव्या भागात गणेशाच्या ध्यानासाठी सगुण स्वरुपाचे वर्णन असून दहाव्या भागात गणपतीला वंदन केले आहे. तर त्यापुढे ‘अथर्वशीर्ष’ पठणाची फलश्रुती देण्यात आली आहे. ‘गणपती अथर्वशीर्षा’चे पठण करताना ‘ओम नमस्ते गणपतये’ येथून सुरुवात करून ‘नमो व्रातपतये नमो गणपतये नम: प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नम:’ इथपर्यंत म्हणण्याची पद्धत आहे. हे एकदा म्हटले की ‘अथर्वशीर्षा’चे एक आवर्तन पूर्ण होते. आपल्याला जेवढय़ा संख्येत आवर्तने करायची आहेत ती करून झाल्यानंतर शेवटी फक्त एकदाच ‘एतदर्वशीर्षम’पासून पुढील फलश्रुती म्हणायची असते. भारतीय संस्कृतीत देव-देवतांना विविध स्तोत्रे, मंत्र म्हणून अभिषेक करण्याची पद्धत आहे. ‘गणपती अथर्वशीर्ष’ म्हणून गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करण्याची पद्धत असून अभिषेकासाठी गणेशभक्तांमध्ये ‘अथर्वशीर्ष’ अधिक आवडीचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *