Secret meaning of “Aum Namoji Aadya”
ॐचे ध्वनिरूप
ॐ नमोजी आद्या! ‘ॐ’ आणि ‘आद्या’ म्हणजे सद्गुरूंना वंदन कसे, या गूढार्थाची उकल गेल्या भागापासून सुरू झाली आहे. ही उकल करताना आधी या दोन्ही
ॐनमोजी आद्या! ‘ॐ’ आणि ‘आद्या’ म्हणजे सद्गुरूंना वंदन कसे, या गूढार्थाची उकल गेल्या भागापासून सुरू झाली आहे. ही उकल करताना आधी या दोन्ही शब्दांबद्दल शक्य तितक्या संक्षेपानं जाणून घेऊ. ‘ॐ’ हा मंत्र, हे प्रतीक, हे अक्षर आपल्या अत्यंत परिचयाचं असलं तरी त्याचा खोलवर विचार आपण करीत नाही. ॐ चं रहस्य आहे तरी काय? स्वामी रामतीर्थ यांनी १९०२मध्ये सॅनफ्रान्सिस्को येथे ॐवर दोन व्याख्याने दिली होती. स्वामी रामतीर्थ समग्र ग्रंथ, खंड पाचवा (गणेश महादेव आणि कंपनी, पुणे, १९६९) या ग्रंथात ती प्रकाशित आहेत. त्यात ॐ हा रोजच्या जगण्यातही कसा सर्वव्यापी आणि सहज प्रकटणारा आहे तसंच सर्व देशांत, सर्व भाषांत तो या ना त्या रूपात कसा विद्यमान आहे, याचा मागोवा आहे. ॐ हा आपल्या जन्मापासूनच आपला सोबती कसा आहे, हे उलगडून दाखविताना स्वामी रामतीर्थ सांगतात, ‘‘ॐ हे अक्षर स्वाभाविकपणे प्रत्येकाच्या तोंडी येते. जन्मल्या वेळेपासून हा ॐ तुमच्या तोंडी असतो. लहान मुलांच्या तोंडावाटे ऊम्, ओम्, आम् असा ध्वनी निघत असतो.’’ वाणी ही माणसाच्या ज्ञानाचा आधार आहे. सृष्टीच्या प्रारंभिक काळात चित्कार, हास्य, रुदन, ओरडणे या वा हातवाऱ्याच्या माध्यमातून माणूस आपल्या मनातल्या भावना आणि विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असे. जसजसा चित्रलिपीपाठोपाठ बोली भाषेचा विकास होत गेला तसतसा वाणीच्या माध्यमातून माणूस संवाद साधू लागला. तसंच आपलं सारं ज्ञान तो मौखिक रूपातच साठवू लागला. पिढय़ान्पिढय़ा हे ज्ञान वाणीद्वारेच दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत होतं. थोडक्यात वाणी हा माणसाच्या ज्ञानाचा पूर्वापार आधार राहिला आहे. त्याचबरोबर ईश्वरापासूनच सर्व ज्ञानाचा आरंभ आणि विकास होत असल्याने या वाणीशी आणि ईश्वराशी ॐची सांगड घालताना पू. बाबा बेलसरे म्हणतात की, ‘‘तोंड उघडल्यावर आपोआप निघणारा जो ‘अ’ कार त्यापासून वाणीचा आरंभ होतो आणि तोंड किंवा ओठ मिटल्यावर जो ‘म’कार निघतो त्यामध्ये वाणीचा अंत होतो. एका टोकाला घशातून निघणारा अ आणि दुसऱ्या टोकाला म, या दोहोंच्या मध्ये उ हा स्वर आहे. म्हणून अ, उ, म मिळूून मानवी ज्ञानाचा आदि, मध्य व अंत होतो.’’ (अध्यात्म दर्शन, त्रिदल प्रकाशन, मुंबई). स्वामी रामतीर्थ आणखी खोलात जात भाषाविज्ञानालाच स्पर्श करत म्हणतात, ‘‘प्रत्येक भाषेत कण्ठापासून निघणारे, तालूपासून निघणारे आणि ओठापासून निघणारे असे तीन प्रकारचेच ध्वनी असतात. मानवी शरीरातील वागिंद्रियाची कण्ठ ही एक सरहद्द असून ओठ ही दुसरी सरहद्द आहे. या दोन मर्यादांच्या आत सर्व प्रकारच्या ध्वनीची उत्पत्ती होते. ॐमध्ये अ, उ, म हे तीन वर्ण किंवा ध्वनी आहेत. यातील अ हा कंठापासून निघतो म्हणून अ हा ध्वनीच्या प्रदेशातील सुरुवातीचा बिंदू आहे. उ हा तालूपासून निघतो. तो मध्यबिंदू आहे. म् हा ओष्ठय़ वर्ण असून अनुनासिक आहे. हा ध्वनीच्या प्रदेशातील अंतिम बिंदू आहे. या प्रकारे ॐ हा ध्वनीचे सर्व क्षेत्र व्यापतो म्हणून तो वाणीचा व पर्यायाने विश्वाचा निदर्शक आहे.’’