आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबात नव्हतं
ABCD …….XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर , ते ही इंग्रजीच्या तासालाच !
आणि आता
ABP माझा , CID , MRI , X-ray , Z-TV विचारूच नका .
आमच्या लहानपणी ,
This is Gopal . अन That is Seeta .हे दोन वाक्य पाचवीत गेल्यावर वाचता यायचे तरी जबरदस्त कौतुक व्हायचं !
आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्या सारखंच वाटायचं !
अहो कंडक्टर याच्यामुळे की …..आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने ,
हं sss काय रे बाळ मोठेपणी तू काय होणार ?
असा प्रश्न विचारला की ते पोट्ट हमखास म्हणायचं …..
मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार !
तुम्हाला खोटं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती परसेंटेज मिळालं असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं
फक्त एवढंच विचारायचे ….
पहिल्या झटक्यात पास झालास न ?
आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा !
म्हणजे पहा सुखाच्या , आनंदाच्या , मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या !
लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो , त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं .
तुम्ही बघा पूर्वी ….
गाव छोटं , घर छोटं , घरात वस्तू कमी , पगार कमी , त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी
उसनपासन केल्या शिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता , तरीही मजा खूप होती!
तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं !
उसनपासन करावंच लागायचं ……
साखऱ्या , पत्ती , गोडेतेल , कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता
त्यामुळे कोणाकडे ” हात पसरणे ” म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही .
उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टीचा ” कमीपणा ” वाटत नव्हता !
डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडे अमृत अंजनच एक बोटं उसन मागायला सुद्धा अजिबात लाज वाटली नाही .
घरातल्या वडील माणसासाठी 10 पैश्याच्या तीन मजूर बिड्या किंवा 15 पैशाचा सूरज छाप तंबाखूचा तोटा आणतानाही मान कशी ताठ असायची !
कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं !
गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती , कारण शेजाऱ्या-पाजाऱ्या कडून पोह्याच्या प्लेट , चमचे , बेडशीट ,
तक्के , उषा , दांडी असलेले कपं आदी साहित्य मागून आणल्या शिवाय ” पोरगी दाखवायचा कार्यक्रम ” होऊच शकत नव्हता !
आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती , ते आत्ता कळतंय !
आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही !
जेंव्हा Status वर डान्सचा व्हिडीओ येतो तेंव्हा कळतं , अरे लग्न झालं वाटतं !
हे सगळं लिहिण्या मागचा एकच उद्देश आहे
भेटत रहा , बोलत रहा , जाणे-येणे ठेवा , विचारपूस करा …..
जेवलास का ?
झोपलास का ?
सुकलास का ?
काही दुखतंय का ? असे प्रश्न विचारतांना लागलेला मायेचा , काळजीचा , आपुलकीचा कोमल स्वरच जगण्याचं बळ देत असतो !
माणसाशिवाय ,गाठीभेटीशिवाय , संवादाशिवाय काssssही खरं नाही !
-ˋˏ ༻•••••❁•••••༺ ˎˊ–