AaratiUncategorized

Meaning of Ganpati Aarti in Marathi – गणपती आरती, शब्दश: अर्थ व निरुपण

गणपती आरती, शब्दश: अर्थ व निरुपण

सुखकर्ता दु:खहर्ता = सुख देणारा दुःख हरण करणारा

वार्ता = बातमी. अजूबाजूकडून सतत बातम्या येत असतात. त्या सुखाच्या व दुःखाच्या पण असतात. त्यातील विघ्नाच्या, दुःखाच्या राहू देऊ नको,

नुरवी = न उरवी, फक्त प्रेम पुरव, दुःखाचा समुळ नाश करतो.

पुरवी प्रेम कृपा जयाची = त्याची कृपा झाली की प्रेमवर्षाव भक्ताला लाभ होतो.

सर्वांगी सुन्दर उटी शेंदुराची = गणेश सर्वांगाने सुंदर आहे. त्याने शेंदुराची उटी लावली आहे.

कंठी झळके माळ मुक्ताफळांची = त्याच्या कंठात मोत्याची माळ झळाळत आहे
————————-
जय देव जय देव जय मंगलमूर्ति | दर्शनमात्रे मन कामना पुरती ||धृ||

म्हणजे = हे देवा, तुझा जयजयकार असो. तु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस. तुझ्या केवळ दर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
———————————
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा = हे गौरीकुमारा रत्न जडवलेला मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे. रत्नखचित फरा म्हणजे रत्नांचा तुरा. जसा मोराला, कोंबड्याला तुरा असतो तसा. तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे असे कृष्णलिला वर्णन आहे.

चंदनाची उटी कुंकुमकेशरा = कुंकू आणि केशर मिश्रित चंदनाची उटी तु लावली आहे.

हिरेजडित मुकुट शोभतो बरा = हिऱ्यानी जडलेला मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसत आहे.

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया = तुझ्या पायांतील वाळ्यांतील घूंगरां चा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे.
————————————
लंबोदर पीतांबर फणिवर बंधना = मोठे पोट असणाऱ्या, पीतांबर नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला.

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना = सरळ सोंड व वाकडे तोंड असणाऱ्या,म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुन त्याना सरळ मार्गावर आणणाऱ्या, त्रिनयना (३ नेत्र असणाऱ्या).

दास रामाचा वाट पाहे सदना = हे गणपते, मी रामाचा दास (समर्थ रामदासस्वामी) माझ्या घरी मी तुझी आतुरतेने वाट पहात आहे.

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना = हे सुरवरवंदना = सर्वश्रेष्ठ देवां कडून वंदिल्या जाणाऱ्या हे गजानना, सर्व संकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ कर.

निर्वाणी = अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी तु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना.

आता थोडे निरुपणत्मक:

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |

या पहिल्या ओळीतल्या पहिल्या दोन शब्दांचे अर्थ सुख करणारा (देणारा) आणि दुःखाचा नाश करणारा असे होतात, पण पुढे विघ्नाची वार्ता कशाला? त्याचे उत्तर पुढील ओळीत आहे.

नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ||

म्हणजे विघ्नाची वार्ता नुरवी, तिला शिल्लक ठेवत नाही, शिवाय प्रेमाचा पुरवठा करते अशी ज्याची कृपा आहे. अशा त्या गणपतीचे वर्णन पुढील ओळींमध्ये आहे.

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ता फळाची ||

त्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि चमकदार मोत्याची माळ गळ्यात परिधान केली आहे. अशा त्या मंगलमूर्ती गणेशाचा जयजयकार ध्रुवपदात केला आहे.

जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती | दर्शनमात्रे मन कामना पुरती || १ ||

त्याचे फक्त दर्शन घेतल्यानेच मनातल्या कामना, इच्छा वगैरे पूर्ण होऊन जातात असे संत रामदासांनी म्हंटले आहे. ‘दर्शनमात्रे’ च्या जोडीला काही भक्त तर ‘स्मरणमात्रे’ च मनोकामना पूर्ण होतात असेही म्हणतात. पण ही जरा अतीशयोक्ती झाली कारण संपूर्ण समाधान मिळणे हे माणसाच्या स्वभावातच नाही. तो नेहमीच ‘ये दिल मांगे मोअर’ म्हणत राहतो. शिवाय दोन शत्रू पक्षातल्या किंवा स्पर्धक भक्तांनी एकाच वेळी परस्परविरोधी कामना मनात बाळगल्या तर त्या दोन्ही कशा पूर्ण होणार?

पण इथे मला थोडा वेगळा अर्थ लावावासा वाटतो. मनोकामना, या शब्दाचे विघटन करावे वाटते. मन पूर्ण करतो (म्हणजे या देहीचे त्या देही घातले, किंवा माझे मन तुझे झाले, एकरूपता, किंवा ध्यानात गण-ईश, असा अर्थ लावूयात) नि कामना ही. इथे तो ईश आहे, गुणाधीश जो ईश सर्व गुणांचा आहे, म्हणून विघटनात्मक, विनाशात्मक, कामना तो कसा पूर्ण करणार. विद्या-अधिपती म्हणतो, मग तो फक्त सकारत्मक वृत्तीचे जोपासन करेन, सत्याची बाजू घेईन, मित्र-शत्रू हे शब्द आपल्यासाठी, तो तर फक्त भक्तालाच जाणतो.

या आरतीच्या दुसऱ्या कडव्यात राजसी थाटाच्या गजाननाच्या ऐश्वर्याचे साग्र-संगीत वर्णन केले आहे. गणपतीचे पितृदेव भगवान शंकर अंगाला भस्म लावून अगदी साधेपणे रहात असतांना दाखवले जातात, तसेच त्याची आई पार्वतीसुध्दा माहेरच्या ऐश्वर्याचा त्याग करून कसलेही अलंकार न घालता वावरतांना पुराणात दिसते, पण त्यांचा पुत्र गणेश मात्र नेहमी राजसी थाटात असतो.

रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा | चंदनाची उटी कुंकुम केशरा ||
हिरे जडीत मुकुट शोभतो बरा | रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ||

पार्वतीच्या या पुत्राने रत्नखचित अलंकार परिधान केला आहे, त्याने सर्वांगाला लावलेल्या शेंदुराच्या उटीचा उल्लेख पहिल्या चरणात आलेला आहे, आता त्याच्या जोडीला सुगंधी चंदन आणि लालचुटुक कुंकुमाची भर पडली आहे. त्याच्या पायात रुणुझुणू वाजणाऱ्या नूपुरांच्या (पैंजणांच्या) छोट्या छोट्या घागऱ्यांपासून ते मस्तकावर धारण केलेल्या हिरेजडित मुकुटापर्यंत हा गणपती सुंदर सजलेला आहे.

शेंदुरावरून आठवले, हनुमानाला शेंदूर एवढा का प्रिय आहे याचं उत्तर ‘रामचरित मानस’ मध्ये मिळतं. एकदा हनुमानाने सीतेला आपल्या भांगात शेंदूर भरताना पाहिलं. या गोष्टीचं हनुमानाला खूप आश्चर्य वाटलं. असं शेंदूर लावण्याचं कारण हनुमानाने सीतामाईला विचारलं. त्यावर सीता माई उत्तरल्या, “माझे पती श्रीराम यांच्या दीर्घायुष्यासाठी मी हा शेंदूर भांगात भरते. धर्मशास्त्रानुसार असा शेंदूर लावल्याने आपल्या स्वामींचं आयुष्य वाढतं. त्यांना कुठलेही विकार होत नाहीत.”

सीतेचं हे उत्तर ऐकून हनुमंताने विचार केला, जर चिमुटभर शेंदूराने प्रभू श्रीरामांचं आयुष्य वाढणार असेल, तर जर मी सबंध शरीरावर शेंदूर फासला तर प्रभू रामचंद्र अमर होतील. हाच विचार करून बजरंगबली हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीरावर शेंदूर चढवण्यास सुरूवात केली आणि त्यामुळेच हनुमानाला शेंदूर चढवण्याची पद्धत निर्माण झाली. हनुमानास शेंदूर चढवणं हे श्रीरामांचंच पूजन असतं. त्यामुळे असा शेंदूर चढवण्याने हनुमान प्रसन्न होऊन आपल्या मार्गातील अडथळे दूर करतात.

पूजनाच्या सोपस्काराचा शास्त्रार्थ तर आहेच पण वैज्ञानिक करणे देखील आहेत, शिवाय संत वचन, भक्तांची श्रद्धा, मूर्तीला स्पर्श करतानाची भावना, त्याला बाळ समजून किंवा सर्वाधीश समजून, समजून उमजून केलेली पूजा याची मजा काही औरच, ती फक्त अनुभवायची असते, शब्दामध्ये उतरवणे कठीण असते. आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोचतात. याचे अनुभव देखील आपल्या सर्वांना आहेतच.

