जसराज जोशी – कान तृप्त करणारे संगीत
येत्या २७ तारखेला आहे वुल्फगँग अमॅडीयस मोझार्ट या महान अभिजात संगीतकाराचा २५९ वा जन्मदिवस. जेमतेम ३५ वर्षांच्या आयुष्यात आणि २४ वर्षांच्या कारकिर्दीत (हो..नवव्या वर्षांपासून..अद्भुत!) त्याने पाश्चिमात्य अभिजात संगीतात (western classical music) प्रचंड मोठं काम करून ठेवलं आहे. त्याने अधिकृत माहितीनुसार ४१(नवीन मताप्रवाहानुसार ६४) सिंफन्या लिहिल्या. (ज्यातील पहिल्या १३ त्याने ९ ते १४ या वयात लिहिल्या) शेवटाकडील काही कामे अशीही आहेत, जी त्याच्या अकाली मृत्यूमुळे अर्धवट राहिली आणि नंतर त्याच्या अनुयायांनी पूर्ण केली. उदाहरणार्थ- लॉक्रेमोसा (किंवा requiem mass). मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी चर्चमध्ये गायली/ वाजवली जाणारी ही सिंफनी आहे. यातला कोरस किवा किंवा choir अंगावर येतो; मन एकाच वेळी सुन्न आणि शांत होते.
एकूणच मोझार्टची कुठलीही निर्मिती ऐकत असताना आपल्या मनाचा प्रवास हा शांततेकडेच होतो. ताण नाहीसा होतो. आपण अंतर्मुख होतो. गंमत म्हणजे आपण काही काम करत असताना जसे अभ्यास, लिखाण, शिवणकाम..काहीही..मन त्याच कामावर एकाग्र होतं. (आतासुद्धा मी हे सगळं लिहिताना मोझार्टची पियानो कॉन्सर्ट नंबर २७ ऐकत आहे!) आणि काहीही न करता फक्त सिंफनी ऐकली तर त्या सिंफनीमधल्या सूक्ष्म गोष्टी, स्वरांमध्ये होणारे अलंकारिक बदल, लयीमधील, तालामधील चढ-उतार यात आपण गुंतून जातो. मोझार्टने निर्माण केलेल्या एकूण रचनांचा (piano/ horn/ woodwind, violin concertos, piano music, violin music, solo/ dual pianos, sonatas, string quartets/ quintets dances, devotional music, masses, operas आणि असे बरेच काही..) आकडा ६२६ पर्यंत जातो.
थोडक्यात, एखाद्याचा डॉक्टरीचा किवा इंजिनीयिरगचा सर्व वर्षांचा अख्खा अभ्यास एकटा मोझार्ट सहज करून घेऊ शकतो!!!मोझार्टच्या मला आवडलेल्या ‘लिखाणा’मध्ये पुढील लिखाणे मी सारखी सारखी ऐकत असतो-कॉन्सेटरे फॉर पियानो अँड ऑर्केस्ट्रा- नं २०, अ लिटिल लाईट नाईट म्युझिक (हे तुम्ही नक्की ऐकलेले असेल.. खूप प्रसिद्ध आहे आणि खूप ठिकाणी जाहिरातींमध्ये वगरे वापरले जाते), ’ la nozze di figaro. हे ऑपेरा संगीत आहे. ज्यात दोन स्त्रिया soprano प्रकारात गाताना दिसतात. यात शेवटी दोघी मिळून जे गातात ते मिश्रण फारच सुंदर आहे.
आम्हा गायकांना अशा गायकीतून खूप काही शिकण्यासारखं आहे. rondo alla turca हे पियानो सोनाटामध्ये मोडणारे कंपोझिशन त्या काळातील तुर्की संगीताच्या प्रभावात बनलेलं आहे. मॅजिक फ्लूट हे सुंदर कॉम्पोझिशन मोझार्टच्या शेवटच्या काही गाण्यांपकी एक.खरं तर यूटय़ूब किंवा तत्सम सोशल साइटवर ‘मोझार्ट’ असं टाइप केल्यावर जे जे काही येतं, ते निसंशय डोळे झाकून ऐकावं असंच असतं. मी वर लिखाण असा उल्लेख केला, कारण आपण जे आज ऐकतो ते मोझार्टने लिहिलेलं संगीत आहे. जे वाचून एखादा तयार पाश्चिमात्य ऑर्केस्ट्रा ते पुनíनर्मित करू शकतो. आज आपण जे ऐकतोय ते सगळं पुनíनर्मित आहे. एकटं बसून मनातल्या मनात अख्खा ऑर्केस्ट्रा उभा करून कोण कधी काय वाजवेल हे लिहून संगीतनिर्मिती करणं हीच तर पाश्चिमात्य अभिजात संगीताची खासियत आहे! म्हणूनच मोझार्टच्या शेवटच्या अशाही काही रचना आहेत, ज्या त्यानं स्वत कधीच ऐकल्या नाहीत वा त्याच्या हयातीत वाजवल्या गेल्याच नाहीत!
====================================
कविता : अभिव्यक्तीने लावलेला एक असा शोध, ज्याच्या मदतीने आपल्याला सांगायचे असलेले खूप काही, फक्त काही मोजक्या शब्दांत मांडता येते. आपल्याला वाटत असलेले खूप काही, ज्या वाटण्याला नाव नसते, अव्यक्त असे ते सगळे व्यक्त करता येते. ज्याप्रमाणे हजारो मेगाबाइटचे फोटो, गाणी इत्यादी एका छोटय़ाशा पेन ड्राइव्ह किंवा मेमरी कार्डमध्ये बसवून किंवा ‘zip’ ते दुसऱ्याला देता येते, त्याचप्रमाणे मनात असलेला, व्यक्त होण्यासाठी धडपडत असलेला भावनांचा सागर कवितेच्या सूक्ष्म रूपाने दुसऱ्यासमोर ठेवता येतो. या सूक्ष्म रूपात काय काय दडले आहे, हे शोधून ते unzip करण्याची प्रक्रिया म्हणजेच ‘चाल देणे’, कवितेचे ‘गाणं’ बनवणे. श्रेष्ठ संगीतकार नुसता अर्थ शोधत नाही, तर त्या कवितेला आपला स्वत:चा अर्थ देऊन तिच्या भव्यतेत आणि सूक्ष्मतेतही भर घालतो. माझ्या मते या श्रेष्ठ संगीतकारांमधील सर्वश्रेष्ठ नाव म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर! बहुधा म्हणूनच ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटले, अवघेचि झाले देह ब्रह्म’ या ज्ञानेश्वरांच्या स्थितीशी एकरूप होऊन, हक्काने बाळासाहेबांनी त्याचे गाणे बनवले. पंडितजी ज्ञानेश्वरांच्या त्या अमृतानुभवाच्या भावनेशी एकरूप झाले असणार, यात शंका नाही. अद्वैताच्या शोधात ज्ञानोबांना जे जे होत गेले, ते बाळासाहेबांनासुद्धा होत गेले असावे, असेच त्यांचे अभंग ऐकून वाटते. ‘ॐ नमोजि आज्ञा’, ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’, ‘पैल तोगे काऊ’, ‘मोगरा फुलला’, ‘रुणुझुणू रुणुझुणू’, ‘आजी सोनियाचा दिनु’, ‘कानडाऊ विठ्ठलू’, ‘घनु वाजे रुणुझुणा’, ‘पसायदान’.. हे अभंग जोडीला डायरेक्ट देवाशी कनेक्शन असलेले दोन आवाज- आशा आणि लता! अजून काय पाहिजे?‘शिवकल्याण राजा’ – ही अशीच एक अजरामर कलाकृती. यात नुसते कवितांना चाल लावणेच नाही, तर प्रसंगानुरूप एक एक कविता शोधून काढणे आणि त्याला संगीतबद्ध करणे असे काम बाळासाहेबांनी केलेय. ‘सरणार कधी रण’, ‘गुणी बाळ असा’, ‘निश्चयाचा महामेरू’, ‘आनंदवनभुवनि’, ‘वेडात मराठे वीर’, ‘अरुणोदय झाला’, ‘हे हिंदू नृसिंहा’ – प्रत्येक गाणे असे, की ऐकून अंगात येते, रक्त सळसळायला लागते, एक वेगळेच स्फुरण चढते.
संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज आणि नंतर ग्रेस! ग्रेस म्हणजे – नुसते वाचायला अवजड, अवघड अशा कवितांना चालबद्ध, लयबद्ध करायचे धाडस आणि इच्छा होण्यासाठी प्रतिभेच्या कुठल्या पातळीवर त्यांना पोहोचायला लागले असेल? आता ‘मनाचा दगड घेतो कण्हत उशाला’ (गेले द्यायचे राहुनि) या ओळीतले स्वर शोधायचे म्हणजे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. फक्त ग्रेसच नाही, तर अनेक कवींच्या कवितांना पंडितजींनी असे हाताळले आहे, की जणू बाळासाहेबांमार्फत गाणे होऊन जगासमोर येण्यासाठीच जणू त्या कवितांचा जन्म झाला होता. ‘घनतमी शुक्र बघ राज्य करी’ (भा. रा. तांबे).. या अशा कविता आणि त्यांची गाणी ऐकली की, मला ‘मेरा कुछ सामान’ची आठवण होते. ते तरी पंचमदांना गाणे करण्यासाठी गुलजार साहेबांनी दिलेले गीत होते, इथे तर या कवितेचे गाणे करण्याचा निर्णय स्वत: बाळासाहेबांनी घेतलेला! खरंच, ‘घर थकलेले’, ‘ती गेली’, ‘वाऱ्याने हालते रान’, ‘लवलव करी पातं’, ‘सावर रे सावर रे’, ‘भय इथले संपत नाही’, ‘दु:ख ना आनंद ही’, ‘त्या फुलांच्या गंधकोशी’, ‘पूर्तता माझ्या व्यथेची’, ‘केव्हा तरी पहाटे..’ या आणि अशा कविता बाळासाहेब नसते, तर कागदावरून कॅसेटमध्ये कधीच नसत्या आल्या!
हे ऐकाच..
न ऐकलेले हृदयनाथबाळासाहेबांची गायकीसुद्धा मंगेशकर घराण्याला शोभणारी अशीच आहे; हे बाळासाहेबांचे डायहार्ड फॅन असणाऱ्यांना वेगळे सांगायची गरज नाही. ‘भावसरगम’ला अजूनही तुडुंब गर्दी होते ते यामुळेच; पण खूप मोठा फॅन असूनही बाळासाहेबांनी ‘ब्लॅक अँड व्हाइट’ काळात गायलेली काही गाणी मी अजूनपर्यंत ऐकली नव्हती. इतक्यातच ती ऐकली म्हणून उल्लेख करतोय. बाल-हृदयनाथनी गायलेली हिंदी गाणी – ‘लहरों के रेले’ (बाबला – १९५२) आणि ‘ये दुनिया कैसी है भगवान’ (दीवाना १९५३) आणि ‘माणसाला पंख असतात’मधली कुमार हृदयनाथने गायलेली ‘पतित पावन नाम ऐकुनि’ आणि ‘उभवू उंच निशाण’. स्वच्छ शब्दोच्चार, सूर लावायची मंगेशकारी शैली आणि असंस्कारी आवाज.. आवर्जून ऐका आणि आनंद घ्या.
=====================================
१४ फेब्रुवारी..अरे कोण कुठला तिकडचा संत.. तिकडचा सण इकडे कशाला? आपली संस्कृती नाही ती.. असे म्हणणाऱ्यांनी आजची प्ले लिस्ट वाचायची काही गरज नाही. (अरे १४ फेब्रुवारीपर्यंत कोण थांबतंय? अपने लिये तो रोजही व्हॅलेंटाइन है. असा दावा असेल तर त्यांचे त्यांनी ठरवावे.) बाकी या दिवसात काहीतरी मजा आहे यात वाद नाही. कारण या दिवशी अख्खे जग प्रेममय असते. रोमँटिक असते. हा दिवस दर वर्षी कितीतरी जणांना दिल की बात सांगायची िहमत देत असतो. आपल्या साथियाँसोबत दिवस मजेत घालवायचा हक्क देत असतो.. आणि साथीला रोमँटिक गाण्यांची प्ले लिस्ट नसेल तरच नवल. माझ्या-तुमच्या प्ले लिस्टमध्ये खूप प्रमाणात साम्य असणार हेही ओघाने आलेच. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नि आमचं अगदी सेम असतं.माझ्या प्ले लिस्टची सुरुवात निर्वविादपणे मला रोमँटिकपणा शिकवणाऱ्या सोनू निगमच्या सजिद-वाजिदचे संगीत असलेल्या ‘दीवाना’ या अल्बमने होतेय. यातल्या सगळ्याच गाण्यांनी मला वेड लावले होते. तेव्हा मी दहावीत होतो. कधी एकदा मुलांच्या शाळेतून कॉलेजमध्ये जातोय आणि एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतोय असे मला ही गाणी ऐकताना झाले होते. नंतर कॉलेजमध्ये मुलींसमोर गायलो नाही फार; पण रॅिगग करणारे कोणी म्हणाले, की गायक आहेस तर मग गाऊन दाखव पट्कन काहीतरी..की, माझे एकच गाणे ठरलेले असायचे- ‘दीवाना तेरा..’ काही सीनिअर्स तर मला सोनू अशीच हाक मारायला लागले होते, त्यानंतर.कॉलेजला असताना थेट तलत मेहमूदच्या ‘जलते है जिस्के लिये’, रफीसाहेबांच्या ‘तेरे मेरे सपने’, किंवा ‘एहेसान तेरा होगा मुझपर’ लतादीदीच्या ‘मुझे तुम मिल गये हमदम.., ना..जिया लागे ना..’, ‘आज कल पाँव ज़्ामी पर नही पडते मेरे’ या आणि अशा गाण्यांचे नव्याने अर्थ लागायला लागले. किशोरदाच्या ‘छू कर मेरे मन को’, ‘केहेना है केहेना है’, वगरे गाण्यांनी वेगळी नशा चढायली लागली. बाकी कडव्यात ‘रे’ चा ‘सा’ होणाऱ्या (स्केल चेंज) ‘तेरे बिना जिया जाये ना’चाही अनुभव आला.विजू शहा-हरिहरन-साधना सरगम यांचा सुरेल संगम- ‘कुछ मेरे दिलने कहा..’(चित्रपट-तेरे मेरे सपने), ‘चुपके से’ आणि ‘साथियाँ’( चित्रपट- साथियाँ) यांनीही वेड लावलेच होते.प्ले लिस्टमधले मस्ट – ‘तुम्हे हो न हो मुझको तो इतना यकीन है, मुझे प्यार तुमसे नही है नही है ..’ (चित्रपट -घरोंदा) – हे असे गुलजारसाहेबांशिवाय दुसरे कोण लिहिणार? ‘चुप चुप् के चोरीसे चोरी’ (चित्रपट -बंटी और बबली)- शंकर-एहसान-लॉय च्या सर्वात भारी चालींपकी एक.. पुन्हा एकदा गुलज़ारसाहेब. या संगीत त्रिकुटाचेच ‘दिल चाहता है’ मधले ‘कैसी है ये रुत..’ जावेद अख्तरसाहेबांनी लिहिलेली हीदेखील गाणी रोमँटिक मूडमध्ये ऐकावीच अशी.गुलजार-विशाल भारद्वाज यांचे ‘ओंकारा’मधले भन्नाट गाणे ‘ओ साथी रे..’ स्वत विशाल आणि श्रेया घोषालनी गायलेले आहे. प्रेमाची गाणी म्हटल्यावर आठवतातच अशी आणखी दोन गाणी – ‘क्या यही प्यार है..’ (‘रॉकी’ मधले) आणि ‘तुमसे मिलके’ सुरेशजी- आशाताई – आरडी. काय बोलू याविषयी.. तुम्हाला ऐकल्यावर प्रत्येकवेळी थेट जाणवेलच. (सुरेशजींचा विषय निघाल्यावर ‘माजे राणी माजे मोगा’ हेही आठवतेच आठवते.) कमालीचा गोड आवाज लाभलेल्या मधुश्रीने गायलेले- ‘तू बिन बताये मुझे ले चल कही..’ (रंग दे बसंती), ‘कयामत से कयामत तक’ मधली सगळी गाणी विशेषत ‘अकेले है तो क्या ग़म है’, उदित नारायणच्याच फ्रेश आवाजातले- ‘तेरि याद हमसफर सुबहशाम..’ ही सगळी गाणी ऐकण्यासाठी मला १४ फेब्रुवारीपर्यंत थांबवत नाही. आणखी एक राहिले.. कुमार शानू मी आधी आवर्जून ऐकत नसे. पण, त्याचे ‘संभाला है मने बहुत अपने दिल को..’,‘जब कोइ बात बिगड जाये..’, ‘सासोंकी जरुरत है जैसे..’,‘आखोन्की ..’, ‘जब्से तुमको देखा है सनम..’ही रोमँटिक गाणी आज मला खूप जवळची वाटतात. कुमार शानूची गायकी मला जरा उशिरा कळू लागली, असे म्हणा हवे तर.. रोमँटिक आणि दर्दभऱ्या गाण्यांमधील कुमार शानूचे योगदान विसरून चालणारच नाही.खरे तर ही यादी अशीच पुढे चालू राहू शकते. इतकी की, १४ नोव्हेंबर उजाडेल!!! तुर्तास थांबू या.
