जयदेव जयदेव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्यां ताराया
आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला !
सद्गदिता भूमाता दे तुज हांकेला
करुणारव भेदुनि तव हृदय न कां गेला
जयदेव जयदेव जय जय शिवराया
श्रीजगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छांहीं छळतां
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?
जयदेव जयदेव जय जय शिवराया
त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलों
परवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालों
साधु परित्राणाया दुष्कृति नाशाया
भगवन् भगवद्गीता सार्थ कराया या
जयदेव जयदेव जय जय शिवराया
===================================
अनन्य – एकरूप / एकटा.
परवशता – गुलामगिरी.
म्लेंच्छ – यवन / हिंदुव्यतिरिक्त अन्य धर्मी.
रव – आवाज.
शुंभ – एक राक्षस. निशुंभाचा भाऊ. दोघांनी ब्रह्मदेवास संतुष्ट करून कोणाही पुरुषाकडून आपला वध होऊ नये असा वर मागितला. पुढे काली देवीच्या हातून दोघांना मृत्यू आला.
सद्गद – कंठ दाटून येऊन.
====================
गीत – स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – लता मंगेशकर
राग – भिन्न षड्ज
गीत प्रकार – स्फूर्ती गीत, प्रभो शिवाजीराजा
==================
संपूर्ण कविता-
जयदेव जयदेव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्यां ताराया
आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला !
सद्गदिता भूमाता दे तुज हांकेला
करुणारव भेदुनि तव हृदय न कां गेला
जयदेव जयदेव जय जय शिवराया
श्रीजगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छांहीं छळतां
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?
जयदेव जयदेव जय जय शिवराया
त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलों
परवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालों
साधु परित्राणाया दुष्कृति नाशाया
भगवन् भगवद्गीता सार्थ कराया या
जयदेव जयदेव जय जय शिवराया
ऐकुनियां आर्यांचा धांवा महिवरला
करुणोक्तें स्वर्गी श्रीशिवनृप गहिंवरला
देशास्तव शिवनेरीं घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तच्छ्रीमत्शिवनृप की जय बोला
Shivaji Maharaj Aarti Lyrics संपूर्ण कविता / मूळ रचना
===================
नोंद
फर्ग्युसन महाविद्यालयांतील ‘आर्यन संघ’ नावाच्या चौथ्या भोजनसंघामध्ये प्रत्येक आठवड्यास म्हणण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही आरती रचली होती.
संदर्भ-
सावरकरांची कविता
संपादक- वासुदेव गोविंद मायदेव
सौजन्य- ढवळे प्रकाशन, मुंबई.
===================