जलधोरण
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, समर्थ रामदासस्वामी, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, आर्य चाणक्य आदींनी पाण्याचा वापर किती
काटकसरीने आणि नियोजनपूर्वक केला हे पाहिले की सरकारचा करंटेपणा लक्षात येतो.
सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या २५ वर्षांच्या राजवटीत १२ वर्षे अवर्षणाची होती. त्याने तलाव,
कालवे व विहिरींच्या निर्मितीवर भर देऊन कृषी विकास व समृद्धीचे शिखर गाठले. कुरण
विकास या स्वतंत्र विभागाची नेमणूक करून स्वतंत्र सचिवाची नेमणूक केली. विद्यमान
सरकारमध्येही कुरण विकास आहे. पण ते वेगळ्या अर्थाने…
संत ज्ञानेश्वरांनी –
नगरेचि रचावी । जलाशये मिर्मावी ।
महावने लावावी । नानाविधे
असे जलाशयांचे महत्त्व सांगितले आहे. भगवान गौतम बुद्ध परस्पर संवादातून नदी
जल वाटपाच्या समस्या सोडविण्यासाठी आग्रही होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘मोट
स्थल वाढवावे व पाटस्थल जतन करावे । दुर्गावरील पाणी बहुत जतन करावे’ असे
सांगितले आहे. तर महात्मा फुल्यांनी –
डोंगर टेकड्यातील जलाशये जपावी ।
ती बांधून बळकट करावी ।
उन्हाळ्यात सकलजनांस द्यावी । जलसंजीवनी ।।
असा हितोपदेश कधीचाच केला आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी राजर्षी शाहू
महाराजांनी भोगावती नदीवर राधानगरी हे धरण बांधले. तेथे साठलेले पाणी नदीमध्ये सोडले
व नदीवर बंधारयांची शृंखला निर्माण करून लाभक्षेत्राचा विकास केला. तर देशाचे पहिले
सिचनमंत्री राहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जलधोरण दिले. त्यांनी नदी-
खोरेनिहाय जलनियोजन व व्यवस्थापनाचा पाया घातला. जल व ऊर्जा विकासाला
नियोजनात स्थान दिले. जलसंधारणाच्या क्षेत्रात देवी अहिल्याबाई होळकरच्या कर्तृत्वाला तोड
नाही –
चौफेर बांधावीत बारवे । घाट उभारावेत नदीकाठी ।।
सकळांच्या यत्नांतून । उदक साठेल सर्वांसाठी ।।
असे अहिल्याबाई होळकरनी सांगून ठेवले. गोंडराजे बख्त बुलंद तसेच राणी हिराईने पूर्व
विदर्भात हजारो तलावांची निर्मिती केली. तर राणी प्रभावतीने रामटेक परिसरात तलावांची
शृंखला निर्माण केली. सांगायचे हे की पाण्याचे महत्त्व ओळखून राजे-महाराजे, संत-महंत
आणि समाजसुधारकांनी पाणी आणि तळेही राखले. म्हणून त्यावेळच्या जनतेने पाणीही
चाखले. आज आपण जुन्या विहिरी, तलाव बुजवले आहेत. पाण्याचे स्रोत बंद केले.
समुद्रात भराव घालून टोलेजंग इमारती बांधल्या. त्याचे भीषण परिणाम आज दिसत आहेत.
नद्यांचे नाले झालेले आहेत, तलाव आटले आहेत, विहिरी कोरड्या ठक पडल्या आहेत
आणि झरयांनी केव्हाच दिशा बदलली आहे. तरीही सरकार दीर्घकालीन उपाययोजना
करण्यापेक्षा थातुरमातुर उपाययोजना करून वेळ मारून नेण्यातच धन्यता मानीत आहे.
कारण दुष्काळ सर्वांना आवडतो…