जसराज जोशी
हे ऐकाच.. व्हेन आय नीड यू
‘जब कोइ बात बिगड जाए..’ ची चाल राजेश रोशननी ‘500 miles’ या पीटर-पॉल-मेरी च्या गाण्यावरून घेतलेली आहे. अर्थात कडव्याची चाल वेगळी आहे; पण हे मूळ गाणे नक्की ऐका. फार सुंदर आहे. खरा धक्का तर तुम्हाला हे वाचल्यावर बसेल की, ‘तुमसे मिलके..’ या ‘परिन्दा’मधल्या गाण्याची चालसुद्धा पंचमदांनी लीओ सेअरच्या when i need you वरून उचलली आहे! याच्याही कडव्याची चाल वेगळी बांधली आहे आणि त्यात भारतीय मुलाम्याची गायकीही सुंदरररीत्या अवतरली आहे. इंग्रजी गाण्यांचा विषय निघालाच आहे, तरी enrique iglesias चे ‘हीरो’ मला त्याच्या आर्त गायकीसाठी खूप आवडते. Have i told you lately that i love you? हे रॉड स्टुअर्टचे गाणे त्यातील प्रपोजच्या स्टाइलमुळे आवडते. स्लमडॉग मिलिअनरमधले- dreams on fire ऐकाच. कारण अर्थातच ते रेहमानचे आहे!
==============================================
शास्त्रीय संगीतामधील दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांची आठवण या आठवडय़ात होतेय. ८ एप्रिलला कुमारजींचा जन्मदिवस आणि आज (१० एप्रिल) किशोरीताईंचा वाढदिवस.
कुमारजी.. पंडित कुमार गंधर्व.. अभिजात संगीतात आजवर चालत आलेला धोपट मार्ग न स्वीकारता गायकीची एक वेगळी वाट, वेगळे वळण शोधून दाखवणारे महान नाव. राग-मांडणीची आधी कधीही न वापरली गेलेली पद्धत, एकापेक्षा एक सुंदर बंदिशी, आलापांचे, सरगमचे आणि विशेष करून तानांचे लहान लहान खंड, रागाचे अंतरंग, सौंदर्य उलगडून दाखवणारी आणि त्यातून जणू शिकवणारी गायकी!
या सर्व अलंकारांनी नटलेली कुमारजींची मैफल प्रत्यक्ष अनुभवता आली नाही याचे शल्य नेहमीच मनात राहील; पण ती उणीव भरून काढायला त्यांची अनेक गाजलेली रेकॉर्डिग्स उपलब्ध आहेत. भाटियार, मालगुंजी, जौनपुरी, बिलासखानी तोडी, नंद, श्री, बागेश्रीसारख्या प्रस्थापित रागांबरोबरच गौरी-बसंत, लागण गांधार, गांधी मल्हार, धनबसंतीसारखे अनवट राग ऐकताना आजही खूप शिकता येते. आघाडीचा अभिनेता आस्ताद काळेने म्हणजे माझ्या गुरुबंधूने मला दिलेल्या एका कॅसेटमधले कुमारजींचे भीमपलास आणि मालकंस हे राग मी सगळ्यात जास्त ऐकलेले.
‘भीमपलास’मध्ये विलंबित एकतालातली – ‘नाद सो जानू रे..’ साथीला वसंतराव आचरेकारांचा संतत चालणारा ठेका, नावापुरतीच हार्मोनियम. कारण ही गायकी हार्मोनियममध्ये पकडता येणे तसे अशक्यच. मग द्रुत तीनतालातली ‘जावा हु देसा’.. दुसऱ्या बाजूला मालकंस.
‘मालकंस’मधले विलंबित तीन तालातले ‘आए हो..’, नंतर द्रुत तीन तालातले ‘फूल बेदाग ये बना..’ त्यातली ती अवरोहाची म्हणजे वरून खाली येणारी सळसळती तान.. अहाहा! मग मध्य लय तीन तालातील- ‘कैसो निकोला..’ म्हणजे जलद लयीच्या बंदिशीनंतर धिम्या गतीची बंदिश! म्हणजे इथेही विलंबितपासून जलद गतीकडे जाण्याची परंपरा मोडीत काढलेली. नंतर येणारी द्रुत एक तालातील ‘छाब तेरी छाब तेरी’, द्रुत तीन तालातील ‘देखो अजब खेल है ये..’ आणि सरते शेवटी मध्य लय एक तालातील, म्हणजे एकूण गायलेल्या बंदिशींपैकी सर्वात संथ लयीतली- ‘आनंद मान मोरा पिया जो घर आयो’ त्यात तो हळूच डोकावून जाणारा ‘पंचम’. वा वा वा! त्या पंचमने खरेच आनंद मना होऊनी जातो.. याविषयी थोडक्यात सांगायचे झाल्यास ‘मालकंस’ या रागात पंचम (‘प’ हा स्वर) खरे तर लागत नाही, तो वज्र्य आहे. पण कुमारजींनी तो वापरून ‘मालकंस’ला अजूनच सुंदर करून ठेवले आहे.
‘मालकंस’मध्ये अधिकृतरीत्या ‘पंचम’ आणि ‘ऋषभ’ वापरण्यासाठी ‘संपूर्ण मालकंस’ या रागाची निर्मिती झाली असावी. हा राग मात्र मी प्रत्यक्ष लाइव्ह मैफलीत ऐकला आहे.. किशोरीताईंचा! अजूनही आठवून अंगावर काटा येतो. पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंदिरात त्यांनी गायलेला अभोगी अंगाचा ‘बागेश्री’ आणि नंतर हा ‘संपूर्ण मालकंस’.. शांत सुरुवात, सुईमध्ये लीलया दोरा ओवावा तसा सुरांचा लगाव आणि अशा शांत गायकीत एकदम वरच्या षड्जाला स्पर्श.. ब्रह्मानंदी टाळी! काही छोटय़ा ताना आणि मग अशी मोठी सणसणीत तान, की काळजाचा ठोकाच चुकावा. किशोरीताईंचे गाणे ऐकणे म्हणजे जणू देवाची प्रार्थनाच!
किशोरीताईंनी गायलेल्या माझ्या ‘ऑल टाइम फेव्हरेट’मध्ये सर्वात जास्त ऐकला जाणारा राग म्हणजे भूप. छोटय़ा आकाराचा असल्याने विस्तार करायला अवघड असा हा ‘भूप’ गावा तो किशोरीताईंनीच. विलंबित तीन तालामधला ख्याल- ‘प्रथम सूर साधे’ आणि नंतर मध्य लय ‘सहेला रे’ .. भन्नाट! तशीच हंसध्वनी या छोटय़ा रागातली ‘गणपत विघ्न हरण’ ही बंदीश मी परत परत कितीही वेळा ऐकू शकतो. याशिवाय तोडी, बागेश्री, नंद, सोहनी भटियारसारखे भरजरी राग माझ्या नेहमीच ऐकण्यात असतात.
कुमारजी आणि किशोरीताई या दोघांच्या गायकीमध्ये एक साम्य नक्की आहे. यांना ऐकताना आपल्याला सतत जागृत, सावध असावे लागते. थोडेसे लक्ष विचलित झाले तर तुम्ही एखाद्या सुंदर जागेला, ओळीला, तानेला मुकू शकता. त्यामुळे यांना परत परत ऐकल्यावाचून गत्यंतरच नसते. यांच्या रागदारीचीच प्ले लिस्ट आठवडाभर पुरेल असे वाटतेय. उपशास्त्रीय गायकीविषयी बोलू या पुढच्या आठवडय़ात.
हे ऐकाच.. भिन्न षड्ज
खरे तर ही आवर्जून ऐकायची नाही, तर पाहायची गोष्ट आहे. किशोरीताईंच्या गायकीच्या, त्यांच्या विचारांच्या आणखी जवळ जायचे असेल तर ‘भिन्न षड्ज’ हा अमोल पालेकर- संध्या गोखले यांनी बनवलेला माहितीपट चुकवू नये असाच आहे. ताईंवर झालेले माईंचे म्हणजे त्यांच्या आईचे – मोगूबाई कुर्डीकरांचे संस्कार, विचारांची जडणघडण, ताईंचे सांगीतिक विचार, सुराविषयी, स्वराविषयी, श्रुतींविषयी ताईंचे म्हणणे, संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन, समकालीन दिग्गज कलावंतांचे आणि ताईंच्या शिष्यांचे ताईंविषयीचे विचार, अनुभव हे सगळे जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहाच.
===========================
सरत्या वर्षांच्या पार्टी मूडमधून अजून बाहेर आला नसाल तर त्याच नॉस्टॅल्जियाला जागून या वर्षांची पहिली प्ले लिस्ट देतोय. वर्षांची पहिली प्ले लिस्ट अर्थातच सरत्या वर्षांतल्या मला आवडलेल्या गाण्यांची. सरत्या वर्षांत गाजलेली काही गाणी तुम्हा सर्वाप्रमाणेच मलाही आवडली. उदाहरणार्थ ‘एक व्हिलन’मधलं मोहम्मद इफमर्नच्या अगदी तलम आवजातलं – ‘किसी शायरकी गज़्ाल..’, उंगली चित्रपटातलं गुलराज सिंगनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं ‘ओ पाकिज़ा रे’.. सुंदरच आहेत ही गाणी!
ईडीएम (अर्थात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक) या नवीन संगीत प्रकारात मोडणारी विशाल-शेखर जोडीची काही गाणी तुफान होती. ‘बँग बँग’ अणि ‘तू मेरी मैं तेरा’ ही गाणी ऐकली तेव्हा या नव्या साऊंडचं पर्व चालू झालंय असं नक्कीच वाटतंय. एऊट हा संगीत प्रकार गेल्या काही वर्षांत जगभर गाजणारा प्रकार आहे. जगभरातील सर्वात प्रसिद्ध संगीत प्रकार अशी याची ख्याती वाढते आहे. मेलडी आवडणाऱ्या भारतीय मनांवरही हळूहळू याची जादू पसरते आहे, असं म्हणायला हवं. कारण भारतातही हा प्रकार आता वापरला जातोय. या प्रकारात संगीताचं जवळजवळ सगळं काम डिजिटली केलं जातं. लाइव्ह म्युझिक वाजवणं हा प्रकार नसतो.
विशाल-शेखर याच जोडीची ‘मनवा लागे’ (चित्रपट – हॅपी न्यू इअर) आणि ‘ज़्ोहेनसीब’ (चित्रपट – हसीं तो फसीं) ही रोमँटिक गाणी बँग बँगच्या अगदी विरुद्ध प्रकारची आहेत. संगीताच्या एवढय़ा दोन टोकांचं काम तितक्याच ताकदीनं करणाऱ्या या जोडीला मनापासून सलाम!
याबरोबरच अशी काही गाणी जी तुलनेने कमी वाजवली वा ऐकली गेली, पण मला मनापासून आवडली.. ‘हायवे’मधलं सरांचं (सर.. अर्थात ए आर रेहमान) ‘सुहासाहा अम्मा का’ हे असंच एक गाणं. फारच गोड अंगाईगीत आहे हे.. आलिया भट आणि झेब (झेबुन्निसा बंगश) या गायिकांनी गायलेलं.. खरंच या गाण्याच्या गोडव्याला काही सुमारच नाही! तुम्ही ऐकलं नसेल तर नक्की ऐका. तसंच ‘टू स्टेट्स’मधलं ‘चंदनिया..’ हे गाणं. तितकंच मोहक आणि श्राव्य. मोहन कन्नन या गायकाच्या खर्जयुक्त आवाजात काही औरच जादू आहे. आणि सर्वात शेवटी फारच कमी लोकांनी ऐकलेलं असेल असं, पण मला सर्वात जास्त आवडलेलं गेल्या वर्षांतलं गाणं -‘गुलों में रंग भरे’! त्याविषयी वाचा सोबतच्या चौकटीत आणि पुढच्या आठवडय़ात पुन्हा भेटूच.. नव्या प्ले लिस्टसह.
हे ऐकाच.. बेभान करणारी गजल
‘गुलों में रंग भरे..’ ही मुळात मेहदी हसन यांनी गायलेली गजलय फैज या शायराची ही गज़्ाल गेल्या वर्षी रिलीज झालेल्या विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’ चित्रपटासाठी वापरली गेली. अरिजीत सिंग यांनी या चित्रपटासाठी ही गजल गायली आहे. ही ओरिजिनल गज़्ालच मुळात बेभान करून टाकणारी आहे; त्याला मिळालेला अरिजीतचा अष्टपैलू आवाज.. कहर! आवर्जून ऐकलंच पाहिजे असं हे गाणं. जरूर ऐका.
===================================
कर्नाटकी आणि हिंदुस्तानी शास्त्रीय गायकीचा सुंदर मिलाफ; त्याचबरोबर पाश्चिमात्य संगीताचीही उत्तम जाण; वर-खाली लीलया फिरणारा आवाज; कमालीची फिरत; आणि सर्वात मुख्य म्हणजे या सर्व गोष्टींचा सुंदर आणि नावीन्यपूर्ण वापर.. मी कुणाबद्दल बोलतोय लक्षात आलंच असेल. ज्या कलाकारामुळे मला माझ्या गायकीची दिशा ठरवता आली; ज्याला मी मनापासून गुरू मानतो, त्या शंकर महादेवन यांच्याबद्दल. या आठवडय़ात (३ मार्चला) त्यांचा वाढदिवस झाला. ‘आयुष्यात शंकर महादेवनसारखे होणे’ हेच माझे साधारण कॉलेजपासूनचे ध्येय आहे! शंकरजींना ऐकून कोणी फॅन झाला नाही तरच नवल! सादर आहे शंकर महादेवन आणि शंकर-एहसान-लॉय प्ले लिस्ट-
प्ले लिस्टची सुरुवात ‘उर्वशी उर्वशी’ या ‘हमसे है मुकाबला’ मधल्या गाण्याने. एक तर ते गाणेच भन्नाट, त्यातून रेहमान सरांच्या जोडीला येणारा शंकरजींचा आवाज म्हणजे अजूनच मजा! मग अर्थातच ु१ीं३ँ’ी२२. हे गाणे तांत्रिकदृष्टय़ा एका श्वासात गायलेले नसले, तरी जसे गायले आहे तसे गाणे कोणालाच शक्य नाही. संगीत संयोजनानेही हे गाणे आपली उत्कंठा अशी वाढवते आपण आपला श्वास धरून ठेवतो, आपल्यालाच दम लागतो!
‘ब्रीदलेस’नंतर काही काळातच शंकर-एहसान-लॉय हे एकत्र आले. त्यांचा पहिला सिनेमा होता- मुकुल आनंद यांचा- ‘दस’. मुकुल आनंद यांच्या निधनामुळे हा चित्रपट प्रदíशत झाला नाही, पण यातली गाणी मात्र प्रसिद्ध झाली. ‘सुनो गौर से दुनिया वालो’ , ‘माहिया’ ही गाणी तुम्ही ऐकली असतीलच, पण या चित्रपटात आणखी एक गाणे होते, जे मला फारच आवडते, ते शंकरजींनीच गायलेले- ‘चांदनी रूप की, या किरण धूप की..’ फारच सुंदर. हे गाणे तसे फार ऐकले न गेल्यामुळे त्यांनी त्यांच्या पुढच्या एका चित्रपटात अशाच धाटणीचे गाणे बनवले, ते म्हणजे ‘दिल चाहता है’ मधले- ‘कैसी है ये रुत..’ हे गाणेसुद्धा तितकेच मस्त. बाकी ‘दिल चाहता है’ विषयी मी काय बोलू! या चित्रपटाप्रमाणेच याच्या अल्बमनेसुद्धा बॉलीवूडला एक तजेलदारपणा आणून दिला. संगीताचा एक नवीन अध्यायच सुरू केला.. सगळीच गाणी भारी! माझे सर्वात आवडते- दिल चाहता है- शीर्षकगीत.
शंकरजींचे ‘अल्बम-९’ मधील ‘साहेबा’ हे गाणे जर निसटून गेले असेल तर नक्की ऐका. (‘मितवा’ गाण्याचे मूळ गाणे असे या गाण्याला म्हणता येईल. दोन्ही गाणी त्यांचीच आणि दोन्ही सुरेख)
‘रॉकफर्ड’ या चित्रपटासाठी त्यांनी दिलेले ‘मैं हवा के परों से कहा..’ हे थोडे कमी ऐकले गेलेले पण अफाट सुंदर गाणे माझ्या अगदी जवळच्या गाण्यांपकी एक आहे. ‘दिल चाहता है’च्या बाबतीत आहे, तेच ‘तारे जमीं पर’च्या बाबतीत आहे. सगळीच गाणी भारी. मला सर्वात आवडणारी दोन म्हणजे टायटल सॉँग आणि ‘खोलो खोलो दरवाजे..’
शिवाय, ‘कभी अलविदा ना कहेना’ मधले ‘तुम ही देखो ना’, ‘रॉकऑन’मधले- ‘ये तुम्हारी मेरी बातें..’, ‘टू स्टेट्स’मधले ‘चांदनीया’, ‘सलाम-ए-इश्क’ मधील ‘या रब्बा’ हे कैलाश खेरने गायलेले गाणे, ‘क्यू? हो गया ना?’ मधले ‘आओ ना..’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ (यांच्या जवळजवळ सगळ्याच चित्रपटांची नावे मोठमोठाली आहेत.. लिहिताना कंटाळा येतो..ऐकताना मात्र नाही!) मधील ‘उडे..खुल्के जहाँ मे ख्वाबों के परिन्दे..’, ‘चांदनी चौक टू चायना’ (पुन्हा तेच..)मधील ‘तेरे नना’, ‘बंटी और बबली’मधील चुपचुपके..’ सारखी अवीट गोडीच्या चाली असलेली गाणी हवीतच या प्ले लिस्टमध्ये.
‘माय नेम इज खान’मधील ‘नूर-ए-खुदा’, ‘लक बाय चान्स’मधले ‘सपनों से भरे नना’ ही सूफी धाटणीची गाणी, ‘जॉनी गद्दार’ चित्रपटाचे शीर्षकगीत, ‘झूम बराबर झूम’ मधले ‘किस ऑफ लव’, ‘तारे..’मधले ‘खोलो खोलो दरवाजे’, भाग मिल्खा भाग मधले ‘जिंदा..’ ही रॉक प्रकारातील गाणी सारखी ऐकावी अशी.
चित्रपटांप्रमाणेच शंकरजींनी जाहिरातींमधेही (जिंगल्स) आपल्या गायकीची चाप पाडली आहे. त्यांची ती ‘वर्लपूल रेफ्रिजरेटर’च्या जाहिरातीतील सनसनाटी तान तर तुम्हाला आठवत असेलच, शिवाय पर्क, कॅडबरीच्या जुन्या जाहिराती मी ‘यूटय़ूब’वर शोधून शोधून ऐकत असतो. अजून एक.. मी सतत यूटय़ूबवर पाहतो म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये सलमान खान पहिल्यांदा विक्रम गोखलेंना गाणे गाऊन दाखवतो तो सीन.. सलमान इटलीवरून आला असतो हे दाखवण्यासाठी शंकरजींनी ज्या गायकीचा (जॅझ स्टाइल) अवलंब तिथे केला आहे, तो ऐकून मी त्यांच्या प्रेमात पडलो.. ऐकल्यावर तुम्हीही नक्कीच पडाल.
हे ऐकाच..
रिमेम्बर शक्ती
‘शक्ती’ या फ्युजन बॅण्डची निर्मिती जॉन मॅकलॉइन या गिटारिस्टने साधारण १९७५ मध्ये केली. यात झाकीर हुसेन, आर राघवन, विक्कू विनायकराम, एल शंकर हे कलाकारही होते. कालांतराने जॉन आणि झाकीर यांनीच काही नवीन कलाकारांसह ‘रिमेंबर शक्ती’ हा बॅण्ड सुरू केला. यात मेंडॉलिनवर होते नुकतेच जग सोडून गेलेले यू श्रीनिवास हे दिग्गज कलाकार आणि गायनाची जबाबदारी सांभाळली शंकर महादेवन यांनी. या बॅण्डचे काही अल्बम बाजारात आहेतच, पण यूटय़ूबवर यांचे सादरीकरणाचे अनेक व्हिडीओ आहेत. रिमेंबर शक्तीचे मला सर्वात आवडणारे गाणे म्हणजे ‘सखी’.. कमाल! फ्युजन म्हणजे काय, हे शक्ती/ रिमेंबर शक्तीकडून शिकावे! पाश्चात्त्य-भारतीय याबरोबरच िहदुस्तानी-कर्नाटकी असाही मेळ या बॅण्डमध्ये सुंदररीत्या साधला आहे. ही शक्ती तर युक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे!!!
