लालबागला लालबाग हेच नाव का पडलं? यामागे काय इतिहास आहे?
…
राजकीय पुढारी फिरोझशहा मेहता यांचा बंगला या भागातच होता. तो ज्या वाडीत होता तिथे आंबा, फणस, केळी, सुपारी यांची असंख्य झाडं होती. मुंबईचा भराव टाकताना या वाडीत टाकलेली माती मात्र लाल होती. त्यामुळे हा परिसर ‘लालवाडी’ म्हणूनच ओळखला जात होता. पुढे ‘वाडी’ ची ‘बाग’ झाली. त्यामुळे ‘लालवाडी’चं ‘लालबाग’ असं रूपांतर झालं.
लालबागमध्ये चाळीची कामं सुरू असताना रस्तेबांधणीचं कामही सुरू झालं होतं. हळूहळू मध्य मुंबईच्या नागरी रचनेचं काम या रस्तेबांधणीच्या रूपाने आकार घेत होतं. ठिकठिकाणी सुपारीची जी झाडं होती, ती हटवून त्याजागी हमरस्ता आकाराला आला. त्याठिकाणी पूर्वी असलेल्या सुपारीच्या झाडांची आठवण म्हणून त्या रस्त्याला ‘सुपारीबाग रोड’ असं नाव दिलं गेलं. या रस्त्याचंच पुढे ‘डॉ. आंबेडकर रोड’ असं नामांतर करण्यात आलं.
लालबागमध्ये चाळी बांधणीची कामं सुरू असतानाच एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी ‘करीरोड’चा पूल बांधण्यात आला. त्याच्याच आसपास ‘चिंचपोकळी’चा पूलही तयार झाला. १९१५ च्या सुमारास पारशांची वसाहत असलेलं ‘नवरोज बाग’ हे बारा इमारतींचं संकुल उभं राहिलं. त्या काळी या सर्वांना १५,५०,००० रुपये इतका खर्च आला.
———————————
‘सलाम लालबाग’ या सुरेश सातपुते यांच्या पुस्तकातून.