सत्याअंबा आरती
जयदेवी जयदेवी जय श्रीसत्याम्बे ।
अनाथनाथे अम्बे आई जगदम्बे ॥धृ॥
संकटी पडता कार्तिकस्वामी रणकाळी ॥
सत्याम्बा व्रत करण्या सांगे शशिमौळी ॥
व्रत करिता जय लाभे प्रसन्न हो काली ॥
अम्बे तव महिमा गाऊ त्रिकाळी ॥१॥ जयदेवी ॥
होता कांचिपुरी ब्राह्मण कौंडिण्य ॥
विटला बहु जीवाला न मिळे त्या अन्न ॥
व्रत करिता सत्याम्बा होई प्रसन्न ॥
देऊनि सुखसंपत्ती त्या केले धन्य ॥२॥ जय देवी ॥
सूर्यकेतू राजा सौराष्ट्राधिप थोर ॥
परचक्रा योगे त्या लागे घोर ॥
व्रत करिता सत्याम्बा करी चमत्कार ॥
पळमात्रे शत्रूचा होई संहार ॥३॥ जयदेवी ॥
गुण्ड नामे शूद्र होता मालवदेशी ॥
पूर्वपापायोगे सुत नव्हता त्यासी ॥
व्रतमहिमा ऐकोनि करिता व्रतासी ॥
झाला सुपुत्र तत्कुल उध्दरिता त्यासी ॥४॥ जयदेवी ॥
ऐसा तव व्रतमहिमा माते अपार ॥
व्रत करिता करिशी भक्ता भवपार ॥
तुझ्या भक्तीमध्ये न पडो अंतर ॥
अंबे तव कृपेचे हेचि एक सार ॥५॥ जयदेवी ॥
श्रीसत्य अंबादेवी व्रत पुजन माहिती….
आज माझ्या श्रीवास्तु मध्ये श्री राज राजेश्वरी तुळजापूर निवासिनी श्री जगदंबा देवीचे श्रीसत्य अंबादेवी व्रत पुजन करण्यात आले
आपण दरवर्षी प्रमाणे कुलदेवीचा कुलाचार करवा या विषयावर मी लेख लिहिला आहे
आपणास श्रीसत्यनारायण हे व्रत सर्वत्र पाहतात पण या बरोबर श्रीसत्य विनायक(श्रीगणपती साठी), श्रीसत्यदत्त(श्री दत्ता साठी),श्रीसत्यअंबा देवी साठी असे व्रत केले जाते हे व्रत ज्यांच्या घरी त्रिगुणामिका स्वरूपात कुलदेवी दैवत आहे. यात मुख्य साडेतीन पीठातील श्रीतुळजापूर निवासिनी जगदंबा देवी/श्रीमाहूर निवासिनी श्रीरेणुका देवी/श्रीकोल्हापुर निवासिनी श्रीमहालक्ष्मी देवी/श्रीवनी निवासिनी श्रीसप्तसुंगी देवीचे या देवी ज्याची कुलदेवी असेल त्या भक्तजनानी आपल्या कुलदेवी साठी वर्षातून एकदा तरी श्रीसत्य अंबादेवी व्रत पुजन हे करावे
सत्यनारायण व्रताप्रमाणेच श्रीसत्याम्बा ही पूजा आहे.जसे सत्यनारायण पूजेमध्ये नारायण विष्णू यांची स्तुती आली आहे त्याप्रमाणे सत्याम्बा पूजेमध्ये सत्य + अंबा = देवी जगदंबेची स्तुती आहे. श्रीसत्याम्बा म्हणजे जगन्माता जगदम्बाच आहे महर्षी व्यासानी रचलेल्या “देवी भागवत” पुराणामध्ये या देवीच्या पराक्रमाचे वर्णन आले आहे इश्वरशक्ति ही निराकार निर्गुण आहे परंतु भक्तांसाठी सगुण रुपामध्ये साकार झाली. तिला प्रसन्न करण्यासाठी हजारो नावांची योजना आहे. या सत्याम्बा देवीला दुर्गा, चामुण्डा, वाराही लक्ष्मी, वनदुर्गा, परमेश्वरी, ब्रह्मवादीनी अशा विविध नावांनी ओळखली जाते. सत्य हा शब्द ब्रह्म वाचक आहे आणि अम्बा म्हणजे आई. सूर्यसंक्रांत, अष्टमी, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशी श्रीसत्याम्बा हे व्रत करावे. या व्रताचे महात्म्य – हे सत्याम्बाव्रत या लोकी आपल्यावर येणार्या संकटांचा नाश करणारे असून पुत्र आणि धन प्राप्त करून देणारे आहे. तसेच हे व्रत विधी पूर्वक केल्याने त्या मनुष्याला मुक्ति मिळून तो सत्याम्बा लोकात जातो. हे व्रत गोरज मुहूर्तावर (सायंकाळी ) केले जाते. पति- पत्नी बसून सर्व शुभ मनोरथ पूर्ण होण्यासाठी पूजन करतो असा संकल्प करून प्रथम गणेश पूजन करतात. चौरंगाला केळीचे खांब बाधून सुशोभित करून त्यावर कलश स्थापना करतात. कलशावर श्रीसत्याम्बा देवीच्या परिवार देवतेंचे प्रथम आवाहन पूजन केले जाते. त्यानंतर चतुर्भुज सत्याम्बा देवीचे ध्यान करून आवाहन सोळा उपचारांनी पूजन, अभिषेक इ. केले जाते. देवीला भात, विविध भाज्या, कोशिंबिरी तसेच खीर , केशरमिश्रित रव्याचे लाडू असा नैवेद्य दाखवतात. आरती प्रार्थना म्हणून कथा वाचली जाते. नंतर तीर्थ-प्रसाद ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता होते.
केव्हा करावे:-तिथी अष्टमी, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवारी करावे
श्रीसत्य अंबादेवी व्रत:-
सर्व व्रता मध्ये श्रेष्ठ आहेत व कलयुगी शीघ्र फल देणारे व्रत आहे हे व्रत केल्याने संकट हारण होते, धनधान्य लक्ष्मी प्राप्ति होते, दु:ख दारिद्रय नष्ट होते, पुत्रादी संतती सह सुख प्राप्त होते. श्री कुलदेवीची कृपा प्राप्त होते.
जय जगंदब
नमो सदा श्रीगुरुनृसिंहसरस्वती दत्त महाराज