====================================
मागच्या आठवडय़ात उल्लेख केलेल्या ‘अय्या’च्या पाश्र्वसंगीताची नशा अजूनही उतरली नाहीय.. केवळ त्या सनईच्या धूनसाठी ‘अय्या’ ४-५ वेळा पाहून झाला तरीही! तसे आताशा पाश्र्वसंगीतासाठी पूर्ण चित्रपट पाहायची गरज असतेच असे नाही; पूर्वी ती असायची. जुन्या ‘डॉन’ची थीम (कल्याणजी-आनंदजी) आठवतेय? ‘शोले’ची थीम (आर डी बर्मन) ऐकण्यासाठी म्हणे लोक सिनेमागृहांत गर्दी करत असत; पण आजच्या काळात चित्रपटांचे पाश्र्वसंगीत किंवा बॅकग्राउंड थीम्स अथवा बॅकग्राउंड म्युझिक (BGM) आणि ओरिजिनल साउंड ट्रॅक्स (OST) ही गाण्यांबरोबरच प्रदíशत करायची पद्धत हिंदीमध्ये चांगलीच रुजू झाली आहे. अशाच बॅकग्राउंड थीम्सची प्ले लिस्ट..पाश्र्वसंगीत देणाऱ्यांमध्ये अग्रगण्य अशा नावांपकी एक म्हणजे संदीप चौटा. पन्नासहून अधिक चित्रपटांना पाश्र्वसंगीत दिलेल्या संदीप चौटांची राम गोपाल वर्माबरोबर खास गट्टी जमलेली दिसते. ‘कंपनी’, ‘कौन’ ‘सत्या’ अशा अनेक फिल्म्सना संदीप चौटाचे पाश्र्वसंगीत आहे. ‘कौन’ या भयपटाची बातच निराळी! चित्रपटात गाण्याची गरज असतेच असे नाही हे दाखवून देण्यासाठीच जणू हा सिनेमा काढला गेला आणि केवळ थरारक पाश्र्वसंगीताच्या जोरावर संदीप चौटाने तो यशस्वी केला. तसेच ‘कंपनी’चे. यात गाणी होती दोन-चार, पण लक्षात राहिले ते बॅकग्राउंड म्युझिकच! आणि ‘सत्या’चे बॅकग्राउंड म्युझिक तर जागतिक दर्जाचे वाटावे असे आहे. एक स्वाभिमानी, धूर्त, निर्दयी सत्या आणि एक शेजारणीवर मनापासून प्रेम करणारा सत्या अशी स्वभावातील दोन टोके दोन वेगवेगळ्या सांगीतिक ‘थीम्स’नी परिणामकारकरीत्या दाखवण्यात आली आहेत. गाण्यांपेक्षा जास्त लक्ष इॅट कडेच देणाऱ्या ‘आरजीव्ही’कडे अमर मोहिले यांनीसुद्धा काम केले आहे. ‘आरजीव्ही’च्या अनेक चित्रपटांसाठी पाश्र्वसंगीत दिले आहे. त्यातील लक्षवेधक चित्रपट म्हणजे ‘सरकार’ आणि ‘सरकार-राज’. ‘गोिवदा-गोिवदा-गोविंदा..’ या थीमचा अमर मोहिले यांनी फार सुंदर वापर करून भययुक्त आदर असणाऱ्या ‘गॉडफादर’चे अर्थात सरकारचे चरित्र आपल्यासमोर उलगडले आहे.राम गोपालांच्या ‘फॅक्टरी’मध्ये काम केलेले आणि उत्तमोत्तम पाश्र्वसंगीतासाठी जाणले जाणारे असे अजून एक नाव, खरे तर दोन नावे- सलीम-सुलेमान. राम गोपाल वर्माच्या ‘अब तक छप्पन’पासून नागेश कुकुनूरच्या ‘डोर’पर्यंत किंवा ‘धूम’पासून ते मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’पर्यंत अनेक चित्रपट सलीम सुलेमान या जोडीने आपल्या बहुरंगी पाश्र्वसंगीताने सजवले आहेत. त्यातले मला सर्वात आवडतात ते ‘डोर’ आणि ‘अब तक छप्पन’. ‘डोर’ची थीम ऐकताना तर प्रत्येक वेळी अंगावर काटा येतो!राम गोपाल वर्माबरोबर रेहमान या कॉम्बिनेशनचा ‘रंगीला’. ‘प्यार ये जाने कैसा है..’ गाण्याचा या चित्रपटात एका दु:खाच्या प्रसंगी केलेला वापर फारच सुंदर आहे. आपल्याच गाण्यांचा पाश्र्वसंगीतासाठी सुंदर वापर करणे हीच तर रेहमानची खासियत आहे आणि म्हणूनच ‘ज्या चित्रपटांमध्ये माझी गाणी असतील, त्याचे पाश्र्वसंगीतही माझेच असेल’, अशी रेहमानची अटच असते. पण रेहमान BGM साठी केवळ गाणीच वापरतो असेही नाही, ‘बॉम्बे थीम’, ‘वॉल्ट्स फॉर रोमान्स’ (लगान), ‘मौसम अँड एस्केप’, ‘लतिका’ज थीम’, ‘ओ साया’, ‘रायट्स’ (स्लमडॉग मिलिअॅनर), ब्लू थीम (ब्लू) अशा पाश्र्वसंगीताच्या अनेक थीम्स त्याने अजरामर करून ठेवल्या आहेत. या थीम्सबरोबरच ‘रंग दे बसंती’च्या इॅट चा मी दीवाना आहे. त्यात चंद्रशेखर आझाद जेव्हा रावण-दहनाच्या वेळी पोलिसांच्या हातून निसटतात तो सीन, किंवा सगळे गच्चीवर उभे राहून संरक्षणमंत्र्याच्या हत्येचा कट रचत असतानाचा सीन केवळ आणि केवळ अफाट. ‘युवा’ चित्रपटसुद्धा मी केवळ BGM साठी परत परत पाहत असतो. त्यातले ‘डोल डोल ना पाप्पे’ हे ‘लल्लन’ची धंद्यातील प्रगती दाखवताना वापरले गेलेले म्युझिक फारच भारी. विशेष करून त्यातल्या त्या बाईच्या आवाजात केलेल्या करामती!शंकर एहसान लॉय यांनीसुद्धा ‘दिल चाहता है’ आणि ‘तारे जमीं पर’च्या पाश्र्वसंगीतात कमाल केली आहे. विशाल-शेखरची ‘ब्लफमास्टर’ची थीम माझ्या फेव्हरेट्समध्ये आहे. ‘बर्फी’चे सिंफनीयुक्त पाश्र्वसंगीतसुद्धा (संगीतकार- प्रीतम) उल्लेखनीय आहे.
माँटी शर्मा या पाश्र्वसंगीतकाराने संजय लीला भन्साळीच्या सर्वच चित्रपटांमध्ये सिंफनीचा उत्तम वापर सुंदररीत्या केला आहे. विशेषत: ‘ब्लॅक’ची थीम. या चित्रपटाचा लुक हॉलीवूडपटासारखाच असून म्युझिकसुद्धा त्याला साजेसे आहे. पुढची प्ले लिस्ट हॉलीवूडमधल्या पाश्र्वसंगीताविषयी..पण जाता जाता एका हॉलीवूडपटाचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. तो चौकटीत वाचा.
==============================
कोजागरी पौर्णिमा. वर्षांतले सर्वात सुंदर चंद्र दर्शन. वर्षांतली सर्वात सुंदर रात्र! शुभ्र चांदणे, हळूहळू लागणारी थंडीची चाहूल, गार, गुलाबी होत जाणारा मंद वारा, घट्ट मसाला दूध आणि सोबतीला खास रात्रीची, चंद्राची गाणी! चंद्र.. जणू एक न संपणारी वहीच. जिच्यावर कितीही कविता लिहिल्या तरी ती भरतच नाही. कवी-गीतकार लोकांचा अगदी हुकमाचा एक्का. शकील बदायुनी साहेबांचे ‘चौधवी का चाँद’.. रफीसाहेबांचा रेशमी आवाज. आहाहा! असेच प्रेयसीच्या सौंदर्याला ‘चौधवी के चाँद’ची उपमा असलेले माझे अजून एक खूपच आवडते गाणे म्हणजे इब्न-ए-इन्शा या शायरची ‘कल चौधवी की रात थी, शब् भर रहा चर्चा तेरा; किसने कहा वो चाँद है, किसने कहा चेहरा तेरा..’ ही गम्जम्ल. ही जगजीतजी आणि गुलाम अली खाँसाब दोघांनी वेगवेगळ्या चालीत गायली आहे. दोन्ही आवृत्त्या जगप्रसिद्ध आहेत. गुलाम अली साहेबांची मला जास्त आवडते. त्यात कौतुकाबरोबरच एक लडिवाळ, काहीसा खटय़ाळ भावसुद्धा डोकावतो. याची ‘यूटय़ूब’वर वेगवेगळ्या मैफलीतले रेकॉर्डिग्स आहेत. प्रत्येक रिकॉर्डिगमध्ये वेगवेगळी मजा आहे.
प्रेयसी आणि चंद्र यांचा मेळ घालणारे अजून एक अप्रतिम गाणे म्हणजे देवदास (२००२) मधले ‘वो चाँद जैसी लडम्की इस दिलपे छा रही है..’ उदित नारायणजींचा धबधब्याच्या तुषारांसारखा आवाज, नुसरत बद्र यांचे शब्द, इस्माइल दरबारचे संगीत आणि भारतीय सिम्फनीचा उत्तम नमुना असलेले संगीत संयोजन. ‘चंदा रे चंदा रे कभी तो जमीं पर आ..’ हरिहरन, साधना सरगम, जावेद अख्तर आणि ए. आर. रेहमान.. क्या बात! ‘एआरआर’चे एक फारच भारी रात्रीचे गाणे- ‘खामोश रात..’ ‘तक्षक’ चित्रपटातले. मेहबूब यांचे शब्द, रूपकुमार राठोड यांचा मऊ मुलायम आवाज, सरगम, गिटार.. फारच वरचे गाणे आहे हे. गंमत म्हणजे या गाण्याचे रेकॉर्डिगसुद्धा चेन्नईमध्ये रात्री २ ते ५ या वेळेत झाले होते! रात्रीची माझी अजून काही आवडती हिंदी गाणी म्हणजे – ‘फिर वही रात है’ (किशोरदा, आरडी बर्मन), ‘रात का समा’ (हसरत जयपुरी, एसडी, दीदी- ‘जिद्दी’) ‘चाँद फिर निकला’ (मजरूह, एसडी, दीदी- ‘पेइंग गेस्ट’) आणि खास शंकर जयकिशनशैली मधील, उत्कट, सुरेल चालीच्या जोडीला सिम्फनीचा सुरेल वापर असलेली दोन गाणी- ‘ये रात भीगी भीगी’.. मन्नाडे आणि दीदी, दीदींचा कमाल ओवरलॅपिंग आलाप आणि ‘रात के हमसफर’ रफीसाब आणि आशाताईंचे अजब रसायन.
