काही म्हणा
पण इतकं मात्र खरं की
जगण्यातली मजाच सगळी हरवली
येणं नाही जाणं नाही
समोरासमोर बोलणं नाही
कट्ट्यावरच्या गप्पा नाही
मी तुला तु मला मन भरून
वाटी भरलं देणं नाही
लांब कुठं जाणं नाही
मोकळ्या हवेत फिरणं नाही
शनिवार नाही रविवार नाही
आज वार कोणता कळत नाही
पिक्चर नाही नाटक नाही
बाहेर कोणी जात नाही
घराचा झालाय कोंडवाडा
रस्त्याचा झालाय उकिरडा
बोलून बोलून तेच ते
‘ कंटाळा आलाय ‘ हेच ते
त्याला आता पर्याय नाही
घरात कोणाला करमत नाही
बाहेरची भीती सरत नाही
गाणी नको बातम्या नको
टी.व्ही. सारखा बघणे नाही
पेपर कोणी वाचत नाही
खरं काय नी खोटं काय
काही सुद्धा कळत नाही
पत्ते नाही भिशी नाही
बर्थडे नाही लग्न नाही
नवीन कपड्यात शिरणं नाही
नवीन काही घेणं नाही
पार्टी नाही सेलीब्रेशन नाही
खायला थोबाड उघडं नाही
शाळा नाही कॉलेज नाही
परिक्षेत काही राम नाही
खरा खुरा निकाल नाही
पेढे वाटण्यात मजा नाही
ब्युटी नाही पार्लर नाही
फडकं लावलेला चेहरा
खरा कोणाचा कळत नाही
उचापती नाही भांडणं नाही
तुझं माझं ही शर्यत नाही
कसलं काय नी कसलं काय
प्रेमप्रकरणाला वाव नाही
छे असलं जगण्यात अर्थ नाही
गुन्हा नाही जामीन नाही
अंधार कोठडी टळत नाही
राजकारणाशिवाय बात नाही
नेत्यांना त्याशिवाय करमत नाही
दोन महिने चार महिने सहा महिने
नऊ महिन्यात सुद्धा निकाल नाही …
काही म्हणा
पण इतकं मात्र खरं की
जगण्यातली मजाच सगळी हरवली … !