Stotra

श्रीदत्तमाहात्म्य

श्रीदत्तमाहात्म्य

श्रीदत्तमाहात्म्य या ग्रंथाची रचना भाविक जनांच्या आग्रहावरून महत्पूर येथे शके १८२३ (इ.स.१९०१) च्या चातुर्मासांत झाली असें श्री स्वामीमहाराजांच्या पत्रावरून कळते. त्यांतच पुढे ते म्हणतात, ‘..(श्रीदत्तपुराणातील) तृतीयाष्टकापासून सहाव्याच्या सहाव्या अध्यापर्यंत आजपर्यंत (श्रावण शु।।११) ओव्या लिहिल्या. प्रायः प्रत्यहि एकशें आठ होत गेल्या. तेवढ्याचाच अध्याय ठेवला. उद्यां पन्नास अध्याय पुरा होईल. सुमारें साडेपाच हजार ग्रंथ झाला. आतां पुढें लिहिण्याची इच्छा होत नाहीं…’ यानंतर अवतरणिकेचा एक अध्याय झाला. असे एकूण ५१ अध्याय आहेत. गुरुचरित्राच्या अध्यायांचीच संख्या येते. ह्या सर्व अध्यायांची विषयसूचि इतरत्र दिली आहे. तसेच श्रीदत्तमाहात्म्याचे मराठी चिंतन दिले आहे

प. पू. योगिराज श्री गुळवणीमहाराज यांनी प्रकाशित केलेल्या श्रीदत्तमाहात्म्याचे संपादन पं. आत्मारामशास्त्री जेरे यांनी केले आहे. त्यांच्या शब्दांत ‘प्राकृत दत्तमाहात्म्यस्वरूप हीसुद्धां एक सर्वश्रेष्ठ अशी महाराजांची लीला आहे. आबालवृद्धांस सुलभबोध करून देणाऱ्या दत्तमाहात्म्य ग्रंथासारखा सर्वांगसुंदर ग्रंथ वाङ्मयात अपूर्वच आहे……’ सगुणस्वरूपसाक्षात्काराची ज्ञान, भक्ति व वैराग्यरूप साधने रसभरित वाणींने महाराजांनी यांत सांगितली आहेत. महाराज आप्तकाम असल्याने देवाजवळ काहीं मागत नसत. परंतु या ग्रंथांत सतत सान्निध्य ठेवण्यांकरीतां त्यांनी श्रीदत्तप्रभूंची प्रार्थना केली आहे. ते म्हणतात, ‘प्रभो दत्तात्रेया, मागतों पसरूनी हात। ह्याग्रंथी सतत सान्निध्य ठेवी।।’ (५१:११०) व या प्रार्थनेप्रमाणें दत्तमहाराजांचे या ग्रंथात सान्निध्य आहे असा अनुभव वाचकांसही येतो. ‘… यांत श्रीदत्तमहाराजांचें सांगोपांग चरित्र व सहस्रार्जुन, अलर्क, यदु, आयुराजा, परशुराम, प्रह्लाद वगैरे भक्तांची व तदनुषंगानें अत्रि, अनसूया, जमदग्नि इत्यादिकांचीही चरित्रे अत्यंत रसाळ वाणीने वर्णन करून स्वस्वाधिकारानुरूप साधकांचे भक्ति, ज्ञान, वैराग्य, निष्कामकर्मयोग इत्यादि परमार्थमार्ग अत्यंत स्पष्ट व निश्चित स्वरूपानें वर्णिले आहेत. साल व कोयरहित आम्रादि फळांचा गाभा जसा सर्वच अमृतमय असतो तसाच हा ग्रंथ अगदीं अमृतमय आहे. त्यामुळे याच्या निरंतर सेवनाने मूळचाच अमृत असणारा मानव अमृतमय होईल यांत बिलकुल संशय नाही. हा एकच ग्रंथ वाचकाच्या सर्व कामना पूर्ण करून त्याला परब्रह्म पदवी देणारा आहे.’ खुद्द श्रीस्वामीमहाराजांनीच ग्रंथाच्या शेंवटीं त्याच्या प्रयोजनाविषयी म्हटले आहे, ‘मंदां विशेंषेंकरून। नुमजे औपनिषदज्ञान। त्यांकरितां हे लेखन। करवी अत्रिनंदन दयाळू।। (५१:१०६) कलियुगातील अशक्त जीवांना उपनिषदांचे श्रवण, मनन, निदिध्यासनादि मार्ग अगम्य आहेत. तसेंच त्यांचा अधिकारही मर्यादित आहे. म्हणून गीतेच्या वचनाप्रमाणे स्त्रिया, वैश्य, शूद्र इत्यादि सर्व जीवांना ह्या ग्रंथाद्वारें श्रीस्वामीमहाराजांनी मोक्षाचा मार्ग प्रशस्त केला आहे. ह्या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायापासून ग्रंथाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक ओवीचे तिसरे अक्षर क्रमाने वाचल्यास मांडुक्योपनिषद, भद्रं कर्णेभिः व स्वस्ति नो हे शांतिमंत्र, ईशावस्योपनिषद्, पूर्णमदः…, अतो देवा अवंतु नो हे मंत्र साकार होतात. हें श्रीमहाराजांच्या वरील वचनाचेंच द्योतक आहे. पांचव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतील संपादकीय निवेदन मननीय आहे. ‘श्रीदत्तमाहात्म्य ग्रंथाच्या ह्या नव्या आवृत्तीची मुद्रितें शोधण्याचे काम पू. श्रीगुळवणीमहाराज यांच्या सांगण्यावरून केलें. काम जरा कठीणच होते. त्यास मुख्य कारणें तीन (१) श्री. प. प. श्रीटेंबेस्वामीमहाराज यांच्या हातची अशी प्रत तुलनेसाठी प्रमाण म्हणून हवी; ती उपलब्ध नाही. (२) मूळ ग्रंथाची रचना झाल्यावर त्याच्या हस्तलिखित वा मुद्रित आवृत्त्या अनेक झाल्या; त्यांत हस्तदोष, मुद्रणदोष झाले असणार ते सर्वच शुद्ध केले गेले असतील असे नाही. (३) या अडचणीत भर पडली ती ग्रंथाच्या योग्यतेमुळे. हा ग्रंथ सामान्य पुस्तकाप्रमाणे केवळ बुद्धीचा विषय नाही; हा मंत्रग्रंथ आहे. श्रीस्वामीमहाराजांनी लिहिलेल्या प्रत्येक अक्षरास विशेष महत्त्व आहे. तेव्हां शुद्धाशुद्ध पाठांचा विचार करीत असतां काय प्रकारची अडचण भासली असेल हे वाचकांच्या ध्यानांत आले असेल. हंसक्षीर न्यायानें ग्राह्याग्राह्य निर्णय कराव म्हटलें तर ही गोष्ट परमहंसपदास पोहोचलेल्या श्रीस्वामीमहाराजांच्या ग्रंथाच्या बाबतीत सामान्य माणसास न करतां येण्यासारखी आहे. तरीही दोष दूर करण्याचा यथामति यत्न केला आहे; कांही शंका पू. श्रीगुळवणीमहाराज यांना विचारून खुलासा करून घेतला आहे. त्यामुळे या खेपेस पाठ बराच शुद्ध झाला असावा असे वाटते. असे जरी असले तरी जे दोष अजूनही असतील त्याबद्दल ग्रंथरूपी, ग्रंथकृद्रूपी, वक्तृरूपी तसेच श्रोतृरूपी श्रीदत्तात्रेयगुरूंची क्षमा मागणे प्राप्त आहे. या कामीं, श्रीगुरुचरित्राच्या एका प्राचीन हस्तलिखित प्रतींत कांही ओव्या मिळाल्या त्यांचा उपयोग पू. श्रीगुळवणीमहाराज यांच्या अनुमतींने केला आहे. यांमुळें श्रीगुरुंचा संतोष होईल अशी आशा आहे.
यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च व्यंजनम्। तत्सर्वं क्षम्यतां देव दत्तात्रेय जगद्गुरो।।१।।
लेखक विनवी श्रोत्यावक्त्या। मी दासानुदास तुमचा। लेखनीं स्फूर्तीची परिपूर्णता। नाही तत्त्वता ममांगी।।२।।
मूळ ग्रंथ यथावत। तैसेचि लिहिता माझे हस्त। तथापि मात्राव्यंजनादिकाने बहुत पडले असति न्यूनाधिक।।३।।
यालागी तुम्हां समस्तां चरणी। माथा ठेवितां म्या दीनवाणी। दृष्टी न द्यावी न्यूनपाणी। पूर्णपाणी अवलोकिजे।।४।।
श्रीगुरुचे मामृत। अल्पमतीनें लिहिला ग्रंथ। सेवट लाविला तेणे येथ। आपुले सत्तेकरूनी।।५।।
आजिचेनि मी कृतकृत्य। धन्य माझे पूर्वार्जित। सद्गुरुसेवे पावले हस्त। देवसुत नरसिंह म्हणे।।६।।
।।शुभं भवतु।।

श्रीदत्तमाहात्म्याची सप्ताहपद्धती

पहिल्या दिवशीं ६ अध्यायापर्यंत
दुसऱ्या दिवशीं १४ अध्यायापर्यंत
तिसऱ्या दिवशीं २२ अध्यायापर्यंत
चौथ्या दिवशीं ३० अध्यायापर्यंत
पाचव्या दिवशीं ३८ अध्यायापर्यंत
सहाव्या दिवशीं ४६ अध्यायापर्यंत
सातव्या दिवशीं ५१ अध्यायापर्यंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *