सखेसोबती रत्नदुर्ग आणि पूर्णगड
रत्नदुर्ग हा दुर्ग अगदी तीन तासात बघून होतो आणि त्यामुळेच आपण लगेच निघायचं ते अगदी ३० कि. मी. अंतरावर असलेल्या पूर्णगडकडे. मुचकंदी नदीच्या मुखाशी असलेला हा पूर्णगड म्हणजे काळ्या कुळकुळीत दगडांचा आणि अतिशय भक्कम असा आहे. चांगल्या आणि सुस्थितीत असलेल्या काही मोजक्या किल्ल्यांपैकी हा एक आहे. अगदीच छोट्या असलेल्या या किल्ल्याची बांधणी शिवाजी महाराजांनी केली असे काही दस्तावेज सांगतात, पण काही पुराव्यांमध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रेचा मुलगा सखोजी आंग्रे याने बांधला असा उल्लेख सुद्धा आहे. पूर्णगड गावातून चालत अगदी १० मिनिटात आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो. दोन भक्क बुरुजात हे प्रवेशद्वार आहे. इथेच एक हनुमानाची मूर्ती आणि एक विहीर आहे, पण सध्या त्यात पाणी नाही. त्यामुळे पाणी सोबतच ठेवावे. याच मुख्य प्रवेशद्वारावर चंद्र, सूर्य आणि गणपती कोरलेले आहेत. दारातून आत गेलं की, डाव्या हातास वृंदावन व उजव्या हातास वाड्याचं जोतं आहे. तसंच दरवाज्यात दोन्ही बाजूस पहारेकरयांच्या देवड्या आहेत. वरच्या भागात जाण्यासाठी चार जिने आहेत. तसंच समुद्राच्या बाजूस दुसरा दरवाजा आहे. या बाहेरील जागेतून सुद्धा सिधू सागराचे रमणीय असे दृश्य दिसते. हा किल्ला पाहून जाताना बाजूला कशेळे हे गाव आहे. तेथे असणारे सूर्य मंदिर सुद्धा अवश्य पाहण्यासारखे आहे.
कसे जाल
रत्नदुर्ग हा किल्ला रत्नागिरी शहरालगतच आहे. म्हणजे एस. टी. स्टँडपासून अगदी पाच कि. मी. अंतरावर. ऑटोसुद्धा शहरापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जातात. सकाळीच निघाल्यास दहा वाजेपर्यंत पूर्ण किल्ला बघून होतो. वापस रत्नागिरीला येऊन, जेवण घेऊन पूर्णगडला जावे. एस. टी. बसेस रत्नागिरीपासून पूर्णगड गावापर्यंत जातात. ४५ मिनिटात पूर्णगडला पोहोचता येतं. दोन्ही किल्ले लहान असल्यामुळे दिवस वाया न घालवता एकाच दिवसात पाहता येतात. आबाल, वृद्ध अगदी सगळ्यांसह कुटुंब कधीही जाऊ शकतील, असे हे दोन सुंदर किल्ले आहेत.