मराठीतली काही आवडती रात्र गाणी म्हणजे- ‘शुक्रतारा मंद वारा’, ‘चंद्र आहे साक्षीला’ आणि अर्थात बाळासाहेबांचं- ‘चांदण्यात फिरताना’- आशाताई, बासरीचा काय सुंदर वापर! ‘धरलास.. हात’ मधली चालीतील उडी, एकूणच अचंबित करणारी चाल. सुरेश भटांचे ‘श्वास तुझा मालकंस स्पर्श तुझा पारिजात’, ‘काजल रातीनं ओढून नेला..’ पुन्हा आशाताई, सुधीर मोघ्यांचे शब्द आणि हॉण्टिंग चाल! दीदींनी गायलेले ‘सुन्या सुन्या मैफिलित माझ्या.. अजूनही चांद रात आहे..’ पुन्हा एकदा सुरेश भट. सुरेश भट-पंडित हृदयनाथ मंगेशकर जोडीचे सर्वात भारी, केवळ बाप गाणे- ‘तरुण आहे रात्र अजूनी’! खरे तर हे एकटेच गाणे एक प्लेलिस्ट आहे! भावोत्कटतेची सर्वोच्च पातळी, आशाताईंचा आर्त स्वर, ‘बिलासखानी तोडी’चे सूर, हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीचे वेड लावणारे पीसेस.. हे एकच गाणे किती तरी वेळा मी रात्रभर ऐकत बसलो आहे. या गाण्याची अनेक इंटरप्रिटेशन्स आहेत. कोणी म्हणते हे प्रियकराच्या मृत्यूवर लिहिलेले आहे, तर कोणी अजून काही. खुद्द बाळासाहेबांनी मात्र हे स्पष्ट केले आहे की हे एक शृंगारगीतच आहे किंबहुना शृंगार-गम्जम्ल आहे. मला हे गाणे प्रत्येक वेळी वेगवेगळी प्रेरणा देते. कधी कधी हे गाणे ऐकताना जाणवते की, आपण किती छोटे आहोत! असली निर्मिती आपल्याच्याने होणे बापजन्मात शक्य नाही. हताश व्हायला होते. तर कधी उलटे हरल्यासारखे, काही करू नये असे वाटले की, हे गाणे म्हणते, ‘एवढय़ातच त्या कुशीवर वळलास का रे? सांग या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू?’ असे म्हणून ते विचारते.. मोठमोठी स्वप्ने पाहिली आहेत, त्यांना काय उत्तर देणार? ‘रातराणीच्या फुलांचा गंध तू मिटलास का रे?’मधून हे गाणे मला या जगाकडे सौंदर्यदृष्टीने पाहायला सांगते. हे गाणे ऐकून झाल्यावर प्रत्येक वेळी एक नवा मी मला सापडतो.
योगायोगाने कोजागरी २७ तारखेला आणि बाळासाहेबांचा वाढदिवस २६ तारखेला आलाय. त्यामुळे पुढच्या आठवडय़ात पुन्हा बाळासाहेबच!
हे ऐकाच..
गुलजारांची ‘नज्म्म’कोणी आज चंद्रावर गेले, गुलजारसाहेबांचे एक घर नक्कीच सापडेल. गुलजारसाहेब जणू चंद्रावरच राहतात आणि त्यांच्या काव्याचा चंद्राशी वरचेवर संबंध येतच असतो. गुलजारसाहेबांच्या कवितांचा असाच ‘नज्म्म’ नावाचा अल्बम आहे. त्यात ४०च्या वर कविता गुलजार यांनी स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड केल्या आहेत. जवळजवळ प्रत्येक कवितेत चंद्र, रात्रीचा उल्लेख आहेच. नक्की ऐका. गुलजारसाहेबांच्या आवाजातले काव्यवाचन म्हणजे जणू गाणेच!
============================================
उगाचच जुन्या कपाटाचे कप्पे उचकत बसलो होतो आणि एक जुनी कॅसेट हाती लागली. आबिदा परवीन यांनी गायलेल्या गझलांची. मी लहान असताना दर शनिवार रविवार आमच्याकडे लागलेली असायची. माझे तेव्हा फार काही कळायचे वय नव्हते, तरीही मी ते ऐकून तल्लीन होऊन जायचो. अगदी न कळणाऱ्या वयापासून मला वेगवेगळे संगीत ऐकवल्याबद्दल मी माझ्या आई-बाबांचा आणि नित्यनियमाने पाकिस्तान रेडिओ ऐकणाऱ्या माझ्या आजोबांचा प्रचंड ऋणी आहे. आजच्या काळातही टेप रेकॉर्डर चालू अवस्थेत असलेल्या माझ्या एका मित्राच्या घरी जाऊन मग मी ही कॅसेट दोन-तीन वेळा ऐकून काढली, तेव्हा कुठे समाधान पावलो.
‘कू ब कू फैल गयी बात शनासाई की
उसने खुशबू की तरह मेरी पझेराई की..’
किंवा-
‘जबसे तूने मुझे दीवाना बना रखा है
संग हर शाक़स ने हातोंमे उठा रखा है..’
नंतर- ‘वो हमसफर था मगर उससे हम- नवाई ना थी..’ मग- गालिबची- ‘हर एक बातपे कहते हो तुम के तू क्या है..’
काहीशी कव्वाली अंगाकाडे झुकणारी ही आबिदाची गज़्ाल गायकी, उस्ताद नुसरत फतेह अली खान साहेबांशी बरीच मिळतीजुळती. थोडासा फरक हाच की खान साहेबांचे गाणे जास्त अभिजात(किंवा शास्त्रीय) संगीताकडे झुकणारे आणि आबिदाचे तल्लनतेकडे!
पुढे थोडा मोठा झाल्यावर हे लक्षात आले की, आबिदाचा मूळ पेशाच ‘तल्लीनता’ हा आहे. कारण तिच्यात सूफी गायकी मुख्य आहे, गज़्ाल तर तोंडी लावायला आहे. ढोबळ मानाने सूफी म्हणजे काय? तर ‘त्या’ला म्हणजे ईश्वर/ अल्लाह जो कोणी असो, त्याला आपला प्रियकर मानून प्रेमाच्या मार्गाने त्याची साधना करणे. आबिदा या प्रेमात नखशिखांत बुडलेली दिसते. तिने गायलेले ‘बुल्लेशाह’चे सूफी क़लाम (‘दमादम मस्त कलांदर’, ‘तेरे इश्कनाचाया’..‘अरे लोगो तुम्हारा क्या? म जानु मेरा खुदा जाने..’, ‘एक नुक़ते वीच गल मुकदी ए’, ‘बुल्ले नु समझावण आया..’) याचाच प्रत्यय देतात. ‘ओ मिया..’ नि आबिदा गायला सुरुवात करते आणि ती आणि तिचा प्रियकर गप्पा मारत राहतात. साक्षीदार मात्र राहून अनुभव घेत राहणे एवढेच काय ते आम्हा श्रोत्यांच्या हाती उरते. ‘आलात? या.. बसा. ऐका हवं तर..बाकी म जानु मेरा खुदा जाने!
हे ऐकाच..
बुल्लेशाहव्यतिरिक्त आबिदाने कोळून प्यायलेला अजून एक संत म्हणजे कबीर. ‘कबीर बाय आबिदा’ हा अल्बम आवर्जून ऐकायला हवा असा आहे. कबिराचे काही निवडक दोहे (‘मन लागो यार फकिरी मे’, ‘साहेब मेरा एक है’, ‘भला हुवा मेरी मटकी फून्टी रे’ , ‘सोऊ तो सपने मिलू.’) पालुपदी घेऊन बाकी दोहे त्यात माळेसारखे गुंफून आबिदा आपल्यासमोर घेऊन येते! या अल्बमचे सादरकत्रे आहेत गुलजार साहेब! त्यामुळे प्रस्तावनेत गुलजार साहेबांचा आवाज आणि गाण्यात आबिदाचा; अशी डबल ट्रीट आपल्याला अनुभवता येते. प्रस्तावनेतील काही ओळी सांगून थांबतो –
‘रांझा रांझा करदी हुण म आपही रांझा होई.. सूफियों का कलाम गाते गाते आबिदा परवीन खुद सूफी हो गयी. उनकी आवाज़्ा अब इबादत की आवाज़्ा लगती है. मौला को पुकारती है तो लगता है की हां, इनकी आवाज जरूर उस तक पहुचती होगी.
वो सुनता होगा- सिदक सदाकत की आवाज़्ा. ‘माला कहे है काठ की; तू क्यूँ फेरे मोये; मन का मनका फेर दे; तो तुरत मिला दूँ तोये..’ आबिदा कबीर के मार्फत पुकारती है उसे, हम आबिदा के मार्फत उसे बुला लेते है’
‘कबीर को पढते जाओ- परत खुलती जाती है. आबिदा को सुनते रहो- सूरत खुलती जाती है. ध्यान लग जाता है, इबादत शुरू हो जाती है, आँखें अपने आप बंद हो जाती है. कभी इन्हे सामने बठ के सुनें. आँखें खोलो तो बाहर मे नजर आती है, आँखे मुन्दो तो अंदर मे..’
===========================
३० एप्रिल ही खळेकाकांची म्हणजेच संगीतकार श्रीनिवास खळे यांची जयंती. खळेकाकांच्या चालीव म्हणजे ऐकताना अतिशय गोड वाटणाऱ्या, लक्षात राहतील अशा; पण गायला.. गायलाच काय नुसते गुणगुणायला जरी गेलो तरी घाम फुटेल अशा चाली. मराठी संगीताचे प्रतिनिधित्व करणारे असे हे आपले खळेकाका.
खळेकाकांची आणि माझी पहिली भेट झाली ती वसंतरावांमुळे! हो.. ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात’मुळे. एकतर तोपर्यंत मी वसंतराव देशपांडे यांची फक्त नाटय़गीते, शास्त्रीय मफिली, ठुमरी-दादरा असेच ऐकले होते. त्यांच्याकडून असे एक भावगीत ऐकायला मिळणे हा एक सुखद धक्का होता. ते भावगीतही प्रचलित चालींपासून हटके असे. मग त्यांनी अजून एक बाण काढला भात्यातून. ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे..’ बापरे! या गाण्याबद्दल असा प्रश्न पडतो की आधी काय? म्हणजे हे गाणे बनताना सर्वात आधी काय ठरले असावे? गायक? चाल? की शब्द? कारण वसंतरावांच्या आवाजातल्या नसíगक कंपनांचा या गाण्यात असा काही वापर झालेला आहे की असे वाटून जाते की, त्या कंपनांना न्याय देण्यासाठी चाल झाली असावी आणि चालीला न्याय देण्यासाठी गीत आले असावे. असा उलटा प्रवास झालाय की काय, असे वाटून जाते.
एकूणच खळेकाकांची सगळीच गाणी अशी आहेत की ती त्या म्हणजे त्याच गायक/गायिकेने गावे.. जसे लतादीदींचे ‘जाहल्या काही चुका..’ अंगावर काटा श्रेणीतले गाणे! ‘काही’ची किंवा ‘गायिले’ची जागा फक्त दीदीच घेऊ जाणे! चाल बांधतानाच अशी जागा त्यात आणणे एखाद्या संगीतकाराला कसे काय जमू शकते? लता मंगेशकर हे नाव डोक्यात ठेवूनच हे गाणे तयार झाले असणार यात शंका नाही. लतादीदी आणि खळेकाका यांची सगळीच गाणी एकेका गाण्यावर पीएचडी करावी अशी आहेत. काही उदाहरणे म्हणजे – ‘या चिमण्यांनो.’ त्यात विशेष करून कडव्याची चाल.. कडव्याच्या शेवटी परत मूळ ध्रुवपदाच्या चालीकडे येणे.. अफाट!
‘नीज माझ्या नंदलाला’ – आपण मोठे का झालो? लहानच राहिलो असतो तर काय बिघडले असते? काय तो मातृत्वाचा भाव, काय ती आर्तता.. हे गाणे एकदा ऐकून मन भरतच नाही.
‘श्रावणात घन निळा बरसला’- या गीताच्या ओळी नुसत्या वाचल्या तर याचे गाणे बनू शकते यावर विश्वासच बसणार नाही! या गीताला छंद किंवा वृत्त नाही. यातले शब्द ज्या पद्धतीने छोटय़ा छोटय़ा पॉझेसचा वापर करून बसवण्यात आले आहेत त्याची गंमत ते गाणे गुणगुणायला घेतल्यावरच लक्षात येते आणि परत ती ‘पसारा’ची जागा.. न सुटणारे कोडे!
‘सुंदर ते ध्यान’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’, ‘खेळ मांडियेला’, ‘भेटी लागे जीवा’ हे अभंग तितकेच तन्मयतेने ऐकावे. ‘भेटी लागे जीवा’मध्ये लयीत जे शब्द ओढून मोठे केलेत, त्यामुळे ती भेटीची उत्कंठा शिगेला पोहोचल्याचा, ती आस लागली असल्याचा भाव फारच प्रभावीरीत्या आपल्यासमोर येतो.
बाळासाहेबांनी म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी दुसऱ्या संगीतकाराकडे तशी अभावानेच गाणी गायली आहेत. त्यातलीच दोन गाणी म्हणजे ‘लाजून हासणे’ आणि ‘गेले ते दिन गेले.’ बाळासाहेबांमधला त्यांनाही न सापडलेला गायक खळेकाकांना नक्कीच सापडलाय, असे वाटते.
बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी गायलेले काकांचे ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे’ हे गाणेही बाबूजींनी गायलेल्या इतर गाण्यांपेक्षा वेगळे वाटते. सुरेश वाडकरांची गायकीसुद्धा काकांनी आपल्या काही गाण्यांत फार सुंदररीत्या वापरली आहे. जसे- ‘काळ देहासी आला काउ’- त्यात ‘का’ आणि ‘दे’ला लांबवण्याची पद्धत आणि ‘जेव्हा तुझ्या बटांना’मधली ‘वारा’ची जागा किंवा ‘धरीला वृथा छंद’ हे झपतालातले गाणे वाडकरजींच्या उपशास्त्रीय गायकीला न्याय देणारे असेच आहे.
अण्णा.. अर्थात भीमसेन जोशी यांनी गायलेले तुकोबांचे अभंग तर विचारायलाच नकोत! रागदारीचा आधार आणि भावोत्कटता याचा संगम या सगळ्या चालींमध्ये दिसतो. ‘याजसाठी केला होता अट्टहास’, ‘राजस सुकुमार’, ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे अभंग परत परत ऐकावेत, ऐकतच राहावेत असेच.
खळेकाकांनी लहान मुलांसाठीही काही कमालीची भारी गाणी केली आहेत. त्याविषयी पुढे कधीतरी बोलणे होईलच.
हे ऐकाच.. :
शंकरजींची बगळ्यांची माळ
खळेकाका हे शंकर महादेवन यांचे गुरू आहेत. शंकर महादेवन यांच्या गायकीतून, चाल लावण्याच्या पद्धतीतून क्वचितप्रसंगी काकांची आठवणही येते. शंकरजींनी ‘नक्षत्रांचे देणे’च्या खळेकाकांवरील कार्यक्रमात आणि इतरही काही कार्यक्रमांमध्ये ‘बगळ्यांची माळ फुले’, ‘राहिले ओठातल्या ओठात’, ‘उगवला चंद्र पुनवेचा’, ‘लाजून हासणे’ ही गाणी गायलेली आहेत. ती यूटय़ूबवर उपलब्ध आहेत. शंकरजींच्या गायकीत ही गाणी ऐकणे म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. हे व्हिडीओ न चुकता आवर्जून अनुभवावे असेच.
=============================