पाकिस्तानमध्ये कराचीत यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. कराचीत गणेश चतुर्थीला गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. कराचीत मोठ्या भक्ती भावात गणपतीची स्थापना करून पूजा आरती करण्यात आली. हजारो हिंदू कुटुंबांनी यावेळी गणरायाच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. कराचीत गणपती बाप्पाची स्थापना मंडपात होत नाही. तर तेथील विविध मंदिरांमध्ये बाप्पाला विराजमान केलं जातं. कराचीत गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद नसतो. तर मोतीचूरचे लाडू आणि शिऱ्याचा प्रसाद चढवला जातो.
यंदा गणोशोत्सवात कराचीत गणरायाच्या मोठ-मोठ्या मूर्तीही दिसून आल्या. कराचीतील दिल्ली कॉलनी, मद्रासी पाडा, जिना कॉलीन, सोल्डर बाजार आणि क्लिफ्टॉन या ठिकाणी किमान दहाच्या वर गणपतींची स्थापना करण्यात आली. घुरगुती आणि मंडाळांच्या मिळून दरवर्षी किमान 25 ते 30 गणपतींची स्थापना करण्यात कराचीत केली जाते. तसंच कुठलीही अनुचित घटना होऊ नये यासाठी उत्सवादरम्यान कडक सुरक्षाही असते.
कराचीत काल विसर्जन मिरवणूक काढून पुढच्या वर्षी लवकर या म्हणत सात दिवसांच्या गणपती बाप्पाला उत्साहात निरोप देण्यात आला. मंडळाच्या आणि घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. मोठ्या मूर्तींचे विसर्जन कराचीच्या समुद्रात बोटीने नेऊन केले जाते. तर घरगुती गणपतींचे विसर्जन नदीत किंवा तवालांमध्ये करण्यात येते.