भारतीय शिल्पकलेत प्रथमपासूनच गणेश गजानन, एकदंत व लंबोदर रूपात आहे. गणेशाच्या ध्यान, प्रार्थना व मंत्रही असेच रूपवर्णन करतात:

सर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं, लम्बोदरं सुन्दरं
प्रस्यन्दन्मद्गन्ध लुब्धमधुपब्यालोल गण्डस्थलम् |
दन्ताघात विदारितारिरुधिरैःसिन्दूरशोभाकरं
वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम् || (गणेशध्यानम्)

नामदेवांनी पण गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. ते म्हणतात,

लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड | करीतसे खंड दुश्चिन्हांचा ||
चतुर्थ आयुधे शोभतासी हाती | भक्ताला रक्षिती निरंतर ||

तिसऱ्या कडव्याच्या पहिल्या दोन ओळींमध्ये गणपतीचे वर्णन असे केले आहे, त्याचे उदर (पोट) मोठे आहे, त्यावर नागाला (पट्ट्यासारखे) बांधले आहे, पिवळ्या रंगाचे धोतर तो नेसला आहे, त्याची सोंड सरळ पण तोंड वाकडे आहे, त्याला तीन डोळे आहेत असे वर्णन या आरतीमध्ये केले आहे, पण गणपतीच्या कुठल्याच चित्रात त्याच्या कपाळावर तिसरा डोळा काढलेला दिसत नाही. त्रिनयना हे सूक्ष्मातले ध्यान आहे. तिसरे नेत्र हे दिव्य अशा ज्ञानचक्षूचे द्योतक आहे. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातल्या मूर्तीला मध्यभागी तिसरा डोळा दाखवला आहे.

लंबोदर पितांबर फणिवर वंधना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||
दास रामाचा वाट पाहे सदना | संकटी पावावे सुरवर वंदना ||

अशा वर दिलेल्या स्वरूपाच्या गजाननाची वाट रामाचा दास (रामदास) घरी बसून पहात आहे, या देवांनाही वंदनीय अशा देवाने संकटकाळात प्रसन्न व्हावे अशी प्रार्थना संत रामदासांनी केली आहे. (आणि निर्वाणी रक्षावे, या निर्वाणीच्या क्षणी आपले रक्षण करावे, अशी पुष्टी त्याला जोडून केली आहे). काही लोक शेवटची ओळ ”संकष्टी पावावे” असे म्हणून सगळा अर्थच बदलून टाकतात.

सुखकर्ता दुखहर्ता या आरतीची शब्दरचना अशी अगदी सोपी आहे, त्यात खूप गहन अर्थ भरला असेल असे मला तरी कधी जाणवले नाही. सर्वसाधारण जनतेला ती कळावी, पटावी म्हणजे ते या आरतीचा स्वीकार करतील असाच विचार त्यामागे असावा आणि तसा असल्यास तो कल्पनातीत प्रमाणात साध्य झाला आहे.

तीनशे वर्षांनंतरही आज अक्षरशः कोट्यावधी लोक गणपतीची ही आरती म्हणतात आणि आज ती देशोदेशी पसरलेल्या मराठी माणसांच्या घरी म्हंटली जात आहे. या आरतीचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की गणपती, गणेश, गजानन, विनायक यासारख्या कुठल्याच प्रसिध्द नावाचा समावेश या आरतीच्या कुठल्याही कडव्यात नाही, तरीसुध्दा यातल्या एकंदर वर्णनावरून ही त्याच देवाची आरती आहे यात कोणाला शंका येत नाही.

तुकोबा गणपतीला नाचत येण्याची विनंती करतात,

गणराया लौकरी येई | भेटी सकलांसी देई ||
अंगी सिंदूराची उटी | केशर-कस्तुरी लल्लाटी ||
पायी घागऱ्या वाजती | नाचत आला गणपती ||
तुका म्हणे पाही | विठ्ठल गणपती दुजा नाही ||

मराठी साहित्याच्या प्रारंभ काळापासून गणेशाचे उल्लेख आहेत. मराठी भाषेमधील आद्य वाङमयकार असलेल्या महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथात गणपतीचा असा उल्लेख येतो:

“तेया गणरायाचे उदार रूपडे थोरपण जिंकले होडे |
कवीस शब्दब्रह्मीची राणिव कोडे, जेणे पाहिले तो सिंदुरे आंडंबरे ||
गोर मेरु जसा, तयाचे ठायी सिद्धीचे सर्ग, नानाविध वसती भोग |
तेण आधारे अग्नेय सुखावले ||”

 

श्रीगुरुचरणरजानंदसेवक
श्रीकृष्ण पुराणिक
(१६ नोव्हेंबर २०१५)

meaning of ganpati aarti in marathi
ganpati aarti marathi lyrics

ganpati aarti lyrics in marathi pdf

ganpati aarti marathi lyrics in english

sukhkarta dukhharta full aarti pdf

sukhkarta dukhharta lyrics

ganesh aarti lyrics in english pdf

sukhkarta dukhharta lyrics in hindi pdf

ganpati aarti pdf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *