Articles

Ramraksha Stotra Meaning In Marathi Pdf Download

आज श्रीराम नवमी. प्रभू रामचंद्राची गाथा हा भारतीय महाकाव्यातील एक लखलखता अलंकार तर आहेच शिवाय हिंदूंच्या श्रद्धेचाही एक अविभाज्य भाग आहे.  स्नान झाल्यावर प्रथम रामरक्षा स्तोत्र म्हणून दिवसाला सामोर जाणारांची संख्या मोठी आहे. रामरक्षा म्हणजे काय, ती कशी सिद्ध करावी याचे विवेचन करणारा हा स. कृ. देवधर यांचा लेख-

अंक – प्रसाद : श्रीराम विशेषांक – ऑगस्ट १९८०

महर्षी वाल्मीकींनी लिहिलेल्या रामचरित्राची कीर्ती त्रिखंडांत दुमदुमली. तीनही भुवनांत तेव्हा सर्व देव, दानव आणि मनुष्य एकत्र जमले. त्यांनी रामचरित्राची वाटणी करण्याचे ठरविले. तिघांनीही त्याला संमती दिली. पण याची वाटणी बरोबर झाली पाहिजे आणि ती करणारा निःस्वार्थी असला पाहिजे. असा कोणी असला तरच ही वाटणी बरोबर होईल. सर्व देव, दानव आणि माणसे अपेक्षावान्. अपवाद होत तो फक्त एका शिवांचा. दिगंबर वृत्तीने राहणाऱ्या, स्मशानी वास करणाऱ्या आणि अंगी विभूतीचे मण्डन मिरविणाऱ्या शिवांना मात्र यांच्या वाटणीत काहीच हेतू नव्हता. त्यांनी या कृतीस मान्यता दिली. तरी पण एक अट शिवांनी सर्वांना घातली. ती अट म्हणजे संपूर्ण रामकथा वाटून त्याचा जो भाग आता वाटता येणार नाही, याचे आता काय करावयाचे असा प्रश्न जेव्हा निर्माण होईल तेव्हा उर्वरित शिवांना देऊन टाकायचे. शिवांनी घातलेल्या अटी सर्वांना मान्य झाल्या. शिव एका उच्चासनावर बसले. त्यांच्यासमोर शतकोटी रामायणाची पाने ठेविली. त्यांच्यासमोर देव, शिवांच्या उजव्या हाताला मानव आणि डाव्या हाताला दानव गर्दी करून बसले. शिवांनी पवित्र प्रणवाचा उच्चार केला आणि पोथीचे पान उचलले. पहिले पान मानवांना दिले. दुसरे दानवांना आणि तिसरे देवांना. याप्रमाणे वाटप सुरू झाले. शतकोटी श्लोकांची वाटणी चालू झाली. तेहतीस कोटी, तेहतीस लक्ष, तेहतीस सहस्र, तीनशे तेहतीस याप्रमाणे वाटून झाल्यावर अखेर एक श्लोक उरला. त्याची वाटणी चालू झाली. अनुष्टुप छंदाचा एक श्लोक त्याची अक्षरे एकूण बत्तीस. प्रत्येकाला दहा-दहा अक्षरे दिली. तीस अक्षरे संपली. दोन अक्षरे राहिली. न वाटता येण्याजोगी अक्षरे ती. यांचे काय करावयाचे असा प्रश्न येऊन पडला. पण भगवान् शिवांच्या अटीप्रमाणे त्याचा निर्णय अगोदरच लागला होता. ती दोन अक्षरे म्हणजे ‘राम’. त्यानी ती दोन अक्षरे आपल्या कंठात ठेविली. कंठ अंतरबाह्य रामरूपाने नटला. ज्या कंठात अक्षरे ठेविली होती तो कंठ निळा झाला. त्या वेळेपासून शिवांना निळकंठ म्हणतात. ते रामनामाने नटले, रामकथेने मोहून गेले, आणि रामचिंतनाने त्यांची समाधी लागली. अनाहुत मिळालेल्या रामनामाचे वैभव पाहून ऋषिमुनींचे डोळे दिपले. रामनामाचा शिवांनी जसा ध्यास घेतला आणि ते महादेव झाले त्याप्रमाणे शिवध्यानाने आपणासही रामरूप प्राप्त होईल असा विचार करून अनेकांनी शिवव्रत स्वीकारले. बुधकौशिक हेही असेच एक महान ऋषी होते. राम-नामाचा ध्यास त्यांनाही लागला. शिवांना त्यांनी अनेकवार रामनामाची कीर्ती कानी पडावी म्हणून विचारले. शिवांनी बुधकौशिकांच्या स्वप्नविश्वात प्रवेश करून त्यांचे केवळ अंतर जागविले आणि आपले गुह्यतम असे रामनाम-वैभव त्यांना सप्रयोग सांगितले. अनुभवानंदाने तो इंद्रियनिग्रह केलेला ऋषी अक्षरशः नाचू लागला. त्यांचे मन नाचू लागले. बुधकौशिक ऋषींनी ते सर्व ज्ञान अक्षरांकित केले, इतकेच नव्हे तर ते गेय केले. सुबोधतेसाठी छंदबद्ध केले. हे सांगतांना बुधकौशिक स्वतः सांगतात-

आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः। तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः।।

भगवान् शिवांनी बुधकौशिकाला स्वप्नात ज्या प्रकारे ही रामरक्षा सांगितली त्याप्रमाणे प्रातःकाळी जाग्या झालेल्या बुधकौशिकाने ती लिहून काढली. रामरक्षा हे स्तोत्र म्हटले की त्याचा कर्ता, त्यात प्रवेश कसा करावयाचा, त्या स्तोत्राची देवता कोणती याचा उल्लेख रामरक्षेच्या प्रारंभातच आहे. हा प्रस्ताव समजून घेणे अगत्याचे आहे. त्यासाठी मूळचा प्रारंभ समग्र पाहाणेच इष्ट ठरेल.

१)  या स्तोत्राचा कर्ता- अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य बुधकौशिकऋषिः। या रामरक्षा स्तोत्ररूप मंत्राचा कर्ता बुधकौशिक ऋषी आहे.

२)  स्तोत्राची देवता – श्रीसीतारामचन्द्रो देवता।

३)  स्तोत्राचा प्रमुख छंद-अनुष्टुप छन्दः। या स्तोत्रातील अधिकतर श्लोक अनुष्टुप छंदात ग्रथित केलेले आहेत.

४)  स्तोत्रशक्तिः- सीता शक्तिः। या स्तोत्राची शक्ती सीता ही आहे.

५)  कीलक-किल्ली, प्रवेशद्वार असा ढोबळ अर्थ करावा. श्रीमत हनुमान् कीलकम्। श्री हनुमान हे या स्तोत्राचा प्रवेश करण्याचे द्वार आहे.

६)  स्तोत्राचा विनियोग-श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः श्रीरामचंद्रांच्या प्रीतीच्या लाभासाठी या स्तोत्राचा जप करणे म्हणजे त्यांचा विनियोग करणे होय. रामरक्षा याचा अर्थ रामाकडून ज्यायोगे संरक्षण होते असे जे स्तोत्र ते रामरक्षा स्तोत्र होय. परंतु प्रस्तुतचे स्तोत्र हे केवळ स्तोत्र नसून त्या नावाप्रमाणे स्तुती तर आहेच पण त्याबरोबर मंत्र आणि स्तोत्रातून साधणारा रक्षाविधी आहे. भगवंताची स्तुती रामरक्षेत भरपूर आहे. परंतु ज्यायोगे रामरक्षा हे नाम सार्थ होते असे रामरक्षेत असलेले श्लोक केवळ १२ च आहेत. या बारा श्लोकांतही पहिले सहा श्लोक म्हणजे खरीखुरी रामरक्षा आणि दुसरे श्लोक रक्षाकायार्थ केलेली सदिच्छा आहे. त्यामुळे असे म्हणता येईल की, एकूण अडतीस श्लोकांपैकी रामरक्षा म्हणून केवळ १/६ भाग आहे.

शिरो मे राघवः पातु भालं दरशरथात्मजः। कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रिप्रियः श्रुती। घ्राणं पातु मख त्राता मुखं सौमित्रिवत्सलः। जिव्हां विद्यानिधिः पातु कंठम भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः।। करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः। सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः। ऊरू रघूत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत पातु जङ्घे दशमुखान्तकः। पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोSखिलं वपुः। या अकरा ओळी म्हणजे खरा रक्षामंत्र होय. हे मंत्र ज्या पद्धतीने दिले आहेत ती बुधकौशिकाची पद्धत मोठी लोभस आहे. रामरक्षा नाव घेऊन शरीराच्या प्रत्येक अवयवाचे रामचंद्र रक्षण करतात. प्रार्थिताना अवयवांच्या नावाबरोबर प्रभू रामचंद्राच्या ज्या नावाचा विनियोग केला आहे. अर्थात या नामांचा उच्चार करताना संपूर्ण रामायणाची आठवण करून देण्याचे कार्य बुधकौशिकांनी केले आहे. मस्तकापासून पायापर्यंत रक्षणमंत्र म्हणताना रामचंद्र नावाचा उल्लेख त्यांना प्रसंगानुरूप लाभलेल्या विशेषणांनी केला आहे. शिर म्हणजे मानवी शरीराचा सर्वोत्तम भाग. ज्याचे आपण स्तोत्र गातो ते प्रभू रामचंद्र, शिरोभूषणाप्रमाणे लोकांना आदराचे असे जे राघवाचे कुल त्या रघु-कुलात जन्म पावलेले होते. म्हणून  ‘राघवः मे शिरः पातु।’ असे म्हणून रघूकुलभूषण अशा रामाने सर्वशरीरोत्तम अशा माझ्या मस्तकाचे संरक्षण करावे अशी बुधकौशिक प्रार्थना करतात. त्याबरोबरच आपले नशीब म्हणजे आपली पैतृक संपत्ती. ही संपत्ती काय आहे याचे वृत्त भालप्रदेशी रेखाटले आहे. अशा माझ्या भालप्रदेशाचे रक्षण दशरथाचा पुत्र करो ही प्रार्थना सुस्थळी केली आहे असे वाटते. माता आपल्या एकुलत्या पुत्राकडे मनाची नजर लावून असे आणि राम मातृवचनात होता अशा प्रेमभऱ्या नजरेने कौसल्येने ज्याला सांभाळले त्यामुळे कौसल्येय असे संबोधतात असा तो राम आमच्या नेत्रांचे रक्षण करो. विश्वामित्र ऋषींच्या यज्ञसंरक्षणासाठी रामाचे सांनिध्य लाभते त्यामुळे विश्वामित्र त्या रामचंद्रावर अत्यंत खूष झाले. त्याला बला आणि अतिबला या विद्यांचे दान त्यांनी केले. रामांना घेऊन आश्रमात जाताना सबंध रघुवंशाचा इतिहास आणि अन्य कथा विश्वामित्रांनी रामचंद्रांना सांगितल्या. रामांनी त्या अत्यंत आवडीने ऐकल्या. त्याप्रमाणे आम्हा मानवांना प्रभूचे चरित्र ऐकण्यास मिळावे म्हणून त्या रामाने आमच्या कर्णद्वयाचे संरक्षण करावे. विश्वामित्राच्या यज्ञाचे रामाने रक्षण केले. विश्वामित्राचा यज्ञ पुरता झाला असा मखत्राता राम आमच्या नाकाचे रक्षण करो. बंधू लक्ष्मणाला अत्यंत प्रिय असणाऱ्या रामाने लक्ष्मणाचे जसे रक्षण केले त्याप्रमाणे आमच्या मुखाचे त्याने संरक्षण करावे. विश्वामित्राच्या सान्निध्यात असताना राम लौकिक अर्थाने विद्यावान झाले. ही सर्व निष्ठा जिव्हेवर आहे त्या जिव्हेचे संरक्षण प्रभू विद्यानिधी रामचंद्र करोत. राम वनात आल्यावर नंदीग्रामहून भरत अयोध्येस आला. त्याला सर्व दुःखद वृत्त समजले. त्याने रामाचा ध्यास घेतला आणि चित्रकुट पर्वतावर रामास भेटण्यासाठी त्याने प्रयाण केले. रामाला पाहताना भरताचे शब्द कंठात अडकले. रामदर्शनाचा त्याला अपार आनंद झाला. भरताने रामाच्या गळ्याला मिठी मारली. हिंदी भाषेत जो ‘गले लगाना’ असा वाक्प्रचार आहे तोच हा आचार.ज्या कंठामध्ये राम राहतो त्या कण्ठाचे रक्षण भरतवंदित भरताकडून वंदन केल्या गेलेल्या रामचंद्राने करावे. शाs:धनु करण्याची शक्ती ज्या स्कंधात आहे अशा रामाने माझे स्कंध तसेच सामर्थ्यवान करावेत म्हणजे त्याचे आपोआपच रक्षण होईल. त्याप्रमाणे शिवधनू मोडण्याचे सामर्थ्य ज्या बाहूंत आहे अशा तऱ्हेचे माझे बाहू हे रामा तू सबल कर, ज्या हाताने रामाने जानकीचे पाणिग्रहण केले आणि म्हणून ज्याला सीतापती म्हणून संबोधतात अशा रामाने माझे हात सामर्थ्यशील करावेत. जमदग्नीऋषींचा पुत्र परशुराम विवाहानंतर अयोध्येस परतत असताना हा जामदग्न्य मार्गात आडवा आला. निःक्षत्रिय पृथ्वी करणाऱ्या परशुरामाच्या दर्शनाने रामपरिवारातील सर्व क्षत्रियांची हृदये भीतीने विदीर्ण होऊ लागली, परंतु महासामर्थ्यशील रामाने या परशुरामाला जिंकले आणि प्रत्येकाच्या भयकंपित हृदयात आनंद निर्माण केला. त्याप्रमाणे माज्या हृदयात आनंद निर्माण करून त्याचे रक्षण करण्याचे कार्य प३भू जामदाग्न्यजित् करोत. खर नावाच्या राक्षसाचा वध करणाऱ्या रामाने शरीराच्या मध्य भागाचे रक्षण करावे आणि जाम्बवंत नावाच्या अस्वलाला अभयाश्रय देणाऱ्या रामाने माझ्या नाभीचे रक्षण करावे. नाभि-कमलाचे रक्षण म्हणजे वाचा-उगमाचे रक्षण होय. कारण परा वाणीचा उदय नाभीमध्ये होते. परेतून पश्यंती, पश्यंतीतून मध्यमा आणि मध्यमेतून वैखरी प्रसवते. याप्रमाणे प्रभू रामचंद्र माझ्या वाणीचे स्वामी होऊन ती नियंत्रित करोत. सुग्रीवाचा सखा प्रभू राम तो माझ्या कंबरेचे संरक्षण करो. मारुतिरायांचा स्वामी माझ्या मांड्यांच्या पृष्ठभागाचे रक्षण करो आणि राक्षसांचे कुल निर्दालन करणाऱ्या रघुकुलात श्रेष्ठतम असणाऱ्या रामाने माझ्या मांड्यांचे संरक्षण करावे. दशमुखान्तक रावण याचा अंत करणारा राम  माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करो. बिभीषणाला राजैश्वर्य प्रदान करणाऱ्या रामाने माझ्या पायांचे रक्षण करावे. इतकेच काय पण या जगती रमविणाऱ्या रामाने माझ्या सकल देहाचे रक्षण करावे. याप्रमाणे एकेका अवयवाचे रक्षण रामाकडून होवो अशी प्रार्थना साधक करतो. हा सर्व रक्षामंत्र ग्रथित असताना रामायणातील प्रसंगांची एक उत्कृष्ट माला स्मरण पुष्पाने बुधकौशिकाने गुंफिली आहे. ‘राम हा रघुकुलात जन्माला आला. तो दशरथात्मज आणि कौसल्येय होता. विश्वामित्राने त्याला आपल्या मखत्राणासाठी नेले त्या वेळीही लक्ष्मणाने त्याला सोडले नाही. विश्वामित्रांनी त्याला विद्या दिल्याने तो राम विद्यानिधी झाला. सीता-स्वयंवरामध्ये धनुर्भंग करून दिव्यायुध धारण करणारा असा राम झाला. सीतेला वरिल्यामुळे तो सीतापती, परशुरामाला जिंकल्याने जामदग्न्याजित् झाला. पुढे वनवास चालू झाला. त्यात खर राक्षसाला ठार मारले, जांबवंताला आपलासा केला, सुग्रीवाशी सख्य करून राम त्याचा स्वामी बनला आणि त्याच वेळी मारुतीचे राम हे गुरू झाले. रामाने पुढे राक्षसकुलाचा नाश केला पण यापूर्वी समुद्रावर सेतू बांधला. रावणाचा नाश करून त्याचे राज्य बिभीषणाला दिले आणि आपण सर्वांच्या हृदयाला आराम देणारा झाला.’ हे झाले सर्व रामायण. का सर्व रामायणाचा आढावा याच श्लोक-पंक्तीत घेतला आहे. रामरक्षा सिद्धतापद्धती- रामरक्षा आज जी प्रचलित आहे ती संपूर्ण पांढऱ्या कागदावर किंवा केतकी पत्रावर साधकाने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून काढावी. ही लिहिताना साधकाचे मुख हिमालयाकडे असावे. यासाठी कोणत्याही शाईचा उपयोग केला तरी चालेल. परंतु काळी शाई सर्वात चांगली. कागद अथवा भुर्जपत्र यांची लांबी साधकाच्या अकरा अंगुलांइतकी असावी. कागदाला अगर भुर्जपत्राला जे चार कोपरे असतात त्यांतील वायव्य म्हणजे डाव्या हाताचा वरचा आणि आग्नेय म्हणजे उजव्या हाताच्या खालच्या कोपऱ्यात ‘श्रीराम’ अक्षरे लिहावीत. उरलेल्या कोपऱ्यांपैकी उजव्या बाजूच्या कोपऱ्यात पानाचा क्रमांक आणि डाव्या हाताच्या कोपऱ्यात ऊँ असे लिहून मध्ये असणाऱ्या जागेत अकरा ओळी लिहाव्यात. स्त्रोत्राला प्रारंभ करण्यापूर्वी श्रीगणेशाय नमः आणि स्तोत्र संपल्यावर तीन वेळा उँकार लिहावा. चैत्र, श्रावण, अश्विन कंवा मार्गशीर्ष या महिन्यांच्या पौर्णिमा या कार्यास चांगल्या यांपैकी कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी एका पाटावर तांदळाचे आसन तयार करून त्यावर ही पोथी ठेवावी. तिची विधियुक्त पूजा करावी. पूजकांचे मुख उत्तरेस असावे. यथासांग पूजा केल्यावर साधकाने तिचे अकरा वेळा वाचन करावे. याप्रमाणे अकरा दिवस केले म्हणजे रामरक्षा सिद्ध होते. १२व्या दिवशी संपूर्ण उपोषण करावे. केवळ फलाहार, दूध, पाणी यांशिवाय अन्य काहीही ग्रहण करू नये, त्यानंतर तेराव्या दिवशी आसनाच्या तांदळाचा भात करून त्याचा अन्य पदार्थांसमवेत नैवेद्य दाखवावा आणि तो भाव स्वतः आणि ब्राह्मण यांनी भक्षण करावा. त्यानंतर मात्र रोज रामरक्षेचा एक पाठ तरी केला पाहिजे, तरच साधनाप्रवाह अनुस्यूत राहातो. (२) यापेक्षा थोडी सोपी अशी रामरक्षा सिद्ध करण्याची पद्धत म्हणजे साधकाने या रामरक्षेचे रोज ११ वेळा पठण करावे. हे पठण करण्याची वेळ कोणतीही असली तरी चालेल; परंतु ती वेळ एकच असावी. शक्यतो पहाटेची वेळ सर्वोत्तम. स्नान करून धूतवस्त्र परिधान करावे आणि पूर्वाभिमुख बसून रामरक्षेचे वाचन करावे. वाचताना एकही उच्चार चुकणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यता स्तोत्रसिद्धतेत व्यत्यय येईल. याप्रमाणे एकूण एकशे एकवीस दिवस पठण केले की रामरक्षा सिद्ध होते. या एकशे एकवीस दिवसांचा पहिला दिवस चैत्र किंवा अश्विन महिन्यातील शुद्ध नवमी असावी. वाचताना मध्ये कोणाशीही बोलू नये किंवा आसन सोडू नये.एकही दिवस खण्ड येऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे खण्ड पडल्यास पुन्हा प्रारंभापासून सुरुवात करावी. या काळात सर्व शुचिता पाळणे आवश्यक आहे. सुतक आणि रजस्वला स्पर्श हे साधनेचा संपूर्ण नाश करतात म्हणून ते टाळावेत. अन्यथा त्यांचा विपरीत परिणाम होतो. त्याबद्दल साधकाने दक्ष असावे. साधकाने अशा तऱ्हेने रामरक्षा स्वतः सिद्ध केली असे कोणाजवळही बोलू नये. ज्या साधकाची रामरक्षा अशा प्रकारे सिद्ध झाली त्याने रोज एकदा तरी रामरक्षेचा पाठ करावा.

रामरक्षा कवच धारण करण्याची पद्धती – ज्या पुरुषाने रामरक्षा सिद्ध केली त्यालाच हे कवच निर्माण करता येते. ज्या माणसाला अनेकवार अपघात होतात, किरकोळ रोगांच्या तक्रारी सारख्या चालू असतात, घरात सदैव असमाधान असते, काहीही करू नये असे वाटते, लहान मुलांना सारखी दृष्ट लागते किंवा त्याची अन्नावरील वासना नाहीशी होते, शरीराची वाढ होण्यासाठी दिलेल्या औषधांचा उपयोग होत नाही अशा व्यक्तींना कायमचे कवच तयार करू देता येते. ज्या व्यक्तीवर हे कवच करावयाचे असेल त्याने शुभ्र वस्त्रे परिधान करावीत आणि एका आसनावर बसावे. कवच करणाऱ्याने देखील पवित्र मनाने या व्यक्तीच्या सन्निध आसनावर बसावे. गोंवरीची शुद्ध रक्षा किंवा भस्म हाती घ्यावे. जवळच उदबत्ती लावून ठेवावी किंवा धूप घालून ठेवावा. दोघांनीही प्रभू रामचंद्राचे स्मरण करावे. कवच करणाराने प्रारंभपासून रामरक्षा म्हणण्यास प्रारंभ करावा. ध्यान-श्लोक संपेपर्यंत हातातील विभूती चिमटीने चूर्णादी. ध्यान-श्लोक संपल्यावर ती विभूती एका पानावर ठेवावी. पहिले तीन श्लोक पूर्ण झाल्यावर ज्या व्यक्तीवर हे कवच करावयाचे त्या व्यक्तीने स्वतः किंवा कवचकाराने त्यातील थोडी थोडी रक्षा हाती घेऊन या पुढील श्र्लोकांचा प्रत्येक चरण तीन वेळा म्हणून त्या त्या अवयवांना ती विभूती लावावी. उदा. – ‘शिरो मे राघवः पातु’ हा मंत्र तीन वेळा म्हणून या व्यक्तीच्या मस्तकाला विभूती लावावी. याप्रमाणे प्रत्येक अवयवाला ती विभूती लावावी आणि अगदी अखेर ‘पातु रामोSखिलं वपुः।’ असे म्हणून विभूतीचा हात सर्वांगावरून फिरवावा. कवचकाराने पुढील रामरक्षा म्हणण्यास शांतपणे सुरुवात करावी आणि दुसऱ्याने ती एकाग्र मनाने हात जोडून ऐकावी. रामरक्षेतील राम रामेति हा अगदी अखेरचा श्लोक तीन वेळा म्हणावा. दोघांनीही प्रभुरामचंद्रास वन्दन करावे आणि आसन सोडावे. हे कवच करीत असता तीनपेक्षा अधिक माणसे असतील अशा स्थळी ते करू नये. कवच केल्यावर विभूती झाडून टाकू नये. ती अंगावर राहू द्यावी. या कवचाप्रमाणे लहान मुलांना दृष्ट लागली असता अंगारा करून देता येतो. रामरक्षा म्हणणाऱ्याने पानावर विभूती घ्यावी. समोर उदबत्ती अथवा धूप जाळत ठेवावा. विभुती चिमटीने कुस्करीत रामरक्ष म्हणण्यास प्रारंभ करावा. यापूर्वी त्या मुलाचे नाक्षत्रनाम मनात म्हणून ‘अस्य बालकस्य दोषहरणार्थम्। किंवा या बाळाची दृष्ट दूर व्हावी म्हणून’ असा संकल्प करून मग रामरक्षा म्हणावी. बालकास दृष्ट लागली असेल तर म्हणणाऱ्यास जांभया येण्यास प्रारंभ होतो. तशा जांभया येऊ लागल्यास रामरक्षेतील शेवटचा श्लोक तीन वेळा म्हणावा. रामरक्षा म्हणून झाल्यावर त्या विभुतीला नमस्कार करावा आणि रामनाम घेत बालकाला ती विभूती मस्तकाला लावावी. शिल्लक उरलेली विभूती बाहेर जाऊन फुंकरून टाकावी. कवच्याप्रमाणे रामरक्षा म्हणून रक्षाबंध दोरा देखील तयार करता येतो. काळा रेशमी गोफ घेऊन त्याला उदबत्तीच्या धुरापुढे क्षणभर धूपवावा आणि उजव्या हाताच्या मुठीत तो धरून ठेवावा. कवच्याच्या वेळी ज्याप्रमाणे रामरक्षा म्हणावी असे सांगितले जाते त्याप्रमाणेच रामरक्षा म्हणावी. नंतर तो दोरा लहान मुलाच्या हातात, हव्या त्या व्यक्तीच्या कंठात, डाव्या दंडात किंवा डाव्या मनगटात बांधवावा. त्यायोगे कवचाचे सर्व फायदे मिळतात. हा दोरा कमीतकमी १२१ दिवस शरीरावर राहिल्यानंतर तुटला किंवा काढून टाकला तरी चालेल.

सार्थ रामरक्षा श्रीगणेशाय नमः। अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य। बुधकौशिकऋषिः। श्रीसीतारामचन्द्रो देवता। अनुष्टुप् छन्द सीता शक्तिः। श्रीमद्धनुमान् कीलकम्। श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः।।

या रामरक्षा स्तोत्राचा बुधकौशिक ऋषी हा कर्ता आहे. सीतारामचंद्र ही स्तव्य देवता आहे, स्तोत्रातील (बहुतेक) श्लोक अनुष्टुप् छंदात आहेत, श्रीमान् हनुमान ही या स्तोत्रात प्रवेश करण्याची किल्ली आहे आणि श्रीरामचंद्राची प्रीती लाभावी म्हणून या स्तोत्राचा सारखा पाठ करणे हा या स्तोत्राचा उपयोग आहे.

श्रीरामांची ध्यानमूर्ती अशी आहे – अथ ध्यानम्। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं। पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्। वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं। नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम्।। इति ध्यानम् ।। गुडघ्यापर्यंत लांब हात असलेल्या आणि ज्याने धनुष्य व बाण हाती घेतली आहेत, जो मांडी घालून बसला असून ज्याने पोटाखाली नेसलेला आहे, नवीनच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणारे असे सुंदर आणि आनंद ओसंडणारे ज्याचे डोळे आहेत, डाव्या मांडीवर बसलेल्या जानकीच्या मुखाकडे जो पाहात आहे, जलपूर्ण मेघाप्रमाणे ज्याची श्यामवर्ण कांती आहे, अनेक प्रकारे अलंकारांनी जो सुशोभित झाला आहे आणि ज्याने भव्य जटाभार मस्तकावर धारण केले आहे अशा रामाच्या मूर्तीचे ध्यान करावे (अंत:चक्षूंनी पाहावे.)

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशम् ।।१।। (१)ज्याचे एक एक अक्षर मानवाच्या महाभयंकर पापाचा नाश करते अशा रघुकुल श्रेष्ठाच्या (रामाचे) चरित्राचा विस्तार शंभर कोटी श्लोकांचा आहे.

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् । जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ।।२।। (२)निळ्या कमळाप्रमाणे ज्याचा श्यामल वर्ण आहे, कमळाप्रमाणे ज्याचे डोळे आहेत, ज्याच्या समवेत लक्ष्मण आणि सीता आहेत आणि जटांच्या मुकुटामुळे जो शोभून दिसतो.

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् । स्वलीलया जगत्त्रातूमाविर्भूतमजं विभुम् ।।३।। (३) ज्याच्या हाती तलवार आणि धनुष्य असून पाठीला बाणभाता बांधलेला आहे, राक्षसांचा संहारक, आणि जगाच्या रक्षणासाठी जन्मरहित सर्वव्यापी असतानासुद्धा सहज लीलेने अवतीर्ण झालेल्या रामाचे ध्यान करून, रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् । शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ।।४।। (४)सर्व इच्छा पुऱ्या करणाऱ्या, पापाचा नाश करणाऱ्या या रामरक्षा स्तोत्राचे शहाण्या माणसाने पठण करावे, रघुवंशाचे भूषण असलेल्या रामाने, माझ्या मस्तकाचे रक्षण करावे. दशरथाच्या पुत्राने माझ्या कपाळाचे रक्षण करावे.

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती। घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ।।५।। (५) कौसल्येच्या रामाने माझ्या डोळ्याचे, विश्वामित्राला आवडणाऱ्या रामाने माझ्या कानांचे, यज्ञरक्षण करणाऱ्या रामाने माझ्या नाकाचे आणि सुमित्रानंदन लक्ष्मणावर प्रेम करणाऱ्या रामाने माझ्या मुखाचे रक्षण करावे.

जिव्हां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः । स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ।।६।। (६) सर्व विद्यांचा ठेवा अशा रामाने माझ्या जिभेचे, भरताने ज्यांना वन्दन केले आहे अशा रामाने माझ्या कंठाचे, दिव्य आयुध धारण करणाऱ्या रामाने माझ्या खांद्यांचे आणि शिवधनुष्य मोडलेल्या रामाने माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करावे.

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ।।७।। (७)सीतानाथ राम माझ्या दोन्ही हातांचे, जमदग्नीपुत्र परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे, खर राक्षसाचे हनन करणारा राम माझ्या शरीरमध्याचे, जाम्बवन्ताला आपलासा केलेला राम माझ्या नाभिकमलाचे-बेंबीचे रक्षण करो.

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः । ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ।।८।। सुग्रीवाचा स्वामी माझ्या कंबरेचे, मारुतीचा प्रभू राम माझ्या मांड्यांच्या मागच्या भागाचे, रघुकुलात श्रेष्ठ असणारा आणि राक्षसकुलाचा संहारक राम माझ्या मांड्यांचे रक्षण करो.

जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः । पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोSखिलं वपुः ।।९।। (९)सेतू तयार करणाऱ्या रामाने माझ्या गुडघ्यांचे, रावणाला ठार मारणाऱ्या रामाने माझ्या पोटऱ्यांचे, बिभीषणाला सर्व वैभव देणाऱ्या रामाने माझ्या पायांचे इतकेच काय श्रीरामाने माझ्या सर्व देहाचे संरक्षण करावे.

एतां रामबलोपेतां रक्षां यः सक-ती पेठेत् । स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ।।१०।। (१०)रामसामर्थ्याने युक्त अशा या रक्षास्तोत्राचे जो पठण करील तो दीर्घायुषी, सुखी, संततिवान्, विजयी आणि विनयसंपन्न होईल.

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ।।११।। (११)रामनामाने ज्याचे रक्षण केले जाते त्याला पाताळ, भूतल आणि आकाश यांत हिंडणारे कपटी लोक पाहू शकणार नाहीत.

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् । नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ।।१२।। (१२)राम, रामभद्र,किंवा रामचन्द्र असे म्हणून जो मनुष्य रामाचे स्मरण करतो त्याला पापे चिकटत नाहीत आणि शिवाय तो ऐहिक व पारमार्थिक वैभव मिळवितो.

जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् । यः कण्ठे धारयेतस्य करस्थाः सर्वसिद्धयः ।।१३।। (१३) जगाला जिंकणारा मंत्र जो रामनाम त्याने संरक्षित (असा एखादा पदार्थ) कंठात धारण केला असता त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात.

वज्रपज्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् । अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ।।१४।। (१४) वज्राप्रमाणे अभेद्य असे हे रामरक्षा स्तोत्र जो म्हणतो त्याची आज्ञा सर्वत्र मानली जाते आणि त्याला जय व कल्याण प्राप्त होते.

आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः। तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ।।१५।। (१५) ही रामरक्षा भगवान् शिवांनी ज्याप्रमाणे बुध-कौशिक ऋषींना स्वप्नात सांगितली त्याप्रमाणे त्यांनी जागे होताच लिहून काढली.

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् । अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ।।१६।। (१६)कल्पवृक्षांचा विसावा, सर्व संकटे दूर करणारा, आणि तीनही लोकांना आनंद देणारा राम आमचा स्वामी आहे.

तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ। पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ।।१७।। (१७)तरुण, स्वरूपसंपन्न, सुकुमार, महा-सामर्थ्यवान, कमलपाकळीप्रमाणे विशाल नेत्र असलेले, आणि मृगाजिन वस्त्राप्रमाणे नेसलेले,

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ । पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।।१८।। (१८)कन्दमुळे खाणारे, ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली आणि तपोवन ब्रह्मचारी असे हे दशरथाचे पुत्र, एकमेकांचे बंधू राम आणि लक्ष्मण,

शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् । रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ।।१९।। (१९)सर्व प्राण्यांना अभय देणारे, सर्व धनुर्धरांमध्ये आणि राक्षसांचा नाश करणारे रघूकुलोत्तम राम-लक्ष्मण आपले रक्षण करोत.

आत्तसज्यधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनीषङ्गसंगिनौ। रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ।।२०।। (२०)सिद्ध धनू आणि बाण, व भाते धारण करणारे असे दोघे राम आणि लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी माझ्या समोर चालोत.

सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा। गच्छन् मनोरथोSस्माकं रामः पातु सलक्ष्मणः।।२१।। (२१)कवच घालून खङ्ग आणि धनुष्यबाण घेऊन सदैव सिद्ध असलेला आमचे मानसच जणू काही असा लक्ष्मणासह जाणारा राम आमचे संरक्षण करो.

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली। काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघूत्तमः ।।२२।। (२२)दशरथाचा शूर पुत्र, लक्ष्मण ज्याचा दास आहे, बलवान् काकुत्स्थ वंशात जन्मलेला, पूर्णब्रह्म कौसल्येचा पुत्र, रघूकुलश्रेष्ठ सीता राम.

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः । जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ।।२३।। (२३)वेदांकडून ज्ञात होण्यास योग्य, यज्ञपुरुष, अनादि पुरुषोत्तम; जानकीनाथ, वैभववान् आणि अतुल पराक्रमी.

इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः । अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः ।।२४।। (२४)अशा (नावांनी) नित्य जप करणाऱ्या, श्रद्धावान अशा माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्यापेक्षा अधिक फल प्राप्त होते यात शंका नाही.

रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् । स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः ।।२५।। (२५)दूर्वादलाप्रमाणे श्यामलवर्ण, कमलाप्रमाणे ज्यांचे डोळे आहेत, पीतांबर ज्याने नेसलेला आहे अशा रामप्रभूची जे लोक (त्याच्या वर सांगितलेल्या) दिव्य नावांनी स्तुती करतात ते जन जन्म मरणाच्या प्रवासातून सुटतात.

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं । काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् । राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति। वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ।।२६।। (२६) लक्ष्मणाचा मोठा भाऊ, रघूकुलात श्रेष्ठ; सीतेचा नाथ, धर्मसंपन्न, कुकुस्थ कुलात जन्मलेला, करुणानिधी, सर्व गुणांचा ठेवा, विद्वान ज्याला आवडतात, धर्माप्रमाणे आचरण असलेला, राजश्रेष्ठ सत्यव्रत दशरथात्मज, श्यामवर्ण, शांतमूर्ती, लोकांना आनंद देणारा, रघुकुळाला तिलकाप्रमाणे शोभा देणारा आणि रावणाचा शत्रू अशा रामाला मी वंदन करतो.

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे य़ रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ।।२७।। (२७)श्रीराम, रामभद्र, रामचंद्र, वेधस्, रघुनाथ, नाथ आणि सीतापतीला मी नमस्कार करतो, श्रीराम राम रघुनन्दन राम राम । श्रीराम राम भरताग्रज राम राम । श्रीराम राम रणकर्कश राम राम । श्रीराम राम शरणं भव राम राम ।।२८।। (२८)रघुकुलात श्रेष्ठ असलेल्या रामा, भरताच्या जेष्ठ बंधो रामा, युद्धात कठोर होणाऱ्या रामा आमचा रक्षिता होता.

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ।।२९।। (२९)श्रीरामाचे चरण मनाने मी स्मरतो, वाणीने त्याची कीर्ती गातो, मस्तकाने नमस्कारकरतो, आणि त्यांच्या चरणी मी शरण येतो.

माता रामो मत्पिता रामचन्द्रः । स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः । सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने ।।३०।। (३०)राम माझी आई, राम माझा पिता, रामचंद्र माझा धनी, राम माझा स्नेही, माझे सर्वस्व तो दयाघन रामचंद्र आहे. त्याशिवाय मी अन्याला जाणत नाही. त्रिवार जाणत नाही. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा । पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ।।३१।। (३१)ज्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला जानकी आहे आणि समोर मारुती आहे त्या रघुनंदनाला मी वंदन करतो. लोकाभिरामं रणरङ्गधीरं । राजीवनेत्रं रघुवंशनाथम् । कारुण्यरूपं करुणाकरं तं । श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ।।३२।। (३२)लोकांना आनंद देणारा, युद्धात धीरवान असणारा, कमलनेत्र, रघुवंशाचा स्वामी, दया हे ज्याचे रूप, दया हाच ज्याचा जाकार आहे त्या रामचंद्राला मी शरण आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।।३३।। (३३)मनाप्रमाणे ज्याचा वेग आहे, वाऱ्याप्रमाणे वेगवान, इंद्रिये जिंकलेला, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायूपुत्र, वानराधिपती, आणि श्री रामचंद्राचा दूत अशा मारुतीला मी शरण आहे. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् । आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ।।३४।। (३४) कवितारूपी खांदीवर बसून राम राम अशा गोड अक्षरांचे कूजन करणाऱ्या वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वन्दन करतो. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ।।३५।। (३५) संकाटांना दूर करणारा, सर्व वैभव देणारा, लोकांचा आनंद अशा रामचंद्राला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् । तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ।।३६।। (३६)जन्म-मरणाचे मूळ जाळून टाकणारा, सर्व वैभव देणारा, यमदूतांना भीती वाटणारा, असा राम राम हा घोष आहे. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः । रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहं । रामेचित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।३७।। (३७)राम राजश्रेष्ठ असून तो सदा विजयी होतो. रमापती रामचंद्राला मी भजतो, ज्या रामाने राक्षस-सेना मारिली त्या रामाला मी नमस्कार करतो. रामाहून मला कोणी श्रेष्ठ नाही. मी रामाचा दास आहे, रामात माझे मन मिळून जावो, हे रामा माझा उद्धार कर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनामतस्तुल्यं रामनाम वरानने ।।३८।। (३८)हे सुमुखी पार्वती, राम राम असे म्हणून मी रामाला रमतो. कारण श्रीरामाचे नांव विष्णुसहस्रनामाशी तुलना करतो आहे असे भगवान शिव पार्वतीला सांगतात. ।। श्रीसीतारामचन्द्रापर्णमस्तु ।। याप्रमाणे बुधकौशिकांनी लिहिलेले रामरक्षास्तोत्र संपूर्ण झाले ते श्रीसीतारामाच्या चरणी अर्पण असो.

लेखक- स. कृ. देवधर

 

ramraksha stotra in marathi pdf
ramraksha stotra meaning in marathi pdf download
ram raksha stotra meaning in marathi pdf free download
ram raksha stotra marathi arth
ram raksha stotra marathi anuvad
ram raksha stotra benefits in marathi
ram raksha stotra download
ramraksha stotra sanskrit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *