मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण. त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री दिलीप कांबळे यांनी ब्राह्मणांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. ब्राह्मण डरपोक किंवा घाबरट असे ज्यांना वाटते त्यांनी ब्राह्मणांच्या निवडक शौर्यकथा समजून घेतल्या पाहिजेत!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस ही ब्राह्मण व्यक्ती बसली आहे, पण त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री दिलीप कांबळे यांनी ब्राह्मण समाजावर ‘डरपोक’पणाचे ताशेरे मारले आहेत. एका प्रसंगात त्यांनी गर्वाने सांगितले आहे की, ‘‘मी घाबरणार नाही. घाबरायला मी ब्राह्मण आहे काय?’’ कांबळे यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज नाराज झाला व त्यांनी पुण्याच्या रस्त्यावर श्री. कांबळे यांचा निषेध केला. महाराष्ट्राचे राज्य श्री. देवेंद्र फडणवीस चालवीत आहेत व राजकीय अनुभव कमी असतानाही त्यांनी राज्य बेडरपणे चालवले आहे. खडसे, तावडे, शेलार, फुंडकर असे बहुजन समाजातील पक्षातील नेते सभोवती असतानाही श्री. फडणवीस दिल्लीच्या आशीर्वादाने राज्य करीत आहेत. श्री. बाबासाहेब भोसले यांच्यापेक्षा फडणवीस यांचे राज्य नक्कीच चांगले आहे. त्यामुळे ब्राह्मणांचे राज्य बरे नाही व ते डरपोक आहेत असे बोलणे निदान महाराष्ट्रातील ब्राह्मणवर्गावर तरी अन्यायाचे ठरेल. ‘जात नाही ती जात’ असे विधान नेहमीच तोंडावर फेकले जाते. देशातील जातीप्रथेस ब्राह्मण समाज जबाबदार असल्याचे सांगितले जाते; पण राजकारण्यांनी सारा देश मंडल आयोगाच्या आधाराने कधीच जातीय चौकटीत वाटला. त्यामुळे जाती नष्ट करा असे सांगण्याची सोय उरलेली नाही. शेवटी या देशात समाजसुधारणांचा आग्रह धरणारे जसे फुले-आंबेडकर होते तसे प्रबोधनकार ठाकरे, सुरबा नाना टिपणीस होते.
जातीभेदांचे थोतांड
जोतिबा फुले यांनी १८७३ मध्ये ‘गुलामगिरी’ या मथळय़ाखाली लिहिलेल्या लेखात ‘जातीभेदांचे थोतांड’ असा शब्दप्रयोग वापरला. त्यांचा सर्व रोख ब्राह्मणविरोधी होता. जोतिबांच्या मते ब्राह्मण समाजाने ‘आपल्याला वंशपरंपरा लाभ व्हावा’ यासाठी शूद्र, अतिशूद्र यांच्यात वाद निर्माण केले. उद्योगधंद्यांप्रमाणे जातीचे वाटप केले. १८१८ मध्ये पेशवाई विसर्जित झाली. पेशवाईत जातीभेदासंदर्भात सर्व दुष्ट प्रकार अस्तित्वात आले होते. त्या स्थितीवरचे पहिले प्रहार लोकहितवादी देशमुखांनी म्हणजे एका ब्राह्मणानेच मोठय़ा धाडसाने केले होते. नंतर महादेव गोविंद रानडे यांचे युग सुरू झाले.
टिळक व फडके
मंत्री श्री. दिलीप कांबळे यांनी ‘मी घाबरायला ब्राह्मण आहे काय?’ असे विचारले म्हणून फक्त देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातील काही संदर्भ देतो. छत्रपती शिवाजीराजांनंतर ज्यांनी मराठा साम्राज्य अटकेपार वाढवले व ज्यांच्या तलवारीचा धाक मोगलांना राहिला ते पहिले बाजीराव हे ब्राह्मण, पण जात त्यांच्या शौर्याच्या आड आली नाही. १८७८-७९ च्या सुमारास इंग्रज सत्तेविरुद्धचा क्रांतिध्वज आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या खांद्यावर घेतला. इंग्रजांचे राज्य हाणून पाडण्यासाठी सरकारी नोकरीत असतानाही वासुदेव बळवंतांनी हा उठाव केला. निशाणबाजीचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी पुण्यात एक वर्गही गुप्त रीतीने चालविला होता. टिळकांचे मनही फडक्यांच्या क्रांतिकल्पनेने भारावून गेले होते. इतके की, वासुदेव बळवंतांनी सुरू केलेल्या निशाणीबाजीच्या वर्गात टिळकही शिक्षण घेण्यासाठी जात असत. टिळक हेच पुढे ब्रिटिशांचे साम्राज्य गदागदा हलवणारे असंतोषाचे जनक ठरले.
बॉम्बची विद्या
सेनापती बापट हे ब्राह्मण होते, पण त्यांनी ‘बॉम्ब’ची विद्या हिंदुस्थानात आणली. ब्रिटिश पार्लमेंटवर बॉम्ब टाकताना ते घाबरले नाहीत. टिळकांच्या क्रांतिकारक विचारांपासून पुणे परिसरातील तीन क्रांतिकारक चापेकर बंधू देशासाठी क्रांतिकार्य करून फासावर गेले. हे चापेकर बंधू ब्राह्मण होते व न डगमगता ते फासावर गेले.
काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह करणारे साने गुरुजी कोण होते? ‘मेरी झाशी नही दुंगी’ असे आव्हान देऊन ब्रिटिशांविरोधात समशेर गाजवणारी झाशीची राणी ब्राह्मणच होती. महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रही म्हणून ज्यांची निवड केली ते विनोबा भावे तरी कोण होते? वैयक्तिक सत्याग्रही म्हणून ब्रिटिश सोल्जरांच्या लाठय़ा खाणाऱया विनोबांचे शौर्य व संयम थक्क करणाराच होता.
क्रांतिकारकांचे शिरोमणी विनायक दामोदर सावरकर यांची ब्रिटिशांनी इतकी दहशत घेतली की, त्यांना दोन जन्मठेपा ठोठावून त्यांची रवानगी अंदमानला केली. सावरकर हे बेडर व निर्भय होते. जातीने ते ब्राह्मणच होते. त्यामुळे ब्राह्मण घाबरतात हे मत मला मान्य नाही. लोकमान्य टिळकांचे सहकारी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे सशस्त्र क्रांतीच्या कल्पनेने इतके भारावले होते की, एखादा शस्त्रांचा, बंदुकांचा कारखाना काढता येईल काय याची चाचपणी करण्यासाठी ते नेपाळला गेले होते.
सैन्यातले ब्राह्मण
हिंदुस्थानच्या सैन्यात गुजराती व जैन नाहीत, पण महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाचे तरुण मोठय़ा प्रमाणात आहेत व त्यांनी प्रसंगी हौतात्म्यही पत्करले आहे. गांधीहत्येचा मी निषेध करतो, पण देशाच्या फाळणीविरोधात भूमिका घेऊन गांधीहत्या करणारे पंडित नथुराम गोडसे व त्यांचे सहकारी करकरे, आपटे वगैरे मंडळी ब्राह्मण होती. बिर्ला हाऊसमध्ये गांधींवर गोळय़ा झाडूनही गोडसे पळून गेले नाहीत. ते शांतपणे तेथेच पोलिसांची वाट पाहत उभे होते. या कृतीसाठीही मोठे धाडस लागते.
कॉ. डांगे खरा वीर!
हिंदुस्थानात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना श्रीपाद अमृत डांगे यांनी केली, पण स्वातंत्र्यलढ्यातील ते एक क्रांतिकारक होते. मिरज बॉम्ब खटल्यात त्यांनी सात वर्षे तुरुंगवास भोगला व ब्रिटिशांच्या बंदुका आणि दडपशाहीची पर्वा न करता ते लढत राहिले. स्वातंत्र्यानंतरही ते बेडरपणे कामगारांचे नेतृत्व करीत राहिले. डांगे हे जन्मतः ब्राह्मण पण कर्माने क्षत्रिय होते. डांगे म्हणजे एक जबरदस्त असे तुफान होते. राज्यकर्त्यांना धडकी भरवणारी अनेक भाषणे व कृती कॉ. डांगे यांनी केली. कॉ. डांगे यांचे एक जोरकस भाषण मला आठवते. हिंदुस्थानात कम्युनिस्टांचे पहिले राज्य केरळमध्ये स्थापन झाले. केरळच्या या कम्युनिस्ट सरकारने दंगलखोर जमावावर गोळीबार करून पाच दंगलखोरांना ठार केले होते. प्रजा समाजवादी पक्षाने कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. कम्युनिस्ट सरकारने गोळीबार करता कामा नये अशी आरोळी बुद्धिमंतांनी ठोकली. कम्युनिस्ट सरकारवर चारही बाजूंनी टीकेचा प्रहार सुरू झाला. अशावेळी मुंबईत सुंदराबाई हॉलमध्ये तंग वातावरणात कम्युनिस्टांची जाहीर सभा झाली.
श्री. नीळकंठ खाडिलकर वर्णन करतात त्याप्रमाणे सिंहाच्या रुबाबात कॉम्रेड डांगे व्यासपीठावर आले. आपल्या शांत पण ठाम सुरात त्यांनी गर्जना केली, ‘‘आमच्या सरकारने पाच दंगलखोरांना गोळ्या घालून ठार मारले आहे. याबद्दल आमचा राजीनामा मागणाऱ्या प्रजा समाजवाद्यांना मी नम्रपणे सांगत आहे की, आमच्या राज्यात ५०० दंगलखोर चाल करून आले तर ५०० ठार मारले जातील आणि एकालाही पळू दिले जाणार नाही!!’’ या वाक्यानंतर सभागृहात ढगांच्या गडगडाटासारखा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि केरळमधील दंगलीचा बीमोड झाला. कॉ. डांगे यांनी ते करून दाखवले.
या सगळय़ा शौर्यकथांमध्ये महाराष्ट्रातील दलित समाज आणि बहुजन समाजाचेही योगदान राहिले आहेच. देशाच्या सुरक्षेसाठी या समाजातील शूरवीरांनी आपले रक्त सांडले आहे. आपल्या संरक्षण दलांमध्येही या समाजातील देशभक्त तरुण मोठय़ा संख्येने कालही होते आणि आजही आहेत.
ब्राह्मण मुख्यमंत्री!
मी स्वतः जातपात मानत नाही हे पहिले व मी ब्राह्मण नाही हे दुसरे; पण जात ही जन्मतःच चिकटून येत असली तरी शौर्याच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. गोवा आणि उत्तर प्रदेशात सरळ जातीय प्रचार झाला. उत्तर प्रदेशातील वीसेक टक्के ब्राह्मणांची मते मिळतील म्हणून काँग्रेसने शीला दीक्षित यांना तेथे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पाठवले, पण उपयोग झालाच नाही. महाराष्ट्रात सर्वप्रथम ब्राह्मण मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना करण्याचे धाडस शिवसेनाप्रमुखांनी दाखवले. जातीपेक्षा त्यांनी अनुभव आणि कर्तृत्वाला महत्त्व दिले व आता श्री. फडणवीस राज्य करीत आहेत. त्यामुळे समस्त ब्राह्मणवर्ग भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे हासुद्धा जातीयवादच आहे. पण त्याच सरकारातले एक मंत्री दिलीप कांबळे ब्राह्मणांना डरपोक म्हणतात व एकही प्रमुख ब्राह्मण सत्य सांगण्यासाठी धाडसाने उभा राहिला नाही हा डरपोकपणा आहे. ब्राह्मणांच्या काही शौर्यकथा मी सांगितल्या. सत्य सांगण्याची हिंमत रक्तात असावी लागते! सत्य सांगणे व आचरण करणे हे ‘चिंतन’ करणे व ‘बौद्धिक’ घेण्याइतके सोपे नाही.
संजय राऊत